आमचे पाटणकर सर

मित्रहो, मी प्रकाश सुर्वे. मी दर वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या रम्य बालपणाच्या व आपल्या गुरु जनांनाच्या कडू गोड आठवणी मी एक तरी लहानसे स्फुट लेख लिहून आपल्या बरोबर Share करतो. पण यावेळी मी माझा दुसरा अनुभवही आपल्या समोर मांडणार आहे स्वतः कारण मी नुकत्याच एका ओढवून घेतलेल्या आजारातून सहीसलामत वाचलो. त्यामुळे जे कांही उस्फुर्तपणे सुचते आहे ते आजच मांडणे हे उत्तम. नाहीतर उद्या सांगीन म्हणून मनातच ठेवले तर मनाला नक्कीच टोचणी लागत राहील.

आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला गुरुवर्य श्री. बा. पाटणकर सरांचे पुण्यस्मरण करून त्यांना त्रिवार वंदन करीत त्यांच्या बद्दलच्या कांही खास स्मृतींना उजाळा द्यावा असे वाटते. आपल्या शिष्यांना तरबेज करण्याचे ध्येय मनाशी बाळगून त्यासाठी झापाटल्यासारखे परिश्रम घेणारे शिक्षक (गुरु) श्री. बा. गो. पाटणकरसर आम्हाला लाभले हे मी आमचे परम भाग्य समजतो. सर हे हाडाचे शिक्षक (छडी लागे छम छम पठडीतले). आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी शिकवलेल्या खेळात तरबेज वाहावे ही त्यांची जबरदस्त इच्छा असे.

त्यावेळी खो-खो चा हंगाम हा ऎन थंडीत दिवाळीची सुट्टी पडली की चालू होत असे. सर आम्हाला खेळाच्या सरावा साठी सकाळी ५.३० लाच बोलवत. सरांना सरावासाठी विद्यार्थ्यांनी उशीरा आलेले बिलकुल खपत नसे. सर स्वतः साडे पांच च्या आधीच हजर असत त्यामुळे आम्ही सकाळी पांच च्या अगोदरच मैदानात हजर असत असू. थंडीचा मौसम असल्याने मग कोंडाळे करून शेकोटी करत, सर येई पर्यंत आमचे warming up ही होत असे. सरांना खेळताना कोणी टंगळ मंगळ किंवा हलगर्जी पणा केलेला खपत नसे. असा कोणी विद्यार्थी सापडलाच तर मग त्याची खैर नसे. त्याला जवळ बोलावून ते त्याच्या एका पायावर आपला मणामणाचा पाय ठेवीत, जेणेकरून तो त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाऊ नये. मग एका हाताने त्याचा कान पकडून, “लेको खेळायला येता की उनाडक्या करायला” असा उद्धार करीत दुसऱ्या हाताने एक सणसणीत रट्टा असा पाठीत देत की  त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर दिवसाच काजवे चमकत असत. आम्ही तेंव्हा चेष्टेने त्या विद्यार्थ्याला म्हणायचो की “जो खाईल रट्टा तो होईल पठ्ठा.” कांही अंशी हे खरे ही होते.

सर प्रत्येक खेळाडूचे गुण व दोष बारकाईने हेरीत व त्याप्रमाणे मार्गदर्शन करीत व विशेष करून दोषांचे खंडन करण्यसाठी त्या खेळाडूला विश्वासात घेऊन योग्य ती समज देत. या धोरणा मुळेच  खेळाडूंचा खेळ सतत सुधारत जात असे. ते अतिशय वक्तशीरपणे, तसेच खेळांच्या प्रशिक्षणा बाबतीत जीव ओतून काम करीत असत. पण जेंव्हा त्यांना कळले की ते व्यवस्थित प्रशिक्षण देतात की नाही हे तपासण्याच्या उद्देशाने व्यवस्थापनातर्फे पडळकर सर सकाळी ६.३० ला येत असतात, तेंव्हा या प्रामाणिक व सचोटीने काम करणाऱ्या हाडाच्या शिक्षकाच्या मनाला खूप लागले होते. अशावेळी ते भावनाविवश होत आपल्या शिष्यांकडे मन मोकळे करून स्वतःला सावरीत. आम्हालाही हे जाणून अतिशय खेद वाटे व व्यवस्थापनाला माणसांची पारख नाही हे प्रकर्षाने जाणवे.

सर आम्हाला शाळेतर्फे जिल्हा तसेच हिंद ट्रॉफी चे सामने खेळण्यासाठी पोदार शाळा (सांताक्रूझ), नायगांव मैदान (दादर) तसेच University Ground मरीन लाईन्स येथे घेऊन जात. आमचा संघ चांगलाच कसदार असल्याने बहुतेक वेळा आम्ही विजयीच होत असू. सामना जिंकल्यावर सरांना आमच्याहून काकणभर अधिकच आनंद होत असे. त्यावेळी संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ते आवर्जून, छाती जराशी फुगवूनच सांगत असत, “माझी मुले जिंकली.” त्यांच्या  चेहऱ्यावर निरागस मुलाप्रमाणे निखळ आनंद विलसत असे. कारण ते त्यांनी आम्हाला कसून दिलेल्या प्रशिक्षणाचेच फळ असे. सामना संपवून घरी परतताना सर आम्हाला आठवणीने मलईदार लस्सी पाजत. त्याची लज्जत आजही जिभेवर आहे. मरीन लाईन्स ला सामना असला की “KAYANI ‘ त नेउन तेथील पुडिंग आठवणीने आम्हाला खायला घालीत.

मला आठवते आम्ही १०वीत असताना हिंद ट्रॉफीचा लोकमान्य विद्यामंदिर विरुद्धचा अंतिम सामना University Ground वर एका गुणाने सामना संपायला शेवटचे १० सेकंद असताना हरलो. तेंव्हा त्यांच्या डोळ्याला अश्रूंची जी धार लागली ती ते आमच्या पासून लपवू शकले नाहीत. त्यांचा चेहरा अतिशय बोलका होता. त्यांना झालेले ते दुखः पाहून आम्हाला मेल्याहून मेल्या सारखे झाले होते. सरांनी सर्वांशीच अबोला धरला होता. सरांच्या मनाला बसलेल्या धक्क्याची सल आमच्या मनालाही लागून  राहिली. पुढच्या वर्षी आम्ही कसून खो-खो ची practice केली. योगायोगाने हिंद ट्रॉफी चे सामने आपल्या शाळेच्या मैदानातच होते व आमचा संघ पुन्हा लोकमान्य विद्यामंदिर समोरच अंतिम सामन्यात उभा ठाकला. आम्ही हा सामना आपल्याच प्रेक्षकांसमोर सहज जिंकला. त्यावेळी पाटणकर सरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागलेले आम्ही पाहिले व आम्ही धन्य झालो. वर्षभर असलेले आमच्या मनावरचे दडपण गेले होते. या विजयाने आम्ही सरांचे ऋण काकणभर तरी फेडू शकलो याचेच मोठे समाधान आमच्या सर्वांच्याच चेहऱ्यावर विलसत होते. सर भेटेल त्याला “माझी मुले जिंकली” हे अभिमानाने सांगत होते. सर कधीच, “पार्ले टिळकची मुले जिंकली” किंवा “माझ्या शाळेची मुले जिंकली” असे म्हणत नसत. ते नेहेमी “माझी मुले जिंकली ” असेच म्हणत असत. त्यांना आपल्या शिष्यांबद्दल केवढी आंतरिक  आपुलकी होती हेच आमच्या मनाला अधिक भिडत असे.

म्हणूनच आज गुरु पौर्णिमेच्या शुभ दिनी पितृतुल्य गुरु श्री. बा. पाटणकर सरांचे स्मरण करीत आम्हा सर्व शिष्या तर्फे  त्यांच्या पवित्र आत्म्यास त्रिवार वंदन करतो. असेच गुरु आम्हाला जन्मो जन्मी लाभोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

प्रकाश सुर्वे व सरांचे समस्त शिष्यगण

टीप:

माझा शाळेतील मित्र प्रकाश सुर्वे याने हा लेख लिहून पाठवला तो ११ जुलै २०१४ या दिवशी. लेख मला आवडला. त्याने यापूर्वी लिहिलेला देशमुख बाईंवरचा लेखही मला आवडला होता. शोधून तोही मी या सदरात “प्रकाशित” करणार आहे.

या लेखाच्या मूळ संहितेवर मी अल्पसा संपादकीय हात फिरवला आहे. त्यासाठी त्याची परवानगी घेता आली नाही. कारण, “उद्या काही अघटित घडले तर मला जे सांगायचे ते राहून जाईल” असे म्हणणारा प्रकाश ३१ ऑगस्ट २०२० रोजी करोनामुळे आम्हाला सोडून गेला. त्याला श्रद्धांजली.

Hits: 60

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *