बाबासाहेबांना श्रद्धांजली !

बाबासाहेबांनी शंभरीत प्रवेश केल्यावर, त्यांनी शंभरी पार करावी म्हणून शुभेच्छादर्शक लेख लिहिता लिहिता थोडा उशीर झाला. १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. कालाय तस्मै नमः ! दुसरे काय?

बाबासाहेबांचे महाराष्ट्रावर मोठे ऋण आहे. त्यांनी शिवचरित्र उलगडून दाखवले. शिवचरित्राची थोरवी आमच्या, आणि आमच्या मुलांच्या मनात ठसवली. त्यांनी लिहिलेले शिवचरित्र आणि शिवचरित्रातील कथांची पुस्तके आमच्या नातवंडा-पंतवंडांनाही प्रेरक ठरतील यात शंका नाही.

बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र मी, पत्नी आणि माझ्या मुलांनी पुन्हापुन्हा, पुस्तकातील पानांच्या पत्रावळी होईपर्यंत वाचले आहे. पण आमच्या पुढच्या पिढीचे दुर्दैव हे की त्यांना बाबासाहेबांच्या उमेदीच्या काळातली शिवचरित्रपर व्याख्याने ऐकायला मिळाली नाहीत. या बाबतीत आमची पिढी तशी सुदैवीच ! त्यांची व्याख्याने हा पराकोटीचा गुंगवून टाकणारा अनुभव असे. मी नववीत असताना पारल्यात त्यांची पहिली दहा दिवसांची शिवचरित्र-व्याख्यानमाला झाली. त्यानंतर जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा शक्य झाले तिथे जाऊन मी त्यांची व्याख्याने ऐकली आहेत. त्यांची व्याख्याने ऐकल्यानंतर त्यांचे शिवचरित्र वाचणे हा पुनःप्रत्ययाचा आनंद असे. त्यांच्या व्याख्यानांच्या ध्वनिफिती निघाल्यावर त्याही पुन्हा पुन्हा ऐकल्या आहेत. पुढच्या पिढ्यांना हा व्याख्यानांचा अनुभव कसा मिळणार? त्यांना ध्वनिफितीवरच भागवावे लागणार !

ही व्याख्यानेही कशी असत? उत्स्फूर्त, तरीही ससंदर्भ. बाबासाहेबांची रसाळ वाणी, शिवकालीन जनांच्या भावना जितक्या आवेगाने मांडे, तितक्याच सहजपणे बारीकसारीक तपशील, तारखा, दिवस, वेळ, व्यक्ति यांचे संदर्भ देत जाई. “अफझलखान-वध” या विषयावरील व्याख्यानमाला तीन व्याख्यानांत पुरी होऊ शकली नव्हती. नेहेमीचेच शिवचरित्रावरीलच व्याख्यान; कुठेही जाऊन ऐका. पुन्हा ऐकताना काही नवी माहिती किंवा शिवचरित्राचा वा शिवकाळाचा नवा पैलू गवसला नाही असे कधीच झाले नाही. हा चालताबोलता शिवकोश सतत अद्ययावत् असे.

वयाच्या पंधराव्या वर्षी केवळ शिवचरित्राभ्यासाला वाहून घ्यायचा निर्णय घ्यायचा. पुढची सत्तर ऐंशी वर्षे आपले तन-मन-धन असे सगळे त्यात झोकून द्यायचे, हे सोपे नाही. पुस्तके लिहायची, गडकोटांना भेटी द्यायच्या, गडांवर शोध घेताना कधीकधी जिवावरही उदार व्हायचे, शिवचरित्र विषयक साधने गोळा करायला आपल्या खर्चाने फिरायचे, जनतेत शिवचरित्र पोचावे म्हणून गावोगावी व्याख्याने द्यायची. शिवसृष्टी निर्मितीचा प्रकल्प योजायचा, आणि “जाणता राजा” सारखी नाट्यकृती कल्पून उभी करायची, आणि याखेरीज मला अज्ञात असलेले बरेच काही, असा कामाचा विशाल आवाका. एका वेळी शिवचरित्र प्रकाशनासाठी त्यांनी स्वतःची प्रकाशनसंस्थाही काढली आणि चालवलीही. हे सर्व कमी वाटले म्हणून की काय, वेळ येताच त्यांनी दादरा-नगरहवेली मुक्तिसंग्रामात भागही घेतला.

या पैकी व्याख्याने, पुस्तके आणि जाणता राजा या नाट्यप्रयोगाला अपेक्षित यश लाभले. पण शिवसृष्टी मागे पडली. १९७४ मध्ये शिवाजी पार्क वर त्यांनी उभी केलेले प्रदर्शन ही शिवसृष्टी प्रकल्पाची सुरुवात होती. पण त्याचवेळी चाललेल्या रेल्वे संपाने त्या प्रदर्शनाला पुरेसा प्रतिसाद मिळू शकला नाही. व तो प्रकल्प मागे पडला तो पडलाच. कुठल्याही इतिहासकाराप्रमाणे, “इतिहास विसरणारा समाज, इतिहासाचे भोग पुन्हा पुन्हा भोगतो” ही जाण त्यांच्याही मनात होतीच ! प्रत्येक व्याख्यानात, वेळोवेळी इतिहासाचा वर्तमानाशी सांधा जोडण्याच्या त्यांच्या हातोटीतून ही जाण दिसत राही. शिवसृष्टी हा प्रकल्प वर्तमानाला पाच सात शतकांपूर्वीच्या इतिहासाची जाण देण्यासाठीच होता आणि आहे. हे महत्वाचे आहे, कारण रझा अकादमी प्रकरणात आपल्याला केवळ १५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे विस्मरण कसे होते ते आपण पाहातच आहोत. इतिहासातील घटनांइतकीच ऐतिहासिक साधनांविषयीची जागरूकता निर्माण करणे हाही शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांचा हेतू असतो. शिवशाही नांदली त्या अनेक जिल्ह्यातील अनेक कुटुंबातून शिवकालविषयक ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. पण ती जपून ठेवणे वा संशोधकांना सुपूर्द करणे याऐवजी मोहरमच्या ताबूताला चिकटवण्यासाठी वापरली जातात. कारण हे जुने कागद ताबूताला छान चिकटतात. ही माहिती बाबासाहेबांनीच एका व्याख्यानात दिली होती. तेव्हा शिवपूर्व व शिवकालीन इतिहासाचे आणि साधनांचे महत्व पटवण्यासाठी आपण जे काही सांगतोय आणि करतोय, ते जनतेच्या मनात झिरपायचे तेव्हा झिरपो, आपण सांगणे सोडायचे नाही ! यश मिळायचे तेव्हा मिळो ! हे जे सगळे चालले आहे, ते केवळ महाराजांसाठीच. या बांधिलकीला तोड नाही.

साधारण पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तुकाराम जाधव या दुर्गप्रेमी फिरस्त्याने आपले दुर्गभ्रमणविषयक पुस्तक पारल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात एका देखण्या समारंभात प्रकाशित केले होते. ज्या ज्या व्यक्तींबद्दल आदरभाव वाटतो त्या सर्वांनाच जाधवांनी आमंत्रित केले होते. त्यात बाबासाहेब तर होतेच, पण मंगेश पाडगावकरही होते. अगोदर बाबासाहेबांचे भाषण झाले. नंतर बोलणार्‍या मंगेश पाडगावकरांनी म्हटले की, “जाऊ द्या ना आता हे इतिहासात रमणे!” खुर्चीत बसलेले बाबासाहेब इतके अस्वस्थ झाले की त्यांची खुर्चीतून उठण्याची धडपड आणि लगेच उठता येत नाही म्हणून होणारी चुळबूळ लपली नाही. पाडगावकरांचे भाषण झाल्याझाल्या ते उठले आणि त्यांनी १८८० सालच्या सुमारास घडलेली “The Book of Bombay” ची कूळकथा सांगितली. एक इंग्रज सरकारचा नियुक्त अधिकारी डोंगरी किल्ले पाहातो, आणि त्याचे शिवाजी राजा विषयीचे कुतूहल जागे होते. तो या दोनशे वर्षांपूर्वींच्या राजाविषयी मिळेल ते वाचतो. आणि त्याच्या मनी या राजाविषयीचा आदरभाव दाटून येतो. पुस्तकात तो म्हणतो, “Where are your poets who will sing ballads to this king?” “कुठे आहेत या राजाचे पवाडे गाणारे तुमचे कवी?” बाबासाहेबांनी हे वाक्य उच्चारतांना पाडगावकरांकडे पाहिलेही नाही, कारण तो त्यांचा स्वभाव नव्हता. ते जात्याच ऋजु होते.

हे सर्व करताना बाबासाहेबांनी काही व्यक्तिगत मूल्येही पाळली. नेहेमीच ज्याचे श्रेय त्याला दिले. विविध इतिहास संशोधकांचे ऋण मान्य केले व स्वतःकडे शिवशाहीर अशीच भूमिका घेतली. त्याच बरोबर, यशवंतरावांमुळेच महाराष्ट्र सरकार हे माझ्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे पहिले मोठे गिर्‍हाईक ठरले हे ते आवर्जून सांगत. आचार्य अत्र्यांनी अग्रलेख लिहिल्याने राजा शिवछत्रपती पुस्तकाची पहिली आवृत्ती हातोहात खपली हेही ते दिलखुलासपणे मान्य करीत. जाणता राजा सारखी नाट्यकृती उभी करताना आम्ही मूळ इटालियन नाट्यकृतीचे अनुकरण केले असे म्हणतानाही ते मुळीच अवघडत नव्हते.

परिपूर्णतेचा ध्यास त्यांनी कधीच सोडला नाही. पुस्तकाइतकेच व्याख्यानातलेही ऐतिहासिक संदर्भ अचूक असावे याकडे त्यांचा कटाक्ष असे. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ लोकप्रिय होण्यात त्यातील दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचाही वाटा आहे. ही चित्रे अचूक व्हावी म्हणून प्रत्येक चित्रातील प्रत्येक पात्र त्याप्रसंगी काय काय आविर्भाव करीत असेल ते त्यांनी दलालांना अभिनय करून दाखवले होते. त्यांच्या अभिनयाकडे पाहात पाहात दलाल आरेखन करीत व चित्रे बनवत. म्हणूनच तर ही सर्व चित्रे इतकी देखणी व बोलकी झाली आहेत.

दिलेली वेळ पाळणे त्यांनी कधीच चुकवले नाही. पारल्यातल्या एका कार्यक्रमाला वाहातुकीच्या खोळंब्याने त्यांना पोचायला उशीर झाला होता. वेळ साधायची म्हणून ते गाडीतून उतरून धावत निघाले तेव्हा त्यांचे वय पंचाहत्तरच्या पुढे होते.

त्यांनीच सांगितलेली आणि माझ्या आठवणीतली, “राजा शिवछत्रपती” या ग्रंथाच्या (कदाचित दुसर्‍या आवृत्तीच्या) प्रकाशन-समयीची गोष्ट तर नामी आहे. प्रकाशन समारंभाला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येणार होते. बाबासाहेबांनी त्यांच्या संवयीनुसार यशवंतरावांच्या कार्यालयाला कार्यक्रमाची वेळ कळवली व गाडी कधी पाठवू अशी विचारणा केली. पण मुख्यमंत्री आपले आपण येतील असे त्यांना कळवण्यात आले. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना उशीर झाला. पण बाबासाहेबांनी उपलब्ध मान्यवरांपैकी पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशनाचा समारंभ ठरल्या वेळेवर सुरू केला होता. यशवंतरावांना नंतर प्रेक्षकांत बसावे लागले होते. या निर्भीड मूल्यव्यवस्थेलाही तोड नाही.

बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकांतून, व्याख्यानांतून, वागणुकीतून आम्हाला धडे दिले. शिवचरित्राच्या मनगट्या आमच्या बाळमनगटांत चढवल्या. आमची मनगटे बळकट केली. यापुढेही नेहेमीच शिवचरित्र म्हटले की जोडीने बाबासाहेबही आठवणार ! त्यांना श्रद्धांजली.

विश्वास द. मुंडले

Hits: 70

You may also like...

6 Responses

  1. Shaila Phatak says:

    फारच सुंदर

  2. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    ”जाऊ द्या ना ते इतिहासात रमणे ” हे पुरोगामी साहित्यिक,कवि,दिग्दर्शक,नट नट्या यांचे आवडते वाक्य असते. शिवछत्रपतींचे संस्कार–दुसऱ्या महायुद्धात जंगी पलटण (मराठा लाइट इन्फंट्री ने इंडोनेशियातून स्त्रिया,लहान मुली मुलगे वृद्धा जपान्यांच्या अत्याचारातून सुखरूप हॉलंड ला रवाना केले. तसेच जपानचा पराभव झाल्यानंतर सिंहपूर (सिंगापूर)स्त्रिया,वृद्धा,मुली आणि मुलगे यांना सुखरूप जपानला रवाना केले.

  3. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    श्रद्धांजलीचा लेख छान समयोचित जमला आहे.

  4. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    बाबासाहेबांची दहा दिवसांची शिवचरित्र व्याख्यान माला पा.टि.वि. प्राथमिक शाळेच्या पटांगणात झाली होती. रात्री नऊ वाजता व्याख्यान प्रारंभ होई. मी ऐकली आहेत तेव्हा.

  5. अर्चना देशपांडे says:

    बाबासाहेब गेल्यानंतर एकेक आठवणींना उजाळा मिळाला.आपल्या सुंदर लेखाने तो आणखीच उजळून निघाला.शाळेमधील त्यांचे दहा दिवसांचे व्याख्यान तर एक पर्वणीच होती .तारीख,वार,वेळ,सन या सगळ्या ते लिलया सांगायचे,ते बघून प्रत्येक जण स्तंभित व्हायचा.मी तर सातवीत होते,तरी आठवते आहे.आम्ही घरातील सर्व जण आवर्जून व्याख्यानाला जात असू.अमोघ वाणी, जबरदस्त
    स्मरणशक्ती यांचे वर्णन करु तेवढे थोडेच.
    स्वर्गामधे शिवाजी महाराजांनी त्यांच्या या भक्ताचे कसे स्वागत केले असेल ?
    बाबासाहेबांना शतशः प्रणाम.

  6. मेधा भावे says:

    खूप छान !बाबासाहेब पुहा एकदा समोर उभे ठाकले !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *