मानस-पूजा-गीते
श्रीसरस्वतीची मानसपूजा
सरस्वती माते । तुज करीन वंदन । तुझ्या पतीचे पूजन । आधी करिते ॥१॥
सरस्वती माते । विद्येच्या देवते । मी मानसी पूजीते । तुजलागी ॥२॥
सरस्वती माते । तुज बसण्या वृक्ष-छाया । देई मजलागी माया । सद्गुणांची ॥३॥
सरस्वती माते । तुज स्नान पंचामृती । सदा समाधानी वृत्ती । ठेवी माझी ॥४॥
सरस्वती माते । तुज हळदी कुंकू लेणं । मजलागी देई दान । सौभाग्याचे ॥५॥
सरस्वती माते । तुज वाहू शुभ्र फुले । आनंदी ठेवी मुले । सदा माझी ॥६॥
सरस्वती माते । तुज वाहू वृंदा पान । कधी नसो ताठ मान । गर्वे माझी ॥७॥
सरस्वती माते । तुज करू ग आरती । देई माझ्या बाळा हाती । विद्यादान ॥८॥
सरस्वती माते । तुज नैवेद्य दुधाचा । आम्हा देई ग सुखाचा । नित्य घास ॥९॥
सरस्वती माते । शुक्र मंगळ तुझे वार । देई मंगळसूत्र हार । जन्मभरी ॥१०॥
सरस्वती माते । तुझा महिमा नवरात्री । ठेवी अखंड धरित्री । भारती या ॥११॥
सरस्वती माते । तुझे वाहन मयूर । मजपासोनी करि दूर । आळसाला ॥१२॥
सरस्वती माते । तुझी रूपे नानापरी । नित्य राहो मजघरी । वास तुझा ॥१३॥
सरस्वती माते । रूप घेई रणचंडी । भुत्तो अयुबांची मुंडी । हाती धरी ॥१४॥
सरस्वती माते । तुज हाती शोभे वीणा । सदा पडो माझे कर्णा । नाम तुझे ॥१५॥
सरस्वती माते । तुज हाती जपमाला । तुझे चरणी मंगला । लीन होई ॥१६॥
- मंगला द. मुंडले (२९/१०/१९६५)
आशिर्वाद असावा
शंकरसुत तो देव गजानन । करीत त्याची मी पूजा ॥
सकलांआधी त्याला नमिती । सगळ्या देवांचा राजा ॥१॥
चौदा विद्या चौसष्ट कला । अवगत असती या त्याला ॥
त्यातिल एक तरी मज द्यावी । म्हणुनी वंदित चरणाला ॥२॥
त्याने दिधला धडा गिरवुनी । शिकेन जे जे मिळे त्यातुनी ॥
कला हस्तगत करण्यासाठी । करीन खटपट दिनी अनुदिनी ॥३॥
विद्येने या मिळो टवटवी । भल्या गुणाची फुटो पालवी ॥
सत्कीर्तीची फुले फुलावी । गंधभेट सकलांस मिळावी ॥४॥
आणिक थोडे अधिक मागते । वैभव शिखरी देश असावा ॥
सुखे घास सकलांस मिळावा । असाच आशिर्वाद असावा ॥५॥
- मंगला द. मुंडले (२५/९/१९६९)
गजानन पंचक
गजानना रे तुजवीण सारी । महासंकटे कोण बारे निवारी ।
मुखी घास आम्हा मिळावा दुपारी । नसे मागणी अन्य यावीण न्यारी ॥१॥
नको अलंकार मोती सुवर्ण । देई कुंकु ते थोर सौभाग्यलेणं ।
तनू रक्षणा वस्त्र अंगावरी रे । नसे मागणी अन्य यावीण बारे ॥२॥
पती मुलांना सुदृढ बनवी । तया हातुनी नित्य सेवा घडावी ।
सेवा जनांची घडो नित्य सारी । नसे मागणी अन्य यावीण न्यारी ॥३॥
मुलांस विद्येत ठेवून गुंग । गर्वे करीना कधि त्यांस धुंद ।
दुष्कृत्य हातून घडवू नको रे । नसे मागणी अन्य यावीण बारे ॥४॥
सदा मुखीं नाम तूझे असावे । सदा संगती सज्जनांच्या असावे ।
असा मार्ग आम्हा सदा दाखवी रे । नसे मागणी अन्य यावीण बारे ॥५॥
- मंगला द. मुंडले (१३ जानेवारी १९७०)
बाळकृष्ण
रंग सावळा रूप मनोहर । कानी कुंडल झळकति सुंदर ॥
गळा शोभती कौस्तुभ माळा । पहा देव हा असे आगळा ॥१॥
पुतना नामे एक राक्षशिण । ये मायावी रूप घेउन ॥
मनात हेतू यास मारणे । आली होती याच कारणे ॥२॥
म्हणे मीच बाळाला पाजिन । श्रीकृष्णाने सर्वहि जाणुन ॥
दूध तियेचे असे प्राशिले । शरीर धरणीवरती पडले ॥३॥
यमुनातीरी गाइ चारतो । गोप सौंगडी संगे घेतो ॥
हाती काठी खांदी कांबळा । पहा देव हा असे आगळा ॥४॥
खेळ खेळण्या सारे जमती । चेंडु फेकती चेंडु झेलती ॥
आणायाला पळा रे पळा । पहा देव हा असे आगळा ॥५॥
अपुली जागा मुळि न सोडतो । तेथुन सारी गंमत बघतो ॥
चालवि विश्व पसारा सगळा । पहा देव हा असे आगळा ॥६॥
- मंगला द. मुंडले (२८ ऑगस्ट १९६९)
Hits: 25
Recent Comments