प्राणिगीते ३

प्राणिगीतांची पार्श्वभूमी वाचली नसल्यास इथे वाचा.

गंमतशीर प्राणिगीते

याही यादीतील कित्येक प्राण्यांची नावे पालकांनाही परिचित नसण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती मिळवणे हाही एक प्रकल्प होईल.

परीट

एक होता परीट । त्याने आणलं कारीट ॥ त्याचा केला साबण । कपडे धुतले दणादण ॥

पाकोळी

एक होती पाकोळी । तिने केली पोळी ॥ पोळी होती पुरणाची । वर धार तुपाची ॥

पाणकोंबडी

एक होती पाणकोंबडी । तिने आणली एक वडी ॥ वडी होती साबूची । तिला घाई आंघोळीची ॥

पाल

एक होती पाल । तिने पांघरली शाल ॥ आणि म्हणाली कशी । मला भेटणार एक माशी ॥

पोपट

एक होता पोपट । तो अगदीच लोचट ॥ नको नको म्हणे मोर । तरीही बसला पाठीवर ॥

बकरी

एक होती बकरी । तिने आणली बाजरी ॥ त्याच्या केल्या भाकरी । विकून आली बाजारी ॥

बगळा

एक होता बगळा । त्याचा किती गोड गळा ॥ त्याने घेतली गोड तान । कोकिळेची खाली मान ॥

बुलबुल

एक होता बुलबुल । त्याने मित्राला केलं कबूल ॥ तासाभरात येतो फिरून । आला काश्मीरची सफर करून ॥

बैल

एक होता बैल । चालत गेला एक मैल ॥ पाहून मैलाचा दगड । बैल हसला रगड ॥

भारद्वाज

एक होता भारद्वाज । त्याने आणला पखवाज ॥ त्यावर मारली थाप । तालावर नाचला साप ॥

भोरडी

एक होती भोरडी । तिने नेसली चिरडी ॥ हातात घेतली परडी । वेचू लागली गुलछडी ॥

मंडली

एक होती मंडली । तिने साखर आणली ॥ साखर गेली सांडून । ही बसली वेटोळं करून ॥

मांजर

एक होतं मांजर । त्याने घेतला नांगर ॥ म्हणाला शेत नांगरीन । त्यात उंदीर पेरीन ॥

माकड

एक होतं माकड । त्याने खाल्ला पापड ॥ पापडाची चटक लागली । माणसाशी गट्टी केली ॥

माकड आणि घुबड

एक होतं माकड । आणि एक होतं घुबड ॥

दोघांनी टाकलं ठरवून । स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून ॥

स्पर्धा होती स्वरूपाची । दोघांना उणीव फक्त नाकाची ॥

माळढोक

एक होता माळढोक । त्याने आणला केळीचा फोक । त्याची केली चटणी । लावून खाल्ले शेतातले प्राणी ॥

माशी

एक होती माशी । म्हणे फिरून येते काशी ॥ चार दिवसांची उपाशी । पण उडाली साठ मैल ताशी ॥

मुंगुस

एक होता मुंगूस । त्याने आणला ऊस ॥ त्याचा रस काढला । आणि सापाला पाजला ॥

मेंढा

एक होता मेंढा । त्याने आणला पेंढा ॥ त्याची बांधली झोपडी । वर वेल काकडी ॥

मैना

एक होती मैना । तिला गाता येइना ॥ मग कोकिळेने गायले गान । मैनेने फक्त हलवली मान ॥

मोर

एक होता मोर । त्याला मिळालं बोर ॥ आधी म्हणाला सोलीन । आणि मग खाईन ॥

म्हैस

एक होती म्हैस । ती म्हणाली गवळी दादास ॥ मी चालले फिरायला । तिकडे चिखलात लोळायला ॥

लावी

एक होती लावी । तिने आणली चावी ॥ चावीने उघडले घरटे । शोधले बाळाचे दुपटे ॥

वाघ

एक होता वाघ । त्याला आला राग । म्हणाला लाविन साग । छान सजविन बाग ॥

वानर

एक होता वानर । धंद्याने झाला सोनार ॥ धंद्याचं वाजलं दिवाळं । म्हणून तोंडाला फासलं काळं ॥

वाळवी

एक होती वाळवी । ती बाळाला डोलावी ॥ डोलता डोलता झोपलं बाळ । वाळवी फिरली रानोमाळ ॥

विंचू

एक होता विंचू । शिकत होता च चा चि चू ॥ काढता येइना अक्षर । मग पडला काळा ठिक्कर ॥

वेळविंची

एक होती वेळविंची । तिला सापडली चंची ॥ त्यातली खाल्ली सुपारी । म्हणून झाली टणक भारी ॥

शक्करखोरा

एक होता शक्करखोरा । त्याने आणला कागद कोरा ॥ त्याची केली होडी । मुंगी झाली नावाडी ॥

शिंपीण

एक होती शिंपीण । म्हणाली घर लिंपीन ॥ तिला येइना लिंपायला । मग शिकली शिवायला ॥

शेळी

एक होती शेळी । तिची कामे वेळच्यावेळी ॥ तिला बोलावलं सकाळी । तर यायची संध्याकाळी ॥

सरडा

एक होता सरडा । त्याला मिळाला हरडा ॥ त्याचा काढला भरडा । जसा काही हुरडा ॥

ससा

एक होता ससा । तो म्हणतो कसा ॥ पन्नास केळी हवीत । मला उपवासा ॥

सांबर

एक होतं सांबर । त्याने आणलं डांबर ॥ उठून गेला पहाटे । वाघच्या पाठीवर ओढले पट्टे ॥

साप

एक होता साप । त्याने केलं पाप ॥ म्हणून गेला गंगाजळी । करत बसला आंघोळी ॥

सारस

मी तर आहे पक्षी सारस । पिऊन आलो उसाचा रस ॥

मंगला द. मुंडले

Hits: 36

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *