केरोली आणि अरुणिमा

केरोली टाकाक्स
(श्रेय happyliving)

Quora.com या वेबसाइटवर जनता जे भावेल ते लिहीत असते वा प्रश्न विचारीत असते. जाणकार त्यावर उत्तरेही पुरवीत असतात. त्यातून विविध देशांतील ऐतिहासिक आणि सामाजिक रंजक घटना, जसे की लढाया, संघर्ष, गुन्हे, गुन्हेअन्वेषण, संकटे, चित्रविचित्र प्रसंग वा माणसे यांबाबत, किंवा अन्य एखाद्या विषयातली सुरस व चमत्कारिक माहिती मिळत असते. “What are some examples of badass people?” म्हणजेच एखाद्या भन्नाट माणसाचे उदाहरण विचारणार्‍या या प्रश्नाला उत्तर म्हणून विमल सिंग नामक वाचक/लेखकाने केरोली टाकाक्स नामक हंगेरियन हीरोची ओळख करून दिली आहे. (विमल सिंग यांचा मूळ संदर्भ हरवला आहे. क्षमस्व!)

पण या हीरोची ओळख करून घेण्याअगोदर badass या शब्दाविषयी थोडे! “Badass” हा मुळात अमेरिकन इंग्लिशच्या बोलीभाषेतला शब्द. तो इंग्रजीत आणला आफ्रिकन अमेरिकन समाजाने. गोरे अमेरिकन हा शब्द १९७० च्या दशकात वापरू लागले. पण अजून हा शब्द ब्रिटीश वा ऑस्ट्रेलियन इंग्रजीने उचललेला नाही.(Thorne, 2010) त्यातील “ass” हा भाग एक व्यक्ती सुचवतो. (Thorne, 2010), आणि परंपरेने तो पुरुषच असतो. (Spears, 1998). प्रत्यक्षातही असेच दिसते की साधारणपणे स्त्रीसाठी हा शब्द वापरला जात नाही; आणि वापरलाच तरी अपवादानेच. “badass” हा शब्द बहुधा व्यक्ति-विशेषण म्हणून वापरला जात असला तरी एखादे वेळी तो निर्जीव पदार्थांचे (उदाहरणार्थ पोषाखाचे) विशेषण म्हणूनही वापरलेला दिसतो. (Munro, 1990)

सुरुवातीपासूनच, “badass” हे विशेषण सद्गुण आणि अवगुण हे दोन्हीही ठळकपणे व्यक्त करीत असते. (Kipfer & Chapman, 2007) म्हणजेच tough (कणखर), excellent (सर्वोत्तम), wonderful (आश्चर्यकारक), very good (अत्युत्तम), incredible (विलक्षण), awesome (विस्मयकारक) यासारखे सद्गुण; तर cocky (कुर्रेबाज), belligerent (भांडखोर), arrogant (उद्धट), aggressive (आक्रमक), troublesome (त्रासदायक), antisocial (समाजविघातक), difficult to deal with (अवघड), worthless(कवडीमोल) असे दुर्गुण हे सारे “badass” मधून व्यक्त होत असते. ही झाली परंपरा. आजमितीला मात्र हे विशेषण स्तुतिकारक व विधायक अर्थानेच वापरले जाते. (Thorne, 2010) केरोली टाकाक्स हे कसे कणखर, व त्याच्या क्षेत्रातील सर्वोत्तम आणि विस्मयकारक व्यक्तिमत्व होते हे त्याच्या खाली वर्णिलेल्या कामगिरीवरून दिसेलच.

डाव्या हाताने नेमबाजी करणारा केरोली (श्रेय doerlife.com)

हंगेरियन सैन्यात कनिष्ठ अधिकारी पदावरील केरोली टाकाक्स, हा १९३८ सालीच हंगेरीतील सर्वोत्तम पिस्तुल नेमबाज ठरला होता. १९४० साली होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये २५मीटर पिस्तुल नेमबाजीत तो सुवर्णपदकाचा दावेदार होता. पण एक अपघात झाला. हातबॉंब हातातच फुटल्याने ज्या हाताने नेमबाजी करायची तो उजवा हातच उडून गेला. या संकटानंतर एखाद्याने नेमबाजीचा नादच सोडला असता. पण हॉस्पिटलातून परतल्यावर कुणालाही पत्ता न लागू देता केरोलीने डाव्या हाताने नेमबाजीचा सराव सुरू केला.

१९३९च्या उन्हाळ्यात हंगेरीत नेमबाजीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धक जमू लागले त्यात केरोलीही होता. केरोलीला ओळखणार्‍या सार्‍यांनी अपघाताबद्दल सहानुभूति दाखवली व स्पर्धा पहायला येण्याचे धार्ष्ट्य दाखवल्याबद्दल स्तुतीही केली. पण केरोली हा प्रेक्षक नसून स्पर्धक आहे हे कळल्यावर समस्तांस आश्चर्याचा पहिला धक्का बसला. सुवर्ण पदक मिळवून केरोलीने सर्वांनाच आणखी मोठा दुसरा धक्का दिला. १९३९ सालीच डाव्या हाताने त्याने जागतिक नेमबाजी स्पर्धाही जिंकली.

(Credit Colnect)

केरोलीचे दुर्दैव असे की सप्टेंबर १९३९ मध्ये सुरू झालेल्या दुसर्‍या महायुद्धामुळे १९४० व १९४४ या दोनही ऑलिम्पिक स्पर्धा झाल्याच नाहीत. पण १९४८ मध्ये वयाच्या अडतिसाव्या वर्षी केरोली लंडन ऑलिम्पिक स्पर्धेला पात्रच ठरला नव्हे तर जागतिक विक्रम रचत त्याने सुवर्ण पदकही मिळवले. त्याच्या या कामगिरीला सलाम म्हणून एक पोस्टाचा स्टॅम्पही निघाला होता. तर १९५२ सालच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकला लागोपाठ दुसरे सुवर्ण पदक मिळवून त्याने कडीच केली. नेमबाजीत लागोपाठ दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळवणारा तो पहिलाच खेळाडू. त्याचा हा विक्रम त्याच्या मृत्यूपर्यंत (१९७६ पर्यंत) अबाधित होता. असा हा केरोली हंगरीचा राष्ट्रीय हीरो ठरणे जसे स्वाभाविक, तसेच त्याच्या व्यक्तिमत्वाला “badass” असे विशेषण लावावेसे वाटणे, हे ही स्वाभाविकच म्हटले पाहिजे.


अरुणिमा सिन्हा

या जगात सगळी माणसे इकडून तिकडून सारखीच असतात. मग आमच्या देशातही असे आदर्श असतील काय? परमवीरचक्र विजेत्यांच्या मांदियाळीत कितीतरी असतील. मला खात्री आहे की अन्य क्षेत्रांतही भरपूर असतील, पण शोधावे लागतील. क्रीडाक्षेत्रात मला सहजी सापडली ती अरुणिमा सिन्हा ! तिची कथा इंग्रजीत (Born Again on a Mountain) आणि आता मराठीतही (फिरुनी नवी जन्मले मी) उपलब्ध आहे. बर्‍याच वाचकांनी ती वाचलीही असेल. तरी देखील तिची कथा थोडक्यात सांगण्याच्या मोहाला मी बळी पडणार आहे. ज्यांनी ही कथा मुळातून वाचली नसेल त्यांनी ती पुस्तकातून वाचावी यासाठी ते आवाहन असेल. तर ज्यांनी पुस्तक वाचले असेल त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल, अशी मी आशा करतो.

अरुणिमाच्या आयुष्याचे तीन भाग पडतात – अपघातपूर्व, अपघातकालीन व अपघातोत्तर! या तीनही कालखंडात अरुणिमा ज्या ज्या दिव्यांमधून गेली ते पाहाता तिची कामगिरी उठून दिसते.

(श्रेय goodreads.com)

बालवयातच वडिलांचे अपघाती निधन, त्याउपर आई, मोठा भाऊ आणि बहीण यांच्यावर आलेले बालंट, त्यांचा तुरुंगवास, आणि त्यापोटी त्या बालवयातच केवळ धाकट्या भावासोबत काढावे लागलेले दिवस या सार्‍याची कल्पना करणेही कठीण! त्यांना दूध पुरवणारी गाय विकावी लागणे, मोठ्या भावाची हत्या, या सारखे प्रसंग बालमनाला कायमचे जखमी करणारे असतात. पण त्यातून सावरून तिने आपले आयुष्य पुन्हा उभारणे आणि राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉलपटू तसेच फुटबॉलपटू बनणे हेही कौतुकास्पद ठरते. अरुणिमाने या लढाऊ वृत्तीचे श्रेय आपल्या आईला दिले आहे.

(श्रेय amazon)

रेल्वे प्रवासात तिच्यावर झालेला हल्ला, हल्लेखोरांनी तिला गाडीतून ढकलून देणे हे सारे कल्पनेतही कष्टप्रद आहे. पण एक पाय तुटून गेलेला, तर दुसरा जखमी अशा अवस्थेत दोन रुळांदरम्यान पडलेली असताना आजूबाजूच्या रुळांवरून जाणार्‍या गाड्यांच्या खाली न येता जवळून फिरणारे उंदीर हाकलत, विव्हळत ओरडत, कोणीतरी मदतीला येईल या आशेवर रात्रभर पडून राहाणे, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. सुविधाविहीन ग्रामीण इस्पितळात दाखल झाल्यावर अरुणिमाला कळले की जीव वाचवायचा असेल तर आपला पाय कापायला पर्याय नाही. पण भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया होऊ शकत नव्हती. हे कळल्यावर भूल न देता पाय कापायला परवानगी देणे हे तर फार मोठेच धाडस. अरुणिमाच्याच शब्दात सांगायचे तर भूलविरहित शस्त्रक्रियेच्या वेदना या कल्पनेपेक्षाही भयंकर होत्या.

पाय कापून जीव वाचला तरी पोलिसांनी आणि रेल्वेप्रशासनाने आपली जबाबदारी टाळण्यासाठी अरुणिमावर जे नाहक आरोप केले त्यांनीही एखादी मुलगी हरली असती. विनातिकीट प्रवास केला यासारखा आरोप करणे किंवा राज्य/राष्ट्र पातळीवरील खेळाडू ठरवण्याला आक्षेप घेणे हे सहन करण्यातले होते. पण नसलेले प्रेमप्रकरण, चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, आणि त्यापोटी आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप प्रशासनाने करणे हे सारेच निराशाजनक होते. या सगळ्याला तोंड देत असताना इस्पितळातच कृत्रिम पायानिशी एव्हरेस्ट चढण्याचा निर्णय घेणे, हे सारेच विलक्षण आहे.

एव्हरेस्ट चढून जाण्याचा निर्णय घेतल्यावर कृत्रिम पायाने होणार्‍या जखमांकडे दुर्लक्ष करीत त्या पायाला सरावणे, त्या बंधनात रोजचे व्यवहार करायला शिकणे या सार्‍या पायर्‍या अरुणिमाने जंगी घाई करत यशस्वीपणे तर ओलांडल्याच. पण गिर्यारोहण प्रशिक्षणातील विविध टप्पे झपाट्याने ओलांडणार्‍या अरुणिमाच्या मनातली ऊर्मीही ठळकपणे दिसत राहाते. हे सारे वर्णन मुळातूनच वाचावे हे बरे. CISF च्या मुलाखतीसाठी डोंगरदर्‍यांतील पाच दिवसांचे अंतर एकाच दिवसात कापण्यासाठी कृत्रिम पायाने सतत २७ तास केलेल्या प्रवासाची कथा तर अविश्वसनीय अशीच आहे.

(श्रेय blogadda)

आणि एव्हरेस्टवरील चढाई हा या चरित्राचा कळसाध्यायच! पाय ठणकणे, फोड येणे, सुजणे असल्या अडचणी तुम्हा आम्हा सगळ्यांनाच येतात. पण त्यात भर होती कृत्रिम पायाकडून येणार्‍या अडचणींची. कृत्रिम पायातील वंगण गळून जाणे, पायाचा स्क्रू पडणे, पाय १८० अंशात फिरणे, पायच निखळून पडणे, किंवा बर्फात पाय रुतणे अशा अनेक समस्या येत होत्या. कृत्रिम पाय अधून मधून काढावा व पुन्हा चढवावा लागे. (शेजारील चित्र पाहा.) पण हिमालयीन भूप्रदेशात कृत्रिम पाय बसवणे उतरवणेच नव्हे तर कृत्रिम पायात बूट घालणे आणि त्यावर क्रॅम्पॉन (बर्फावर चालण्यासाठी बुटावर चढवण्याचे टोकेरी जुगाड) चढवणे, कपडे बदलणे, विशेषतः देहधर्म उरकणे अरुणिमाला किती कठीण गेले असेल याची कल्पनाच करवत नाही! या सगळ्या संकटांना तोंड देत एव्हरेस्टचे शिखर सर करणे हे तर विलक्षणच! शिखरापासून काही मीटरवर पोचल्यावर प्राणवायु संपत आल्यामुळे “कृत्रिम पायाने इथपर्यंत पोचून झाला एवढा विक्रम पुरे; आता परत जा” असा जो आग्रह झाला तो मोडून एव्हरेस्ट सर करणे, प्राणवायूची टंचाई असूनही तिकडे व्हिडिओ काढणे, माथ्यावरचा एक दगड मिळवणे या सार्‍यातून अरुणिमाचा निग्रह तर दिसतोच. पण जो कृत्रिम पाय बसवल्यानंतर त्याच्याशी जुळवून घ्यायलाच बरेचदा एक वर्ष लागते, तो बसवल्यावर केवळ दोनच वर्षांत गिर्यारोहणाच्या प्राथमिक शिक्षणापासून एव्हरेस्टवर यशस्वी चढाई पूर्ण करण्याची अरुणिमाची कामगिरी लक्षात घेतली तर तिचा झपाटा, जिद्द आणि बेलाग वृत्ती आणखी उठून दिसते. उतरताना शिखराजवळ आकस्मिकपणे खाद्य किंवा प्राणवायु उपलब्ध होणे, यासारख्या घटनांमधून अरुणिमाला दैवाची साथही लाभल्याचे दिसते. पण याचे नवल वाटू नये. कारण दैव नेहेमीच लढणार्‍याला साथ देत असते.

(श्रेय Hindustan times)

अरुणिमाच्या आयुष्यातील तीनही पर्वांकडे पाहिले तर निग्रह, झपाटा व जिद्दीखेरीज आणखी दोन गोष्टी उठून दिसतात. यातील पहिली गोष्ट म्हणजे अरुणिमाच्या मदतीला उभे राहिलेले नातेवाईक (जसे की भाऊ, बहीण आणि मेहुणे) तसेच विविध स्तरातली सर्वस्वी अनोळखी मंडळी. त्यात रुळात पडलेल्या अरुणिमाला शोधणारा पिंटू कश्यप, तिच्या अंगावर लज्जारक्षणार्थ चादर घालणारी ती कनवाळू स्त्री, रक्तदान करणारे यादव, आपणहून पहिली देणगी देणारे उमाशंकर दीक्षित, इथपासून ते कृत्रिम पाय बनवणारे डॉ. श्रीवास्तव, एम्स रुग्णालयाची सुविधा देणारे राजकारणी अजय माकन, गिर्यारोहणाला मार्गदर्शन करणार्‍या बचेंद्री पाल, तिचा शेर्पा असे कितीतरी. दुसरी बाब म्हणजे सार्‍या उपकारकर्त्यांप्रती अरुणिमाचा विनम्र आदरभाव. आपल्या आत्मचरित्रात अरुणिमाने या सार्‍यांची नोंद केली आहे. कृत्रिम पाय लाभून फिरू लागल्यावर आपल्या सर्व लहानमोठ्या उपकारकर्त्यांना भेटून येण्याची अरुणिमाची कृती तो आदरभाव केवळ शा‍ब्दिक नव्हता हे दाखवून देते आणि अरुणिमाबद्दलचा आदर दुणावतो. एव्हरेस्टनंतर तिने अन्य खंडांवरील उच्चतम शिखरे चढून जाण्याचा पण करणारी व त्यापैकी काही पादाक्रांत करणारी अरुणिमा ही तरुण-तरुणींची हिरोइन असेल यात शंका नाही.

अरुणिमाप्रमाणे केरोलीच्या व्यक्तिगत आयुष्याचे तपशील उपलब्ध नसल्याने त्यासंबंधात काही टीका टिप्पणी शक्य नाही. सगळीकडे माणसे सारखीच असली तरी देशोदेशींची परिस्थिती वेगवेगळी असते. सबब, केरोली टाकाक्स व अरुणिमा सिन्हा यांसारख्या दोन कर्तबगार माणसांची तुलना करणे अनाठायी आहे. तरीही केरोली टाकाक्सपेक्षा अरुणिमा सिन्हामुळे मी अधिक प्रभावित झालो हे इथे नमूद केले पाहिजे.

यातून सहजी उपजणारा प्रश्न हा की विमल सिंग यांना अरुणिमा सिन्हाचा उल्लेख करावा असे का बरे वाटले नसेल? इंटरनेटवर केरोली टाकाक्स त्यांना सहजी सापडला हे सोपे, पण तितकेच खरे उत्तर आहे. पण त्याहूनही सोपे उत्तर मूळ प्रश्नात दडलेले आहे. प्रश्न होता “badass” व्यक्तीबद्दल. आणि “badass” हे विशेषण मुख्यत्वे पुरुषासाठीच वापरले जात असते! तेव्हा अरुणिमा सिन्हा हे नाव वगळले जाणे स्वाभाविकच नव्हे काय?

विश्वास द. मुंडले

शीर्षक यादीतील जोडचित्रापैकी कारोलीचे चित्र wikimedia वरून तर अरुणिमाचे चित्र blogadda.com वरून घेतले आहे.

Hits: 39

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *