डॉ. अरविंद गोडबोले – एक प्रभावी व्यक्तिमत्व
डॉ. गोडबोले यांचा माझा पहिला परिचय झाला (१९६७) तेव्हा मी एक तरुण रुग्ण होतो. माझा विषमज्वर तीन महिन्यात दोन वेळा उलटलेला होता आणि नंतरही ताप जात नव्हता. माझ्या वडिलांचे मित्र कै. साटम हे स्वयंप्रेरित वैद्यकीय समाजसेवक होते. त्यांनीच डॉ. गोडबोल्यांची वेळ घेतली आणि ते स्वत:ही आमच्याबरोबर आले. साटम काकांनी सुचवलेले डॉक्टर म्हणजे ते चांगलेच असणार!
डॉ. गोडबोल्यांच्या पद्धतशीरपणाचाही परिचय तेव्हाच झाला. रुग्णालयात भरती होण्याच्या अनेक कारणांपैकी एक, “निव्वळ निरीक्षणासाठी” असेही असते हे तेव्हाच कळले. पाच दिवस त्यांनी मला झोपवून ठेवलेले होते. रात्री दोन वाजता रक्ताचे नमुने घेणे वगैरे प्रकार असतात हेही तेव्हाच कळले. पण त्यांच्या अचूक औषधयोजनेने माझा ताप गेला. त्या आश्वासक अनुभवाने डॉक्टरांचे नाव मनात चांगलेच रुजले. यथावकाश डॉ. गोडबोले हे माझे मामा कै. डॉ. निंबकर यांचे परिचित व मातुलरूप डॉ. भांडारकर यांचे घनिष्ट मित्र निघाले. कोणालाही फॅमिली डॉक्टरच्या हातून बरे न होणारे दुखणे झाले की डॉ. गोडबोले आठवू लागले.
सुदैवाने पुढे कित्येक वर्षे मला किंवा निकटवर्तीयांना आजारपण आले नाही. पण मी वाचनसंस्कृतीचा पाईक असल्याने डॉक्टरांचा परिचय होत राहिला, ते एक बहुआयामी लेखक म्हणून! रुग्णोपयोगी शिक्षणपर पुस्तके प्रथम वाचनात आली. तो तर त्यांचा सहजसंचारविषय होता. ऐंशीच्या दशकात शीख इतिहासावरील त्यांचे वर्तमानपत्रीय लिखाण आणि पत्रे वाचून कळले की हे डॉक्टर बहुविध विषयांत संचार करणारे आहेत. पण सावरकर विचारांच्या पुस्तकावर डॉ. अरविंद गोडबोले हे नांव वाचून वाटलेला विस्मय अजून आठवतो. त्याला सरावल्यानंतर पुढे ते ख्रिश्चन-धर्मप्रसार-पद्धतींवर लिहीत असल्याचे कळल्यावर तितके आश्चर्य वाटले नाही. त्यांच्यामधल्या वैचारिकाला काहीही शक्य होते.
पण मी फारच पुढे गेलो. ऐंशीच्या दशकात माझ्या वृद्ध आजीसाठी दुसऱ्या कोणा डॉक्टरकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. पद्धतशीरपणाचा एक फेरअनुभव! आजी बरी झाली. माझ्या मुलाच्या आजारपणात त्यांच्या इलाजाच्या सर्वंकषतेचा, आहार आणि औषध यांच्या एकत्रित विचारांचा, किमान औषध योजनेचा अनुभव आला. या सर्वातून माझा वैयक्तिक फायदा म्हणजे डॉक्टरांशी वैचारिक सांधा जुळला. इतिहासापासून धडे घेणे दूर, पण त्याकडे पाठ फिरवून वावरणाऱ्या समाजाच्या भवितव्याची खंत हा आमच्यातील समविचाराचा धागा होता. अर्थात या विषयात मी केवळ विद्यार्थी होतो, तर ते चिकित्सक अभ्यासक व सिद्धहस्त लेखक होते. त्यांच्याशी सहज मारलेल्या गप्पा, मग त्या वैद्यकीय असोत की ऐतिहासिक- सामाजिक, हा एक प्रबोधक अनुभव असे.
पण माझे कुतूहल वेगळेच असे. एकतर प्रचलित राजकारणाला वर्ज्य ऐतिहासिक सामाजिक विषय निवडायचे! त्यापोटी होणाऱ्या दुर्लक्ष्याकडे दुर्लक्ष करून प्रबंध ठरावा इतके वैचारिक ससंदर्भ लिखाण करायचे!! हे किती कठीण असते हे त्या प्रयत्नात पडणाऱ्यांनाच कळेल. आणि संदर्भही किती? तर शेकडोच्या घरात. अभ्यासही कसा? तर शिखांचा इतिहास समजण्यासाठी पंजाबी शिकून ग्रंथसाहेबही समजून घ्यायचा! हे डॉक्टर उत्तमपणे व्यवसाय सांभाळून इतकी व्यवधाने कशी सांभाळतात, हा प्रश्न मला पडे. मला त्यांच्याकडूनच कळले होते, की रोज सकाळी चार वाजता उठून सकाळी आठ वाजेपर्यंतचा वेळ ते वैयक्तिक कामे व संशोधन-लेखन-वाचनासाठी देत. त्यानंतर दिवसभराच्या वैद्यकीय मोहिमेवर निघत, तेव्हा ते केवळ वैद्यकव्यावसायिक असत. इतके नियोजित आयुष्य इतक्या यशस्वितेने जगणे हेही किती कठीण आहे हे तो प्रयत्न करणाऱ्यांनाच कळेल. डॉक्टरकी आणि ऐतिहासिक सामाजिक विचारविश्व या दोहोंत लीलया विहार करणारी त्यांची प्रतिभा आणि क्षमता केवळ अजॊड होती. त्या बाबतीत ते माझे स्फूर्तिस्थान होते. पण त्यांच्या सारखी वेळापत्रकी आणि वैचारिक शिस्त, आणि तर्ककठोर वृत्ती अंगिकारणे अजून मला साध्य झालेले नाही. तिथे हा एकलव्य कमी पडला हे खरे! पण यशस्वी ठरतॊ तर त्यांनी मला गुरुदक्षिणा न मागता शाबासकी दिली असती याची खात्री आहे.
असा कुशल वैद्यक व्यावसायिक, वैचारिक, आणि समर्थ लेखक एकाच कुडीत सामावलेला पहाण्याचे, त्यांच्याशी बोलण्याचे, आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेण्याचे भाग्य मला लाभले याचा आनंद आहे. त्यांच्याकडून बरेच काही मिळवता आले नाही याचा सल रहाणार आहे, आणि असे अजोड व्यक्तिमत्व हरपल्याचे दु:खही. त्यांना मी, माझा परिवार आणि माझे समविचारी यांची श्रद्धांजली!
डॉ. विश्वास द. मुंडले
Hits: 33
डॉ गोडबोले यांचे वर्णन अत्यंत सुंदर असे केले आहे. आवडले.
धन्यवाद अनिल
डॉक्टर अरविंद गोडबोले यांचे वरील लेख आणि डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांचे प्रबोधन मंच भाषणाचा सारांश उत्तम जमले आहे.