अपघात आणि मानवी प्रतिक्रिया

अपघात हा माझा आवडीने अभ्यासायचा विषय! अपघात का घडला, कसा घडला, कसा टाळावा, त्याचा परिणाम किती व्यापक झाला आणि तसा तो का झाला हे सारे वैज्ञानिक-तांत्रिक विषय महत्वाचे असतातच. पण मनुष्य स्वभावातूनच अपघातजन्य परिस्थिती कशी उद्भवते, आणि तो अपघात घडला की माणसे त्याला कशी सामोरी जातात, कसे तोंड देतात, ते पाहिले की मानवी मनाचे वेगवेगळे कोपरे उजागर होऊ लागतात. ते फारच उद्बोधक असते. निरंजन घाटे सरांच्या “आण्विक अपघात व अण्वस्त्रे” या पुस्तकाची जाहिरात पाहिली आणि माझ्या मनासमोर काही अपघात आणि त्या अपघातातून दिसणारी मानवी मने तरळून गेली.

मंत्रालयाला आग (चित्राचे श्रेय: The Hindu)

२१ जून २०१२ रोजी मंत्रालयाला लागलेली आग आठवा. मंत्रालयात सोयिस्कर असुरक्षितपणे पसरत गेलेली विद्युत्व्यवस्था, हे आगीचे प्राथमिक कारण. आणि इथेतिथे रचलेले फायलींचे ढीग, ठिकठिकाणी बनवलेल्या लाकडी केबिन, हे आग पसरण्याचे कारण. सर्वर रूम मधून आवाज आणि पाठोपाठ धूर आल्यावर नजीकच्या कर्मचार्‍यांनी अग्निशमनयंत्रे वापरून आग विझवायचा प्रयत्न केला, असे म्हणतात. पण हे सारे बाहेर-बाहेरूनच चालले असले पाहिजे. आगीचे मूळ शोधण्याचा (उदाहरणार्थ विद्युत्व्यवस्थेची आगीला कारण ठरणारी शाखा शोधणे) व त्यानुसार तांतडीने कारवाई करण्याचा (जसे की संबंधित विद्युत्व्यवस्था बंद करण्याचा, आणि अग्निग्रस्त भाग वेगळा करण्याचा) प्रयत्न झाला असे दिसत नाही. अनिर्बंधपणे पसरत गेलेल्या विद्युत्व्यवस्थेत ते कठीणही असते. आग लागल्यास काय करावे या बाबत मंत्रालयातील कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षणही दिले नसावे असे म्हणणे भाग आहे. स्वाभाविकपणे, “आग लागली” असे कळल्यावर संत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळे अप्रशिक्षित कर्मचारी निघून गेले. वेळच्या वेळी योग्य ती कारवाई होती तर काही नुकसान होते, पण आगीने चार मजले ग्रासणे, हजारो फायली नष्ट होणे, काही व्यक्ति दगावणे हे व्यापक दुष्परिणाम टळते. हे का घडले नाही हे समजून घ्यायचे तर पुढील दोन प्रकरणे पहावी लागतील.

कमांडर विनायक आगाशे (माहिती खाली पाहा)
सुक्या गोदीत उभी पाणबुडी
(picture credit Wikipedia)

ही पुढली गोष्ट आहे निवृत्त कमांडर विनायक आगाशे यांची. “Foxtrot Nostalgia” या शीर्षकाखाली ही गोष्ट प्रथम प्रकाशित झाली असली तरी यथावकाश तिचा अनुवाद “अविस्मरणीय युद्धकथा” या निवृत्त विंग कमांडर विनायक डावरे यांच्या पुस्तकात समाविष्ट झाला आहे. तेव्हा कमांडर आगाशे यांच्या मूळ लेखाचा केवळ गोषवारा पाहू.

करंज ही रशियन बनावटीची भारतीय पाणबुडी दुरुस्तीसाठी व्लादिवोस्तोक बंदरात उभी असली तरी तिच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय नौसेनेकडेच होती. बहुसंख्य नौसैनिक व दुरुस्ती कामगार जेवणाच्या सुटीवर असताना कमांडर आगाशे यांच्यावर “करंज”कडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. धुराचा वास येताच त्यांनी तिथे सुरक्षारक्षकांचे लक्ष वेधले. हा धूर आपल्या पाणबुडीतून येत नाही या सुरक्षारक्षकांच्या निदानावर विश्वास न ठेवता, पाणबुडीत शिरून त्यांनी धुराचा व आगीचा वेध घेतला. जिवाची पर्वा न करता, धुराने भरलेल्या बॅटरी कक्षात उडी मारली. धुराने जीव कोंडत असतानाही अंधारात चाचपून धुराचे आणि आगीचे मूळ असलेला एक जळता मिंक कोट त्यांनी बॅटरी कक्षाबाहेर भिरकावून दिला आणि आगीचे कारण मुळातच खुडून काढले. करंज पाणबुडी वाचली! बेशुद्ध पडू लागलेल्या आगाशे व त्यांच्या सहकार्‍यांना अक्षरशः उचलून पाणबुडीबाहेर आणावे लागले. ते सारे बचावले, पण जिवावर उदार होत त्यांनी “आपल्या पाणबुडीचे” फार मोठ्या अग्निप्रलयापासून रक्षणही केले हे महत्वाचे.

बॅटरी कक्षात काम करणार्‍या एका कर्मचारी मुलीने जेवायला जाताना आपला कोट निष्काळजीपणे बॅटरीवर ठेवला होता. व कोटावरील स्थिरविद्युतीमुळे शॉर्ट सर्किट होऊन कोटाला आग लागली होती. पण आगाशेंच्या तत्परतेने, तसेच जिवावरचा धोका पत्करून केलेल्या कारवाईने दुरुस्ती कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणातून उद्भवलेले संकट निवारले.

जे मंत्रालयात घडू शकले नाही ते “करंज”वर का घडले? कारण करंज ही पाणबुडी तीवरील नाविकांची होती. तिच्या सदैव रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती. आगाशे यांनी जिवावर उदार होत ती जबाबदारी पार पाडली. याउलट मंत्रालय सर्वांचेच असले तरी प्रत्यक्षात कुणाचेच नव्हते. कुठल्याही परिस्थितीत मंत्रालयाच्या रक्षणाची जबाबदारी कोणी अंगावर घेतलेली नव्हती. नियोजनाविना वाढत गेलेले मंत्रालय, प्रशिक्षणाचा अभाव याची जोड मिळाल्याने अनाथ ठरलेल्या मंत्रालयात आग एवढी पसरली व मोठे नुकसान झाले. तर कमांडर आगाशे यांची तत्परता, आणि धाडस यामुळे मोठे नुकसान टळले.

तिसरी कथा आहे संशोधनासाठी जिवावर उदार होणार्‍या अणुशास्त्रज्ञाची. या कथेचे मर्म समजून घ्यायचे तर थोडे अणुस्फोटामागचे विज्ञानही समजून घ्यावे लागेल. युरेनियम वा प्लुटोनियम सारख्या किरणोत्सर्गी धातूमधून अणुस्फोट घडतो तो साखळी प्रक्रियेद्वारा. एका अणुपासून सहजी निघणारे दोन न्यूट्रॉन आणखी दोन अणूंचे विभाजन करणार , त्यातून निघणारे चार न्यूट्रॉन आणखी चार अणूंचे विभाजन करणार. एकातून दोन, चार आठ अशी साखळी वाढत वाढत गेली की अणुस्फोट घडून येतो. पण हे सहजी निघणारे न्यूट्रॉन वेगवान असतात. हे वेगवान न्यूट्रॉन वाटेत येणार्‍या अणूंना न भेदता निसटून जातात. अर्थात साखळी प्रक्रिया जमून येत नाही. साखळी प्रक्रिया साधण्यासाठी या न्यूट्रॉनचा वेग घटवावा लागतो. त्याच्याच बरोबरीने या कमी वेगधारी न्यूट्रॉनची अन्य किरणोत्सर्गी अणूंशी गाठ पडावी लागते. ती पडली, तरच साखळी प्रक्रिया सिद्ध होईल. न्यूट्रॉनचा वेग घटवणे व त्या न्यूट्रॉनची अन्य किरणोत्सर्गी अणूंशी गाठ पडणे या दोनही गोष्टी किरणोत्सर्गी धातूचा पुरेसा शुद्ध व पुरेसा मोठा गोळा जमवला की साध्य होतात. या गोळ्याला कळीचा ऐवज (critical mass) म्हटले जाते. पुरेसा ऐवज असला की धातूमधून प्रवास करताना न्यूट्रॉनचा वेग घटतो व त्या न्यूट्रॉनची अन्य किरणोत्सर्गी अणूंशी गाठही पडते. साखळी प्रक्रिया सिद्ध होते आणि अणुस्फोट घडून येतो. तेव्हा अणुबॉंब बनवणार्‍या शास्त्रज्ञांपुढला महत्वाचा प्रश्न हा की किरणोत्सर्गी धातूचा कमीतकमी किती मोठा गोळा बनवला की स्फोट घडेल? या प्रश्नाचे अधिकाधिक अचूक उत्तर अणुबॉंब-निर्मात्यांना हवे असते. कारण गोळा आवश्यकतेपेक्षा लहान बनला तर अणुस्फोट होणारच नाही. गोळा आवश्यकतेपेक्षा मोठा बनवावा लागला तर ते अवाजवी खर्चिक होईल. उघड आहे की हे मोजमाप अचूकपणे करण्यासाठी पुन्हा पुन्हा अणुस्फोट घडवणे शक्य नाही.

त्याचबरोबर हेही उघड आहे की कळीचा ऐवज ठरणारा किरणोत्सर्गी धातूचा गोळा जितका लहान तितका अणुबॉम्बचा खर्च कमी ! पण वेगवान न्यूट्रॉनचा वेग घटवण्यासाठी प्लुटोनियमचा मोठा गोळा वापरताना अभावितपणे अधिक प्लुटोनियम वापरले जाते. मग वैज्ञानिकांनी एक वेगळाच पर्याय काढला. आपणहून स्फोट न होईल असा प्लुटोनियमचा गोळा घ्यायचा, आणि त्यातून निघणारे न्यूट्रॉन परावर्तनाने परत त्या प्लुटोनियमच्या गोळ्यावर सोडण्याची व्यवस्था करायची. हे परावर्तित न्यूट्रॉन कमी वेगवान असल्याने त्यांची पृष्ठभागावरील प्लुटोनियमच्या अणूंशी गाठ पडेल आणि साखळी प्रक्रिया सिद्ध होईल. जेणेकरून कमी प्लुटोनियम वापरून स्फोट घडवणे शक्य होईल. याही व्यवस्थेत किती प्लुटोनियम वापरावे हे अचूकपणे ठरवणेही तितकेच आवश्यक!

स्लोटिनच्या उपकरणाची प्रतिकृती (चित्राचे श्रेय: blog.nuclearsecrecy.com/2016/05/23/the-blue-flash/)

त्यासाठी प्लुटोनियमचा स्फोट न होईल इतका मोठा (साधारण ३.५” व्यासाचा) गोळा बनवण्यात आला. हा गोळा बेरिलियम धातूच्या एका अर्धगोलात बसवलेला असे. (शेजारील चित्र पाहा) कारण बेरिलियम धातू हा न्यूट्रॉनचा परावर्तक आहे. तर प्लुटोनियमच्या गोळ्याला वरून पूर्णपणे झाकू शकणारा बेरिलियमचा दुसरा अर्धगोल वरून हवे तितके कमीजास्त अंतर राखून ठेवण्याची व्यवस्था केलेली होती. प्लुटोनियम मधून वेगाने निसटून जाणारे न्यूट्रॉन बेरिलियमच्या पृष्ठभागावरून परावर्तित होत, त्यांचा वेग घटे. हे कमी वेगधारी परावर्तित न्यूट्रॉन प्लुटोनियमवर आदळून साखळी प्रक्रिया वाढत जाई. त्यायोगे गोळ्याच्या आजूबाजूला न्यूट्रॉन तसेच गामा किरणांचा प्रभाव वाढत जाई. प्लुटोनियमचा गोळा वरून किती झाकलाय आणि न्यूट्रॉन व गामा किरणांचा प्रादुर्भाव किती वाढलाय यावरून वैज्ञानिक अणुस्फोटासाठी कमीतकमी किती प्लुटोनियम वापरावे लागेल याची आकडेमोड करत. जाता जाता, दोन अणुस्फोटांनी जपान शरण आला नाही तर तिसरा बॉम्बस्फोट या योजनेने करायचे ठरले होते असे म्हणतात. त्यासाठी या गोळ्याचे सांकेतिक नाव होते रुफस. पण जपान शरण आल्याने या गोळ्याचा उपयोग किती प्लुटोनियम वापरावे याचे अचूक मोजमाप मिळवण्यासाठी प्रयोगशाळेत करण्यात आला.

हे प्रयोग अतीव धोकादायक होते. पहिले म्हणजे बेरिलियमचा वरचा अर्धगोल हाताने उचलावा लागे. (वरील चित्र पाहा) तिथे होत असलेल्या न्यूट्रॉन व गामा किरणांच्या दुष्प्रभावाने प्रयोगकर्त्यांच्या हाताला आणि पर्यायाने जिवालाच धोका होता. एन्रिको फर्मी हा शास्त्रज्ञ या प्रयोगाला “मृत्यूशी खेळ” म्हणे. प्रत्येक प्रयोगात होणार्‍या अणुकिरणांच्या मार्‍याने वर्षभरात मरण येण्याचा धोका फर्मीने बोलून दाखवला होता असे म्हणतात. आणि चुकून माकून बेरिलियमचा वरचा अर्धगोल खालच्या अर्धगोलावर घट्ट बसलाच, आणि प्लुटोनियमचा गोळा पुरा झाकला गेलाच, तर व्यापक साखळी प्रक्रिया सुरू होऊन अणुस्फोटाची भीती ही होतीच. कारण मग सगळेच कमी वेगवान न्यूट्रॉन प्लुटोनियमवर आदळून साखळी प्रक्रियेला चालना देणार! रिचर्ड फाइनमन या वैज्ञानिकाने या प्रयोगाला “झोपलेल्या ड्रॅगनच्या शेपटाला गुदगुल्या” अशी उपमा दिली होती.

पण अमेरिकेला अण्वस्त्रक्षमतेत आघाडीवर ठेवायचे तर हे प्रयोग आवश्यक होते. पण ते करताना जी किमान काळजी घ्यायची ती मात्र घेतली जात नव्हती. बेरिलियमचा वरचा अर्धगोल त्याला पाडलेल्या एका भोकात बोट घालून हातानेच उचलला वा ठेवला जाई. त्या हातावर न्यूट्रॉन वा गामा किरणांचा दुष्परिणाम होतच असे. २१ ऑगस्ट १९४५, म्हणजे हिरोशिमा व नागासाकीवरील स्फोटांनंतर केवळ दोनच आठवड्यांनंतर हॅरी डॅग्लियन हा वैज्ञानिक याच प्रकारचा प्रयोग करताना केवळ एक सेकंदासाठी घडलेल्या साखळी-प्रक्रियेमुळे झालेल्या अणुकिरणांच्या प्रभावाने दगावला होता. मात्र तरीही ही व्यवस्था काही बदलली नाही.

चित्रात डावीकडून दुसरा डॅग्लियन व तिसरा स्लोटिन अणुबॉंबची जुळणी करताना (श्रेय: Wikimedia)

बेरिलियमच्या वरच्या आणि खालच्या अर्धगोलात हवे तेवढे अंतर राहावे म्हणून ठराविक मापाच्या पट्ट्या (shims) ठेवण्याची व्यवस्था होती. पण त्याऐवजी लुई स्लोटिन हा वैज्ञानिक एका स्क्रूड्रायवरवर काम भागवत असे. त्याने अनेक वेळा हा प्रयोग केलेला होता. आणि या प्रयोगातला धोकाही त्याला चांगलाच माहिती होता. कारण तोही या प्रयोगाला “ड्रॅगनची शेपटी पिरगाळणे” म्हणत असे. तरीही हे प्रयोग इतक्या बेफिकिरीने करण्यामागे डॅग्लियन वा स्लोटिन यांची भूमिका काय असावी? अण्वस्त्रस्पर्धेत अमेरिकेची आघाडी राखण्यासाठी किंवा विज्ञानासाठी पत्करलेला धोका, आपले शौर्य दाखवणारे साहस, की “अतिपरिचयात् अवज्ञा” यातून आलेला पोकळ आत्मविश्वास? की हे सारेच? आज कसे ठरवणार?

२१ मे १९४६ या दिवशी स्लोटिन हा प्रयोग आपण कसा करतो ते अल्विन ग्रेव्स याला दाखवत होता. त्याच्या आजूबाजूला प्रयोगशाळेत इतर सात-आठ वैज्ञानिकही काही अन्य प्रयोग करत होते. बेरिलियमच्या दोन अर्धगोलांत अंतर राखणारा स्क्रूड्रायवर निसटला, बेरिलियमचे दोन्ही अर्धगोल चिकटले. प्लुटोनियमचा गोळा पुरा झाकला गेला आणि एका विचित्र निळ्या आणि ऊष्ण झगझगाटाने प्रयोगशाळा उजळून निघाली. आजूबाजूची न्यूट्रॉन व गामा किरणांची मोजमापयंत्रे पार विस्कटून गेली. प्लुटोनियमचा गोळा, आणि वरचा बेरिलियमचा अर्धगोल तापू लागला.

असा दिपवून टाकणारा ऊष्ण झगझगाट दिसला की माणसाची पहिली प्रतिक्रिया असते त्याकडे पाठ फिरवून वा झुकून स्वतःला वाचवण्याची. त्यात हा अणुस्फोटाच्या आरंभीचा झगझगाट किती तीव्र होता? तर प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारापाशी बसलेला, स्फोटापासून सर्वात दूर असलेला सुरक्षारक्षक (खालील चित्र पाहा) चक्क पळून गेला. पण हे काय घडते आहे ते शेजारी उभ्या स्लोटिनला लगेच कळले. त्या झगझगाटाला तोंड देत त्याने तत्काळ बेरिलियमचा वरचा तापलेला अर्धगोल हाताने उचलून विलग केला व अणुस्फोट प्रक्रिया थांबवली. अणुस्फोटाच्या सुरुवातीला उद्भवणारे अचाट प्रारण अंगावर झेलत, आपल्या हातांनी अणुस्फोट थांबवून स्लोटिनने आपल्या सहकार्‍यांना वाचवले, आणि लॉस अलामॉसचे अणुसंशोधन केंद्रही वाचवले.

स्लोटिनने काढलेल्या चित्रावरून बनवलेला नकाशा (श्रेय: Wikipedia)

त्यानंतर स्लोटिनने जे काही केले ते एखादा हाडाचा वैज्ञानिकच करू शकतो. आपल्या हाताने अणुस्फोट थांबवल्यावर स्लोटिनने सर्वांना होतात तिथेच थांबायला सांगितले. प्रयोगशाळेतल्या फळ्यापाशी जाऊन त्या खोलीचा एक नकाशा काढला. त्यात अणुस्फोटाची जागा व प्रत्येक वैज्ञानिकाच्या अणुस्फोटावेळच्या स्थितीचा नावनिशीवार नकाशा व प्रत्येकाचे स्फोटापासूनचे अंतर यांची नोंद केली. जेणेकरून स्फोटकाळी उपस्थित प्रत्येकाला अणुकिरणाचा कितपत प्रादुर्भाव झाला आहे हे निश्चित करता येईल. स्लोटिन व त्याच्यामागे उभा असलेला ग्रेव्स यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव पडलेला होता. मात्र स्लोटिन पुढ्यात असल्यामुळे ग्रेव्स अणुकिरणांपासून काहीसा झाकला गेला होता. “तू वाचशील, मी काही वाचत नाही” हे ग्रेव्सला सांगून स्लोटिन मोकळा झाला, आणि खरोखरीच नवव्या दिवशी अणुकिरणांचा त्रास भोगत भोगत वारला. अपघात झाल्या दिवशी तसेच तिसर्‍या व नवव्या दिवशी स्लोटिनच्या हातांच्या अवस्थेची संपादित चित्रे उपलब्ध आहेत. पण ही संपादित चित्रेही बघवत नाहीत. आणि रंगीत चित्रे पाहाणे तर केवळ अशक्य! ग्रेव्स वाचला, आणि पुढे बरीच वर्षे जगलाही. स्लोटिनच्या मृत्यूनंतर मात्र हे प्रयोग दूर अंतरावरून सुरक्षितपणे करण्याची यंत्रणा उभी झाली. आणि या प्लुटोनियमच्या गोळ्याला नवीन नाव मिळाले – सैतानगोळा (Demon core)

नियोजनविहीनता, निष्काळजीपणा, अवाजवी धोका पत्करण्याची वृत्ती असा हा अपघाताला आमंत्रण देणारा मनुष्यस्वभावाचा पल्ला. तर अपघात घडल्यावर दिग्मूढ न होता अणुकिरणांचा धोका पत्करून आपल्या सहकार्‍यांना आणि लॉस अलामॉसला वाचवणारा, तसेच आपला मृत्यू दिसत असूनही विज्ञानाचे देणे चुकवणारा स्लोटिन, आपल्या जागरूकतेने आणि तत्परतेने आगीचा स्रोत शोधणारे व जिवावर उदार होऊन “आपली पाणबुडी” वाचवणारे आगाशे, आणि सर्वांचेच असलेले (आणि पर्यायाने कुणाचेच नसलेले) मंत्रालय वार्‍यावर सोडून जाणारे प्रशिक्षणविहीन मंत्री-संत्री व कर्मचारी असा हा मानवी प्रतिक्रियांचा पट!!

विश्वास द. मुंडले

संदर्भ

https://timesofindia.indiatimes.com/india/fire-at-mumbai-mantralaya-kills-three-chars-vital-files/articleshow/14326078.cms

नाशिकला स्थायिक झालेल्या निवृत्त कमांडर विनायक आगाशे (विशिष्ट सेवा मेडल) यांचे घराणे सैन्यदलाशी निगडित आहे. त्यांचे वडील सैन्यदलात होते व त्यांनी दुसरे महायुद्ध, १९४८ची काश्मीर कारवाई, १९६२चे चीनशी युद्ध व १९६५चे पाकिस्तानशी युद्ध या मोहिमांत भाग घेतला. तर नौदलात पाणबुडीचे कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या विनायक आगाशेंनी १९७१च्या युद्धात भाग घेतला. त्यांचा मुलगा व सून हे दोघेही हवाईदलात विंगकमांडर आहेत.

अविस्मरणीय युद्धकथा, निवृत्त विंग कमांडर विनायक डावरे, परममित्र प्रकाशन, प्रथमावृत्ती, ऑक्टोबर २०२१.

Demon core – Wikipedia

Demon Core – The True Story – YouTube

“Brighter than a thousand suns: A personal history of the atomic scientists”, Robert Jungk, Penguin, London, 1960

पॉल मुलिन या नाटककाराने माहितीच्या अधिकारात अधिकृत माहिती व छायाचित्रे गोळा करून स्लोटिनच्या शेवटच्या नऊ दिवसांवर एक नाटक लिहिले होते. त्याबद्दल इथे वाचा

स्लोटिनच्या या अपघाताचे अन्य तपशील इथे वाचा. तर BBC वरील माहितीपटाबाबत इथे पाहा. Fat man and Little boy या चित्रपटात स्लोटिनच्या अपघाताचे काल्पनिक चित्रीकरण केले आहे ते इथे पाहा. स्लोटिनबाबत इतर माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहे.

Hits: 98

You may also like...

4 Responses

  1. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    अनोखी माहिती. आण्विक प्रयोग शाळेतील घटना तर जीवावर उदार होऊन उद्दीष्ट साध्य करणे. हे धाडसी कृत्य आहे

  2. Shaila Phatak says:

    Farach sundar savistar mahiti. !

  3. माधव भावे says:

    खूप रंजक आणि शास्रीय माहिती !

  4. अर्चना+देशपांडे says:

    फार क्वचितच अशा गोष्टी कळतात,जवळ जवळ नाहीच.उपयुक्त माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *