“झिणिझिणि वाजे बीन” आणखी एक रसग्रहण

“झिणिझिणि वाजे बीन” या कवितेचे एक रसग्रहण नुकतेच व्हॉट्सॅप वर ढकलत ढकलत माझ्यापर्यंत पोचले. व्हॉट्सॅप वरील संदर्भांची विश्वसनीयता शंकास्पदच. त्यात मीही मूळ संदर्भ मी वाचलेला नाही. सबब मूळ लेखक अज्ञात समजावा हे बरे.

त्या रसग्रहणाचा आधारभूत विचार असा की या कवितेत “एकीकडे नेहमीचा बीन वाजवण्याचा सरळ साधा लौकिक अनुभव आहे आणि त्यातून ऐकू येणारा एका जीवनचैतन्याचा एका वेगळ्याच अलौकिक नादाचा अनुभव आहे.” पण या लौकिक अलौकिकाची सांगड घालताना हे रसग्रहण समजायला अवघड बनले आहे.

पण केवळ बीन-वादनानुभवापलिकडे जाऊन, प्रत्येक मानव-जीव म्हणजे एक “बीन” किंवा वीणा आणि तिचे वाजणे हा मानवी जीवन-व्यवहार असे व्यापक रूपक मानले की कवितेचा एक वेगळाच अर्थ उमगतो. तो सांगावा म्हणून हा लेखनप्रपंच.

झिणिझिणि वाजे बीन । सख्यारे अनुदिन चीज नवीन ॥धृ.॥

हा अर्थ कवीला कसा गवसला? तर सामान्य मानवी जीवनाकडे, वर्तनाकडे, मानवांच्या परस्पर संबंधांकडे आणि शेवटी आपल्या स्वत:च्या जगण्याकडे, त्रयस्थपणे पाहात पाहात. हा त्रयस्थपणे बघणारा जीव (म्हणजेच तटस्थपणे बघणारा कवी) जगणार्‍या जीवाला (किंवा स्वत:ला, आणि त्याबरोबर तुम्हा आम्हा सर्वांनाच) “सखा” मानून आपल्या निरीक्षणाचे सार कवितेतून मांडतो आहे.

पण इथे प्रश्न पडतो की हे “बीन वादन” किंवा जगणे म्हणजे “अनुदिन चीज नवीन” कसे काय? विंदा करंदीकरांच्या भाषेत सांगायचे तर “सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते” असा बहुतांचा अनुभव असताना “अनुदिन चीज नवीन” कसे शक्य आहे? पण वास्तव हे की प्रत्येक जीवात प्रतिक्षणी, सतत बदल होत असतात – मग ती वाढ असेल, वृद्धत्वापोटी होणारी झीज असेल, वा पूर्वानुभवाने येणारे शहाणपण असेल. आणि ज्या परिसराला तोंड देत देत जीव जगत असतो तो परिसर (किंवा निसर्ग) तर अखंड परिवर्तनशील असतो. सातत्याने बदलणारी व्यक्ती व बदलणारा निसर्ग यांचे परस्परसंबंध नितनूतन असणारच. “नित्य नवा दिस जागृतिचा” हेच खरे.

पहिल्या चार ओळीत कवीमधल्या निरीक्षकाने एका सामान्य जीवाचे जगणे नोंदवले आहे.

कधि अर्थाविण सुभग तराणा ।कधि मंत्राचा भास दिवाणा । सूर सुना कधि केविलवाणा । शरणागत अतिलीन ॥१॥

या बीनचे वाजणे (किंवा जीवाचे जगणे) कधी “केविलवाणे” आणि “शरणागत अतिलीन” असते. किंवा एखादे जगणे ज्यात शब्द नाहीत व म्हणून शब्दार्थ नाहीत अशा तराण्यासारखे सुभग (किंवा सुरेल व म्हणून सुंदर) असते. हे तराण्यासारखे जगणे अर्थाविण (इथे अर्थ म्हणजे पैसा हा श्लेषही लक्षात घ्या) पण तरीही सुभग (किंवा भाग्यशाली हाही श्लेषच) असते.

कधी एखादे जगणे मंत्रवत् (किंवा पवित्र, आदर्श, वा सुबक) वाटते. पण हे मंत्रवत् वाटणेही “भास दिवाणा” असते हे सांगायला हा तटस्थ निरीक्षक चुकत नाही. हे दिवाणेपण कसे येते? का येते? तर जगण्यातले जे घटक त्या जगण्याला मंत्रवत् ठरवतात ते मूलतः स्थल-, काल-, व्यक्ति-, वा समाज-सापेक्ष असतात. लहान मर्यादित जगातले एखादे “मंत्रवत्” जगणे हे विशाल जगात किंवा व्यापक दृष्टिकोनात भासवत् ठरण्याची शक्यता कशी आणि कोणी नाकारावी?

विशेष म्हणजे हा भासही “दिवाणा” (म्हणजेच झपाटणारा) असतो. आपले जगणे आपल्या लेखी मंत्रवत् (किंवा सुबक) झाले की माणसे आपली जीवनशैली वा विचारसरणी जपण्यासाठी दिवाणी होताना भारतात “इकडे तिकडे चोहिकडे” दिसतातच की. याचे मुख्य कारण असे की एकदा घडी बसली की सामान्यतः बदल नकोसे वाटतात. पण ही जागतिक प्रवृत्ती आहे. अमेरिकन जीवनशैली जपण्यासाठी आतुर असलेले ट्रम्प किंवा वेगळेपण जपण्यासाठी युरोपियन संघाबाहेर पडणारी ब्रिटीश जनता याच प्रवृत्तीचे उदाहरण आहे.

इथेही एक श्लेष आहे. काही माणसे ठराविक गोष्टी ठराविकपणे करताना दिसतात. खुर्चीसमोर बाटल्या ठराविक प्रकारे ठेवणारा, सर्विस करताना केसांवरून व नाकावरून ठराविकपणे बोटे फिरवणारा, ठराविक पद्धतीने आडस चड्डी सरकवणारा राफाएल नदाल आठवा. तो यशस्वी टेनिसपटू असल्याने त्याचे खेळासंबंधातले हे वागणे आपल्याला वेडगळ वाटत नाही. आपण त्याला शिस्तप्रिय म्हणू. पण यशापयशाशी किंवा व्यवहाराशी कुठलाही संबंध नसताना केवळ संवयीपोटी असे वागणार्‍या एखाद्याच्या असल्या वर्तणुकीला मराठीत मंत्रचळ म्हणतात. नि त्याचा अतिरेक करणार्‍या वेडाला इंग्रजीत obsessive compulsive disorder म्हणतात. पलंगपोसाला पडलेली शेवटची सुरकुती काढल्याखेरीज न झोपणारी, किंवा आवर्जून प्रथम उजवा (किंवा डावा) पाय पुढे टाकणारी, किंवा ज्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळावरून घड्याळ लावून घ्यावे अशी माणसे नेहेमी भेटतातच ना? ती माणसे यशस्वी असोत वा अयशस्वी, बोरकरांनी त्या सर्वांच्या जगण्याला “मंत्राचा दिवाणा भास” असे गोंडस मध्यममार्गी नाव दिले आहे.

दुसर्‍या कडव्यात माणसा-माणसांच्या परस्पर-संबंधाचे निरीक्षण आहे.

कधि खटका कधि रुसवा लटका। छेडि कधी प्राणांतिक घटका। कधि जीवाचा तोडुन लचका। घेते फिरत कठीण ॥२॥

त्यात “खटका” उडतो, “लटका रुसवा” सोसावा लागतो. कधी “मेल्याहून मेल्यासारखे” वाटण्याच्या “प्राणांतिक घटका” ही येतात. अथवा कठीण असे “फिरत घेणे” ही येते. इथे “फिरत” मधला श्लेषही लक्षात घ्या. फिरत (किंवा माघार) घेणे नुसतेच कठीण नसते तर माघार घेताना जिवाचा लचकाही तुटत असतो. या कडव्याचे रसग्रहण प्रत्येकाने आपापल्या अनुभवाधारे आपल्यापुरते केले तरी माणशी एक प्रबंध होईल. ते सारे प्रबंध बोरकरांनी या चार ओळींत कवळले आहेत.

मूळ कवितेतले पुढले कडवे गाण्यात घेतलेले नाही. पण माणसांच्या परस्पर संबंधाचा एखाद्या जिवावर होणारा परिणाम या चार ओळींत मांडला आहे.

रोमांचातुन कधि दीपोत्सव। कधि नेत्रांतुन पुष्पांचे स्रव । कधि प्राणांतुन सागर तांडव । अमृतसिंचित जीण ॥३॥

इथे बोरकरांनी जीण हा शब्द जिणे या अर्थाने वापरला आहे, तो ज्ञानेश्वरांना अनुसरूनच. त्याने कवितेतले मात्रावृत्त सांभाळले जाते हेही खरेच.

परस्परसंबंधातून एखाद्याच्या जगण्यात जे काही उमटते ते मांडताना बोरकरांची प्रतिभा सूचकपणे सर्व जीवनानुभव सामावून घेताना दिसते. बोरकरांना केवळ तात्कालिक सुखच नव्हे, तर रोमांचातुन उपजणारा दीपोत्सव जाणवतो. हा अनुभव आध्यात्मिक असेल किंवा शारीरिकही असू शकेल. तर कुठलाही काळीज हलवून सोडणारा, जीव ढवळून काढणारा अनुभव त्यांना “प्राणातुन सागर तांडव” वाटतो. काहीही असले तरी बोरकर सगळ्या जगण्याकडे विधायकपणे पाहातात. त्यांना सारेच अश्रू हे पुष्पवत् वाटतात, मग ते आनंदाश्रू असोत की दुःखाश्रू. अश्रू ढाळण्याची वेळ आली की माणसे काहीना काही शिकत असतातच की !

जिण्याला अमृतसिंचित म्हणणे हे तर बोरकरांच्या विधायक तत्वज्ञानाचे भरतवाक्यच म्हटले पाहिजे. पारंपरिक भारतीय तत्वज्ञान असे मानते की हे जीवन असार आहे, मिथ्या किंवा भ्रम आहे. यातून मोक्ष मिळेल तर बरे. बोरकर आपल्याला या नकारात्मकतेतून सुबकपणे बाहेर काढू पाहातात. बोरकरांच्या मते जीवित असणे म्हणजेच अमृतसिंचित असणे. इथे जीवित म्हणजेच अ-मृत हा श्लेषही लक्षात घ्या. जोवर हे अमृतसिंचन चालेल तोपर्यंतच हा जीव असेल. आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत विविध जीवनानुभव शक्य आहेत. काही साध्य करणे शक्य आहे, त्यात तुमच्या जगण्यातून इतरेजनांवर अमृतसिंचन करणेही आलेच.

प्रथम सामान्य मानवी जीवनाकडे पाहाणारा, नंतर मानवी संबंधाकडे आणि त्या संबंधाचा व्यक्तीवरील परिणाम पाहाणारा कवी या शेवटच्या कडव्यात स्वतःकडे – आपल्या सुबक जीवनप्रवाहाकडे – या रूपकातून पाहातो आहे.

सौभाग्ये या सुरात तारा । त्यातुन अचपळ खेळे पारा । अलख निरंजन वाजविणारा । सहजपणात प्रवीण ॥४॥

आपल्या जीवनाच्या तारा सुरात लागल्या आहेत आणि त्यातून “अचपळ पारा” खेळावा अशा सुरावटी (किंवा कविता) निपजताहेत, हे कवी नोंदवतो.

पण ही बीन वाजवणारा कोण? तर “अलख निरंजन”. अलख निरंजनचा पारंपरिक अर्थ “ब्रह्मा” असा आहे. आपण त्याला जगन्नियंता म्हणू. हा नियंता मानवी जीवनच नव्हे तर जगातील प्रत्येक जीवाचे जीवन सहजपणे चालवू शकतो. किंवा रूपकात बोलायचे तर विश्वातील सर्वच वीणा एकाच वेळी वाजवण्यात, किंबहुना ही विश्ववीणाही सहजपणे वाजवण्यात तो प्रवीण आहे.

“सहजपणात प्रवीण” या परस्पर विरोधी वाटणार्‍या कल्पनेचे व्यावहारिक उदाहरण पाहू. धोनी यष्टीपाठी झेपावून आरामात कसा झेल पकडतो ते आठवा. किंवा सचिन तेंडुलकर एखाद्या तेजतर्रार चेंडूला सहजी सीमापार कसे पाठवतो ते आठवा. सचिनच्या हालचालीतला सहजपणा जाणवण्यासाठी हरभजनसिंग कसा चौकार मारेल ते आठवा. दोघांचेही चौकारच. पण एक अधिक सहजपणे मारल्याचे दिसते. हरभजन सिंग व सचिन, दोघेही प्रवीणच. मात्र सहजपणा आणणारे सचिनचे प्रावीण्य केवळ त्या कृतीसाठी लागणार्‍या प्रावीण्यपेक्षा काहीसे अधिक असते हे निःसंशय.

एकंदरीत कवी बोरकर आपल्या सुभग सुघट जीवनाचे, त्यात उमलणार्‍या कमनीय आणि जीवनभाष्य ठरणार्‍या काव्याचे श्रेय त्या अलख निरंजनाला देतात. इथे “मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड” म्हणणारे माडगूळकर आठवतात. तर मूळ रसग्रहणातही “मजला कवि का म्हणता, मृण्मय पात्रात देव रस भरतो” असे म्हणणार्‍या रेवरंड टिळकांचा उल्लेख केलाच आहे. शेवटी बोरकर, माडगूळकर, टिळक हे सारे एकाच कविगोत्राचे.

-विश्वास मुंडले / १२ डिसेंबर २०१८

Hits: 73

You may also like...

1 Response

  1. visdam says:

    डॉ. विजया पाडगावकर यांनी आपली प्रतिक्रिया वॉट्सॅपवर पाठवली होती. ती इथे उद्धृत करीत आहे.

    खरंच रसपूर्ण रसग्रहण आहे .. बोरकरांवरचं प्रेमही सतत प्रतीत होतं .

    आपण लिहिता ‘पारंपरिक भारतीय तत्वज्ञान असे मानते की हे जीवन असार आहे, मिथ्या किंवा भ्रम आहे. यातून मोक्ष मिळेल तर बरे. बोरकर आपल्याला या नकारात्मकतेतून सुबकपणे बाहेर काढू पाहातात.’ खरं आहे .. बोरकर हे रसलंपट गोसावी आहेत. ज्ञानोबांचे संस्कार त्यांच्यावर अधिक आहेत .. ‘ करून माझा पायचिरा – पुनश्च या हो ज्ञानेश्वरा ‘ ही त्यांची तळमळ आहे. त्यामुळे जगन्मिथ्या पेक्षा माउलींच्या चिद्विलासवादाचं दर्शन त्यांच्या मनांत सतत होत असावं .

    संग्रही ठेवावं असंच हे रसग्रहण आहे तुमचं . धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *