बाबासाहेबांबरोबरचे ते दहा दिवस

परिचय:

१५ नोव्हेंबर २०२१ रोजी बाबासाहेबांचे निधन झाले. त्यांना वाहिलेली श्रद्धांजली येथे वाचा.

कै. बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले तेव्हा मित्रवर्य रवी अभ्यंकर याने बाबासाहेबांबरोबरचे “ते दहा दिवस” हा लेख वॉट्सॅप वर पाठवला होता. तो मला आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांबद्दलचा आदरभाव. त्याच बरोबरीने बाबासाहेबांबरोबर त्याला असे दहा दिवस घालवायला मिळाले, अनेक तत्कालीन थोरामोठ्यांचे डोळाभेटीचा त्याला लाभ झाला याबद्दल मला रवीचा हेवाही वाटला. पण रवीच्याच प्रांजळ कथनात “मी रवीच्या जागी आहे” अशी कल्पना करून मी ते दहा दिवस अनुभवले. बाबासाहेबांचे दोन गुणही कळले. बाबासाहेबांबरोबर अनेक थोरामोठ्यांनाच नव्हे तर रवीच्या आई वडिलांनाही भेटलो.

या प्रांजळ कथनाबद्दल रवीला धन्यवाद, आणि बाबासाहेबांच्या, अन्य थोरामोठ्यांच्या, तसेच रवीच्या आई-वडील-आजीच्या स्मृतीला प्रणाम !

ते १० दिवस

ते १० दिवस म्हणजे माझ्या आयुष्यात आलेला एक दुर्मिळ योगच होता. मी नववी – दहावीत असतानाची ही आठवण आहे. (तेव्हा शालांत  परीक्षा अकरावीत असे.) मी मुंबईत विलेपारले येथील टिळक विद्यालयात होतो. नाताळची सुटी लागत होती आणि छत्रपति शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्याने होणार होती, त्याची तयारी सार्‍या गावात जोरात सुरु होती. वक्ते म्हणून बलवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे असे नाव त्या जाहिरातीत होते. सारेच जण व्याख्याने ऐकायला उत्सुक होते.

श्री. हरिश्चंद्र व सौ. शोभना अभ्यंकर

रात्री ऑफिस मधून परत आल्यावर माझे वडील आईला सांगत होते –

“बरं का गं ! व्याख्यानासाठी येतोय बाबा. आणि सारे दिवस आपल्याकडेच राहणार आहे. त्याला जायला यायला आणि दिवसा विश्रांति घ्यायला सोयीचे आहे.”

त्यावर आई ‘बरं’ एवढंच म्हणाली. तिची आई पण तेव्हा मुंबईला आमच्याकडेच आलेली होती.

ठरल्यानुसार बाबा आले. आणि माझ्यासाठी ते दहा दिवस अगदी ‘मंतरलेले’ असेच ठरले. माझे वडील आणि बाबा हे जुने मित्र होते. बाबा आमच्या कुटुंबाचाच भाग असल्यासारखे रहात असत. वडील कामाला जात आणि बाबा त्यांच्या कामात गुरफटून  जात असत. त्यांना त्रास होणार नाही हे पाहण्याची मला ताकीद असे. दुपारचे जेवण झाले की बाबा नेमाने वाचन करत असत. राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेले त्यांनीच लिहिलेले द्विखण्डात्मक चरित्र आमच्याकडे होते. दिसताच त्यांनी ते मागून घेतले व वाचायला सुरुवात केली. ‘उजळणी करावी लागते’ असे ते म्हणत. एवढा मोठा विद्वान गृहस्थ, पण विषय माहिती असला तरी त्याचे नेमाने वाचन – म्हणजे उजळणी करणे – आवश्यक असते हे सांगत, प्रत्यक्ष करतो हे मनावर ठसले.

एक दिवस ते आईला म्हणाले – ‘वहिनीसाहेब, आज राजांना बाहेर नेऊ का ? ‘राजे’ म्हणजे मीच! वय वर्षे १३-१४.

आई म्हणाली – ‘न्या की!’

प्रा. न. र. फाटक
डॉ. सदाशिव गोरक्षकर

मग त्या दिवशी तर गाड्याबरोबर या नळ्याचीही मुंबईची सफर झाली. त्यांची पुष्कळच कामे होती. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मधे डॉ गोरक्षकर यांची भेट, एल्फिस्टन कॉलेज मधे डॉ. दीक्षित (संचालक पुरातत्व विभाग) यांची, तसेच डॉ. नरहर रघुनाथ फाटक यांचीही भेट. बाबांच्या आणि त्यांच्या चर्चेत पुष्कळ गहन विषय असल्यामुळे मला काहीही समजले नाही.

श्री. प्रभाकर पेंढारकर

मग ग्रॅंट रोड मधे फिल्म्स डिव्हिजन मधे प्रवेश  केला आणि प्रभाकर पेंढारकर यांची भेट. ते कामात होते म्हणून भारतातील जंगली जनावरे अशी काहीतरी एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. तिथे मन रमले. शिवाजी महाराजांनी जो जो मुलुख अफझलखानाच्या वधानंतर ताब्यात घेतला ते डॉक्युमेंटरीत कसा दाखवायचे याची पेंढारकरांशी चर्चा झाली. ‘हिंदुस्तानचा नकाशा टेबलावर अंथरून त्यावर घोड्याच्या टापा पुढे सरकताहेत असे दाखवता येऊ शकेल’ असा तोडगा निघाला. आणखी काही बोलणे झाले, पण ‘नकाशा आणि त्यावरून सरकणार्‍या घोड्यांच्या टापा’ ह्यांनीच माझे डोके व्यापले होते.

श्री. सुधीर फडके

तेथून निघालो ते एकदम १२, शंकर निवास शिवाजी पार्क इथे पोहोचलो. हे तर सुधीर फडके यांचे निवासस्थान ! आम्ही गेल्यावर यथोचित स्वागत झाले आणि सार्‍यांची चौकशी झाली. श्रीधर एन सी सी च्या कॅंपला गेल्याचे समजले. मी कोण हे बाबांनी त्यांना सांगितले. मी नमस्कार केला. सुधीर फडके म्हणाले, “अरे ऐक रे बाबा, आताच ही नवीन ध्वनिमुद्रिका आली आहे, ऐका”. मंगेश पाडगावकरांचे गीत होते … ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे ’…ध्वनिमुद्रिका ऐकत असतांनाच बाबांनी फडक्यांना ‘येत्या रविवारी हरिभाऊंच्याकडे जेवायला या, आपण गप्पा मारू’ असे निमंत्रणही दिले. हरिभाऊ म्हणजे माझे वडील. तिथून आम्ही परत निघालो आणि पारल्यात पोहोचलो. तेव्हा बस, टॅक्सी असे पारल्यात नव्हतेच !

श्री. जयवंत कुलकर्णी

आम्ही पायीच निघालो. हनुमान रस्त्यावर वळायच्या ऐवजी बाबा महंत रस्त्याच्या दिशेला वळले आणि मी पण वळलो. ’राजे, एक राहिले तेवढे करून घरी जाऊ या’ असे म्हणत ते श्री. जयवंत कुलकर्णी यांच्या घराकडे निघाले. तिथे त्यांच्याशी कामाचे बोलून आम्ही घरी पोहोचलो.

आत शिरून हात पाय धुतल्यावर ते स्वयंपाकघरात गेले आणि आईला म्हणाले – “वहिनीसाहेब एक सांगायचे आहे …येत्या रविवारी सकाळच्या पंगतीला तुमच्या वतीने आणि राजांच्या साक्षीने बाबूजींना निमंत्रित केले आहे.”

आई म्हणाली ‘बरं, येऊ देत’. मग आम्ही जेवलो.

व्याख्यान संपवून घरी आल्यावर आई त्यांना हळद घालून गरम दूध देत असे. ‘वहिनीसाहेब, या कामासाठी तुम्हाला रोज सारे व्याख्यान ऐकता येत नाही. मधूनच उठून यावे लागते.’ अशी खंत ते रोज बोलून दाखवीत.

त्यावर आई सांगे – ‘अहो मी काही विशेष नाही करत. मग घरचे कशाला म्हणायचे? पण प्रत्येकाला त्याने केलेल्या कामाची पावती आपल्या बोलण्यातून देणे आवश्यक असते हेही तेव्हा समजले.

हे दिवस कधीही माझ्या स्मरणातून निसटले नाहीत. आज या आठवणीतील मंडळी – डॉ गोरक्षकर, डॉ. मो. ग. दीक्षित, डॉ. न. र. फाटक, प्रभाकर पेंढारकर, बाबूजी, जयवंत कुलकर्णी, माझे आई-वडील, माझ्या आईची आई – सगळीच काळाच्या पडद्याआड झाली आहेत. पण या आठवणी टिकून आहेत. आज त्या मनःपटलावरून शब्दांकित झाल्या त्याचे कारण म्हणजे या वर्णनातील त्यावेळी दाढी नसलेले पण आज दाढी राखून असणारे आणि अद्यापही इतिहासाची उजळणी करणारे ऋषितुल्य पद्मविभूषण बलवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभरीत प्रवेश करीत आहेत. त्यांना माझा त्रिवार मुजरा !

श्री. रवींद्र अभ्यंकर

रवींद्र अभ्यंकर

Hits: 76

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *