आरती – भवानीची

नवरात्रीनिमित्त आईने रचलेली भवानीदेवीची आरती सादर करीत आहे.

भवानीची आरती

जयदेवी जय भवानी माते । आरती मी करिते । भवानी । आरती मी करिते ॥
चरणी द्यावा ठाव अम्हाला । म्हणुनी वंदीते ॥धृ॥

अश्विनमासी उत्सव होतो । भवानी मातेचा । होतसे । भवानी मातेचा ॥
जिकडे तिकडे सुगंध सुटतो । कर्पुर धूपाचा ॥१॥

घरोघरी हे घट स्थापोनी । बांधिती वरि माला । घटाच्या । बांधिती वरि माला ।
नंदादीपा तेवत ठेवुन । करिती आरतिला ॥२॥

कुमारिका अन् सुवासिनींना । भोजन कुणि घाली । रोज ग । भोजन कुणि घाली ।
वरण पुरण अन् वडे घारगे । नैवेद्या करिती ॥३॥

पहिले नउ दिन अन् नउ राती । महिमा होय खरा । आइचा । महिमा होय खरा ।
दहावे दिवशी निघे जावया । उल्लंघुनी द्वारा ॥४॥

गळा गळसरी करी कंकणे । काचेची असती । कंकणे । काचेची असती ।
गोठ पाटल्या तोडे वाकी । मोती नथ नाकी ॥५॥

महिषासुरमर्दिनी कालिका । रूप तसे चंडी । आईचे । रूप तसे चंडी ।
उग्रस्वरूपा पाहुनी वदती । धरी शत्रूमुंडी ॥६॥

सरस्वती अन् लक्ष्मी अंबा । रूप किती हासे । आईचे । रूप किती हासे ।
जन येती दर्शनास सारे । मन हे उल्हासे ॥७॥

पार्वतिरूपे असता तू गे । शंकरासि वरिले । आई तू । शंकरासि वरिले ।
सुत तुमचा तो देव गजानन । चरणी त्या रमले ॥८॥

-मंगला द. मुंडले

Hits: 30

You may also like...

1 Response

  1. अर्चना देशपांडे says:

    भवानीची आरती खूपच छान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *