माझी पहिली कविता
मला भाषांची आवड असूनही स्वतंत्र कविता लिहिणे मला अजून जमलेले नाही. असे का व्हावे? एक कारण असे संभवते की मला कविकल्पना सुचली की एखाद्या कवीप्रमाणे वास्तवाकडे काहीसे दुर्लक्ष करून ती कल्पना पुढे चालवीत नेण्याऐवजी माझ्यातला वैज्ञानिक तिचे विविध अंगांनी निरीक्षण / परीक्षण / विश्लेषण करू लागतो. आणि एखाद्या काव्यविषयाचा विज्ञानविषय होऊन जातो. ते काही असो. पण एखादे “रसात्मक वाक्य” पाहिले, ते आवडले, आणि त्यातील कल्पनेशी मला बांधून घेतले की माझ्यातला वैज्ञानिक मागे पडून कवी जागा होत असतो.
खाली दिलेले राल्फ वाल्डो इमर्सनचे वचन मला १९७८ साली जहांगीर आर्ट गॅलरीच्या पहिल्या मजल्यावरल्या खोलीत फ्रेम करून भिंतीवर लावलेले दिसले. त्याने मी इतका प्रभावित झालो की ते तिथेच लिहून घेतले.
मूळ इंग्रजी
To laugh often and much heartily;
To win respect of intelligent people and affection of children;
To earn appreciation of honest critics and endure betrayal of false friends;
To appreciate beauty;
To find the best in others;
To leave the world a bit better
– whether by a healthy child, a garden patch, or a redeeming social condition;
To know even one life has breathed easier because you lived;
This is to have succeeded.
-Ralph Waldo Emerson
नुकतेच लग्न झालेले. पत्नी बरोबर होतीच. तिच्याशी या सुवचनाबाबत भरभरून बोलू लागलो. तिला कळते आहे, पण माझ्याइतके भावत नाहीये हे लक्षात आले. मराठीतून समजावले, पण मजा आली नाही.
दुसर्या दिवशी ते माझ्या मनात घुमत राहिले, आणि संध्याकाळी परतताना गाडीत धृवपद सुचले. गाडीतच इंग्रजी विचारांना मराठी काव्यरूप मिळाले. आणि माझी पहिली, परप्रकाशित का असेना, पण कविता झाली. कविता आईला आवडली. पत्नीलाही इंग्रजीपेक्षा मराठीतून जास्त कळले, आणि भावलेही. पण सर्वाधिक आनंद माझा होता. कविता करण्याच्या प्रक्रियेत मजा आली.
“यश हे !”, “यश हे !” असे वाटले कुण्या थोर पुरुषाला ॥ धॄ ॥
पुष्कळ आणिक निर्मळ हसणे । बुद्धिमतांचा आदर मिळणे ।
आणि मुलांनी प्रेमाने जर म्हटले हा आपला ॥ धॄ ॥
चोखंदळ रसिकांची दाद । सुहॄदांकरवी झाला घात ।
स्थितप्रज्ञेने तोही ज्याने हसत हसत झेलला ॥ धॄ ॥
सौंदर्याची असणे जाण । जाणतसे जो दुसऱ्याचे गुण ।
उत्तम उदात्त सुंदरतेचा निदिध्यास धरिला ॥ धॄ ॥
या पॄथ्वीचे चुकवी देणे । सुप्रजनाने कर्तॄत्वाने ।
हा अवनीतल हिरवाईने ज्याने सुखवियला ॥ धॄ ॥
जो घडवितसे समाजोन्नति । ज्याने हरिल्या बहुतांच्या क्षति ।
किमानपक्षी जीवन केले सुसह्य एकाला ॥ धॄ ॥
राल्फ वाल्डॊचे। हे मूळ विचार। फक्त शब्दभार। मुंडल्य़ांचा ॥
विश्वास द. मुंडले
Hits: 19
Recent Comments