विचित्र सूड
सत्य कल्पितापेक्षा किती अद्भुत असते याचा साक्षात्कार हेर (spy), प्रतिहेर (counterspy), फितूर (mole), आणि दुतोंडीहेर (दुहेरी हेर किंवा दुहेर वा double agent) यांच्या कथांमधून अधिकाधिक टोंकदारपणॆ घडतो. अमेरिका वा रशिया सारख्या प्रबळ देशांच्या तितक्याच प्रबळ (CIA, FBI, KGB इ. इ.) संस्थांच्या नाकावर टिच्चून हेरगिरी किंवा फितुरी करणारी ही मंडळी निपजतातच कशी, टिकतात कशी, त्यांच्या प्रेरणा कुठल्या, त्यांचे बिंग का फुटते किंवा का फुटत नसते यासारख्या बाबींचे कुतूहल जवळपास सगळ्याच सामान्य जनांना असते. अशाच एका फितुराची ही सत्यकथा!
ही कथा नांवारूपाला येऊ लागली, ती १९८६ साली. FBI (Federal Bureau of Investigation) ही संस्था अमेरिकी भूमीवर प्रतिहेरगिरी करीत असते, म्हणजेच अमेरिकेत चालणाऱ्या परदेशी हेरांचा शोध घेऊन त्यावर इलाज करीत असते. या संस्थेच्या वॉशिंग्टनस्थित मुख्यालयातील रशिया- विभागात त्यावर्षी खळबळ माजलेली होती. रशियाच्या वॉशिंग्टन मधील वकिलातीतील व्हॅलेरी मार्टिन व सर्जी मोटरिन नामक दोन अमेरिकेला फितूर झालेले अधिकारी, अमेरिकेत वावरणार्या रशियन हेरांची माहिती पुरवीत होते. अर्थात FBI च्या लेखी ही दोन्ही मोलाची माणसे होती. पण १९८६ मध्ये एकाएकी, नेमकी त्या दोघांचीच, मॉस्कोला बदली झाली होती. १९८८ साल उजाडले तरी रशियाला ही नांवे कशी कळली याचा उलगडा होईना. तेव्हा आपल्या संस्थेतच कोणी घरभेद्या आहे की काय याचा शोध घेण्याची जबाबदारी FBI मधील रशियाविरुद्ध प्रतिहेरगिरी-विभागाचा प्रमुख रॉबर्ट हॅन्सेन याच्या अध्यक्षतेखालील समितीवर सोंपविण्यात आली. शीतयुद्धाच्या अगोदरपासूनचे (म्हणजे साधारण १९४५ पासूनचे) दप्तर धुंडाळूनही या समितीला कोणीच घरभेद्या सापडला नाही, कारण या समितीचा अध्यक्ष रॉबर्ट हॅन्सेन, हा स्वत:च फितुरी करत होता!
शिक्षणाने व्यवस्थापन तज्ञ व व्यावसायिक हिशेब तपासनीस, व्यवसायाने रशियाविरुद्ध प्रतिहेरगिरीतील सर्वाधिक अनुभवी असलेला रॉबर्ट हा मुळात एका पोलिसाचा मुलगा आणि हुषार विद्यार्थी होता. कर्तव्यदक्ष नवरा व बाप, नियमितपणे चर्चमध्ये जाणारा रोमन कॅथलिक (आणि वरकरणी तरी) एकनिष्ठ अमेरिकन नागरिक अशीच त्याची ओळख होती. पण प्रत्यक्षात १९७९ ते २००१ या काळात त्याने रशियाला माहितीची ६००० पाने पुरवली, अमेरिकेसाठी हेरगिरी करणाऱ्या ५० रशियनांची नांवे फोडली, आणि १४ लाख डॉलर्स कमावले. यथावकाश FBI च्या इतिहासात तो जास्तीत जास्त काळ बिंग न फुटलेला हेर ठरला. पण केवळ पैसा कमावणे एवढाच त्याचा हेतू होता काय? १९८१, १९९१, व १९९४ मध्ये त्याचे बिंग फुटू घातले होते त्यातून तो कसा वाचला आणि शेवटी कसा सापडला हा साराच इतिहास जितका रंजक तितकाच उद्बोधकही आहे.
१९७६ मध्ये काही महिने शिकागो पोलिस खात्यात काढून रॉबर्ट लवकरच FBI च्या आर्थिक-गुन्हेप्रतिबंधक विभागात लागला. दोनच वर्षांनी त्याची वर्णी न्यूयॉर्क येथे प्रतिहेर खात्यात लागली. अमेरिकेत राहून अमेरिकेविरुद्ध हेरगिरी करणाऱ्यांचा छडा लावण्याचे जबाबदारीचे आणि गुप्त काम त्याच्याकडे आले. तेव्हा तो तीन मुलांचा बाप होता. आपल्या वाढत्या कुटुंबाचे रहाणीमान अधिकाधिक सुधारण्याचा सोपा मार्ग त्याने लवकरच शोधून काढला, आणि तो म्हणजे फितुरी. त्याकाळी AMTORG नामक रशियन कंपनी ही रशियन सेनादलासाठी हेरगिरी करणाऱ्या GRU या संघटनेचे दर्शनी रूप होते. अश्या संस्थांमध्ये जाणे हा त्याच्या कामाचा भाग होता. त्याचा उपयोग करून, साळसूदपणे त्याने GRU शी संधान बांधले आणि पहिले गुपित फोडले ते दिमित्रि पोल्याकोवचे. १९६३ पासून GRU मधील या मॉस्कोस्थित कर्मचाऱ्याने अमेरिकेला रशियन सेनादलाची माहिती देणारी कपाटाचे २७ खण भरतील इतकी कागदपत्रे पुरवली होती. अमेरिकेसाठी महत्वाचा माहितीचा झरा आटला, आणि रॉबर्टने ३० हजार डॉलर कमावले.
१९८१ मध्ये रॉबर्ट बालबाल बचावला. वेळीअवेळी बाहेर जाणारा, रात्रीबेरात्री तळघरात बसून पत्रे लिहिणारा आपला नवरा कुणाच्या प्रेमाबिमात पडला की काय या शंकेने रॉबर्टच्या पत्नीला – बॉनीला – पछाडले. तिने रॉबर्टला पत्र लिहितांनाच पकडून जाब विचारला. संशयनिवृत्तीसाठी रॉबर्टने आपण रशियाला नगण्य गुपिते विकून ३० हजार डॉलर्स कसे कमावले याच्या कहाण्या तिला ऐकवल्या. “पति, पत्नी और वो” प्रकरणाला ही भलतीच कलाटणी लागल्याने बॉनी गांगरली. गोंधळलेली साधी माणसे जे करतात तेच तिने केले. नवरा-बायकोने मिळून स्थानिक चर्चचे फादर बुकियारेली यांचेकडे आपल्या पापाचा कबुलीजबाब दिला. फादरने सल्ला दिला की त्यांनी पोलिसांनाच शरण जावे. दुसऱ्या दिवशी पोलिसांत वर्दी देण्याअगोदर फादरने फोन करून सल्ला बदलला. बुकियारेलींनी सुचवले की पापक्षालनार्थ रॉबर्टने गैरमार्गाने कमावलेले सर्व पैसे धर्मार्थ दान करणे, हे पुरेसे आहे. रॉबर्टने हा सल्ला तत्काळ मान्य करून मदर थेरेसांच्या कार्याला ३० हजार डॉलर्सची देणगी देण्याचे वचन दिले. बुकियारेली व बॉनी या दोघांनी हा मामला तिथेच संपवल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोचलेच नाही. रॉबर्टनेही काही वर्षे आपले उपद्व्याप थांबवले. अमेरिकेचे दुर्दैव! दुसरे काय?
पण १९८१ मध्येच रॉबर्टला वॉशिंग्टन येथील मुख्यालयात बढती मिळाली. त्याच्यावर प्रतिहेरगिरीसाठी अर्थसंकल्प बनविण्याची जबाबदारी दिल्याने कोण कुठे काय करीत आहे किंवा करायचे योजीत आहे याची अचूक माहिती त्याला त्याच्या टेबलावरच मिळू लागली. १९८३ मध्ये त्याला दुसरी बढती मिळाली व अमेरिकेत वावरणाऱ्या रशियन हेरांवर नजर ठेवण्याच्या खास कामगिरीवरच त्याची नेमणूक झाली. रॉबर्टची ही प्रगती काहीशी आश्चर्यजनक होती. वास्तवात, अहंगंडाने पछाडलेला, उद्धट अशी त्याची सहकाऱ्यांमध्ये ख्याती होती. पण हेही खरे की त्याचे शत्रू देखील प्रतिहेरगिरी या विषयातील त्याच्या विविधांगी (तांत्रिक, व्यवस्थापकीय, किंवा अर्थसंकल्पीय) हुषारीची दाद देत. त्यामुळे लवकरच तो FBI चा रशियाविरोधी उपक्रमांचा प्रमुख झाला. चार वर्षांपूर्वीचे बायकोला दिलेले वचन विसरून त्याने हेरगिरीला पुन्हा सुरुवात केली. धिटावलेल्या रॉबर्टने सरळ KGB या सर्वोच्च रशियन गुप्तहेर संस्थेशीच संधान बांधले, आणि अगोदर वर्णिलेल्या मार्टिनोव व मोटरिन या दुकलीचे बिंग फोडले. KGB ला रॉबर्ट हॅन्सेनचे महत्व कळायला वेळ लागला नाही. पुढील पाच वर्षात रॉबर्ट साडे चार लाख डॉलरचा धनी झाला. पण एक सर्वस्वी अज्ञात देशद्रोही अमेरिकेला छ्ळत राहिला. मार्टिनोव व मोटरिन प्रकरणात हा देशद्रोही शोधण्याचे प्रयत्न कसे फसले ते वर आलेच आहे. १९९१ मध्ये पुन्हा हॅन्सेनचे गुपित फुटण्याची वेळ आली.
एव्हाना रॉबर्टने वॉशिंग्टन शहरात FBI च्या ऑफिस जवळच बंगला घेतलेला होता. एकदा बॉनी आणि पाहुणी आलेली तिची बहीण – ज्यॉं बेग्लीस – या दोघीही बोलता बोलता शयनगृहात पोचल्या. बहिणीने टेबलावर पडलेली हजारो डॉलरची रक्कम पाहिली आणि ती चकरावली. पण बॉनीने बहिणीला पटवले की तिच्या नवऱ्याला FBI च्या सर्व अमेरिकेतील पसाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सतत दौऱ्यावर जावे लागते व म्हणून त्याला इतकी रोख हाताळावी लागते. पैशाची खाण गवसलेला रॉबर्ट पैसे हाताळण्यात बेदरकार होणे हे स्वाभाविकच. पण बॉनीचे काय? चार वर्षांपूर्वींचा प्रसंग ती कशी विसरली? की एव्हाना आपली सहा मुले, त्यांचे शिक्षण, वाढत्या गरजा या सगळ्यांवर मात करून नवीन घर घेणाऱ्या व श्रीमंती थाट सांभाळणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या कर्तबगारीला ती भुलली? तेही एका अर्थी स्वाभाविकच म्हणायचे ! कारण बॉनीला वाल्या कोळ्याच्या बायकोची गोष्ट माहीत असणे शक्यच नव्हते!
मेहुणीला ही थाप चांगलीच पचली. तिने आपल्या मेहुण्याचे हे कौतुक आपल्या भावाला – मार्कला – सांगितले. पण बॉनीचे स्पष्टीकरण मार्कला पटले नाही. एकाएकी त्याला दहा वर्षांपूर्वींचा बॉनीबरोबर झालेला आपला संवाद आठवला. बॉनी म्हणाली होती की माझ्या नवऱ्याने निवृत्त झाल्यावर पोलंडमध्ये स्थायिक व्हायचे ठरवले आहे. वास्तविक पोलंड हे त्याकाळी रशियाच्या अंकित असणारे कम्युनिस्ट राष्ट्र होते. FBI च्या हेरखात्यात नोकरी करणारा इसम पोलंडला स्थायिक होण्याची इच्छा बाळगतॊ, आणि त्याच्या टेबलावर हजारो डॉलर सांपडतात, याचा अर्थ मार्कला चटकन कळला. कारण तो स्वत:च FBI च्या शिकागोमधील कार्यालयात हेरखात्यातच नोकरीला होता! मार्कला हेही माहित होते की मार्टिनोव – मोटरिन प्रकरणानंतर FBI आपल्याच अस्तनीतील एका निखाऱ्याच्या शोधात आहे. “आपला मेहुणाच तर हा हस्तक नव्हे ना?” या विचाराने मार्कला पछाडले. आता काय करायचे?
सर्वप्रथम त्याने या मामल्यावर “काही आठवडे” गंभीरपणे विचार केला. आणि मग सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे निर्णय घेतला की आपण सरकारी चाकोरीतूनच (through proper channel) जायचे. त्याने आपल्या बॉसची भेट घेतली आणि त्याला सर्व काही सांगितले, आणि आता काहीतरी घडेल याची तो वाट पाहू लागला. पण जेव्हा काहीच घडले नाही तेव्हा आपली समजूत चुकीची होती असे मानून मार्क गप्प राहिला. रॉबर्ट पुन्हा एकदा सुटला.
१९९४ साली CIA (Central Intelligence Agency – परदेशांत हेरगिरी करणारी अमेरिकी संस्था) मध्ये राहून रशियासाठी हेरगिरी करणाऱ्या अल्ड्रिच एम्सचा शोध लागला. त्याच्या कबुलीजबाबातून स्पष्ट झाले की १९८८ मध्ये अमेरिकी गुप्तहेर खात्यातच एखादा घरभेदी असल्याचा जो संशय आला होता तो खरा होता, आणि तो हेर अजून कार्यरत आहे. पण FBI ला त्याचा शोध लागला नाही. पुन्हा एकदा रॉबर्ट नशीबवान ठरला कारण त्यावेळी हेरगिरी थंड पडलेली होती. त्याचे मुख्य कारण होते फुटू घातलेल्या रशियन साम्राज्यातील अनागोंदी. पण ब्रायन केली नामक CIA मधील हेरावर मात्र विनाकारण आळ आला. रॉबर्ट हॅन्सेन नामानिराळा राहिला. रॉबर्टमधल्या फितुराने, १९९८ मध्ये पुन्हा उचल खाल्ली. माहिती व पैशाची देवाणघेवाण पुन्हा सुरू झाली. KGB च्या दप्तरी रॉबर्ट हॅन्सेनचे नाव होते- रॅमन गार्सिया.
२००० च्या सुमारास या कथेचा शेवटचा अध्याय मोठ्या नाट्यमय रीत्या सुरू झाला. KGB च्या मॉस्कोमधील मुख्यालयात नोकरी करणारा एक कर्मचारी अमेरिकनांना माहिती पुरवीत असे. कुणालाही संशय न येता निवृत्त होऊन तो मॉस्कोमध्ये आपला खाजगी व्यवसाय चालवीत होता. अमेरिकी हेरांची आणि त्याची मॉस्कोत गांठ पडली तेव्हा त्याने एक स्फोटक खबर दिली की FBI मध्ये राहून रशियासाठी अनेक वर्षे हेरगिरी करणाऱ्या रॅमन गार्सिया नामक हेराची फाईल त्याने पाहिलेली आहे. इतकेच नव्हे तर किंमत मोजून ती फाईल उपलब्ध होऊ शकते. ती किंमत होती – ७० लाख डॉलर्स रोख देऊन त्या खबऱ्याचे अमेरिकेत नव्या नावाने पुनर्वसन करण्याची उठाठेव. हा रॅमन गार्सिया कोण असावा? हाच का तो गेली वीस वर्षे त्रास देणारा फितूर? हे गूढ उकलण्यासाठी, आणि त्या अज्ञात रॅमन गार्सियाला शोधून काढण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाने विशेष टीम तयार करून एक सर्वस्वी गुप्त मोहीम सुरू केली. ही मोहीम इतकी गुप्त होती, की FBI किंवा CIA मधील अन्य कुणालाच त्याची कल्पना नव्हती.
त्यांनी प्रथम आपल्या रशियन खबऱ्याला रशियाबाहेर काढले. त्या बदल्यात त्यांना मिळाली एक जाडजूड फाईल, रॅमन गार्सियाच्या आवाजातील संभाषणाची एक कॅसेट टेप, आणि एक कागदी पुडके! फायलीवरून अमेरिकी सुरक्षा खात्याची खात्री पटली की रॅमन गार्सिया हाच तो छळिया फितूर! कॅसेटमध्ये रॅमन गार्सिया व KGB दरम्यान मोबदल्याबाबत झालेल्या वाटाघाटीचे ध्वनिमुद्रण होते. पण ते इतके खराब होते की पुरावा म्हणून सोडाच पण ओळख पटवायलाही त्याचा उपयोग नव्हता. पण तज्ञांनी त्या टेपवरील संवाद कष्टपूर्वक कागदावर उतरवल्यावर लक्षात आले की दुसऱ्या महायुद्धातील प्रसिद्ध जनरल पॅटन यांच्या तोंडची प्रसिद्ध शिवी रॅमन गार्सियाच्या तोंडी बसलेली आहे. FBI च्या मुख्यालयातील रशियाविरोधी प्रतिहेरगिरी तज्ञ रॉबर्ट हॅन्सेन ही शिवी सर्रास वापरतो हेही सगळ्यांना ठाऊक होते. त्यामुळे संशयपिशाच्चाला सुरुवात झाली.
पण तो काही पुरावा नव्हता. तो होता त्या पुडक्यात. आणि ते पुडके तर “रशियन खबऱ्या अमेरिकेत पोचल्यावर त्याच्यासमोरच उघडायचे” अशी सक्त सूचना होती! यथावकाश त्या पुडक्यात सापडली एक प्लास्टिकची पिशवी! एका वर्षी रशियाला कागदपत्रे पुरवताना रॅमन गार्सियाने वापरलेली, आणि रशियन सरकारी खाक्यानुसार वर्षानुवर्षे जपून ठेवलेली! त्यावरील अनेक ठशांपैकी दोन रॉबर्ट हॅन्सेनच्या ठशांशी जुळले. हा पहिला कायदेशीर पुरावा होता. तरीही आपला दावा भक्कम करण्यासाठी FBI ने ठरविले की या घरभेद्याला हेरगिरी करतांनाच पकडायचे! त्यासाठी एक अतिगुप्त मोहिम सुरू झाली. रॉबर्टवर सतत नजर ठेवण्यात आली. वर्तमानातील पुरावे गोळा करण्यात आले. या मोहिमेवर आधारलेला Breach या शीर्षकाचा एक हॉलिवुडपट २००७ साली निघाला होता. त्यात रॉबर्ट हॅन्सेनची भूमिका क्रिस कूपरने केली होती.
रशियन फायलीवरून हेही कळले की रशियनांची रॅमन गार्सियासोबतची देवाणघेवाण जिथे होई त्या जागेचे सांकेतिक नांव होते एलिस. रॉबर्ट हॅन्सेनची ईमेल, कॉम्प्यूटर, डायरी, पत्रव्यवहार, हालचाली या सर्वांचा इतिहास अभ्यासल्यावर स्पष्ट झाले की १९९८ पासून दरवर्षी तो १८ फेब्रुवारी या दिवशी एलिसला भेटतो. एलिसचा पत्ता शोधण्यासाठी कॉम्प्यूटरवरील पुसलेल्या फायली वाचण्याची विद्या उपयुक्त ठरली. एलिस म्हणजे रॉबर्टच्या घराजवळील फॉक्स्टोन पार्क या उद्यानामधील एका झऱ्यावरील विशिष्ट लाकडी पुलाखालील कमान! आता काम सोपे होते. एलिसवरही लक्ष ठेवायला सुरुवात झाली.
१२ फेब्रुवारी २००१ या दिवशी रशियन हस्तकांनी एलिसवर ठेवलेल्या पुडक्यात ५०००० डॉलर सांपडले. त्या नोटांची झेरॉक्स काढून पुडके पुन्हा जागेवर पोचवण्यात आले. १८ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या दुपारी ४ वाजता रॉबर्टने आपल्या गाडीतून काही कागदपत्रे काढली आणि एका पुडक्यात टाकून तो फॉक्स्टोन पार्ककडे चालत निघाला. पार्कच्या पाटीच्या खांबावर त्याने एक पांढरी पट्टी चिकटवली. रशियनांना ती इशारत होती की थोड्याच वेळात माहितीचे पुडके जागेवर पोचत आहे. थोड्याच वेळाने पैशाचे पुडके आपल्या गाडीत ठेवणाऱ्या रॉबर्ट हॅन्सेन ऊर्फ रॅमन गार्सिया याला अटक झाली. पुलाखाली हॅन्सेनने ठेवलेले कागदांचे पुडके मिळवून वाचल्यावर FBI ला कळले की रॉबर्टला आपले बिंग फुटल्याची शंका आलेली होती. रॅमन गार्सियाने आपल्या रशियन मालकाला कळविले होते की “झोपलेल्या वाघाला कोणीतरी उठवले आहे”. इथे तर उठलेल्या वाघाने त्याला पकडलेच होते!
खटला उभा राहिल्यावर रॉबर्टच्या व्यक्तिमत्वाचे विचित्र पैलू उघड झाले. इतके विचित्र, की त्याचे अतिमर्यादित मित्रमंडळ, पत्नी आणि मुले यांपैकी कोणीही त्याच्या बाजूने उभे राहिले नाहीत. “अमेरिकेत राहून अमेरिकेविरुद्ध हेरगिरीचा प्रयत्न करणारा इसम तद्दन मूर्ख असला पाहिजे कारण आम्ही (म्हणजे FBI) त्याला पकडल्याशिवाय रहाणार नाही हे त्या फितुराने ऒळखून असावे” अशी देशभक्तिपर दर्पोक्ती करणारा आपला मित्रच घरभेद्या हेर निघावा याचे त्या मित्रांना विश्वासघाताइतके दु:ख झाले. जेम्स बॉंडसारखी प्रेमप्रकरणे करण्याचा त्याचा प्रयत्नही उघड झाला. पण त्यापेक्षा वाईट म्हणजे बरेचदा तो पत्नीबरोबरील एकांताचा तिच्या नकळत छुप्या व्हिडियो कॅमेऱ्याने आपल्या एका आंबटशौकीन मित्रासमोर सिनेमा (live show) मांडत असल्याचे स्पष्ट झाले. पत्नीने त्याची साथ कायमची सोडली, पाठोपाठ मुलांनीही.
रॉबर्टची पूर्वपीठिका तपासतांना कळले, की एकमेव पालक असलेले त्याचे वडील अतिशय जुलमी होते. त्यांनी लहानग्या रॉबर्टवर कायम मानसिक आणि शारीरिक छळप्रयोग केले. वडील त्याला शिवीगाळ करीत, सततचे टीकास्त्र सोडीत. तर गादीत गुंडाळून उभे करणे, उलटी येईपर्यंत गिरक्या घ्यायला लावणे, असल्या शिक्षाही करीत. मानसशास्त्रज्ञांच्या मते, म्हणूनच सर्वच वडीलधाऱ्यांविषयी त्याच्या मनात अढी निर्माण झाली. त्यापोटीच त्याने त्याच्यावर कुठलाही अधिकार गाजवणाऱ्यांवर (पक्षी वडीलधाऱ्यांवर, व अमेरिकन सरकारवर) असा सूड उगवला. मात्र रॉबर्टने पत्नीबरोबर स्वत:चीही बेअदबी करणारा आंबटशौक का करावा हे गूढ उरतेच! याशिवाय फादर बुकियारेलींनी आपला सल्ला बदलणे, बॉनीने चार वर्षातच पूर्वानुभव विसरणे, मार्कच्या बॉसने काहीच कारवाई न करणे, रशियन खबऱ्याने निवृत्तीनंतरच रॅमन गार्सियाची माहिती देणे, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात.
अनेक प्रश्न अनुत्तरित राहाणे हे हेरगिरीच्या प्रांताला मुळेच नवे नाही. पण या प्रश्नांची उकल झाली तर कल्पितापेक्षाही अद्भुत अश्या रंजक आणि उद्बोधक सत्याचा अजून एक साक्षात्कार घडेल एवढे नक्की!
विश्वास द. मुंडले
Hits: 84
बरीच माहिती नवीन आहे.. हेरगिरी च्या प्रांतात अशा अनेक गोष्टी असतात आणि त्या आपल्याला नंतर केव्हातरी समजतात… दैनंदिन जीवनात सतर्कता किती महत्वाची आहे हे लक्षात येते.. आणि चर्च (किंवा देवळातील) गुरुजी किती पाण्यात आहेत हे समजते.. छान आहे लिखाण
आणखी अशा कथा येऊ देत. आजच्या घडीला ही कथा अनुरूप प्रसंगोचित.
विचित्र सूड= मस्त. या विषयावरील पुस्तकांची नावे मला कळवावीत ही विनंती