फॅशनच्या जगात विद्यार्थी
विंबल्डनचे सामने टीव्हीवर चालू होते त्यावेळची गोष्ट. आमच्या वर्गातली एक मुलगी एक नव्या प्रकारची बटवेणी घालून आली. सगळ्यांनी ती वाखाणलीही. आता ती मुलगी सुंदर होती; आणि “जातीच्या सुंदराला काहीही शोभते” या न्यायाने ती वेणी तिला शोभलीही. पण मधल्या सुटीत तशाच वेणीची आणखी चारपाच उदाहरणे भेटली; आणि मला एकदम मला साक्षात्कार झाला – “जेनिफर कॅप्रियाती! तिच्या वेणीची फॅशन झाली बरं का!”
त्याच रात्री मी आईकडे तसल्याच केशभूषेचा हट्ट धरला नाहीतरी आम्हा शाळकरी मुलींना केसाखेरीज फॅशनला वाव असतोच कुठे? आम्ही थोड्याच कॉलेजकुमारी आहोत फॅशनवाले ड्रेस बिनधास्त घालायला! म्हणूनच आईच्या खनपटीला बसले. तर आई म्हणते कशी, “ आता ही कुठली नवीनच टूम निघालेली दिसतेय! पण मला बघू दे तरी कुणाची तसली वेणी! त्याशिवाय कशी घालू?”
त्यादिवसात जेनिफर कॅप्रियाती फॉर्मात होती. दोनच दिवसांपूर्वी मार्टिना नावरातिलोवाला हरवून सगळ्यांच्या नजरेत भरलेली जेनिफर अंतिम फेरीत पोचलेली होती. तो अंतिम सामनाच मी आईला दाखवला. म्हणजे मी तिचा खेळही बघितला व वेशभूषाही. सुदैवाने ती तशीच होती. आईने मात्र तिची फक्त केशभूषाच पाहिली, व दुसर्या दिवशी माझी तसलीच वेणीही घातली.
पण दुसर्या दिवशी तसली वेणी घालणार्या मुलींची संख्या घटली होती. इतकेच नव्हे, तर मलाही ती वेणी आवडेनाशी झाली, आणि माझ्या एकदम लक्षात आले की जेनिफर काल हरली होती. त्याचबरोबर तिच्या वेणीची फॅशनही लयाला गेली होती.
जेनिफरची वेणी मला खूप काही शिकवून गेली. ती जिंकली तेव्हाच तिच्या वेणीची फॅशन झाली. पण ती हरली आणि तिच्या वेणीची फॅशनही संपली. अर्थात तुमच्या नव्या वेणीची फॅशन व्हायची तर जेनिफर कॅप्रियाती बनून आघाडीवर यावे लागते, आघाडी टिकवावी लागते. एखाद्याच्या नव्या रूपाला कर्तृत्वाची जोड मिळाली तरच त्या रूपाची फॅशन होऊ पाहील, नाही तर नाही. अर्थात त्या नव्या रूपात काही सौंदर्यही हवे बरं का? हेच पाहा ना – बर्म्यूडा पॅंट आणि दादा कोंडके चड्डी या दोहोत फक्त चित्रविचित्र रंगांचा फरक आहे. पण त्याने एकाची फॅशन झाली, दुसर्याची नाही! पण जेनिफर सारखी वेणी घालावी किंवा ती बर्म्यूडा घालावी असे तुम्हाआम्हाला का वाटावे?
“निव्वळ खूळ! काहीतरी जगावेगळं करण्याचं खूळ! चारचौघात उठून दिसण्याची हौस. दुसरं काय?”
हे माझ्या बाबांच मत. बरेचदा न पटणारं, पण यावेळी पटलेलं. कारण आपली कोणीतरी दखल घ्यावी, कौतुक करावे, असे सगळ्यांनाच वाटते. मग कोणी नवी केशभूषा करतात तर कोणी नवी वेशभूषा. कोणी नवीन शब्द वापरतात तर कोणी नव्या लकबी अंगिकारतात. पण त्यातल्या बर्याच नाविन्यपूर्ण गोष्टी तेरड्यासारख्या कोमेजूनही जाताना दिसतात. पण काही मात्र कायमच्या रुजतात. याच वर्गात बघा की – पूर्वी बॉबकट कुठे इतका प्रचलित होता?
फॅशन म्हणून सुरू झालेला बॉब आता रुजला आहे. कारण तो सोयिस्कर आहे. नेहेमी असंच होतं. काही तरी जगावेगळे म्हणून सुरू झालेली फॅशन बोकाळली की तिचे जगावेगळेपण संपते. पण जर का त्या फॅशनमध्ये काही अंगभूत सोय, गुण किंवा फायदा असेल तर त्या आधारे ती रुजते, नाहीतर नष्ट होते. ज्या रुजतात त्या आम्हाला घडवतात. नाहीतरी घडवणे, आकार देणे असाही फॅशन या शब्दाचा अर्थ आहेच की! आता आम्हा विद्यार्थी-विद्यार्थिनींवर अनेक फॅशन्सचा मारा होतच असतो – मग तो सिनेमातून असेल, टीव्हीतून असेल वा जाहिरातींतून. पण त्यातल्या किती आम्हाला घडवतात? किती बिघडवतात? कसे ठरवायचे?
माझ्या आजोबांचा मार्ग अगदी सोपा आहे. ते म्हणतात, “जे नवे ते हवे. पण त्यातही काही गुण शोधावे, सौंदर्य शोधावे,आणि पटले तर फॅशन स्वीकारावी.”
तेव्हा मी ठरवलेय. दोन दोन पोनीटेल घालायचे – नादियासारखे! मला छान दिसतात – सौंदर्य हा गुण. शिवाय मला एकटीला आईच्या मदतीशिवाय घालता येतात – म्हणजे स्वावलंबनाचा गुण. आणि माझी खात्री आहे. भाषण चांगलं झालं तर तुम्ही सईसारखे दोन दोन पोनीटेल असंही म्हणाल!
अदमासे १९९२ मध्ये माझ्या मुलीला (सईला) लिहून दिलेले भाषण. मात्र सानेगुरुजी विद्यालयातली शालेय वक्तृत्व स्पर्धा रद्द झाल्याने ते भाषण झाले नाही.
Hits: 13
Best wishes
Let this website be more and more popular
धन्यवाद उदय