कोडी – खाद्यवस्तू

फळे नि भाज्या

रचयित्री – मंगला द. मुंडले

तीन अक्षरी आहे फळ मी । गंमत होय कशी पण नामी ॥
प्रथम अक्षरा काना देउन । “कंदील” निघतो अर्थच त्यातुन ॥

उत्तर फणस

—————————————————

दोन अक्षरी फळ मी असुनी । उलटे वाचा होइ धातु मी ॥

उत्तर पेरू

—————————————————-

चार अक्षरी आहे फळ मी । हात पुजावा माझ्या नामी ॥
रूपे नाही लोभस म्हणुनी । दूर जाउनी बसलो रानी ॥


उत्तर: करवंद

—————————————————

दोन ‘प’कार दोन ‘स’कार । एक ‘अ’कार तीन ‘न’कार ॥
एवढ्या अक्षरात । दोन फळे होती ॥
जो ओळखेल त्याची । समजा तल्लख बुद्धी ॥

उत्तर अननस, पपनस (२९/८/१९८४)

———————————————————————–

दोन प दोन व आणि दोन र । त्याच्यात मिसळा एक ड आणि एक ळ ॥
साधा दोन फळं त्यातून तुम्ही झटपट । त्यांची होत असते भाजी लक्षात घ्या नीट ॥
त्यांच्यापैकी एक लांब आणि एक आखूड । न ओळखेल त्याला शिक्षा पाठीत लाकूड ॥

उत्तर परवर पडवळ

——————————————————–

तीन अक्षरी एक भाजी मी । देव आणि युद्ध माझ्या नामी ॥
रूप पाहता दिसते पथ्थर । उंचीहुन ती रुंदी भरपूर ॥

उत्तर सुरण

रचयित्री – मंगला द. मुंडले

——————————————————————————————————–

विविध खाद्य वस्तू

रचयित्री – मंगला द. मुंडले

पदार्थ तीन अक्षरी । सुवासिक रंगित नि भावखाऊ ॥
मधले अक्षर वगळाल तर । मी अगदी टाकाऊ ॥
पहिले दुसरे अक्षर घ्याल तर । मी सार्‍यांच्या डोक्यावर ॥
दुसर्‍या तिसर्‍या अक्षरी घडतो । धनुष्याचा जोडीदार ॥

उत्तर केशर

———————————————-

तीन अक्षरे माझी । प्रीतीचे मी प्रतीक ॥
पहिली दोन घ्याल । तर मी शेतकर्‍याचा हस्तक ॥

दुसरे तिसरे घ्याल । तर ते वाका असे म्हणते ॥
पहिले तिसरे घ्याल । तर ती नाकातच जाते ॥

तिसरे दुसरे घ्याल । तर मी एक कडधान्य ॥
जर मला ओळखाल । तरच व्हाल धन्य ॥

उत्तर हलवा

———————————————————

तीन अक्षरी खाद्य मी असुनी । तिसरे अक्षर काढा त्यातुनी ॥
उरते तो तर पक्षी असतो । कोण बघूया मज ओळखतो ॥

उत्तर घारगे

————————————————————–

चार अक्षरी असे शब्द मी । गोड अन् लता माझ्या नामी ॥
नामे गोड जरी मी असले । कटुता माझे सद्गुण ठरले ॥

उत्तर गुळवेल

रचयित्री – मंगला द. मुंडले

या कोड्यांची जन्मकथा व वापरविषयक निवेदन वाचले नसल्यास या लेखाच्या सुरुवातीला वाचा.

Hits: 41

You may also like...

2 Responses

  1. मेधा says:

    काकूंचा हा गुण कळलाच नाही तेहा .असो, आताआदर दुणावला कोडी व सर्व गाणी खूप छान ! तुझ्यामुळे हे सारं वाचता आलं !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *