कारगिल विजय दिवस

कारगिलचा भूप्रदेश (Picture credit Amit Rawat flickr.com)

नुकताच “कारगिल विजय दिवस” (२६ जुलै) पार पडला. त्याच दिवशी १९९९ साली कारगिलच्या युद्धभूमीवर शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला होता, आणि कारगिलचे “ऑपरेशन विजय” यशस्वी ठरले होते.

जगातील युद्धांच्या इतिहासातही हे युद्ध महत्वाचे ठरले, ते सर्वाधिक उंचीवरील पर्वतीय युद्धभूमीमुळे. भारतीय सेनेच्या इतिहासात हे युद्ध महत्वपूर्ण ठरले ते ज्या विषम परिस्थितीत भारतीय सेनेने विजयश्री मिळवली त्यामुळे. या युद्धात ४००० पाकिस्तानी सैनिक मारले गेले असा अंदाज आहे. पण त्यासाठी भारताच्या ५७६ जवानांनी तर लेफ्टनंट ते लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या ३६ अधिकार्‍यांनी बलिदान दिले. यातील बहुसंख्य शहीद हे २० ते २६ या वयोगटातील होते. या वीरांना ४ परमवीर चक्रे, ४ महावीर चक्रे, २९ वीरचक्रे आणि ५२ सेना पदके देऊन गौरवण्यात आले. युद्धात प्रामुख्याने भाग घेतलेल्या १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, गढवाल रेजिमेंट, १३ जम्मू काश्मीर रायफल्स, ८ शीख रेजिमेंट या दलांचाही विशेष गौरव केला गेला. (तरुण भारत ३१ जुलै २०२२)

हे युद्ध समजून घ्यायचे तर त्याची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे.

कारगिलचे युद्ध ज्या गिरिशिखरांवरील चौक्यांसाठी लढले होते, त्या चौक्या श्रीनगर लेह मार्गावर (NH 1A) लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावरून जाणार्‍या वाहनांवर मारा करण्यासाठी मोक्याच्या जागा होत्या, आणि आहेत. १९७१पूर्वी या चौक्या काश्मिरातील ताबा रेषेच्या, म्हणजेच locच्या पलिकडे, पाकिस्तानी क्षेत्रात होत्या. पण या चौक्यांचे महत्व जाणून भारतीय सेनेने त्या १९७१च्या युद्धात काबीज केल्या. सिमला करारात दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याचे प्रावधान होते. त्यानुसार दोन्ही सेना सर्वमान्य आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत मागे हटल्या. काश्मीरमध्येही भारताने युद्धपूर्व ताबा रेषेपर्यंत माघार घ्यावी (म्हणजेच या चौक्यांवरील ताबा सोडावा) यासाठी पाकिस्तानने आणलेल्या दबावाला न जुमानता भारतीय सेनेने या चौक्या राखून ठेवल्या. ही तडजोड स्वीकारूनच सिमला करार झाला. जम्मू-काश्मीर मध्ये १८ डिसेंबर १९७१ ला असलेली ताबा रेषा ही अधिकृत ताबा रेषा (line of control) म्हणून दोन्ही पक्षांनी मान्य करायची हे सिमला करारातच नमूद झाले. (https://mea.gov.in/in-focus-article.htm?19005/Simla+Agreement+July+2+1972)

पण या चौक्या गमावल्याचे शल्य पाकिस्तानी सेनेला बोचत असावे. १९९९ साली पाकिस्तानी सैन्याने ज्या लबाडीने या चौक्या बळकावल्या, आणि आपल्या सैनिकांचा अनन्वित छळ आणि हत्या केली, त्यामागे हा विद्वेष दिसतो. असे म्हणतात की १९९९पूर्वी जनरल झिया व बेनझीर भुत्तो यांच्या राजवटीत कारगिलवर ताबा मिळवण्याच्या योजना पाकिस्तानात शिजल्या. मात्र पुन्हा जर सर्वंकष युद्ध पेटले तर ते जड जाईल या भीतीने या योजनांवर अंमल झाला नाही. पण ऑक्टोबर १९९८मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ सेनाध्यक्ष झाले आणि त्यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अंधारात ठेवून आपलेच सैनिक हे मुजाहिदीन आहेत असे भासवून कारगिल बळकवण्याची योजना आखली, तयारीही केली, आणि लगोलग संधीही साधली.

युद्ध चालू नसेल तेव्हा समोरासमोरील दोन विरोधी सेनादलांचे स्थानिक प्रमुख हे परिस्थितीनुरूप परस्परांशी करार करत असतात व सभ्य सेनाधिकारी असे करार पाळतही असतात. हिवाळ्यात कारगिलमधील उंच चौक्यांवरील हवामान अतिशय थंड आणि वादळी असते. तिथे सैनिक ठेवल्यास त्याच्या जिवाला या हवामानाचाच सर्वात मोठा धोका असतो. त्याला रसद पुरवणेही कठीण जाते. मग युद्धाची तर गोष्टच सोडा. तेव्हा अशा उंचीवरील ठाण्यातून हिंवाळ्यापुरती माघार घेण्याची प्रथा असते, तशी ती कारगिलमधील चौक्यांवरही होती. त्यानुसार भारतीय फौजांनी कारगिलमधून १९९८च्या अखेरीला माघार घेतलेली होती. त्यात १९९९च्या एप्रिलमध्ये १३ महिने चाललेले वाजपेयी सरकार गडगडले. पुढील निवडणुका ऑक्टोबर १९९९मध्ये घेण्याचे ठरले. आणि वाजपेयी सरकार काळजीवाहू सरकार म्हणूनच उरले. या परिस्थितीत भारताची प्रतिक्रियात्मक कारवाई यथातथाच होणार या अपेक्षेने मुशर्रफ यांनी आपली योजना अंमलात आणण्याची संधी साधली. ऐन हिंवाळ्यात भारतीय सेनेने रिकाम्या केलेल्या कारगिलमधील चौक्या बळकावल्या.

पण पाकिस्तानची लबाडी लक्षात आल्यावर आपण लष्करी कारवाई करणेही भाग होते. श्रीनगर लेह रस्त्यावरून जाणार्‍या भारतीय सेनेवर या मोक्याच्या ठिकाणांवरून पाकिस्तानला सहज हल्ला करता आला असता. कारण हा महामार्ग या चौक्यांवरून सरळ सरळ दिसतो. त्या चौकीत बसलेला एक शत्रूसैनिक श्रीनगर-लेह महामार्गावरून जाणारा अख्खा भारतीय सैनिकी तांडा नष्ट करू शकला असता. परिणामी, लडाख आणि सियाचेन हा विस्तीर्ण भूभाग भारतापासून तुटला असता.

ही अतिशय विषम लढाई होती. गोठवणारे शून्याखालचे तापमान, १५ हजार फूट उंचीवरील प्राणवायूचे अल्प प्रमाण, रस्त्यांऐवजी दगड धोंड्यांच्या वाटा, नैसर्गिक सुरक्षेचा अभाव असणारा चढा पर्वती प्रदेश, आणि या सर्वावर कडी म्हणजे उंचावर असलेला आणि तुमच्यावर सतत लक्ष ठेवून बसलेला शत्रू. पण आपल्या सेनेने या युद्धात आपल्या प्राणांची व श्रमांची आहुती दिली. त्याला आपल्या हेरगिरीची आणि मुत्सद्देगिरीची जोडही मिळाली आणि आपले “ऑपरेशन विजय” यशस्वी झाले. या युद्धात प्राणांची बाजी लावणार्‍या अनेक सैनिकांच्या कहाण्या घरोघरी पोचल्या. ते योग्यच होते आणि आहेही. त्याच्या जोडीला उपयुक्त ठरलेल्या हेरगिरी व मुत्सद्देगिरीची, किंवा सेनादलांनी घेतलेल्या अविरत श्रमांची पण दखल घेतली पाहिजे.

उदाहरणार्थ याच युद्धकाळात जनरल मुशर्रफ चीनला गेलेले होते. त्याच सुमारास अमेरिकेतून प्रेसिडेंट क्लिंटन यांनी नवाझ शरीफांवर “या मुजाहिदीनांना मागे घ्या” असा धोशाही लावला होता. तर तोच लकडा नवाझ शरीफ आपल्या सेनाधिकार्‍यांमागे लावत होते. याबाबतीत पाकिस्तानी सैन्याचे एक जनरल व जनरल मुशर्रफ यांचे टेलिफोन संभाषण भारतीय हेरांनी मिळवले. “हे मुजाहिद नसून आपलेच सैनिक आहेत” अशी कबुली देणारे हे संभाषण भारतीय दूतावासांनी जगभरातील प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला ऐकवले, पाकिस्तानविरुद्ध वातावरण चांगलेच तापवले, आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान नरमले.

भारतीय माध्यमांनी श्रीनगर-लेह रस्त्यावरून दिसणार्‍या लढाया घराघरात पोचवल्या. पण बटालिक क्षेत्र, जिथे पोचायला हमरस्ता सोडून एक पूर्ण दिवस चालावे लागे, तिथल्या रक्तरंजित लढायांची आणि सेनेने उपसलेल्या कष्टांची वार्ता काही घरोघरी पोचली नाही. त्यापैकी ही एक कथा – युद्धक्षेत्रावरील जिवाच्या व श्रमांच्या आहुतीची, आणि ती देताना दिसलेल्या सैनिकी बंधुभावाची.


ऋणविहीन मरण

(मूळ इंग्रजी लेखक लेफ्टनंट कर्नल पीके जेटली, १७ गढवाल रायफल्स)

सैन्यदलाची एक कारवाई आटपून दुसरी सुरू करताना सेनेची काही पुनर्रचना करावी लागते. शत्रूच्या कारवायात खंड पडलेला पाहून गढवाली फेरमांडणी करू लागले, तोच सेनेच्या मुख्यालयावर शत्रूच्या तोफखान्याचा जबर हल्ला सुरू झाला. लक्षात घ्या, उंचावरून तुमच्यावर सतत लक्ष ठेवणारा शत्रू तुमच्या ठिकाणाची अचूक माहिती आपल्या तोफखान्याला पुरवून तुमच्यावर नेमका आणि अचूक हल्ला करू शकतो. तसाच तो झाला.

या हल्यात लान्सनाइक क्रिपालसिंग जबर जखमी झाला. तोफगोळ्याच्या एका मोठ्या कपचीने त्याचे पोट फाटले, आणि आंतडी बाहेर आली. एक डोळाही गेला. युद्धक्षेत्रावरील डॉक्टरने प्रयत्न केला पण पोट इतके फाटले होते की रक्तस्राव कमी होईना. आता त्याला कारगिलमधील युद्धक्षेत्रीय इस्पितळात पाठवणे भाग होते. पण तिथे जायचे तर सहा तास चालून एका कामचलाऊ हेलिपॅडवर पोचायचे, मग हेलिकॉप्टरने इस्पितळात पोचायचे एवढा एकच मार्ग होता. स्ट्रेचर वाहकांना पाचारण करण्यात आले. प्रथमोपचार देऊन क्रिपालसिंगला रवाना करण्यात आले.

प्रदेश असा की सर्वत्र केवळ दगड आणि धोंडेच. त्यातून पायवाट शोभेल असा काढलेला रस्ता, ज्यावरून एका माणसालाही चालणे कठीण. आणि पायवाटेच्या बाहेरून चालणे जवळ जवळ अशक्यच. या अरुंद वाटेवरून एका स्ट्रेचरवर झोपलेल्या सैनिकाला वाहून न्यायचे होते, तेही त्याच्या दोन्ही हाताला व दोन्ही पायांना जोडलेल्या बाटल्यांसकट. या परिस्थितीत त्यातल्या त्यात बरी, अशी ती एका माणसासाठी केलेली पायवाट वापरणे, हे स्ट्रेचरवाहकांना शक्यच नव्हते. स्ट्रेचर, रुग्ण, बाटल्या हे सारे सांभाळत हे चौघेही पायवाटेबाहेरून अणकुचीदार दगड धोंड्यांवरून शक्य तितके जलद चालत राहिले. वेळच अशी होती की क्रिपालसिंगला वाचवायचे तर हे दिव्य करणे भाग होते.

बराच वेळ गेला तसे वाहाणार्‍या रक्ताने स्ट्रेचरचे कॅनव्हास भिजले आणि रक्त वाहकांच्या खांद्यावर व हातांवर ओघळू लागले. चालता चालता हे वाहक बोलून क्रिपालसिंगला धीरही देत होते. पण पाचएक तासांच्या खडतर प्रवासानंतर क्रिपालसिंगला दिलेल्या मॉर्फीनचा प्रभाव ओसरला आणि तो अपार वेदनेने कण्हू लागला. आता त्याला धापही लागली होती.

हेलिपॅड जवळ आले आणि क्रिपालसिंगने वाहकांना थांबायला आणि स्ट्रेचर खाली ठेवायला सांगितले. जवळ बोलावले आणि “नीट ऐका” म्हणून क्षीण आवाजात तो म्हणाला, की “त्याच्या शर्टच्या खिशात एक छोटी डायरी आहे. मागल्या शांतताकालीन नेमणुकीवर असताना मी बर्‍याच मित्रांकडून पैसे उसने घेतले होते. त्यांची नावे व देणीं या डायरीत नोंदवली आहेत. एकाएकी युद्धक्षेत्रात बदली झाल्याने मला ती चुकवता आली नाहीत. या युद्धकाळात कोणाच्याच आयुष्याचा ठिकाणा नाही. तेव्हा माझे काही बरेवाईट झालेच तर महिनाअखेरीला मिळणार्‍या पगारातून ही देणी चुकवा”.

समोरच्या चढावावर हेलिपॅड दिसत होते. क्रिपालसिंगच्या दृष्टीने एकएक सेकंद महत्वाचा होता. सहकार्‍यांनी त्याला धीर देत पटवले की “अरे तू बरा होऊन तुझ्या दलात परतलास की तूच तो व्यवहार पुरा कर”. स्ट्रेचरसह तो चढाव चढायला वाहकांना एक तास लागला. तोपर्यंत क्रिपालसिंगची शुद्ध हरपू लागली होती. सुदैवाने हेलिकॉप्टर उडायला तयार होते. हेलिकॉप्टर उडाले आणि क्रिपालसिंगची उमेदही वाढली. पण तोवर खूपच उशीर झालेला होता. कारगिल हॉस्पिटलजवळ उतरण्याअगोदरच त्याचा प्राण गेला. मग त्याची डायरी निघाली. डायरीत त्याच्या विविध मित्रांकडून वेळोवेळी घेतलेल्या ₹३० पासून ₹७५ पर्यंतच्या रकमांची नोंद होती. एकूण देणे होते ₹४००.

मृत्यू जवळ आला की माणसे वेगवेगळ्या प्रकारे वागत असतात. बहुसंख्यांना त्यांचे कुटुंबीय, आराध्य दैवत किंवा देव आठवतो. लान्सनाइक क्रिपालसिंगने इतरांनी अंगिकारावे असे एक नवेच मानक घालून दिले. मरणाच्या दारात असताना, जीव बचावण्यासाठी एकएक सेकंद महत्वाचा असताना क्रिपालसिंगने जे काही केले, ते त्याची मूल्यव्यवस्था दर्शवणारे आहे. आणि त्याचे हे व्यक्तिमत्व घडवण्यात त्याचे आईवडील, त्यांचे संस्कार, त्याचे शिक्षक, यांच्या बरोबरीने भारतीय सेनेतील न्याय्य वातावरणाचा ही प्रभाव पडला असेल.

बद्री विशाल लाल की जय!

लेखक व अनुवादक: डॉ. विश्वास द. मुंडले

कर्नल जेटली यांचा मूळ लेख नजरेस आणून दिल्याबद्दल कर्नल अरुण जोशी यांचे आभार!

Hits: 3

You may also like...

3 Responses

  1. रवी अभ्यंकर पुणे says:

    इतक्या सोप्या भाषेत आणि कमीत कमी मर्यादेत कारगील युद्धाचा तपशील छान सांगितलाआहेस विश्वास…लिखाण आवडले… कर्नल जेटली यांच्या लेखामुळे समक्ष सदरदृष्य पहातआहोतअसा वेगळाच परिणाम झाला ……असाच लिहीत रहा.

  2. अर्चना+देशपांडे says:

    कारगिल विजय दिवस,…सुंदर लेख.
    श्रावण महिमा…फारच उत्कृष्ट !. संपूर्ण महिन्याची उत्कृष्ट
    मांडणी.भाषा पण किती सरळ आणि सोपी.
    फारच छान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *