श्वानपुराण – २ व ३

लांडगा आणि कुत्रा (Picture Credit Scientific American)

श्वानांची कुळकथा

माणसाळलेल्या प्राण्यांत कुत्र्याचा समावेश होत असतो. पण हा एक अपवाद आहे. बहुतेक सगळे माणसाळवलेले उपयुक्त पशु हे माणसांना अभक्ष्य ते गवत इत्यादि खातात आणि भक्ष्य किंवा साधनसंपत्ती निर्माण करतात, किंवा ढोरमेहेनत पुरवतात. या प्राण्यांवरील खर्चवेच वजा करता एकंदरीत नफाच होतो. या उलट कुत्रा बाळगणे हे खर्चिक आहे. साधनसंपत्तीची निर्मिती वा श्रमशक्ति यासारखे उघड फायदे न देणारा कुत्रा माणसाळवण्याची प्रक्रिया पुरातनकाळी कशी घडली असेल?

दुसरे असे की बहुतेक सारे उपयुक्त पशु (जसे की गाय, म्हैस, बकरी, मेंढी, डुक्कर, कोंबडी, घोडा, गाढव, उंट इ.) अदमासे आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी माणसाळवले गेले, असे इतिहास सांगतो. तर अगदी अलिकडे पर्यंत कुत्रा आणि माणूस यांचा संबंध किमान १५ हजार वर्षे जुना असल्याचे माहिती होते. आता तर काही पुरातत्वज्ञांना हा संबंध किमान ३५ हजार वर्षे जुना असल्याचे पुरावे सापडले आहेत. प्राणी माणसाळवणे या प्रक्रियेत हा अदमासे पाच हजार ते पंचवीस हजार वर्षांचा खंड कसा पडला असेल?

कायोटी (Picture Credit Wikimedia)
आफ्रिकी रानकुत्रा (Picture Credit Wikimedia)

तिसरे असे की वंशशास्त्रज्ञांच्या मते कुत्रे, रानकुत्रे (wild dog), कायोटी (coyote), लांडगे (wolf) हे परस्परांशी संबंधित असून हे सारे गेल्या काही लाख वर्षात एका लांडगासदृश पूर्वजापासून उपजले असले पाहिजेत. तर जनुकीय दृष्ट्या कुत्रा व रानलांडगे यांच्यातील फारकतीला अदमासे वीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी. उत्क्रांत होत असलेले कुत्रे व रानलांडगे यांच्या सातत्याने घडलेल्या संकरामुळे हा कालखंड काहीसा धूसर आहे. मात्र कुत्रा व माणूस यांच्या संबंधाला त्याच्याही आधीपासून सुरुवात झाली असली पाहिजे. तेव्हा माणूस व कुत्रा यांच्या संबंधाचा पुरावा आज ३५ हजार वर्षे जुना असला तरी तो काही नवीन पुरावा सापडून हा कालखंड आणखी काही दशसहस्र वर्षे मागे गेल्यास आश्चर्य वाटणार नाही.

सायबेरियन हस्की (Picture Credit Wikimedia)
जर्मन शेफर्ड (Picture Credit Wikimedia)

इतर माणसाळलेले प्राणी प्रथम कुठे माणसाळवले गेले असतील याबाबत वैज्ञानिकांना पुराव्यानिशी सांगता येते. पण दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, चीन, सैबेरिया, युरोप अशा विविध ठिकाणी संशोधन केल्यावरही कुत्र्यांची उत्क्रांति व विकास नक्की कुठे झाला याबाबत काही सांगणे शक्य होत नाही. तेव्हा ही प्रक्रिया बरेच ठिकाणी एकाच समयी घडत गेली असणे शक्य आहे. कारण माणूस जसा पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहू शकतो तसेच रानलांडगेही विविध प्रकारच्या परिसरात आढळतात. इतर प्राणी माणसाळवण्याच्या कित्येक हजार वर्षे आधी ही कुत्रा माणसाळवण्याची प्रक्रिया कशी घडली असेल? भले आजचे जर्मन शेफर्ड वा सायबेरियन हस्की जातीचे कुत्रे रानलांडग्यांशी साधर्म्य दाखवीत असतील, पण पर्सच्या आकाराचे चिवावा (chihuahua), किंवा वासराच्या आकाराचे ग्रेट डेन कुत्रे आणि आजचे रानलांडगे यांचा पूर्वज समान होता हे कसे पटावे?

ग्रेट डेन (Picture Credit Pexels)
चिवावा (Picture Credit Stocksnap)

वैज्ञानिक असा सिद्धांत मांडतात की अतिप्राचीन काळी माणसांनी लांडग्यांना माणसाळवले नसून कुत्र्यांचे पूर्वज असलेल्या लांडग्यांनी माणसाला जवळ केले. माणसे एका जागी, सुरक्षित अशा गुहेत राहू लागली, आणि तिकडेच अन्न भाजून वा शिजवून खाऊ लागली, तेव्हाच या प्रक्रियेची सुरुवात झाली. त्या काळी शेतीचा शोध लागलेला नव्हता. माणसे प्रामुख्याने मांसभक्षी होती. आजच्याप्रमाणेच त्याही काळी भक्ष्य ठरलेल्या प्राण्याच्या शरीराचा अखाद्य भाग, आणि उरलेले किंवा शिळे अन्न घराबाहेर टाकून दिले जाई. त्यामुळे राहात्या गुहांच्या जवळचा उकिरडा हा अन्नाचा स्रोत तयार झाला.

सहजी उपलब्ध होणार्‍या या अन्नस्रोताकडे आकृष्ट झालेले रानलांडगे, त्या उकिरड्यांवर व पर्यायाने माणसांवर अवलंबून राहू लागले. जे लांडगे हिंस्रपणा सोडून मनुष्यप्राण्याशी जमवून घेऊन राहिले त्यांना उकिरड्यावरील, तसेच उरलेले अन्न मिळाले. तर हिंस्रपणे वागणार्‍या लांडग्यांची माणसांकडून हकालपट्टी झाली. सुमारे २० हजार वर्षांपूर्वी हिमयुग पराकोटीला पोचले आणि अन्नाची तीव्र टंचाई झाली. वैज्ञानिकांच्या मते याच काळात कुत्र्यांचे पूर्वज असलेल्या हिंस्र लांडग्यांच्या प्रजाति नामशेष झाल्या, पण माणसाशी जमवून घेणारे लांडगे जगले. माणसासोबत राहाणार्‍या लांडग्यांच्या अनेक पिढ्या उलटल्या व त्यातून कुत्रा ही उपजाति निपजली. सतत माणसावलंबी असणार्‍या रानलांडग्यांची पस्तिसावी पिढी रस्त्यावरील कुत्र्यासारखी दिसू लागते असे संशोधन सांगते.

यथावकाश या प्राण्याचे गुण माणसाला कळू लागले. तत्काळ लक्षात येणारा विशेष गुण म्हणजे जवळ येऊ पाहाणार्‍या धोकादायक घुसखोराची पूर्वसूचना देण्याची क्षमता. याच गुणापोटी जाणीवपूर्वक कुत्रा बाळगणे सुरू झाले असले पाहिजे. थंडीच्या दिवसात गुहेत राहाणार्‍या मानवाला ऊब द्यायलाही कुत्रा उपयुक्त ठरला असेल असे वैज्ञानिकांना वाटते. यथावकाश शिकार करतानाही माणसांनी कुत्र्याची मदत घेतली असेल असा अंदाज आहे.

कुत्र्याचे बहुविध गुण (घ्राणशक्ति, श्रवणशक्ति, धाडस, कळपात जगण्याची वृत्ती, शिक्षणक्षमता इ.) लक्षात आल्यानंतर प्रजननविषयक प्रयोग करून माणसाने विविध क्षमतांपैकी एकच क्षमता प्रखरपणे वापरू शकणार्‍या कुत्र्यांच्या विविध जातीही निर्माण केल्या. इजिप्तच्या संस्कृतीत, म्हणजे साधारणपणे ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी, सहा प्रकारचे कुत्रे आढळतात. गेल्या काही हजार वर्षांत मानवाने गुरे वळवण्याची क्षमता बाळगणारे बॉर्डर कॉली (Border Collie) , हिमस्खलनातून माणसांना शोधून वाचवणारे सेंट बर्नार्ड (St. Bernard) , आकाशातील पक्ष्यांची दिशा दाखवणारे पॉइंटर (Pointer), गोळी लागून पडलेले पक्षी शोधून आणणारे रिट्रायव्हर (Golden retriever or Labrador retriever), राखणीला उपयुक्त जर्मन शेफर्ड (German Shepherd) अशा कुत्र्यांच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. मात्र वर उल्लेख केलेल्या चिवावा वा ग्रेट डेन सारख्या जाती प्रामुख्याने गेल्या पाचशे वर्षांतच विकसित झाल्या आहेत.

पाळीव कुत्र्यांचा सामान्य मानवाला भावणारा विशेष गुण म्हणजे अढळ निष्ठा आणि निर्व्याज प्रेम.

प्रत्येक कुत्र्याच्या दृष्टीने त्याचा मालक हा नेपोलियनच असतो

-आल्डस हक्सले

आल्डस हक्सले यांचे हे विधान अक्षरशः खरे आहे. अजोड असे धाडस, श्रवणशक्ती आणि घ्राणशक्ती वापरून विविध संकटापासून मालकाचा बचाव करत कुत्रे आपली निष्ठा दाखवतात. वेळप्रसंगी आपले प्राण देऊन अज्ञात व्यक्ती वा प्राण्यांच्या हल्ल्यापासून कुत्र्यांनी आपल्या मालकांना वाचवल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण त्याखेरीज, कोसळू घातलेली इमारत, येऊ घातलेला भूकंप, लागलेली आग, याची पाळीव कुत्र्यांनी सूचना दिल्याच्याही अनेक घटना आहेत. आता तर प्रशिक्षित कुत्रे मधुमेही मालकाच्या शर्कराक्षयाची (hypoglycaemia) वा अपस्मारग्रस्त (epileptic) मालकाला येऊ घातलेल्या झटक्याची (fit) आगाऊ सूचना देत असतात. असे नवनवीन विविधांगी कसब शिकण्यासाठी लागणारी बुद्धी देखील कुत्र्यांकडे असते. अर्थात कुत्र्याला ह्या विविध कला कशा शिकवायच्या याबाबत संशोधन करणार्‍या मानवांच्या बुद्धीलाही दाद दिलीच पाहिजे.


समरांगणिचे श्वान – मार्क

पण माणसांच्याच नव्हे, तर कुत्र्यांच्याही विविध क्षमतांची खरी कसोटी लागते ती युद्धकाळात! या कसोटीच्या काळात अनेक अप्रचलित प्रश्न पडत असतात. अक्षरश: अग्निपरीक्षा! त्या परीक्षेला उतरणारे अनेक श्वान इतिहासाला माहिती आहेत. त्यातील वैमानिकासोबत उड्डाण करणार्‍या एका श्वानाची कथा (श्वानपुराण १ ) या आधीच आपण या वेबसाइटवर वाचली असेल. ही दुसरी कथा आहे दुसर्‍या महायुद्धात पश्चिम आघाडीवर पायदळाला उपयुक्त ठरून मानसन्मान मिळवणार्‍या मार्कची, आणि त्याचा पालक जॉन कॉलिंग यांची.

जॉन स्वतःच एक श्वानप्रशिक्षक होता. मार्क या जर्मन शेफर्डच्या क्षमतेने प्रभावित झालेल्या जॉनने त्याला विकत घेतले होते. युरोपवर युद्धाच्या सावल्या आल्यावर जॉन सैन्यात गेला. त्याने मार्कलाही युद्धश्वान म्हणून विशेष प्रशिक्षण दिले. आवाजाला कुत्रे किती घाबरतात हे सर्वज्ञात आहे. पण युद्धकाळातील विविध शस्त्रांच्या आवाजांनी विचलित न होता राखण करीत उभे राहाणेच नव्हे तर निरोप वा दारुगोळा, वेळप्रसंगी नदीपार पोहत जाऊन पोचवणे, यात मार्क प्रवीण झाला. अधिकृत सैनिकी कुत्रा म्हणून नव्हे तर जॉनचा पाळीव कुत्रा म्हणून तो युद्धक्षेत्रावर दाखल झाला!

जर्मनांच्या बेल्जियमवरील वावटळी चढाईत मार्कची उपयुक्तता कळू लागली. तातडीने सतत माघार घेता घेता जॉनच्या पथकातील सैनिकांना झोपायला वेळ मिळे ते मार्क राखणीला उभा राहिल्यानेच. संकट आले की विशिष्ट प्रकारे गुरगुरून तो जॉन आणि सहकार्‍यांना सावध करी. माघार घेताना एका चकमकीत जॉनचे ६ सहकारी बेपत्ता झाले. मार्कने युद्धभूमीवर जाऊन त्या सार्‍या जायबंदी शिपायांना शोधून काढले, व ते सारे वाचले. अशाच एका चकमकीत बेटावरील आपल्या दलाला दारुगोळा पोचवण्यासाठी पोहत-पोहत अनेक फेर्‍या मारणारा मार्क जर्मन गोळीबाराने जबर जखमी झाला. त्याला पाण्यातून वाचवण्याच्या प्रयत्नात जॉनही जखमी झाला. पण जॉनपेक्षा मार्कची दुखापत गंभीर होती.

एव्हाना सर्वच सैनिकांना युद्धभूमीवरील मार्कच्या कामगिरीचे मोल कळलेले होते. त्यांनी एखाद्या सैनिकासाठी करावी अशी प्रथमोपचाराची पराकाष्ठा केली. मार्कला तगवले. एवढेच नव्हे तर माघार घेऊन लंडनला जाताना जखमी सैनिकाला घेऊन जाण्याचे नाटक करीत मार्कला स्ट्रेचरवरून थेट माणसांच्या इस्पितळावर पोचवले. प्राण्यांसाठी आवश्यक तो सहा महिन्यांचा क्वारंटाइन टाळण्यासाठी हे सारे नाटक आवश्यक होते. सुदैवाने माणसांच्या इस्पितळातला डॉक्टरही श्वानप्रेमी निघाला, आणि त्याने मार्कला बरे करायला पशुवैद्यकीय मदतही मिळवून दिली.

पुढली तीन वर्षे मार्क जॉनबरोबर इंग्लंडमध्येच राहिला. या काळात सैनिकांचे प्रशिक्षण चालू असे. मार्क बरोबर असला की सैनिकांच्या अंधारात शब्दवेध घेण्याच्या परीक्षेत जॉन नेहेमीच पास होई. मार्क जिकडे पाहील तिकडे गोळी मारायची की झाले! जॉनही मार्कच्या विविध क्षमतांची परीक्षा घेत राही. मार्ककडे वासाने माग काढण्याची विशेष क्षमता होती. या क्षमतेवर बुटाला लावलेली अमोनिया, पेट्रोल वा अन्य रसायने किंवा बूट साबणाने धुणे याचा काहीही परिणाम होत नसे. केवळ काही मिनिटे घातलेल्या बुटावरील वासही मार्क ओळखत असे.

सहा जून १९४४ला ब्रिटिश दलात सामील झालेला जॉन युरोपवर चढाईला निघाला. जॉनचा पाळीव कुत्रा म्हणून सोबत मार्कही होता, अर्थात अनधिकृतपणे. जॉन शेजारी उभ्या मार्कवर एका सेनाधिकार्‍याचे लक्ष गेले आणि त्याने मार्कची परीक्षा घेतली. जॉनकरवी मार्कला एका ट्रकच्या पाठी ठेववले. मार्कला सोडून जॉन परतल्यावर दुसर्‍याच एका सैनिकाला त्या ट्रककडे पाठवले. रौद्ररूप धारण करून मार्कने त्या अज्ञात सैनिकाला ट्रकजवळही येऊ दिले नाही. मार्क परीक्षेत पास झाला. मार्कची परीक्षा घेणारे ते सेनाधिकारी होते दोस्त सेनेचे सरसेनापती जनरल आयसेनहोवर! सुदैवाने जॉनची सेना फ्रान्सच्या ज्या किनार्‍यावर उतरली होती, तिथे जर्मनांचा फारसा प्रतिकार झाला नाही. पण किनार्‍यावर उतरून चालता चालता मार्क एकदम थबकला! जॉनने तत्काळ सुरुंगविरोधी पथकाला पाचारण केले आणि केवळ काही पावलांवरच एक पदातीविरोधी सुरुंग निघाला. मार्क नसता तर जॉनच्या नक्की चिंधड्या उडाल्या असत्या!

पण तीनच आठवड्यांनंतर मार्कपासून काही मीटर अंतरावर एक सुरुंगाचा स्फोट झाला आणि मार्क फेकला गेला. त्याचा उजवा डोळाच उडाला, आणि उजवा पायही मोडला. जायबंदी मार्कची कारकीर्द संपली. मात्र युद्ध संपल्यावर अधिकृतपणे सैन्यात नसूनही एखाद्या सैनिकाप्रमाणे त्याला मोहीमवार मानसन्मान लाभले. युद्धानंतर जर्मनीत स्थायिक झालेल्या जॉनने जायबंदी मार्कला शेवटपर्यंत सांभाळले. जॉनच्या घराच्या आवारातच १९५२ साली त्याचा अंत्यविधी झाला. तिथे आजही मार्कच्या नावाचा फलक व पुतळा आहे.

विश्वास द. मुंडले

संदर्भ

The Domestication of Wolves https://www.timeforpaws.co.uk/s/Complete-Guide-To-Dog-Evolution

Johnson N. A., Who let the dogs in? The domestication of animals and plants, in Darwinian Detectives, p. 153 – 165, Oxford UP, New Delhi, 2007

https://en.wikipedia.org/wiki/Domestication_of_the_dog

Collings John, A Hero named Mark, Readers’ Digest.

Hits: 2

You may also like...

1 Response

  1. अर्चना+देशपांडे says:

    सुंदर माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *