पाढ्यांची गाणी – अकरा ते पंधरा
पाढ्यांच्या गाण्याबाबतचे निवेदन वाचले नसल्यास इथे वाचा.
अकराचा पाढा – बकर्याची गोष्ट
अकरा एके अकरा । एक होता बकरा ॥
अकरा दुणे बावीस । तो आला मुंबईस ॥
अकरा त्रीक तेहेतीस । सर्कशीत राहिला नोकरीस ॥
अकरा चोक चव्वेचाळ । हिंडायला मिळेना रानोमाळ ॥
अकरा पाची पंचावन । तिथे रमेना त्याचे मन ॥
अकरा सक सहासष्ट । पळायचा केला विचार स्पष्ट ॥
अकरा साती सत्याहत्तर । वाट पुसता न मिळे उत्तर ॥
अकरा आठे अठ्ठ्याऐंशी । गाठ पडली खाटकाशी ॥
अकरा नव्वे नव्याण्णव । मग झाली धावाधाव ॥
अकरा दाहे दाहोदरसे । सर्कस बरी राम भरोसे ॥
मंगला द. मुंडले
बाराचा पाढा -१ – फणसाची उस्तवार
बारा एके बारा । आधी करुया केरवारा ॥
बारा दुणे चौवीस । झाडावरुनी काढा फणस ॥
बारा त्रीक छत्तीस । फणसाचा आपण काढू रस ॥
बारा चोक अठ्ठेचाळ । रसामधून उरला गाळ ॥
बारा पंचे साठ । रसाची घातली साठं ॥
बारा सक बाहात्तर । साठावर दिले चार थर ॥
बारा सत्ते चौर्यांशी । हाती धरले गाळाशी ॥
बारा अठ्ठे शाहाण्णव । त्यात मिसळला खोबर्याचा चव ॥
बारा नव्वे अष्टोदरसे । शिजवुन घेतले हातासरसे ॥
बारा दाहे विसासे । मग वाटले खावेसे ॥
मंगला द. मुंडले
बाराचा पाढा – २ – देवीची पूजा
बारा एके बारा । आपण करुया हारा ॥
बारा दुणे चोवीस । हार घालू देवीस ॥
बारा त्रीक छत्तीस । मग लावू उदबत्तीस ॥
बारा चोक अठ्ठेचाळ । नैवेद्याला केळ ॥
बारा पंचे साठ । उभे राहू ताठ ॥
बारा सक बाहात्तर । घालू साष्टांग नमस्कार ॥
बारा सत्ते चौर्यांशी । वर मागू तिजपाशी ॥
बारा आठे शाहाण्णव । पास होऊ देत सर्व ॥
बारा नव्वे अष्टोदरसे । दुर्गुण पळावे वार्यासरसे ॥
बारा दाहे विसासे । आशिर्वादा मागू ऐसे ॥
मंगला द. मुंडले
तेराचा पाढा – विलासची गोष्ट
तेरा एके तेरा । कोपर्यात बसला बिच्चारा ॥
तेरा दुणे सव्वीस । त्याचे नाव विलास ॥
तेरा त्रीक एकुणचाळ । सारे त्याला म्हणती बाळ ॥
तेरा चोक बावन्न । वडील त्याचे असून ॥
तेरा पाचे पासष्ट । सारा दिवस करि कष्ट ॥
तेरा सक अठ्याहत्तर । त्याला मिळे पगार ॥
तेरा सत्ते एक्याण्णव । प्रेमळ त्याचा स्वभाव ॥
तेरा अठ्ठे चौदोदरसे । हाकारीता ओ देतसे ॥
तेरा नव्वे सत्रोदरसे । सगळी कामे करतो हर्षे ॥
तेरा दाहे तिसासे । ऐसा मुलगा शहाणा असे ॥
मंगला द. मुंडले
चौदाचा पाढा – गुरुजी नि विद्यार्थी
चौदा एके चौदा । गुरुजींशी झाला सौदा ॥
चौदा दुणे अठ्ठावीस । शिष्य म्हणे “करा पास” ॥
चौदा त्रीक बेचाळ । गुरुजी म्हणती “अक्षर गचाळ” ॥
चौदा चोक छप्पन । “तेच दाखव सुधारून” ॥
चौदा पंचे सत्तर । “मगच देईन उत्तर” ॥
चौदा सक चौर्यांशी । “नंतर बोल माझ्याशी” ॥
चौदा सत्ते अठ्याण्णव । “मगच शिकविन तुज सर्व” ॥
चौदा अठ्ठे बारोदरसे । अक्षर सुधारले हसला हर्षे ॥
चौदा नव्वे सव्वीसासे । मगच गेला गुरुजींपाशी ॥
चौदा दाहे चाळिसासे । पास केला आल्यासरसे ॥
मंगला द. मुंडले
पंधराचा पाढा – पाऊस
पंधरा एके पंधरा । आकाशातून पडती धारा ॥
पंधरा दुणे तीस । त्याला म्हणती पाऊस ॥
पंधरा त्रीक पंचेचाळ । सर्वत्र पाण्याचे ओहोळ ॥
पंधरा चोक साठ । तलाव भरती काठोकाठ ॥
पंधरा पाचे पंचाहत्तर । चिखल होतो अंगणभर ॥
पंधरा सक नव्वद । मुलामुलांनी केला बेत ॥
पंधरा साते पाचोदरसे । चिखलात खेळण्या जाउया कैसे ॥
पंधरा अठ्ठे विसासे । अंगणात गेले विचारासरसे ॥
पंधरा नव्वे पस्तीसासे । पाण्यात फिरु या बगळे जसे ॥
पंधरा दाहे पन्नासासे । आई हाकारी “घरी या” ऐसे ॥
मंगला द. मुंडले
Hits: 34
Recent Comments