श्रावण महिमा

या रचनेतून श्रावणातील विविध सणांचे व ते साजरे करण्याच्या परंपरांंचे वर्णन आले आहे.

(चाल: ओवी)

पहिले वंदन । देवा गजानना । श्रावण वर्णना । लिहवी तू ॥१॥
श्रावण महिना । वर्षात पाचवा । सणांचा मेळावा । त्यात होई ॥२॥

श्रावण मासांत । रविवाराचा महिमा । पूजीती प्रतिमा । सूर्याची ती ॥३॥
पाटी प्रतिमा काढती । दूध दही तूप चंदन । खीर नैवेद्य अर्पून । भक्तिभावे ॥४॥

श्रावण सोमवार । शंकर पूजन । दिवेलागणीं भोजन । करिताती ॥५॥

शिवामुठीचे व्रत करिती । नव्या सवाष्णी प्रेमाने ।
मूग, तांदूळ, तीळ, गहू । सातू, वाहती मुष्टीने ॥६॥

श्रावण-मंगळवारी । गौर पूजीती मंगला । मागतात सौभाग्याला । तिजपाशी ॥७॥
गौर मंगला म्हणूनी । अन्नपूर्णाही पूजिती । फुले चौरंगी रचिती । नानापरी ॥८॥

श्रावण बुधवारी । संगे पूजीती वार गुरु । बुध बृहस्पती गुरु । पूजिताती ॥९॥

श्रावण शुक्रवारी । सख्या पूजिती जिवती । धन संतती मागती । तिजपाशी ॥१०
जिवती पूजन । सुवासिनीला भोजन । नैवेद्य पुरण । दाखविती ॥११॥
सायंकाळी हळदीकुंकू । दूधसाखर पिण्याला । भाजल्या चण्याला । वाटताती ॥१२॥

श्रावण शनिवारीही पूजिती, रामभक्त हनुमंताला ।
प्रल्हादाभक्तीस्तव प्रगटे, म्हणुनी पुजा नरसिंहाला ॥१३॥

श्रावण मासांत । तिथीचे कथन । शुद्ध पंचमी पूजन । नागोबाचे ॥१४॥

(चाल: श्रावणमासी)

पंचमी दिनी सकलही भगिनी, नाग मानिती बंधुसम ।
तळणे भाजणे भाजी चिरणे, यासम करिती ना काम ॥१५॥
भूमिखालती वारुळ म्हणुनी, नागोबाचे घर धरती ।
त्या दिवशी म्हणुनी शेतकरी, नांगर हाती नच धरती ॥१६॥

वर्णसठी अन् शिळासप्तमी, नारळी पूनम यांत असे ।
स्वातंत्र्योत्सव त्यात येउनी, श्रावण महिमा खुलवितसे ॥१७॥

वर्णसठीचे व्रत त्या नारी, करिती संकट-नाशाला ।
शंकर नहाती, गौरी भराडी, म्हणुनी देति त्या वाणाला ॥१८॥
वर्णसठीचे वाण म्हणुनिया, देती तांदुळ बालाला ।
ब्राह्मणास त्या दानही करिती, वरी ठेवती पैशाला ॥१९॥

(चाल: ओवी)

शिळासप्तमीचे दिवशी । वाण देती ग भावाला । काकडीचे पानी । दहिभात लोणच्याला ॥२०॥
दहिभात वाणावरी । एक ठेवावी सुपारी । एक मुटकुळे करीं । जलीं द्यावे ॥२१॥
जलीं मुटकुळे देती । शीतला देवीस । पाण्यापासोनी घराण्यास । भय नसो ॥२२॥

नारळी पूनम । सागरी पूजन । नारळ अर्पून । भक्तिभावे ॥२३॥
नारळी पुनवेचा । सण मोठा व्यापार्‍यांस । निघताती प्रवासास । तदनंतर ॥२४॥
भाइरायाला बहिणीची । करू द्यावी आठवण । रक्षाबंधन म्हणून । सण मोठा ॥२५॥
हा सणही करिती । नारळी पुनवेला । राखी पूनम तिजला । म्हणती कोणी ॥२६॥
श्रावण पुनवेला । कोंकण प्रांतात । पोवतीं वाहातात । घरोघरी ॥२७॥
पोवती म्हणून । सूत रंगवून । मध्ये गंठण करून । देवा वाहाती ॥२८॥
पोवती देवाला । म्हणती वाहून । करी रे रक्षण । आमुचे तू ॥२९॥

(चाल: श्रावणमासी़)

वद्य अष्टमी कृष्ण ही जन्मे, जन करती उपवासाला ।
नवमी दिवशी हंडी फोडुन, नरजन करिती दहिकाला ॥३०॥

(चाल: ओवी)

श्रावण अवसेला । म्हणतात पिठोरी । पुत्राकारणे व्रत नारी । आचरिताती ॥३१॥
व्रत आचरताती नारी । करिताती उपवास । संध्यासमयी योगिनीस । पूजिताती ॥३२॥
योगिनी पूजिती । प्रतिमा चौसष्ट । शाका पक्वान्ने चौसष्ट । नैवेद्याला ॥३३॥

माझ्या अल्पमतीने । वर्णियले श्रावणाला ।
काही चुकले माकले । क्षमा करा मंगलेला ॥३४॥

  • मंगला द. मुंडले (२०/८/१९६२)

Hits: 0

You may also like...

1 Response

  1. Hemant Pandit says:

    Great .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *