श्वानपुराण ५ – श्वानमित्र फ्रॅंक व ज्यूडी

श्वानपुराण ४ इथे आपण नौदलात अभूतपूर्व सेवा बजावलेल्या, जपान्यांची युद्धकैदी बनलेल्या व त्यातूनही बचावलेल्या ज्यूडी नामक कुत्रीच्या कथेचा पहिला भाग वाचलात. विलियम फ्रॅंक नामक नाविकाने बन्नो नामक श्वानप्रेमी जपानी कॅंप-कमांडंटला कुत्र्याच्या पिलाची लाच देऊन मनुष्यपदाला पोचलेल्या ज्यूडीला अधिकृत युद्धकैद्याचा दर्जा आणि 81A हा क्रमांक कसा मिळवून दिला तेही आपण पाहिले.

पण दुसरे महायुद्ध अखेरच्या पर्वात आले, बन्नो यांच्या जागी निस्सी नामक श्वानविरोधी कॅंप कमांडंट आला, आणि ज्यूडीवरील संकटांची मालिकाच सुरू झाली. पण या सार्‍या संकटांतून तिला चातुर्याने वाचवताना आणि लंडनपर्यंत आणताना कसोटी लागली ती फ्रॅंक विलियम्स या श्वानप्रेमी नाविकाची, ज्यूडीने फ्रॅंकला दिलेल्या साथीची, तिच्या आज्ञाधारकतेची व शिक्षणक्षमतेचीही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की हे सारे घडले तेव्हा ज्यूडीचे वय नऊ वर्षे होते. कुत्र्यांच्या हिशोबात तिचे उतारवय झालेले होते. पण तरीही नवनवीन कसब शिकून फ्रॅंकच्या प्रयत्नाला साथ देण्यात ज्यूडी कुठेच कमी पडली नाही. तेव्हा ही गोष्ट आहे ज्यूडी आणि फ्रॅंक विलियम्स या दोघांची. काय काय घडले तेव्हा?

बन्नो यांची बदली झाली, आणि त्यांच्या जागी आलेल्या निस्सी यांनी पहिल्याच दिवशी सकाळी सर्व युद्धकैद्यांची हजेरी घेतली. फ्रॅंक रांगेत येऊन उभा राहिला आणि शेजारीच थरथर कापणारी ज्यूडीही. निस्सी यांना कुत्रा या प्राण्याबद्दल काहीही प्रेम नव्हते, हे तिला कळले असावे. रागारागाने फ्रॅंककडे येणार्‍या निस्सी यांनी ज्यूडीला ठार मारण्याचा आदेश देण्याआधी तिला 81A असा अधिकृत क्रमांक देणारा बन्नो यांचा आदेश निस्सी यांना दाखवणे आवश्यक होते. कारण कॅंप कमांडंटने एकदा दिलेला आदेश मागे घेणे म्हणजे अशक्यप्रायच. बन्नो यांच्या सहीचा कागद दाखवताना फ्रॅंकची भंबेरी उडाली. तो कागद पाहून निस्सीही वरमले, पण काही काळासाठीच. तिसर्‍याच दिवशी निस्सी यांनी सर्व युद्धकैद्यांना पुन्हा पाचारण करून आदेश दिला की उद्या सर्व युद्धकैदी सिंगापूरला जातील. त्याच रात्री प्रत्येक बराकीत जाऊन जपानी सैनिकांनी प्रत्येक कैद्याला उद्या पहाटे तयार राहाण्याचा हुकूम दिला. फ्रॅंकला हुकूम द्यायला स्वतः निस्सी आले होते. त्यांचा स्पष्ट आदेश होता की ज्यूडी सिंगापूरला जाणार नाही.

पण इतक्या सार्‍या नाविकांचा तारणहार ठरलेल्या ज्यूडीला असे वार्‍यावर सोडून द्यायला फ्रॅंक तयार नव्हता. आणि ज्यूडीला वाचवायचे तर तिला बरोबर घेऊन जाणे भाग होते. फ्रॅंकने ठरवले की ज्यूडीला वाचवायचे तर आजूबाजूला जपानी सैनिक असतील तिथे ज्यूडीला आपल्या पाठपिशवीतूनच न्यावे लागेल. जिथे शक्य असेल तिथे तिला बाहेर काढले तरी आपला एक आदेश मिळाल्याबरोबर झटपट रिकाम्या पाठपिशवीत शिरण्याचे कसब तिला शिकावे लागेल. त्याच पहाटेला उठून जवळ जवळ एक तास ज्यूडीबरोबर खेळत, एक चुटकी वाजवली की झटपट रिकाम्या पाठपिशवीत शिरायचे कसब फ्रॅंकने ज्यूडीला शिकवले. “म्हातार्‍या कुत्र्याला नवे कसब शिकवता येत नाही” अशी इंग्रजीत म्हण आहे. फ्रॅंकने व ज्यूडीने ती खोटी ठरवली.

पहाटेलाच सर्व कैद्यांना रांगेत हजेरी देण्याचा आदेश दिला तेव्हा फ्रॅंकने ज्यूडीला बराकीबाहेर एका खांबाला बांधून ठेवले. तिला “stay” असा हुकूमही दिला. गाठ अशी मारली की ज्यूडीने ओढ घेतली तर गाठ सुटावी. आपण काहीच सामान नेत नसलो तरी संशय येईल. म्हणून फ्रॅंकने आपल्या पाठपिशवीत एक ब्लॅंकेट भरून ठेवले, आणि तो कैद्यांच्या रांगेत उभा राहिला. निस्सी यांच्यातर्फे कैद्यांची मोजणी आणि पाठपिशव्यांची चाचपणी झाल्यावर कैद्यांना निघायचा आदेश मिळाला.

कैदी रेल्वे यार्डाच्या दिशेने निघाले. फ्रॅंक मुद्दामच मागे रेंगाळत चालला होता. बाहेर पडताच फ्रॅंकने ज्यूडीला बोलावण्याची खुणेची शीळ घातली, आणि रेल्वे यार्डाच्या दिशेने जाताजाता तो ज्यूडीची वाट पाहू लागला. कैद्यांसाठी मालवाहू डबे होते. त्यात चढण्याची वेळ झाली तरी ज्यूडीचा पत्ता नव्हता. तितक्यात फ्रॅंकला रेल्वेच्या डब्याखाली लपून आपल्याकडे नजर लावून बसलेली ज्यूडी दिसली. फ्रॅंक लागलीच खाली बसला. आजूबाजूच्या कैद्यांनी फ्रॅंकभोवती कोंडाळे करून सैनिकांना काही दिसणार नाहीसे पाहिले. एका झटक्यात फ्रॅंकने पिशवीतले ब्लॅंकेट काढले. चुटकीसरशी ज्यूडी वेगाने पिशवीत येऊन बसली. त्याच वेगाने पिशवी उचलून फ्रॅंकने ती पाठुंगळीलाही मारली, आणि तो डब्यात शिरला. काही तासांच्या प्रवासानंतर बेलावान बंदरातील गोदीत कैद्यांना डब्याबाहेर काढले तेव्हा फ्रॅंकने पाठपिशवीतून ज्यूडीला बाहेर काढले आणि ती बाहेर दिसेनाशी झाली.

बेलावानच्या गोदीवर कैद्यांची मोजणी, फेरमोजणी, पाठपिशव्यांची चाचपणी पुन्हा झाली. कैद्यांना रांगेत “आरामसे” उभे ठेवून आश्वस्त जपानी सैनिक एका बाजूला झाले, तशी फ्रॅंकच्या आजूबाजूला कुजबूज सुरू झाली की ज्यूडी येतेय. आणि ती खरच आली. जपानी सैनिकांचा डोळा चुकवून मान जमिनीला टेकवून पोटावर सरपटत ती उभ्या सैनिकांच्या रांगेत शिरली. हे फ्रॅंकच्या तिरप्या नजरेला दिसले. फ्रॅंकच्या सोबत्यांची थोरवी ही की एकानेही मान खाली वळवून ज्यूडीकडे पाहिले नाही. तसे होते तर नक्कीच जपानी सैनिकांच्या ते लक्षात येते. पाठपिशवी सारखी करण्याच्या मिशाने फ्रॅंकने आतले ब्लॅंकेट काढले व ज्यूडी बसल्याबसल्या पिशवी पाठीवर घेतली. एकाही कैद्याची मान वळली नाही, पण ज्यूडी फ्रॅंककडे पोचल्याचे सगळ्या कैद्यांना कळले. जपानी सैनिकांना मात्र काही कळले नाही, तेव्हातरी !!.

कैद्यांना जहाजावर चढवेपर्यंत काही तास लोटले पण ज्यूडी त्या अवघडल्या अवस्थेत निपचित पडून राहिली. जहाजाची वाट बघत सर्वच युद्धकैदी उन्हात उभे होते. ज्यूडीलाच नव्हे तर फ्रॅंकलाही ऊष्माघाताचा धोका होता. अशक्त झालेला फ्रॅंक खाली पडता तर त्याचे बिंग फुटते, आणि मग त्याची आणि ज्यूडीची गच्छंती ठरलेली होती. पण बरोबरच्या एका युद्धकैद्याकडे पाठपिशवीवरही सावली धरेल अशी मोठी घेरेदार हॅट होती. ती त्याने फ्रॅंकला घातली व ज्यूडीलाही सावली झाली.

परिणामी जपानी सैनिकांना शंका आली की काहीतरी घडते आहे. कॅप्टन निस्सी स्वतः कैद्यांसमोरून फिरू लागले. त्यांनी फ्रॅंकला विचारले की “तुझा कुत्रा इथे नाही ना?”. फ्रॅंकने चेहेर्‍यावर पुरेसे दुःख दाखवत मान हलवली व खाली वळवली. ज्यूडीनेही चिडीचूप राहून फ्रॅंकला साथ दिली. निस्सी यांनी मेदानच्या कॅंपात ज्यूडीला बांधून ठेवल्याचे पाहिले होते. त्यामुळे ते आश्वस्त झाले व पुढे निघाले. हुश्श! यथावकाश युद्धकैद्यांची रवानगी बोटीच्या खालच्या डेकवर झाली, आणि जहाज सिंगापूरच्या प्रवासाला निघाले. प्रवास होता ६०० किलोमीटरचा.

अर्ध्या वाटेत जहाजावर टॉर्पेडो हल्ला झाला. कैदी जिथे होते तिथेच स्फोट झाला. कित्येक दगावले. जहाज बुडू लागले. जिवाची पर्वा न करता जवळची खिडकी उघडून फ्रॅंकने ज्यूडीला जहाजाबाहेर सोडून दिले. ती पोहत पुढे निघून गेली. पाठोपाठ फ्रॅंकही बाहेर पडला. या सगळ्या गदारोळात चुकामुक झाली ती झालीच. जेमतेम दोनशे माणसे वाचली. त्यांना एका तेलवाहू जहाजाने उचलून घेतले. जहाजावरून फ्रॅंकने पाण्यात पडलेल्या ज्यूडीचा शोध घेतला. पण ती कुठेच नव्हती – पाण्यातही आणि जहाजावरही. फ्रॅंक निराश झाला. युद्धकैदी म्हणून भोगलेल्या हालअपेष्टांनी पार हडकून गेलेल्या फ्रॅंकचे वजन निम्म्यावर आलेले होते. पण त्या विपरीत परिस्थितीतही जगण्यासाठी धीर देणारी, बळ पुरवणारी ज्यूडीच आता नाहीशी झालेली होती. फ्रॅंकची जगण्याची इच्छाच सरली.

काही दिवसांनंतर तेलवाहू जहाजाने वाचवलेल्या युद्धकैद्यांना सिंगापूरला पोचवले. अस्थिपंजर बनलेल्या युद्धकैद्यांचा घोळका त्या कॅंपात शिरता शिरता फ्रॅंकला मागून जोरदार धक्का बसला आणि तो खाली पडला. कुठल्या तरी जपानी सैनिकाच्या रोषाला आपण पात्र झालोय आणि आता पुढे जे काही वाढून ठेवले असेल ते पत्करायचे या विचारात गढलेल्या फ्रॅंकला कुत्र्याच्या नाकाचा आणि पंजांचा स्पर्श झाला आणि त्याचा विश्वासच बसेना. ज्यूडीने पाठीमागून त्याला मिठी घातली होती.

झाले होते ते असे की, बुडणारे जहाज पाहून बचावासाठी जवळच असलेली एक छोटी मालवाहू नाव तिथे येऊन पोचली. खुल्या समुद्रात पोहोणार्‍या ज्यूडीला काही युद्धकैदी दिसले. त्याही अवस्थेत ज्यूडीने एका कैद्याला आपला आधार देऊन त्या जवळच्या मालवाहू नावेवर पोचवले. पुन्हा मागे येऊन दुसर्‍याला !! असे एक एक करून तिने बुडणार्‍या पाच कैद्यांना वाचवले. त्या पाच नाविकात लेस सर्ल हा ब्रिटीश नाविकही होता, ज्याने हा प्रसंग नोंदवला आहे. शेवटी ज्यूडीलाही उचलून घेतले गेले. तेलवाहू जहाजाच्या तुलनेत ही छोटी नाव सिंगापूरला झटपट पोचली, आणि ज्यूडी, लेस सर्ल आणि इतर सैनिक सिंगापूरच्या जपानी कॅंपात येऊन पोचले. पोचल्यापोचल्या ज्यूडीने सगळीकडे फ्रॅंकचा शोध घेतला. लेस सर्ल तिला आपल्या बराकीत घेऊन जाऊ पाही. पण ज्यूडी बधली नाही. ती कॅंपच्या फाटकापाशीच फ्रॅंकची वाट पाहात थांबून राहिली. तिचे वाट पाहाणे सफळ झाले आणि फ्रॅंकची जीवनेच्छाही जागी झाली.

सिंगापूरच्या कॅंपात चार आठवडे काढल्यावर सर्व युद्धकैद्यांची रवानगी सुमात्रा बेटावरील एका खास मोहिमेवर झाली. बोटीने सिंगापूर ते सुमात्राच्या किनार्‍यापर्यंतच्या प्रवासात ज्यूडीला पाठपिशवीतून वाहून नेणे फ्रॅंकला तुलनेने सोपे गेले. कारण या वेळेला निस्सी सारखे श्वानशत्रू अधिकारी नव्हते. पण सुमात्राच्या किनार्‍यापासून बेटाच्या मध्यावरील सावालुंटोपर्यंतचा पायी प्रवास म्हणजे धुवांधार पावसाला तोंड देत, दुथडी वाहाणार्‍या नद्या, धोकादायक दलदली, आणि कच्चे पूल ओलांडण्याचे एक दिव्यच होते. सावलुंटोला बर्‍याच वर्षांपूर्वी डचांनी बांधायला सुरुवात करून सोडून दिलेली एक रेल्वे लाइन बांधून पुरी करणे ही ती मोहीम. आणि हे सारे युद्धकैदी म्हणजे त्या मोहिमेवरचे वेठबिगार!

या वेठबिगारांची अवस्था काय होती? ब्रिटनच्या लेखी हे सारे बेपत्ता, आणि बहुधा मृत नाविक होते. आधीच युद्धकैदी म्हणून घडलेल्या उपासमार व छळाने अर्धमेले झालेले हे कैदी बेरीबेरी, मलेरिया वा निव्वळ उपासमारीने मरत होते. उरलेले अस्थिपंजर अवस्थेत, अंगावर बशी वा ताटलीच्या आकाराच्या जखमा सोसत झाडे तोडणे, माती उपसणे वा रेल्वे रूळ वाहून नेणे यासारखी कष्टप्रद कामे करीत जिवंत होते इतकेच. त्या सगळ्या काळात ज्यूडी सगळ्यांनाच जगण्यासाठी नैतिक आणि भौतिक असा दोन्ही आधार ठरेल अशी अमूल्य मदत करत राही.

ज्यूडी सदैव फ्रॅंकसहित इतर नाविकांच्या आसपास वा थोडी पुढेच जमीन हुंगत चालत राही. ती एखाद्या झुडुपात नाक खुपसून शेपूट हलवीत उभी राहिली की या नाविकांनी समजून जावे की झुडुपापलिकडे एखादा स्थानिक रहिवासी काहीतरी देवाणघेवाण करण्यासाठी उभा आहे. हे स्थानिक रहिवासी, नाविकांजवळचे घड्याळ, अंगठी, यासारख्या चिजा घेऊन कैद्यांना कॉफी, तंबाखू अंडी, मासे असले खाद्य पुरवीत. ज्यूडी काहीही न बोलता त्या दोहोतला दुवा बनून जाई. ज्यूडीने झुडुपात झडप घालून काही झटापट केली की समजावे तिने उंदीर वा साप पकडला आहे. हे खाद्य लगेच कैद्यांच्या उकडहंडीत समाविष्ट होई. ज्यूडी झुडुपाकडे पाहून जोरदार भुंकली की समजावे पलिकडे एखादा रानडुकर, किंवा अस्वल, हत्ती वा वाघ यासारखा मोठाला प्राणी आहे. त्याला मारायला वा पिटाळायला जपानी सैनिकांची बंदूक आवश्यक असे. ज्यूडीचे हे भुंकणे आता जपानी सैनिकांनाही माहिती झालेले होते. ते धावत येत आणि खाण्याची टंचाई असलेल्या त्या ठिकाणी एखाद्या दिवसाची चंगळ होई.

फ्रॅंक व ज्यूडी (Picture credit Bibliocommons)

एके काळी सुंदर या विशेषणासहित नौदलात दाखल झालेली ज्यूडी आता तशी राहिलेली नव्हती. तिला पाळायला कोणीही तयार झाले नसते. पण पाप्याचे पितर बनलेला फ्रॅंक आणि अस्थिपंजर झालेली ज्यूडी ही एक अविस्मरणीय जोडी होती असे त्या काळच्या साक्षीदारांनी नमूद करून ठेवले आहे. एके काळची आनंदी खेळकर ज्यूडी आता सतत कसल्या ना कसल्या शोधात असे. तणावाखाली असे. (शेजारचे चित्र पाहा) फ्रॅंकने तिला स्पर्श केला वा तो तिच्याशी बोलल्यानंतरच ती सुखावे, तणावमुक्त होई. ज्यूडी हरवल्यावर फ्रॅंकची अवस्था काय होती ते वर आलेच आहे. जणू ते दोघे एकमेकांसाठीच जगत होते. ज्यूडी वा फ्रॅंक यांच्यापैकी एक जरी आजारी पडता वा परलोकी जाता तर दुसर्‍याचे वाचणे कठीण होते.

ज्यूडीचा जीव इतक्या अनेक समरप्रसंगांतून वाचवायला फ्रॅंक व ज्यूडी यांचे हे सायुज्यच कारण ठरले होते. जपानी सैनिक बरेचदा ज्यूडीवर धावून जात. तीही त्यांच्यावर गुरगुरे. पण एखादा सैनिक पिस्तुलाला हात घालतोय असे वाटले तरी फ्रॅंकची चुटकी वाजे व ज्यूडी अक्षरशः बाजूच्या जंगलात अंतर्धान पावे. बराच वेळ ती कोणाच्या नजरेस पडत नसे वा तिचा आवाज नसे. पण फ्रॅंकची एक अस्फुट अशी शीळ ऐकताच ती फ्रॅंकच्या बाजूला येऊन उभी असे. १९४५च्या मध्यात हे समरप्रसंग घटू लागले. युद्ध संपत आल्याची साक्ष मिळू लागली. सैनिकांचे शिव्याशाप घटले. कैद्यांना जंगलातून अन्न शोधायला थोडा अधिक वेळ मिळू लागला. आणखी काही दिवस तग धरला तर आपण यातून निभावून जाऊ असा आशावाद सर्वच कैद्यांना वाटू लागला.

पण एक नवीनच संकट उभे ठाकले. सर्वच युद्धकैदी उवांच्या संसर्गाने पछाडले आहेत असे जपान्यांच्या लक्षात आले. युद्धकैदी कुठल्या जीवघेण्या रोगाने मेल्याचे जपान्यांना कसलेच सोयरसुतक नव्हते. पण उवा? कासावीस झालेल्या जपान्यांनी हुकूम काढला की सर्वच सैनिकांची डोकी आणि भुवया भादराव्या, आणि ज्यूडीला ठार मारावे. हा निर्णय अर्थातच फ्रॅंकला मान्य नव्हता. बातमी पसरली आणि ज्यूडी अक्षरशः अंतर्धान पावली. पण ती आजूबाजूलाच असे. जपानी सैनिकांचा डोळा चुकवून फ्रॅंक व ज्यूडी यांची भेट होई. पण थोडी जरी शंका आली तरी फ्रॅंकचा अगदी अस्फुट असा आदेश आला की ज्यूडी दिसेनाशी होई.

सुदैवाने हे नाटक फक्त दोनच दिवस चालवावे लागले. दोन दिवसांनंतर युद्ध खरोखरीच संपत आल्याची लक्षणे दिसू लागली. आता एक एक करून जपानी सैनिकच अंतर्धान पावू लागले. ज्यूडी पुन्हा कॅंपात प्रकट झाली. आणि नंतर एके दिवशी कॅंपच्या आवारात कधीही न भुंकणारी ज्यूडी आनंदाने शेपूट हलवीत जोरजोरात भुंकू लागली. लवकरच छत्रीधारी दोस्त सैनिकांनी कॅंपचा ताबा घेतला. फ्रॅंक, ज्यूडी व सर्वच युद्धकैद्यांसाठी दुसरे महायुद्ध संपले होते !!!

युद्धकैद्यांना परतीचे आणि कुठल्या जहाजावर दाखल व्हायचे याचे आदेश मिळाले. पण एक नवीनच समस्या उभी राहिली. परतीच्या आदेशात एक तळटीप होती. “जहाजाची सोय फक्त युद्धबंद्यांसाठीच असून कुत्रा वा कुठलाही पाळीव प्राणी नेण्यास परवानगी नाही”. फ्रॅंकने जिथे जपान्यांना दाद दिली नव्हती तिथे तो हा नियम मानणे शक्यच नव्हते. त्याच्या मते ज्यूडी ही देखील एक अधिकृत नाविक आणि क्रमप्राप्त (81A) युद्धबंदीही होती. या न्यायाने तिला नेणेही क्रमप्राप्तच होते. फ्रॅंकने ज्यूडीला आपल्याबरोबर नेण्याची योजना आखली. त्यात बरोबरच्या काही युद्धबंद्यांना सामील करून घेतले.

बोटीत चढण्यासाठी जो पूल लावला होता त्याच्या बंदराकडील बाजूला काही सामान रचलेले होते. ज्यूडीला त्या सामानाआड लपवण्यात आले. बहुसंख्य प्रवासी बोटीत शिरले आणि चढणारी गर्दी ओसरली, तेव्हा फ्रॅंक बोटीत शिरला. पुलाच्या तोंडाशी उभ्या रखवालदाराभोवती घोळका करून फ्रॅंकचे मित्र रखवालदाराशी गप्पा मारीत उभे राहिले. फ्रॅंकने त्याची हलकी शीळ घालताच सामानाआड लपलेली ज्यूडी बोटीत शिरली, आणि पाठोपाठ फ्रॅंकच्या पाठपिशवीत. बोटीवर आपल्यासोबत ज्यूडी नावाची नौदलातली युद्धबंदी राहिलेली नामचीन कुत्री आहे ही बातमी फ्रॅंकने तिसर्‍या दिवशी फोडली. कप्तानाने ज्यूडीला ब्रिटनमध्ये उतरण्यासाठी खास परवानगी मिळवली. जहाजावरील ताणतणावविरहित सहा आठवडे काढून तब्येत सुधारलेले फ्रॅंक आणि ज्यूडी लिव्हरपूलला उतरले. ज्यूडीला नियमानुसार क्वारंटाइनमध्ये सहा महिने काढावे लागले, आणि २९ एप्रिल १९४६ रोजी फ्रॅंक व ज्यूडी यांची पुनर्भेट झाली.

सेंट जाइल्स पदक (Picture Credit Catholic shop)
डिकिन मेडल (Picture Credit Wikicommons)

इंग्लंडला पोचल्यावर ज्यूडीच्या कार्यकर्तृत्वाचा बोलबाला झाला तो फ्रॅंक विलियम्समुळेच. लंडनने दोघांचेही आदरसत्कार केले. दोघांनाही अमाप प्रसिद्धी मिळाली. पुनरागमित ब्रिटीश युद्धबंदी संघाचे सभासदत्व मिळवणारी ज्यूडी ही एकमेव श्वान ठरली. धर्मादाय कार्यासाठी देणग्या गोळा करण्यासाठी ज्यूडीला चित्रतारका आणि प्रतिष्ठितांच्या जोडीने आमंत्रणे येऊ लागली. प्राणिमित्र म्हणून मिळणारा “व्हाइट क्रॉस ऑफ सेंट जाइल्स” हा सर्वोच्च पुरस्कार, फ्रॅंक विलियम्सला मिळाला (डावीकडील पदक). पाठोपाठ प्राण्यांचा व्हिक्टोरिया क्रॉस मानले गेलेले डिकिन मेडलही ज्यूडीला मिळाले. (उजवीकडील पदक) ज्यूडीला मेडलसोबत मिळालेल्या मानपत्रात म्हटले होते, “जपानी तुरुंग-कॅंपात उत्तुंग धाडस आणि सहनशक्ती दाखवून सह-युद्धबंद्यांचे नीतिधैर्य उंचावल्याबद्दल, तसेच आपल्या दक्षतेने आणि बुद्धिमत्तेने अनेक जीव वाचविल्याबद्दल.”

विमानदळ सोडल्यावर विलियम्सने टांझानियात नोकरी पत्करली. तिथेच १९५० साली ज्यूडीचा मृत्यू झाला. टांझानियातील नाचिंग्विया गावी तिचे स्मारक आहे.

विश्वास द. मुंडले

संदर्भ:

Readers Digest

POW dog

Puppy that became a Prisoner of War

Judy (dog)

Hits: 0

You may also like...

1 Response

  1. अर्चना+देशपांडे says:

    Judy the great ! Hatt’s off to her !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *