डबल्यू की डबलव्ही?

इंग्रजीतील “W” या अक्षराला डब्ल्यू किंवा “double U” म्हणतात, पण ते लिहिले जाते दोन “V” जोडून! इतर अक्षरांना जशी ए, बी, सी, डी अशी विशेष नावे आहेत तसे या अक्षराला का नाही? रीडर्स डायजेस्ट, जानेवारी २००९ (पृ. १४) च्या अंकात कोणीतरी हा विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर आले आहे. या कात्रणाचे चित्र खाली दिले आहे. जाणकार वाचक हा मजकूर वाचून पाहातीलच. पण या उत्तराने माझे मात्र समाधान झाले नाही.

पहिली गोष्ट म्हणजे ज्या AskOxford.com या वेबसाइटचा त्यांनी दाखला दिला आहे ती आज उपलब्ध नाही. पण हा काही उत्तर देणार्‍यांचा दोष नव्हे. गेल्या तेरा वर्षांत थेम्समधून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. त्यात कदाचित ही वेबसाइट पण वाहून गेली असेल. पण २००९ साली ही वेबसाइट होती व त्यांनी दिलेले स्पष्टीकरण या वेबसाइटवरूनच आले आहे असे आपण गृहीत धरू.

इंग्लिश भाषा लॅटिन मुळाक्षरे वापरते. आणि “लॅटिन मुळाक्षरांत जुन्या इंग्रजीतील “व” या उच्चारासाठी मुळाक्षरच नाही” हे वरील स्पष्टीकरणातील विधान खरेच आहे. Collins Latin Dictionary मध्ये W अक्षराने सुरू होणारे शब्दच नाहीत. पण इथे हेही सांगितले पाहिजे की पाचव्या शतकात रोमन साम्राज्य लयाला गेले. लॅटिन भाषा केवळ उच्चशिक्षणापुरती किंवा महाजनांपुरतीच उरली, आणि जानपद भाषा वापरात येऊ लागल्या. त्यानंतर सातव्या शतकात, जेव्हा छपाई नव्हती आणि पुस्तके चक्क लिहिली जात, तेव्हा पुस्तक लेखक हा वर्ग उदयाला आला. या लेखकांपैकी कुणा कल्पक माणसाने “व” या उच्चारासाठी “uu” ही द्व्यक्षरे वापरात आणली हे स्पष्टीकरणही योग्यच. आजही इंग्रजीच्या वळणदार लिपीत (cursive writing) लिखित “w” हे अक्षर जोडलेले दोन “uu” असेच दिसते. (शेजारील चित्र पाहा.)

स्पष्टीकरण पुढे म्हणते की “जुन्या इंग्रजीत (?) “uu” ऐवजी “wynn” हे अक्षर [चिन्ह ƿ] वापरायला सुरुवात केली पण ते टिकले नाही. पण युरोपमधील लेखक मात्र “uu” हे चिन्हच वापरत राहिले”. प्रस्तुत प्रश्नासंदर्भात ही माहिती तशी गैरलागू आहे. त्याऐवजी इथे “व” हा उच्चार व “uu” हे चिन्ह यांत संबंध काय किंवा “व” या उच्चारासाठी “uu” का? या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित होते, ते मिळत नाही. ते देण्याचा आपण पुढे प्रयत्न करूच.

सन १०६६ मध्ये नॉर्मनवंशीयांनी इंग्लंड पादाक्रांत केला, आणि “व” या उच्चारासाठी “uu” ही रचना युरोपातून इंग्लंडमध्ये आली. इथपर्यंत ठीक. पण “छापखान्यात “w” या अक्षरासाठी खिळा नसल्याने “vv” किंवा “v” या अक्षराचे दोन खिळे शेजारीशेजारी वापरले गेले” ही माहिती देताना थोडी गफलत होते आहे असे वाटते. म्हणायचे डबल्यू आणि छापायचे मात्र डबलव्ही हा काय प्रकार? हाती लिहिताना डबल्यू हा खरोखरीच दोन जोडलेले “uu” असावेत असाच दिसत असला तरी छपाईत “u” ऐवजी “v” का? हा दुसरा प्रश्न.

मी काही भाषातज्ज्ञ नाही, पण मला उमगलेली उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

अगोदर या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. छपाईचे तंत्र सुरू होण्याआधी हाती लिखाणात डबल्यू कसा होता हे आपण वर पाहिले. पण पाचव्या शतकापर्यंत रोमन इमारती, स्मारके किंवा शिलालेख यांवरही लॅटिन भाषेत व रोमन लिपीत मजकूर कोरला जात असे. तिथे “U” हे अक्षर “V” असेच लिहिले जाई. बुल्गारी या ब्रॅंडच्या नावातील U हे अक्षर पूर्वपरंपरेला धरून आजही V असेच लिहिलेले दिसते. Collins Latin Dictionary देखील सांगते की “capital U” हे अक्षर “V” असेच लिहिले जात असे.

छापखान्याचा शोध लागला तेव्हा सर्वच ज्ञान लॅटिनमध्ये उपलब्ध असल्याने लॅटिनच्या छपाईसाठी खिळे बनवले गेले. त्यांचे एक चित्र इथे दिले आहे. इंग्रजीसाठी याच खिळ्यातून “uu” हे अक्षर जमवताना “vv” अशी दोन खिळे वापरणारी तडजोड झाली. यथावकाश इंग्रजी छपाईसाठी डबल्यू ह्या अक्षराचा खिळा नव्याने “w” असा बनला तो जुन्या “vv” शी साधर्म्य राखतच. तसेच त्याचे डबल्यू हे नावही टिकून राहिले. व डबल्यू हे इंग्रजी अक्षर लॅटिन परंपरेमुळे छपाईत डबलव्ही सारखे दिसू लागले.

आता पहिला प्रश्न – “व” या उच्चारासाठी “uu” असा लिहिलेला वा “w” असा छापलेला डबल्यूच का? मला सुचणारे उत्तर असे. परंपरेने “u” या स्वराला दोन उच्चार आहेत जसे की “put” (पुट्) किंवा “but” (बट्), म्हणजेच उ आणि अ. किंबहुना इंग्रजीत “put” (विविध प्रकारे ठेवणे हा अर्थ व उच्चार पुट्) याच्याच जोडीने “putt” (गोल्फचा चेंडू हळूच ढकलणे हा अर्थ व उच्चार पट्) असे “u” या स्वराचे दोनही उच्चार दाखवणारे स्वतंत्र शब्दही आहेत. (Oxford Advanced Learner’s Dictionary)

आता डबल्यू “uu” मधील पहिल्या “u”चा उच्चार “उ” धरला आणि दुसर्‍या “u”चा उच्चार “अ” धरला की “उअ” असा एकापुढे एक उच्चार करताना, म्हणजेच संधि करताना “व” असा उच्चार होतो. करून बघा. संस्कृतच्या व्याकरणकारांना उच्चारशास्त्राचे हे नियम फार पूर्वीपासून माहिती होते. (First book of Sanskrit, Sir R. G. Bhandarkar) याच न्यायाने aqua या शब्दातील q म्हणजे ku, ku मधील u व नंतर येणारा u असे double u धरले aqua या शब्दाचा उच्चार ॲक्वा असाच होतो. किंबहुना qu या जोडगोळीचा नेहेमीच क्व असा उच्चार होतो.

हाच न्याय चालवायचा तर vacuum या शब्दाचा उच्चार वॅक्वम असा झाला पाहिजे. पण लॅटिन भाषा मात्र “uu” या जोडगोळीतील दोन्ही “u” चा उच्चार उ असाच करते. पहिला “उ” “क”ला जोडून, दुसरा “उ” तसाच ठेवून, “वाकुउम” असा उच्चार करते. लॅटिनला “u”चा “अ” हा उच्चार अमान्य दिसतो.

पण “vacuum” हा शब्द इंग्रजीत आणताना इंग्रजाने “uu” चा “व” हा उच्चार करण्याचा इंग्रजी नियम स्वीकारलेला दिसत नाही. लॅटिनमध्ये व हा उच्चार नसल्याने लॅटिनमधून आलेल्या शब्दाचे लॅटिनी आगळेपण जपण्यासाठी इंग्रजीने “uu” हा डब्ल्यू धरून “व” असा उच्चार करणे टाळले असावे. त्याऐवजी पहिल्या “u” या अक्षराला “यू” हा स्वरमिश्रित व्यंजनोच्चार आणि दुसर्‍या “u”चा उच्चार “उ” धरून “वॅक्यूम” असाच खास इंग्रजी उच्चार पत्करलेला दिसतो. जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

कसेही असो ! भाषेच्याही बाबतीत “शास्त्रात् रूढिर्बलीयसी” हेच खरे !!

विश्वास द. मुंडले

Hits: 2

You may also like...

1 Response

  1. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    २६मुळाक्षरे किती कमी पडतात ते दिसते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *