बालगीतः दळणाचे, मोटेचे

दळणाचे गाणे

पूर्वी घराघरांतून दिसणारे जाते, किंवा उखळ/ मुसळ आजच्या यंत्रयुगात दिसेनासे झाले आहे, आणि त्याच बरोबर दळण कांडण या प्रक्रियाही. माझ्या लहानपणी आमच्या घरी जाते आणि उखळ मुसळही होते. ते सारे वापरलेही जात असे.

सामान्यतः दळणाशी ओव्यांचा संबंध जोडला जातो. आईने जात्यावर गायलेल्या ओव्या मी ऐकल्याही आहेत. काही तिने लिहूनही ठेवल्या आहेत. पण हे गाणे मात्र दळण चालू असताना आजूबाजूला बागडणार्‍या मुलांचे गाणे आहे. दळण संस्कृतीचा परिचय असणार्‍यांना ही कविता भावेल.

घरघर जात्याची

घर्र् घर्र् घर्र् घर्र्

ही घर घर कशाची । ही घरघर जात्याची ॥१॥

जाते फिरे गर्र्गर्र् । पीठ पडे भर्र्भर्र् ॥२॥

एवढे पीठ कशाला । उद्या जायचे सहलीला ॥३॥

उद्या सहल कोणाची । शाळेमधल्या मुलांची ॥४॥

शिरापुरी करू म्हटलं । सार्‍यांनी नक्को नक्को म्हटलं ॥५॥

करीन म्हटलं भाकर्‍या । चटणीत घालू कैर्‍या ॥६॥

आणि करू पिठलं । तोंडाला पाणी सुटलं ॥७॥

असा केला बेत छान । सर्वांचं झालं समाधान ॥८॥

  • मंगला द. मुंडले

मोटेचे गाणे

तंत्रयुगात इंजिने आणि पंप आले आणि मोटाही दिसेनाशा झाल्या, आणि मोटेवरची गाणी फक्त सिनेमातूनच उरली, आणि तीही मोट चालवणार्‍या मोटकर्‍यांनी गायलेली. हे गाणे मात्र मामाच्या गावाला गेलेल्या मुलांनी मोट चालताना पाहून म्हटलेले आहे.

मोट चाले रे

मोट चाले रे । पाणी लाटा रे ॥धृ.॥

पाणी आडाचं । झाड वडाचं । घर मामाचं । खेळू मोदे रे ॥१॥

पाणी बागेला । जाई मळ्याला । मळा मामाचा । कसा फुले रे ॥२॥

मळा भाजीचा । घास आजीचा । गोड लागे रे । खाऊ प्रेमे रे ॥३॥

पाणी बागेला । जाई जुईला । रोपे फुलांची । बहरली रे ॥४॥

फुले वासाची । वाहू देवाला । देई आम्हाला । बल बुद्धी रे ॥५॥

देश आमुचा । रत्नखाणी रे। तनु देशाच्या । कामी लावू रे ॥६॥

मोट चाले रे । पाणी लाटा रे ॥धृ.॥

  • मंगला द. मुंडले (२९/८/१९६५)

शीर्षकावरील चित्राचे श्रेय marathiglobalvillage.com, तसेच saamnaa.com यांना

Hits: 32

You may also like...

1 Response

  1. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    आवडले. छोटे आणि गेय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *