ओव्या – माहेरच्या नि सासरच्या

माझ्या लहानपणी आई बरेचदा जात्यावर दळत असे, आणि दळताना ओव्याही म्हणत असे. जात्यावर बसल्यावर ओवी सुचते हे मला तेव्हापासूनच खरे वाटत आले आहे.

दिवाळीच्या सणा

दिवाळीच्या सणा । माघारी नाही आला । कामाच्या पसार्‍यात । भाऊ माझा विसरला ॥१॥

दिवाळीच्या सणा । दोन ओळी आली चिठी । माहेरीचे प्रेम । जशी साखर ही पिठी ॥२॥

दिवाळीच्या सणा । निळा आला ग लखोटा । माहेरीचे प्रेम । दूध भरून वाहे लोटा ॥३॥

दिवाळीच्या सणा । मला आला ग निरोप । माहेरी अंगणी । मी ग तुळशीचे रोप ॥४॥

दिवाळीचे आमंत्रण । आला जासूद घेऊन । सासर गे माझे । झाले थक्क हे पाहून ॥५॥

माघारी ग आला । माझ्या माहेरीचा वात । दारीचा ग चाफा । मला फुलून सांगत ॥६॥

दिवाळीच्या सणा । मला बोलावणे आले । येईना मला जाता । मी ग संसारी गुंतले ॥७॥

  • मंगला द. मुंडले (१२/११/१९६६)

बीजेची ओवाळणी

बीजेची ओवाळणी । मला कापड रेशमी । बघा माझ्या वहिनीची । पसंती ग नामी ॥१॥

बीजेची ओवाळणी । साडी खण जरी काठी । वहिनीही आहे माझी । किती मनाची ग मोठी ॥२॥

बीजेची ओवाळणी । मज नको साडी चोळी । येता मी माहेराला । प्रेमे घास मज वाढी ॥३॥

बीजेची ओवाळणी । मज नको शालू शेले । माहेरीच्या प्रेमासाठी । मन सदा भुकेलेले ॥४॥

बीजेची ओवाळणी । नको सोने चांदी मोती । माझ्या माहेराची सदा । मजवरी राहो प्रीती ॥५॥

बीजेची ओवाळणी । मज नको काही धन । तुम्हा सर्वांच्या येण्याने । आनंदुनी जाई मन ॥६॥

बीजेची ओवाळणी । मज नको काही दुजी । तुम्हा सर्वांच्या कीर्तीने । मी ग सदा आहे राजी ॥७॥

  • मंगला द. मुंडले (१२/११/१९६६)

दिवाळीची भेट

भाऊ माझा दूर किती । नको चिंता त्याची गडे । आई वहिनी भाचवंडे । सारी असती एकीकडे ॥१॥

आई माझी परदेशी । भाऊ गेला ग घेऊन । सारी करती कौतुक । किती सांगू मी म्हणून ॥२॥

परदेशी भाउराया । वहिनी चाले त्यापाऊली । नातवंडांना करीते । माय माझी ही साऊली ॥३॥

भाऊबीजेच्या ग सणा । भाऊ माझा परदेशी । माझी खुशाली विचारी । त्याचे पत्र आठा दिशी ॥४॥

भाऊबीजेच्या ग सणा । भाऊ माझा दूरदूर । आठा दिशी नाही पत्र । लगोलग येई तार ॥५॥

भाऊबीज आहे म्हणुनी । नको मला जवाहीर । एका प्रेमाच्या शब्दाची । मला पुरे रे पाखर ॥६॥

भाऊबीज आहे म्हणुनी । मला नको काही काही । मायदेशी परतोनी । तुम्ही यावे लवलाही ॥७॥

नको मला भाऊबीज । पत्र पाठव खुशाल । तुम्हा दोघांच्या कीर्तीची । मी रे पांघरीन शाल ॥८॥

तुम्हा दिवाळीची भेट । पाठवीत नाही दुजी । जावो दिगंतरा कीर्ती । एक हीच इच्छा माझी ॥९॥

  • मंगला द. मुंडले (१४/१०/१९६९)

सासरच्या ओव्या

नवा संसार

पहिली माझी ओवी । पडे संसारी पाऊल । जागा नसे राहायाला । दूर काढीली सहल ॥१॥

दुसरी माझी ओवी । दुजाभाव नाही ठावा । एका जागी राहातसू । सासू-श्वसुर दीर जावा ॥२॥

तिसरी माझी ओवी । तिजे प्रहरी येई पाणी । लागे खालून भराया । उभे नयनात पाणी ॥३॥

चवथी माझी ओवी । चार प्रकार भोजनास । आळीपाळीने रांधता । नाही कंटाळा कोणास ॥४॥

पाचवी माझी ओवी । पाच वाजता येई स्वारी । चहापान ग करूनी । जाण्या सिद्धता बाहेरी ॥५॥

सहावी माझी ओवी । सहा वाजले ना कळे । असता स्वारी संगे । दिन टळला हे ना कळे ॥६॥

सातवी माझी ओवी । जेव्हा वाजतात सात । घरी परताया उशीर । उभे मामंजी दारात ॥७॥

आठवी माझी ओवी । जेव्हा आठ ग वाजती । आम्ही बसतो भोजनास । सासु सासरे संगती ॥८॥

नववी माझी ओवी । नउ वाजती रातीचे । काम सगळे संपवूनी । सूर ऐकू संगीताचे ॥९॥

दहावी माझी ओवी । दशांगुळे परमेश्वर । पाठ टेकीता धरणीला । करी तया नमस्कार ॥१०॥

  • मंगला द. मुंडले (४ जून १९६९)

Hits: 46

You may also like...

2 Responses

  1. Asavari S Joshi says:

    वाह ! माझा ९४ वर्षीय आजीला नक्की पाठविन. तिला आवडेल वाचायला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *