त्रिएस्ते नाट्य – पार्श्वभूमी

आंतरराष्ट्रीय राजकारणात गुंते कसे तयार होतात, वा घातले जातात, ते कसे सुटतात, वा सोडवले जातात; आणि या सर्वांमागे उघड वा छुपे राजकारण कसे असते हे दाखवणारी ही गोष्ट आहे. गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे इटालीच्या इशान्येकडील स्लोवेनियाच्या सीमेलगतचे त्रिएस्ते हे बंदर. त्रिएस्ते बंदराची अचूक जागा दाखवणारा नकाशा पुढे पाहूच.

तसे पाहाता हे प्रदीर्घ नाटक, ज्याला आपण “त्रिएस्ते मामला” म्हणू, ते युरोपात सुरू झाले दुसर्‍या महायुद्धात १९४३ साली इटालीचा पाडाव झाल्यावर. त्याचा कळसाध्याय घडला १९५४ साली, प्रतिकळस १९७५ साली, आणि भरतवाक्य उच्चारले गेले १९७७ साली. हे सारे नाट्य समजून घ्यायचे तर आपल्याला त्रिएस्ते बंदराच्या पार्श्वभूमीत आणि लगतच्या प्रदेशाच्या (म्हणजेच आजचा स्लोवेनिया व इटाली, तर पूर्वीचा युगोस्लाविया यांच्या) इतिहासात आणि भूगोलातही डोकवावे लागेल. त्याच्याच जोडीने लगतच्या युरोपीय देशांचीही दखल घेणे भाग आहे. तर प्रथम या कथेत अवतरणारी भौगोलिक ठिकाणे लक्षात घेऊ. त्यासाठी खालील युरोपचा नकाशा पाहा.

युरोप आजचा राजकीय नकाशा

या कथेत युरोप मधील जर्मनी, चेक रिपब्लिक, स्लोवाकिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, इटाली, स्लोवेनिया, क्रोशिया, सर्बिया, बल्गेरिया, बोस्निया, मॉण्टेनीग्रो, कोसोवो, मॅसिडोनिया, आणि अल्बानिया या देशांचा उल्लेख झाला आहे त्यांचा नकाशा वर पाहा. १९१८ ते १९९० या काळात यापैकी स्लोवेनिया, क्रोशिया, सर्बिया, बोस्निया, मॉण्टेनीग्रो, कोसोवो, मॅसिडोनिया हे आजचे ७ स्वतंत्र देश युगोस्लाविया या एकाच देशात समाविष्ट होते.

स्लोवेनियाच्या उत्तरेला ऑस्ट्रिया हा देश आहे. सुमारे साडेपाच शतके त्रिएस्ते बंदर ज्या हॅब्सबर्ग साम्राज्याच्या ताब्यात होते ते ऑस्ट्रियामध्येच उदयाला आले. हॅब्सबर्ग साम्राज्याने त्रिएस्ते बंदराचे ज्या तुर्की ओटोमन साम्राज्यापासून रक्षण केले ते तुर्कस्तानात (म्हणजेच Turkey मध्ये) स्थापन झालेले होते.

त्रिएस्तेचे व्हेनिस (इटाली) व स्लोवेनिया दरम्यानचे स्थान
(Picture credit climatestotravel.com)

शेजारील नकाशात मध्यभागी इटाली देश व त्याच्या इशान्येला त्रिएस्ते बंदर दिसते आहे. त्रिएस्तेपासून पूर्वेच्या स्लोवेनिया देशाची सीमा इतकी जवळ आहे की हे बंदर स्लोवेनियाचाच भाग आहे की काय असे वाटावे. त्रिएस्तेच्या पश्चिमेला जवळच व्हेनिस बंदर दिसते. ती व्हेनिस साम्राज्याची राजधानी होती. हॅब्सबर्ग सम्राटांनी १९१५ पर्यंत व्हेनिस साम्राज्याच्या हल्ल्यांपासूनही त्रिएस्तेचे रक्षण केले.

त्रिएस्ते तसेच स्लोवेनियाच्या दक्षिणेला इस्त्रिया द्वीपकल्प आहे. तर त्याच्या आग्नेयेला असलेला क्रोशियाच्या किनार्‍याला व किनार्‍यावरील बेटांना डाल्माशिया प्रांत म्हणतात. (जाता जाता, डाल्माशियन जातीच्या पाळीव कुत्र्यांचे वाण याच प्रांतात विकसित झाले.)

मध्य युरोपातून त्रिएस्तेकडे जाण्यातील अडथळे

प्राचीन काळात आल्प्सच्या उत्तरेकडील मध्य युरोपातील पठारावरील लॅटिन व जर्मन संस्कृतींसाठी (किंवा आजच्या दक्षिण जर्मनीसाठी) तर पॅनोनियन खोर्‍यातील स्लाव संस्कृतीसाठी (म्हणजेच आजच्या ऑस्ट्रिया, हंगेरी, चेक रिपब्लिक, व स्लोवाकिया या देशातील जनतेसाठी) भूमध्य समुद्रावरून व्यापार करणे तितके सोपे नव्हते. जर्मनीतून सरळ भूमध्य सागरापर्यंत पोचायचे तर इटालीच्या उत्तर सीमेवरील आल्प्सचा अडथळा आहे. तर स्लाव जनतेसाठी आग्नेय युरोपातून भूमध्य सागरापर्यंत पोचायला युगोस्लावियातील दिनारिक आल्प्स अडथळा ठरतात. (शेजारील नकाशा पाहा)

स्लोवेनियाचा प्राकृतिक नकाशा व ल्युबल्याना ते त्रिएस्ते मार्ग
(Credit By Nzeemin – CC BY-SA 3.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=21648004)

मात्र स्लोवेनियाच्या उत्तर सीमेवर इटालियन आल्प्सची रांग संपते. तर दिनारिक आल्प्सची रांग सुरू होते, ती काही अंतरावरील आग्नेयेकडील क्रोशियामधून. या दरम्यान असलेल्या स्लोवेनियामध्ये पर्वतराजी विरळ आणि उंचीला कमी, म्हणजेच १००० मीटर वा लहान, असल्याने तिथून भूमध्य समुद्राकडे जायला वाव आहे. स्लोवेनियातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात याच विरळ पर्वतरांगा ओलांडल्या की त्रिएस्ते हे बंदर लागते. (शेजारील प्राकृतिक नकाशा व ल्युबल्याना ते त्रिएस्ते रस्ता पहा.) याच कारणाने गेली काही हजार वर्षे, म्हणजे ग्रीक संस्कृतीच्याही आधीपासून, स्लोवेनियापासून जवळच असलेले हे बंदर इटालियनांइतकेच स्लोवेनियनांच्याही वापरात होते. आणि म्हणूनच मध्य युरोपातील सत्तांच्या दृष्टीने प्रथम स्लोवेनियावर व नंतर त्रिएस्ते बंदरावर कब्जा मिळवणे हे फारच महत्वाचे होते.

व्हेनिस व त्रिएस्ते प्राकृतिक नकाशा
(श्रेय wikicommons)

साहाजिकच त्रिएस्ते बंदर हे त्रिएस्तेच्या पश्चिमेला अगदी जवळच वसलेल्या व्हेनिस बंदराचे उघड उघड स्पर्धक ठरू लागले. आणि त्रिएस्ते सारख्या व्यापारी बंदरावर ताबा म्हणजे करवसुलीचे व उत्पन्नाचे साधन. त्यामुळे व्हेनिसच्या सत्ताधीशांचाही या बंदरावर डोळा होताच. शिवाय व्हेनिस व त्रिएस्ते यांच्यादरम्यान पर्वतासारखा कुठलाच नैसर्गिक अडथळा नव्हता. ( शेजारील नकाशा पाहा)

पण तेराव्या शतकात सुरू झालेले ऑस्ट्रो-हंगेरियन हॅब्सबर्ग साम्राज्य इस १२८० मध्ये स्लोवेनियात पोचले व त्यांचा त्रिएस्तेमध्ये प्रभाव पडू लागला. व्हेनिसचे राज्य व हॅब्सबर्ग साम्राज्य यांच्यात त्रिएस्ते आपल्या कब्जात राखण्याची चढाओढ लागली. पण इ.स. १३८२ मध्ये त्रिएस्ते शहरानेच व्हेनिसऐवजी हॅब्सबर्ग साम्राज्यात सामील होणे पत्करले. हॅब्सबर्ग साम्राज्याला कायमचे बंदर मिळाले. व्हेनिसच्या इतक्या जवळ असूनही त्रिएस्तेसारखी दुभती गाय आपल्याकडे नाही याची खंत इटालियनांना डाचणे हे स्वाभाविकच. व्हेनिसचे राज्य व हॅब्सबर्ग साम्राज्य आणि पर्यायाने त्या दोन्ही राज्याच्या नागरिकांमधल्या वैरभावाची ही सुरुवात होती.

इस १४९४ मधील व्हेनिस व हॅब्सबर्ग (ऑस्ट्रियन) राज्यांच्या त्रिएस्ते जवळील सीमा
(Credit Wikicommons)

या बंदराचे महत्व जाणून हॅब्सबर्ग साम्राज्याने व्हेनिस राज्यापासून वा तुर्की ओटोमन साम्राज्यापासून त्रिएस्ते परिसराचे रक्षण केले. उदाहरणार्थ इ.स. १३८२ नंतर त्रिएस्ते बंदरावर हॅब्सबर्ग साम्राज्याचा ताबा असला तरी पुढे इ.स. १४९४ पर्यंत त्रिएस्तेच्या आजूबाजूचा (म्हणजेच पश्चिमेचा इटालीकडील व पूर्वेचा इस्त्रिया द्वीपकल्पाचा व डाल्माशिया प्रांताचा (आजच्या क्रोशियाचा व पूर्वीच्या युगोस्लावियाचा) सर्वच किनारा व्हेनिसने काबीज केला होता. (शेजारील नकाशातील हिरव्या रंगाचा भाग पाहा) पण त्रिएस्ते बंदर मात्र हॅब्सबर्ग साम्राज्याच्याच (गुलाबी रंग) ताब्यात राहिले. सन १३८२ पासून १९१५ पर्यंत कित्येक प्रयत्न करूनही व्हेनिसच नव्हे तर कुठल्याच इटालियन सत्तेला त्रिएस्तेचा कायमस्वरूपी ताबा मिळवता आला नाही.

हॅब्सबर्ग साम्राज्याच्या लेखी त्रिएस्तेचे महत्व अफाट होते. उदाहरणार्थ, शासकीय सोय म्हणून या विस्तीर्ण साम्राज्याची काही प्रांतात (जसे की ऑस्ट्रिया, बोहेमिया, हंगेरी, ट्रान्सिल्वानिया इ.) विभागणी केलेली असे. हे प्रांत आजच्या हंगेरी, ऑस्ट्रिया सारख्या मध्य युरोपीय देशांपेक्षाही मोठे होते. राजघराण्यातीलच विविध व्यक्ती या प्रांतांचे जहागिरदार म्हणून कारभार सांभाळत असत. पण भूमध्य समुद्रातील प्रवेशाचा राजमार्ग व व्यापारी बंदर म्हणून केवळ त्रिएस्ते शहर व परिसर या अतिशय छोट्या विभागाला हॅब्सबर्ग साम्राज्यात स्वतंत्र जहागिरीचा दर्जा होता.

हॅब्सबर्ग हनुवटी/ जबडा
(श्रेय Wikicommons)

(जाता जाता, सत्ताधारी वर्गात इतरेजनांचा प्रवेश होऊ नये यासाठी हे हॅब्सबर्ग वंशातील राजे आणि जहागिरदार फक्त स्वकीयांशीच विवाहसंबंध जोडत. याची परिणती झाली सपिंड (consaguinous) विवाहसंबंधात. आणि परिणामी इतर अनेक दोषांबरोबरच अवाजवी मोठी हनुवटी हा प्रकटपणे दिसणारा जनुकीय दोष हॅब्सबर्ग सत्ताधीशांत शिरला. उदाहरणार्थ शीर्षकावरील तसेच शेजारील चित्र पाहा) वैज्ञानिकांनी हॅब्सबर्ग घराण्यांतील विवाहितांच्या नात्यांमधली वांशिक जवळीक व त्यांच्या मुलांच्या हनुवटीची लांबी यांचा सहसंबंध जुळतो असे दाखवून दिले आहे. सदर दोषाला आता “Habsberg Jaw or Hapsberg Jaw” असे म्हणतात. असो.)

हॅब्सबर्ग घराण्याच्या अमदानीत एकोणिसाव्या शतकात त्रिएस्ते हे शहर ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यातले केवळ व्यापार, व जहाजबांधणीचेच नव्हे तर साहित्य-संगीताचे सांस्कृतिक केंद्र म्हणूनही उदयाला आले. त्यातही महत्वाची बाब अशी की त्रिएस्तेसोबतच जवळजवळ सगळाच स्लोवेनिया प्रांतही हॅब्सबर्ग साम्राज्यात दाखल झालेला होता. सबब त्रिएस्ते बंदर हे स्लोवेनियन जनतेला किमान काही हजार वर्षे सतत उपलब्ध राहिले, पण चौदाव्या शतकापासून ते इ.स. १९१५ पर्यंत इटालीतील जनतेला मात्र ते सहजी उपलब्ध नव्हते. अर्थात त्यांच्याकडे अन्य बंदरे उपलब्ध असल्याने त्यांची कोंडी झाली नाही. पण “बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी” ही बोच राहिलीच. पुढे एकोणिसावे शतक ते विसाव्या शतकाची सुरुवात या काळात वाढत्या हॅब्सबर्ग साम्राज्यात क्रोशिया व बोस्निया हे प्रांत समाविष्ट झाले. इटालियनांच्या नाकावर टिच्चून स्लोवेनियन नागरिकांच्या जोडीने क्रोशियन व बोस्नियन (थोडक्यात नंतरचे युगोस्लावियन) नागरिक त्रिएस्ते बंदर आपले म्हणून वापरू लागले. साहाजिकच इटालियनांची बोच वाढली असली तर नवल नव्हे.

कित्येक शतके इटालियन, ऑस्ट्रो-हंगेरियन, स्लोवेनियन, जर्मन, सर्ब, क्रोट अशा विविध संस्कृतींच्या नागरिकांचा वावर असलेल्या या शहरातली वस्ती साहाजिकपणे विविधवंशीय होती. त्यात खरे अल्पसंख्याक होते जर्मन, क्रोट (क्रोशियाचे रहिवासी), व सर्ब (सर्बियाचे रहिवासी). इटालियन बहुसंख्य असणे हे स्वाभाविकच होते. पण १८८० सालानंतर नजीकच्या स्लोवेनिया प्रांतातील मूलनिवासीही इटालियनांशी तुल्यबळ संख्येने त्रिएस्ते शहरात येऊन राहिलेले होते. इतके की विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्रिएस्तेमध्ये राहाणार्‍या स्लोवेनियन वंशीयांची संख्या स्लोवेनियाची राजधानी असलेल्या ल्युबल्यानाच्या लोकवस्तीपेक्षा जास्त होती. त्रिएस्ते हे व्यापार उद्योग व सांस्कृतिक केंद्र बनल्याने तिकडे लोकांचा ओढा असणे हे स्वाभाविक म्हटले पाहिजे. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला (म्हणजेच १९१४ साली) त्रिएस्तेमधील ३३% जनता स्लोवेनियन वंशाची होती. पुढे येऊ घातलेल्या संघर्षाची मुळे त्रिएस्ते शहरातील या सरमिसळ वस्तीतही होती.

पण बोस्नियाचे हॅब्सबर्ग साम्राज्यात दाखल होणे ही त्या साम्राज्याच्या अंताची सुरुवातही होती. बोस्नियातील एका निर्वासितानेच युवराज फर्डिनंड यांची हत्या केली व पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. हॅब्सबर्ग साम्राज्य विलीन करण्यात आले. परिणामी जवळजवळ ६०० वर्षांनंतर इटालीला जे हवे होते ते – त्रिएस्ते बंदर – मिळाले.

युगोस्लाविया १९२९-१९३९ (श्रेय wiki/Yugoslavia)

पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीलाच, १९१५ साली लंडन कराराअंतर्गत त्रिएस्ते शहर अधिकृतपणे इटालीत आले. अर्धा स्लोवेनिया व इस्त्रिया द्वीपकल्प इटालीत सामील झाले. (शेजारील नकाशा पाहा) त्याचसोबत चारशे वर्षांपूर्वी व्हेनिस राज्याने गमावलेला डाल्माशिया प्रांताचा समुद्रकिनारी प्रदेश व बेटे यांवरही इटालीने कब्जा केला. (वरील व्हेनिसच्या राज्याचा नकाशा, तसेच शेजारील नकाशातील गुलाबी भाग पाहा.) पण १९१८ सालच्या व्हर्सायच्या तहाने युरोपचा नकाशा पुन्हा बदलला. हॅब्सबर्ग साम्राज्यातीेल स्लाववंशीय विभाग (स्लोवेनिया व सोबत क्रोशिया, कोसोवो, बोस्निया) हे पूर्वेकडील सर्बियाच्या राज्याला जोडून युगोस्लाविया नामक राजेशाही देशाची निर्मिती झाली. कित्येक शतके एकतर ओटोमन तुर्की किंवा हॅब्सबर्ग साम्राज्याच्या गुलामीत राहिलेल्या स्लाववंशीयांची अस्मिता आता युगोस्लावियन म्हणून जागी होऊ लागली. १९१५ साली लंडन करारानुसार इटालीला मिळालेला डाल्माशिया प्रांत १९१८ सालीच व्हर्सायच्या तहानुसार युगोस्लावियासाठी सोडावा लागला. इतकेच नव्हे तर डाल्माशिया प्रांतात जाऊन वसलेल्या इटालियन नागरिकांना पुन्हा इटालीत आणून वसवावे लागले. इटाली युगोस्लाविया संघर्षाची ही सुरुवात होती. या संघर्षाला तोंड फोडले ते इटालियन फाशिस्टांनी.

Benito Mussolini
(Credit Wikicommons)

इटालीतील फाशिस्ट चळवळ तशी पहिल्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे १९१५ सालीच सुरू झाली. यथावकाश, तीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला. १९२१ साली फाशिस्ट पक्षाची स्थापना झाली, नि १९२२ मध्ये इटालीवर मुसोलिनीचेच राज्य आले. फाशिस्ट अतिरेक्यांनी त्रिएस्तेच्या परिसरातून जवळजवळ ७०,००० स्लोवेनियन नागरिकांना निर्वासित केले. ते सर्व मूळच्या स्लोवेनियात परतले. इटालियन प्रादेशिक अस्मितेपोटी जवळ जवळ ६०,००० लोकांना मूळची स्लोवेनियन, जर्मन, क्रोट, सर्ब आडनावे बदलून इटालियन धर्तीची आडनावे घ्यावी लागली. त्यासाठी ३००० नवी आडनावे तयार करण्यात आली. इटालियनांनी लादलेल्या या व अशा प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षाची झळ त्रिएस्तेमधील सुमारे दीड लाख लोकांना (अदमासे ६०% लोकसंख्येला) पोचली. फाशिस्टांनी मांडलेल्या बिगर-इटालियनांच्या छळाने या संघर्षाला धार येऊ लागली. १९३० च्या दशकात युगोस्लावियाच्या दक्षिणेला वसलेल्या अल्बानिया या देशातील राजकारणावरून तर इटाली व युगोस्लाविया यांच्यातील संबंध तुटतात की काय इतपत परिस्थिती आली. नंतर आलेल्या दुसर्‍या महायुद्धाने इटाली व युगोस्लाविया हे परस्परांचे शत्रूच झाले, आणि “त्रिएस्ते नाट्याची” ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

विश्वास द. मुंडले

संदर्भ १ – https://en.wikipedia.org/wiki/Trieste

संदर्भ २ – https://en.wikipedia.org/wiki/Italy

चित्रातील मराठीकरणासाठी श्रीराम शिवडेकर यांना धन्यवाद.

पुढील भाग “राजकारणातली दृष्टीआडची सृष्टी – २, त्रिएस्ते नाट्याची सुरुवात”

Hits: 30

You may also like...

2 Responses

  1. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    नकाशे दिल्याने अधिक स्पष्ट झाले, पुढे काय?

  2. अर्चना देशपांडे says:

    सुंदर माहिती. असे विस्तृत पणे वाचायला सहसा मिळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *