जादूने राज्य राखिले !
“जादू” किंवा “जादूगार” म्हटले की मराठी प्रेक्षकांना आठवतील “जादूगार रघुवीर”, तर भारतीय प्रेक्षकांना आठवेल “पीसी सरकार आणि त्यांचे मायाजाल”. जादूगारीच्या जागतिक इतिहासाशी परिचितांना आठवेल तो जिवंतपणीच दंतकथा बनलेला अमेरिकन हॅरी हूदीनी (१८७४ – १९२६). विविधप्रकारे कुलूपबंद अवस्थेतून बघता बघता सुटून बाहेर येण्याच्या त्याच्या कसबापोटी त्याला “हॅरी हातकडी हूदीनी” असे टोपणनाव मिळाले होते. पण हॅरी हूदीनीचे खरे नाव होते एरिक वाइस. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने हूदीन (१८०५ – १८७१) या फ्रेंच जादूगाराचे आत्मचरित्र वाचले आणि त्याला या व्यवसायात पडायची स्फूर्ती मिळाली. त्या “हूदीनसारखा” या अर्थाने त्याने “हूदीनी” हे नाव धारण केले होते. कोण होता हा हूदीन?
या हूदीनचे मूळ नाव होते, ज्यॉं-युजीन रॉबर्ट. (इथे ऊदॅं व रोबेर या फ्रेंच उच्चारांऐवजी परिचित असे हूदीन व रॉबर्ट हे इंग्रजी उच्चार घेतले आहेत.) त्याच्या नावात हूदीन कसे आले ते पुढे कळेलच. त्याला आजकालच्या सर्व जादूगारांचा आदिपुरुष म्हटले पाहिजे. त्याच्या घड्याळजी वडिलांना त्याला वकील बनवायचे होते, पण त्याला वडिलांप्रमाणे घड्याळजीच व्हायचे होते. म्हणून त्याने उमेदवारी करून पैसे साठवले आणि घड्याळजींसाठीचा तत्कालीन प्रमाणग्रंथ मागवला. पण विक्रेत्याच्या चुकीने त्याच्या हातात पडला जादूच्या प्रयोगांची गुपिते सांगणारा ग्रंथ. हे जादू प्रकरण त्याला फारच भावले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तो हौशी जादूगार बनला.
पण पुस्तके वाचून जसे पोहोता येत नाही, तसेच पुस्तके वाचून जादूचे प्रयोगही करता येत नाहीत. मग घड्याळे बनवता बनवता उरल्या वेळेत विविध जादूगारांकडे साहाय्यक म्हणून उमेदवारीचा सिलसिला सुरू झाला. विशीत प्रवेश करता करता, ज्यॉं-युजीन छोट्यामोठ्या खाजगी कार्यक्रमांत हौशी जादूगार म्हणून जादूचे प्रयोग करू लागला.
अशाच एका कार्यक्रमात त्याची झाक फ्रान्स्वा हूदीन या यंत्रे व घड्याळे बनवणार्या व्यावसायिकाशी आणि त्याच्या जोसेफी सेसिल हूदीन या मुलीशीही ओळख झाली. तो तिच्या प्रेमात पडला आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी विवाहबद्धही झाला. विवाहानंतर त्याने आपले रॉबर्ट हे आडनाव रॉबर्ट-हूदीन असे वाढवून घेतले. तत्कालीन फ्रेंच समाजात याला मान्यता होती.
सासर्यांप्रमाणे जावईबुवा देखील घड्याळांबरोबर छोटीमोठी यंत्रेही बनवत असत. युरोपात घड्याळजींनी यंत्रे बनवण्याची अशी परंपराच होती. विज्ञानेतिहासात या घड्याळजी यांत्रिकांचे फार मोठे योगदान आहे. तर या सासर्यांचा पॅरिसमधेही एक कारखाना होता. तिथे कामासाठी नियमितपणे जाणार्या रॉबर्ट-हूदीनला यथावकाश स्थानिक जादूगार मंडळी भेटली आणि या हौशी जादूगाराला, जादूगारांसाठी यंत्रे आणि विविध प्रकारची जुगाडे बनवण्याचे एक नवे दालन खुले झाले. घड्याळे व जादूगार वापरत असत ती यंत्रे यांच्यातील साधर्म्याचे उदाहरण म्हणून रॉबर्ट-हूदीनच्या जीवनावरील डॉक्युमेंटरीचा हा अंश पाहा.
जादूगारांना यंत्रे पुरवता पुरवता त्याने स्वतःचे जादूच्या प्रयोगाचे कार्यक्रम सुरू केले. आणि वयाच्या चाळिशीत येतायेता घड्याळजीचा व्यवसाय सोडून स्वतःचे “थिएटर रॉबर्ट-हूदीन” काढले. सुरुवात खडतर होती. पण हूदीन यांनी चिकाटी सोडली नाही. थिएटर रॉबर्ट-हूदीन यशस्वी करून दाखवले. त्यामुळे एके काळी जनसामान्यांची हलक्या दर्जाची करमणूक मानलेल्या, जत्रेत वा रस्त्याच्या कडेला वा फारतर खाजगी कार्यक्रमात चालणार्या या कलेला या जादूगाराने उच्चभ्रू रंगमंचावर पोचवले आणि रुजवले. अनेक परंपरा घातल्या – जसे की जादूगाराचा पोषाख (भडक झुलीऐवजी टाय व कोट) कार्यक्रमांचे राजेशाही नेपथ्य, सादरीकरणाची शैली इत्यादि इत्यादि. रॉबर्ट-हूदीन यांच्या काही प्रयोगाची वर्णने इथे पाहा.
केवळ दहाच वर्षे जादूचे प्रयोग नियमितपणे यशस्वीरीत्या चालवून हा जादूगार निवृत्तही झाला. जादूला प्रतिष्ठा मिळवण्या इतकीच जादूच्या साहाय्याने साधलेली त्याची दुसरी मोठी कामगिरी ही राजकीय होती. केवळ जादूने त्याने अल्जीरियातील फ्रेंचांच्या विरोधातले बंड शमवले होते, त्याची ही गोष्ट.
त्याचे झाले असे, की १८३० साली फ्रेंचांच्या अल्जीरियावरील मोहिमा सुरू झाल्या. बरीच मोठी लष्करी किंमत मोजून फ्रेंचांनी १८४६ मध्ये स्थानिक सत्तांचा निर्णायक पराभव केला. अल्जीरियावर फ्रेंचांची अनिर्बंध राजवट सुरू झाली. ही सत्ता फ्रेंच आक्रामकांना सामील झालेले स्थानिक नेते, क्षत्रप, टोळीवाले यांच्या साहाय्याने चालत असे. स्वाभाविकपणे फ्रेंचांच्या बरोबरीने या मांडलिकांविरुद्ध देखील वातावरण तापू लागले. या मोहिमेत पुढाकार होता मुस्लिम धर्मगुरूंचा, ज्यांना माराबूत म्हणत असत.
हे माराबूत निरनिराळे चमत्कार करत. यथावकाश, रॉबर्ट-हूदीन यांनी या चमत्कारांची अतिसामान्य जादूचे प्रयोग अशी संभावना केली होती. पण अडाणी अरबांवर प्रभाव पाडायला, स्वतःभोवती शिष्यगण गोळा करायला ते पुरेसे होते. माराबूतांनी असा प्रचार चालवला की असे चमत्कार करणारे आपण अरब या दुबळ्या फ्रेंचांच्या वरचढ आहोत. तेव्हा अरबांनी फ्रेंचांपुढे नमते न घेता बंड पुकारावे. जनतेच्या दबावापोटी फ्रेंचांच्या अल्जीरियावरील सत्तेचा पाया असलेले स्थानिक मांडलिकही बिथरू लागले. पर्यायाने फ्रेंच सत्तेलाच आव्हान निर्माण झाले. सैनिकी बळाने पारंपरिक पद्धतीने हे बंड चिरडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फ्रेंच सम्राट तिसरा नेपोलियन यांनी फ्रेंच जादूने अरब माराबूतांच्या चमत्कारांना हरवण्याचा अफलातून आणि क्रांतिकारी निर्णय घेतला. तदनुसार अल्जीरियातील फ्रेंच गव्हर्नरने रॉबर्ट-हूदीन यास पाचारण केले. रॉबर्ट-हूदीन यांनी हे आमंत्रण काही सबबी देऊन दोन वर्षे टाळले. पण शेवटी १८५६ साली सबबीच उरल्या नाहीत. तेव्हा जादूगारीच्या व्यवसायातून निवृत्त होऊन दोन वर्षे उलटलेली असूनही त्यांनी हे आव्हान स्वीकारले. आपल्या आत्मचरित्रात रॉबर्ट-हूदीन यांनी या मोहिमेचे तपशिलात वर्णन केले आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे.
रॉबर्ट-हूदीन यांनी सर्वप्रथम अल्जीरियातील एका मोठ्या नाट्यगृहात दर आठवड्याला दोन जादूचे प्रयोग सुरू केले, जेणेकरून त्यांना सराव होईल व दोन वर्षाच्या काळात आपले विसरलेले कसब पुन्हा मिळवता येईल. या प्रयोगांचा अरब मनावर काय प्रभाव पडतो हेही जोखता येईल आणि थोडीफार कमाईही होईल. यथावकाश त्यांची ख्याती अल्जीरियन अरब जगात पसरली आणि लवकरच अरब टोळीप्रमुखांसमोर जादूचे प्रयोग करण्याची संधी आली. या कार्यक्रमात अनेक छोट्यामोठ्या प्रयोगांनंतर (जसे की हॅटमधून तोफगोळा काढणे, वगैरे वगैरे) रॉबर्ट-हूदीन यांनी त्यांचे ठेवणीतले तीन प्रयोग केले.
त्यातला पहिला प्रयोग होता, “पेटी – हलकी की जड?” या नावाचा. या प्रयोगात एखाद्या प्रेक्षकाला प्रथम हलकी वाटणारी लाकडी पेटी नंतर उचलणे जड जाई. सामान्यतः हा प्रयोग केवळ थट्टा म्हणून चालत असे. पण अल्जीरियात टोळीप्रमुखांसमोर ह्या प्रयोगाला रॉबर्ट-हूदीन यांनी वेगळाच रंग दिला. “माझ्या दैवी शक्तीने मी तुमच्यातल्या शक्तिमान व्यक्तीला शक्तिहीन करेन” असा दावा करून त्यांनी त्यांच्यातल्या ताकदवान माणसाला पेटी उचलायला आमंत्रण दिले. “तू शक्तिमान आहेस ना?” यासारख्या खातरजमा करणार्या प्रश्नावलीने त्याला डिवचूनही झाले. प्रथम पेटी सहज उचलली गेली, आणि “जितं मया” या आविर्भावात तो अरब परत फिरणार तेवढ्यात रॉबर्ट-हूदीन यांनी त्याला पुन्हा बोलावून घेतले. जादुई हस्तलाघव करीत मंत्र म्हटला की, “बघ! आता तू स्त्रीपेक्षाही दुबळा झाला आहेस! उचल बघू पेटी !!” आता मात्र प्रेक्षागारातून मिळणारे प्रोत्साहन व कठोर प्रयत्नांतीही त्या बलदंड अरबाला तीच पेटी उचलता आली नाही. पेटीच्या कड्या उचकटण्याची वेळ येते की काय असे वाटत असतानाच तो अरब लुळा पडून कोसळला व उठून पळून गेला. या प्रयोगानंतर अरब प्रेक्षकांत शांतता पसरली व “शैतान” “जहन्नुम” अशी कुजबुज सुरू झाली असे रॉबर्ट-हूदीन यांनी नोंदवले आहे.
मंत्रबळामुळे माराबूत फकीरांच्यावर बंदूक झाडूनही त्यातून गोळी न सुटता केवळ ठिणग्या पडतात अशा एका चमत्काराचा अरब जनमानसावर फारच प्रभाव होता. ही एक निव्वळ यांत्रिक चमत्कृती होती. अल्जीरियाच्या फ्रेंच गव्हर्नरने रॉबर्ट-हूदीन यांना सूचना केली की आपण याच्या वरचढ असा एखादा प्रयोग करावा. आणि तो प्रयोग रॉबर्ट-हूदीन यांच्या भात्यात तयारच होता, तो असा. प्रथम रॉबर्ट-हूदीन यांनी मी अजेय आहे अशी घोषणा करायची. मग प्रेक्षकांनी पास केलेल्या बंदुकीत, त्यांच्या एका प्रतिनिधीने दारू व गोळी भरून ती रॉबर्ट-हूदीन यांच्यावर झाडायची. आणि रॉबर्ट-हूदीन यांनी ती गोळी हातातील सुरीच्या टोकावर टोचलेल्या सफरचंदात पकडून दाखवायची. गोळीवर त्या प्रेक्षकाने आधीच खूण केलेली असल्याने ती ओळखता येई. बंदुकीतील यांत्रिक चमत्कृतीला हातचलाखीची जोड देऊन हा प्रयोग सिद्ध होई. रॉबर्ट-हूदीन यांचे कसब आणि प्रसंगावधान असे नामी, की त्यांनी कुणाला बोलवण्याअगोदरच खरोखरीच त्यांचे प्राण घेण्याच्या इराद्याने रंगमंचावर धावून आलेल्या प्रेक्षकालाच त्यांनी या प्रयोगात सहभागी करून घेतले. त्यालाच बंदूक तपासायला दिली व गोळीही झाडू दिली. रॉबर्ट-हूदीन म्हणतात की या प्रयोगानंतर प्रेक्षागृहात भीती दाटून आली आणि स्मशानशांतता पसरली.
तिसरा प्रयोग आजचे जादूगारही करत असतात. या प्रयोगात रॉबर्ट-हूदीन यांनी एका प्रेक्षकाला रंगमंचावरून अदृष्य केले, आणि प्रेक्षकांत घबराट माजली. हलकल्लोळ उडाला. पळापळ सुरू झाली. एका अरब नेत्याने पळणार्या प्रेक्षकांना आवाहन केले की, “पळू नका. आपला एक धर्मबंधू गायब झाला आहे, त्याला शोधा.” त्याने पळापळ आणखीनच वाढली. प्रेक्षागृहाबाहेर पळू पाहाणार्या प्रेक्षकांना दरवाज्यात तो गायब झालेला अरब दिसला आणि आणखी हलकल्लोळ उडाला. सगळ्यांनी त्याला चाचपायला, प्रश्न विचारायला सुरुवात केली. तोही इतका बावचळला की तो आणि त्याच्याबरोबर सगळेच पळत सुटले.
आणखी काही टोळीप्रमुखांसमोर दुसर्या दिवशीही हाच कार्यक्रम झाला. पण परिणाम तोच होता. फ्रेंचांची जादू अधिक प्रभावी आहे हे सर्व टोळीप्रमुखांना पटले. मात्र आपण चेटक्या वा सैतान नसून कसबी हातचलाख माणूस आहोत हे रॉबर्ट-हूदीन यांनी बहुसंख्य अरब नेत्यांना परिश्रमपूर्वक पटवून दिले. आणि मग प्रयोगानंतर रॉबर्ट-हूदीन यांच्याशी हस्तांदोलन करायला घाबरणारे अरब नेते त्यांचे चाहते झाले. बौ आलम सारख्या टोळीवाल्यांच्या नेत्यासमोर खाजगी कार्यक्रमही झाला. या अरब नेत्यांनी रॉबर्ट-हूदीन यांना खास समारंभपूर्वक एक मानपत्रही दिले.
रॉबर्ट-हूदीन इथेच थांबले नाहीत. हे माराबूत चमत्कार म्हणून जादूचे कुठले प्रयोग करतात ते त्यांना पाहायचे होते. त्यांच्या नकळत त्यांचे प्रयोग पाहून, समजून घेऊन नंतर त्यांच्याही वरचढ असे हातचलाखीचे प्रयोग त्यांनी त्या माराबूतांनाच करून दाखवले. शेवटी एका माराबूताने त्यांना पिस्तुलाने द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. तो प्रयोग दुसर्या दिवशी पार पडला. हातचलाखीने त्या पिस्तुलातील गोळी बदलून आपल्यावर झाडलेली गोळी त्यांनी दातात पकडून दाखवली. तर माराबूतावर गोळी झाडण्याअगोदर हूदीन यांनी एक गोळी भिंतीवर झाडली तर भिंतीतून रक्त वाहू लागले. [1] हूदीन यांनी हे सर्व कसे साधले त्याची वर्णने व स्पष्टीकरणेही आपल्या आत्मचरित्रात दिली आहेत.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा, की फ्रेंच जादू अरब जादूपेक्षा श्रेष्ठ आहे हे अरब टोळीप्रमुखांना व जनतेला पटले. फ्रान्सच्या विरोधातली माराबूतांची चळवळ झपाट्याने विरून गेली. विजयी वीराप्रमाणे हूदीन फ्रान्सला परतले, आणि फ्रान्सचे हीरो झाले. तिसर्या नेपोलियन राजाने याबद्दल त्यांना इनामही दिले. लक्षणीय बाब ही की नंतर अल्जीरियावरील फ्रेंचांचे राज्य पुढची १०६ वर्षे, १९६२ पर्यंत टिकले.
जादूगिरीच्या इतिहासलेखकांनी विसाव्या शतकात जड पेटीचे गुपित फोडले. त्या पेटीचा तळ लोखंडी होता. आणि ती एका जमिनीत गाडलेल्या विद्युत्चुंबकावर ठेवलेली होती. जादूगाराच्या इशार्यावर वीजप्रवाह सुरू करून ती पेटी जड करता येई. तर पेटीच्या हॅण्डलला विजेचा झटका देण्याची सोय केलेली होती. [1] [2] १८५६ साली हे अद्ययावत तंत्रज्ञान होते. कारण १८३१ मध्येच जोसेफ हेन्री यांनी अमेरिकेत शक्तिशाली विद्युत्चुंबकांचा शोध लावला होता. तर फ्रेंच यांत्रिक पिक्सी याने १८३२ साली जनित्राचा शोध लावला होता. आणि रॉबर्ट-हूदीन या विविध शोधांशी नुसतेच परिचित नव्हे तर संबंधितही होते. विजेच्या उपयोजनाबाबत ते स्वतः संशोधनही करीत होते. म्हणूनच १८५५ सालच्या पॅरिसच्या जागतिक औद्योगिक प्रदर्शनात रॉबर्ट-हूदीन यांना घड्याळांत विजेचा यशस्वी उपयोग करण्याबाबत सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले होते. अल्जीरियाहून परतल्यावर आपले उरलेले आयुष्यही त्यांनी अशा उपयोजक संशोधनालाच वाहिले होते.
रॉबर्ट-हूदीन यांच्या मृत्यूनंतर फ्रान्सच्या जनतेने या सुपुत्राचे स्मारक म्हणून पुतळा उभारला, वस्तुसंग्रहालय केले. जादूचा हूदीन यांच्याशी असलेला संबंध इतका घनिष्ट होता की सिनेमाचा शोध लागल्यावर जे चमत्कृतिपूर्ण चित्रपट बनवले जात त्यांनाही हूदीन सिनेमा म्हणत असत. [3] एरिक वाइस या अमेरिकन जादूगाराने हौदिनी नाव घेण्याचा उल्लेख वर केलाच आहे.
पण रॉबर्ट-हूदीन हे केवळ धाडसी जादूगारच नव्हते. तर निवृत्तीतून बाहेर पडून जादुई वाटणार्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि हस्तलाघवाच्या साहाय्याने अरब मांत्रिकांना नामोहरम करणारे, अल्जीरियामधले बंड मुळातूनच खुडून काढणारे धाडसी आणि धोरणी मुत्सद्दीही होते. आपली जादू हा चमत्कार नसून हस्तकौशल्य आहे हे अरब टोळीप्रमुखांना पटवून त्यांना आपले मित्र बनवणे यात त्यांची मुत्सद्देगिरी दिसते. तर माराबूतांच्यात जाऊन त्यांनाही जादू वाटतील असे हस्तलाघवाचे आणि तंत्रकुशलतेचे नवे प्रयोग जुळवणे व करणे यात मला धोरण आणि धाडस दिसते. जवळजवळ दीडशे वर्षांनंतर काही पत्रकार/ लेखकांनी [1] किंवा जादूगारांनी [2] या कामगिरीची यथायोग्य नोंद घेतलेली दिसते. इतरही अनेक संदर्भ असतील. उदाहरणार्थ विकिपीडियावरील रॉबर्ट-हूदीनविषयक नोंद पाहावी. मात्र, राजकीय इतिहासकारांनी या कामगिरीची नोंद घेतल्याचे दिसत नाही. किंबहुना त्यांना अनुल्लेखाने मारले, असेच दिसते. विकिपीडियावरील फ्रेंच अल्जीरियाच्या इतिहासकालीन नोंदीत, तसेच जगभरातील महत्वाच्या घटनांची, तसेच त्यात सहभागी नामवंतांची तारीखवार नोंद घेणार्या कोशात [4] ही घटनाही दिसत नाही व रॉबर्ट-हूदीन यांचे नावही दिसत नाही. हे आश्चर्यकारक आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान यांची यशस्वी सांगड घालणार्या या धाडसी तंत्रकुशल/ हस्तकुशल व्यावसायिकाला आणि धोरणी मुत्सद्द्याला लिखित राजकीय इतिहासात नावापुरतेही स्थान देणे, हे कंपूशहा राजकारण्यांना आणि इतिहासकारांना जड जात असावे. “कोण रॉबर्ट-हूदीन? तो तर एक यःकश्चित जादूगार!” मग ‘जादूने राज्य राखिले’ असले, म्हणून काय झाले?”
विश्वास द. मुंडले
संदर्भ:
[1] Levy Joel, “The father of modern magic and the Algerian rebellion that never was: 1856”, in “Secret History – Hidden Forces that Shaped the Past”, Vision Paperbacks, London, 2004, p. 155 – 159,
[2] David Copperfield, a magician, in the Foreword to “Brain Works”, Michael S. Sweeny, National Geographic, Washington DC, 2011,
[3] Leeder M, M. Robert-Houdin goes to Algeria: spectatorship and panic in illusion and early cinema, Early Popular Visual Culture, Vol. 8, No. 2, May 2010, 209–22
[4] Chronology of the world history – The Modern World – 1763-1992, Ed. Neville Williams, Philip Waller, 2e, Helicon, Oxford, 1994
लिंक रूपात दिलेले इंटरनेटवरील सर्व संदर्भ १५ ऑगस्ट, २०२१ रोजी वाचलेले आहेत.
फ्रेंच शब्दांचे योग्य उच्चार, तसेच Levy व Leeder यांचे संदर्भ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. रवि अभ्यंकर यांना धन्यवाद. रवि अभ्यंकर यांचा परिचय इथे पाहा.
Hits: 102
हौदिनीचं नाव ठाऊक होतं – बंद पेटा-यातून बेमालूम सुटून येणारा जादूगार म्हणून. इतर माहिती मला नवीन आहे. धन्यवाद.
धन्यवाद सद्गुरु
विश्वास…. सुंदर लेख आहे.. तुझे अफाट वाचन आणि दुसर्या ना त्यातून मिळालेली माहिती इतरांपर्यंत नेण्याची धडपड अवर्णनीय आहे.. तू सांगेपर्यंत या जादूचा प्रकार अज्ञातच होता…
धन्यवाद रवींद्र. मी प्रयत्न करीत असतो. त्याचा विसर पडू नये यासाठी वेबसाइटचे तसेच मराठी विभागाचे ध्येयवाक्य रचले आहे.
सुंदर माहितीपूर्ण लेख .
धन्यवाद कल्याण