श्वानपुराण ४ – ज्यूडी
श्वानपुराण१ मध्ये लढाऊ विमानातून वैमानिकाबरोबर उड्डाण करणार्या ॲण्टिस या कुत्र्याची कथा सांगितली होती. तर श्वानपुराण २ व ३ इथे आपण या श्वानवंशाची कुळकथा व पायदळाला उपयुक्त ठरलेल्या मार्क नामक कुत्र्याची गोष्ट पाहिली. ही पुढची गोष्ट आहे नौदलात नामवंत झालेल्या एका ज्यूडी नामक कुत्रीची.
ज्यूडीचा जन्म शांघायमधला. १९३६ सालचा. यांगत्से नदीवरील व्यापारी बोटींचे रक्षण करण्यासाठी ब्रिटीश नौदलाच्या कीटक वर्गातल्या (Insect Class) म्हणजेच छोट्या तोफधारी बोटी (gunboats) तैनात असत. त्यापैकी बी (bee), सिकाडा (cicada), क्रिकेट (cricket) अशा विविध कीटक-नाम-धारी बोटींकडे कुठला ना कुठला पाळीव प्नाणी होता. नॅट (gnat) मधील नाविकांनाही जहाजाचे प्रतीक म्हणून पाळीव प्राणी हवा होता. पण कप्तानाच्या तीन अटी होत्या – पशु स्त्रीलिंगीच हवा, ती सुंदर हवी, आणि उपयुक्तही हवी. पॉइंटर जातीच्या ज्यूडीने या तीनही अटी निभावल्या, त्यातही विशेषतः ही उपयुक्ततेची अट. पॉइंटर कुत्र्यांचा विशेष गुण म्हणजे दूरवरच्या पक्ष्यांचे आवाज ऐकून, ते ज्या दिशेने येत असतील त्यादिशेला नाक, अंग ताठ व शेपूट लांब करून, बरेचदा तीन पायांवर उभे राहाणे. (शेजारचे चित्र पाहा) पक्ष्यांची शिकार करताना हे दिग्दर्शन फारच उपयुक्त ठरते. असे दिग्दर्शन करणार्या कुत्र्याला गनडॉग (gun dog) म्हणतात. नाविक किनार्यावर उतरले की पक्ष्यांची शिकार करताना ही पॉइंटर कुत्री गनडॉग म्हणून उपयुक्त ठरेल अशी नाविकांची अपेक्षा होती. पण ती मात्र कधीच पुरी झाली नाही. कारण ज्यूडीचे, गनडॉग म्हणून किंवा सैनिकी श्वान म्हणून, अर्थपूर्ण प्रशिक्षण असे कधी झालेच नाही. ज्यूडी तिच्या अंगभूत गुणांनी इतरच वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त ठरली.
नॅटवर दाखल झालेल्या या ज्यूडी नामक पिलू कुत्रीला नौदलाचा अधिकृत नाविक म्हणून एक क्रमांकही मिळाला. मात्र ती केवळ श्वानच नव्हती. आपली निसर्गदत्त ज्ञानेंद्रिये व बुद्धी यांचा वापर करता करता ज्यूडी मनुष्यपदाला पोचली यावर तिच्या संपर्कात आलेल्या समस्त नाविकांचे एकमत होते. ज्यूडीच्या भविष्यातील करामती त्याची साक्ष आहेत. युद्धानंतर १९४६ साली तिला प्राण्यांचा व्हिक्टोरिया क्रॉस मानले गेलेले डिकिन मेडल मिळाले. तिच्यावर पुस्तके लिहिली गेली.
नदीतून प्रवाहविरोधी प्रवास करताना एकदा हे पिलू पाण्यात पडले. सेकंदाला पाच मीटर वेगाने वाहाणार्या नदीच्या प्रवाहातून महत्कष्टाने तिला वाचवणार्या नाविकांप्रती ज्यूडी कायमच एकनिष्ठ राहिली. सैनिक जसे जिवाला जीव देणारे एकमेकांचे “buddy” किंवा दोस्त असतात, तसेच हे. ज्यूडी नेहेमीच सोबत असलेल्या नाविकांच्या उपयोगी पडली. मात्र बोटीवरून परत कधीच पडली नाही, अगदी युद्धाच्या धुमश्चक्रीतही.
कुठलेही प्रशिक्षण नसताना ज्यूडीने पॉइंटर जातीचे लक्षण मानले गेलेले, पक्षी येण्याची दिशा दाखवण्याचे कसब दूरवरून येणारी जपानी विमाने दुर्बिणीतूनही दिसण्या अगोदरच त्या विमानांची दिशा दाखवण्यासाठी उपयोगात आणले. त्या काळी रडारचा शोध नुकताच लागलेला असला, तरी प्रत्येक बोटीवर रडार ठेवण्याइतकी प्रगती झालेली नव्हती. तेव्हा ज्यूडीच रडार बनली.
कोणी अपरिचित आल्यास सूचना देणे ही तर कुत्र्यांचा अंगभूत गुण. एके रात्री प्रवाहाविरोधी चाललेल्या नॅटवर रात्री तीन वाजता एकाएकी ज्यूडी उठली आणि विकराळ भुंकत, नदीच्या वरच्या अंगाकडून कोणी येत आहे, असे दाखवू लागली. दूरवरून दोन जहाजे भरकटत येत होती. ते यांगत्से नदीवरचे चाचे होते. दोरखंडाने बांधलेली ती दोन जहाजे समोरून येणार्या जहाजाला दोन्ही बाजूंनी चिकटत. अडकलेल्या जहाजावर उतरून चाचे लुटालूट करीत. पण ज्यूडीमुळे आधीच सावध झालेल्या नौसैनिकांच्या प्रतिकाराने चाचे माघारी वळले. तिकडे जहाजाच्या तोंडावर अडकलेला दोरही एका नौसैनिकाने तोडला आणि दोन्ही जहाजे भरकटत दिसेनाशी झाली.
वय वाढत चालले तशी ज्यूडी एक माणूसच बनली. किनार्यावर उतरलेले नाविक हॉकी वा फुटबॉल खेळत. त्यांच्यातलीच नाविक म्हणून ज्यूडीही खेळायला उतरे. तिचा आवडता खेळ म्हणजे हॉकी. ज्यूडीला चेंडू सापडला की पळत जाऊन तो जवळच्या गोलमध्ये ठेवायची, मग तो गोल कुठल्याही टीमचा असो. तिच्या लेखी आपपरभाव नसल्याने, ज्यूडीने खेळात सामील व्हायला कुठल्याच खेळाडूचा आक्षेप नसे.
१९३८ साली अशाच एका बंदरात एका फ्रेंच जहाजावरील पॉल नामक पॉइंटर कुत्र्यासोबत समस्त नाविकवर्गाने मनुष्यपदाला पोचलेल्या ज्यूडीचे समारंभपूर्वक लग्न लावले. नवदंपती आपापल्या जहाजावर निघून गेले आणि यथावकाश ज्यूडीला १३ पिले झाली. त्यातली १० जगली. मोठ्या कौतुकाने पिलांचे नामकरण झाले आणि त्यांच्यासाठी फ्रेंच, अमेरिकन वा इतर ब्रिटीश जहाजावर आणि किनार्यावर पालकही शोधण्यात आले.
जून १९३९ मध्ये नॅटवरील नौसैनिक व ज्यूडी ग्रासहॉपर या नव्या गनबोटीवर दाखल झाले. सप्टेंबरला महायुद्ध सुरू होताच ग्रासहॉपर आशियाई युद्धमोहिमेवर आली. जपान्यांच्या धडाक्यापुढे सतत माघार घेताना जपानी विमानहल्ल्यांपासून सुरक्षेसाठी ज्यूडीची रडारसदृश क्षमता फारच उपयुक्त ठरली. जपानी विमानांचा मारा चुकवत ग्रासहॉपर ही गनबोट १९४२ ला सिंगापूरला येऊन पोचली. तिथे ब्रिटीश नागरिक व निर्वासितांना हलवण्याची जबाबदारी ग्रासहॉपरच्या चमूवर येऊन पडली.
या जेमतेम ६०० टनी बोटीवर २४० निर्वासित दाखल झाले. त्यात बहुसंख्येने रुग्णसेविका, सैनिकांच्या बायका व मुले होती. या सर्वांचे ज्यूडीने सहर्ष स्वागत केले. डेकवर मुलांशी ती पकडापकडी खेळे. तर निराशेच्या गर्तेत बसलेल्या एखाद्याच्या गालाला नाक लावून धीर देई. जणू काही या निर्वासितांचे स्वागत करणे, त्यांचे मनोधैर्य राखणे ही तिचीच जबाबदारी होती.
ग्रासहॉपरच्या नेतृत्वात निर्वासितांचा काफिला १३ फेब्रुवारी १९४२ ला सिंगापुराहून जावा बेटाकडे निघाला. कॅप्टन हॉफमनला चिंता होती येत्या रात्रीच्या आश्रयस्थानाची. पण पुन्हा पुन्हा पिटाळूनही बोटीच्या सुकाणूपासून ज्यूडी हटेच ना. मग सिंगापुरची दिशा दाखवीत तिने भुंकायला सुरुवात केली. तत्काळ सुरक्षेसाठी ज्यूडीसह सर्व प्रवाशांना खालच्या डेकवर पाठवण्यात आले. बॉंबफेकी विमानांच्या दोन लाटांच्या दमदार बॉंबवर्षावाने सर्वच बोटी आग लागून बुडू लागल्या. सुदैवाने आसर्याच्या शोधात पॉसिक बेटाच्या किनार्याजवळ पोचलेली ग्रासहॉपर पूर्ण बुडाली नाही. पण काफिल्यातील केवळ ६० माणसे किनार्याला लागली. ज्यूडीचे काय झाले हे पाहायला कोणालाच फुरसत नव्हती.
बचावलेल्यांची पहिली गरज होती पिण्याचे पाणी. स्थानिकांकडून पाणी शोधणे अशक्य होते कारण बेट निर्मनुष्य होते. अर्धवट बुडालेल्या बोटीत शोध घेणार्या अधिकार्याला वरच्या डेकवर अंथरूण, पांघरूण, डबाबंद अन्न, आणि भांडी सापडली. तर खालच्या डेकवर सापडली, कपाटामागे अडकलेली, कूंकूं करणारी ज्यूडी. तिला किती इजा झाली असेल हे कळायला मार्ग नव्हता. कपाट हलवून त्याने ज्यूडीला उचलले आणि वरच्या डेकवर आणून तिला अलगद खाली ठेवले. पण अंग झटकून ती चक्क उभी राहिली, आणि तिच्या उपकारकर्त्याचे गाल चाटू लागली, आणि यथावकाश किनार्यावरही पोचली.
एव्हाना विषुववृत्तीय उकाड्यात पाण्याची उणीव ही आणीबाणी झाली होती. इकडे नाविकांच्या लक्षात आले की ज्यूडी समुद्रकिनार्यानजीक एके ठिकाणी बसकण घेतेय, भुंकतेय, मागे येतेय, पुढे जातेय, पुन्हा बसकण ! ज्यूडी त्या ठिकाणी लक्ष वेधत होती. नाविक तिथे पोचल्याबरोबर ज्यूडीने पायांनी तिथली ओली वाळू उकरायला सुरुवात केली. उरलेले काम नाविकांनी पुरे केले. तिथे काही फुटांवर गोड पाण्याचा झरा होता. ज्यूडीमुळेच पाणीबाणी संपली. पण केवळ पाणी शोधूनच नव्हे तर सापांनी बुजबुजलेल्या त्या बेटावर अनेक साप मारून ज्यूडीने अनेकांचे रक्षणही केले. ज्यूडी ज्या कोणाच्या प्रेमात असेल त्याच्या चरणी हे मारलेले साप अर्पण होत.
यथावकाश ज्यूडी व नाविक सुमात्रा बेटाच्या उत्तरी किनार्यावर पोचले. तिथे कळले की सुमात्राच्या दक्षिण किनार्यावरील पाडांगमधून ब्रिटीश नागरिकांना श्रीलंकेत पोचवण्यासाठी काही जहाजे तयार आहेत. तिथे पोचायचे तर जंगलांतून २७० किमी पार करून पाडांगला पोचणे आवश्यक होते. त्या अज्ञात विषुववृत्तीय अरण्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांचा एकमेव वाटाड्या होती ज्यूडी.
वाटेतले जंगल आणि त्यातले पशु, चिखल आणि त्यातील जळवा आणि कधी कधी सुसरी, यातून ज्यूडी मार्ग काढी. एकदा सुसरीच्या हल्ल्यातून ज्यूडी वाचली तर दुसर्या वेळी तिच्या खांद्याला सुसरीच्या दाताने इजाही झाली. पण ज्यूडीने दाखवलेल्या मार्गावर सात नाविक निश्चिंतपणे चालत राहिले, आणि पाच आठवड्यात पाडांगला पोचले. पण शेवटची बोट २४ तासांपूर्वीच निघून गेलेली होती. ज्यूडीसह या नाविकांचे जपान्यांचे युद्धबंदी होणे काही चुकले नाही.
ब्रिटीश नौदलात ज्यूडीला नाविकाचा दर्जा असला तरी तिला युद्धबंदी ठरवायला जपान्यांनी नकार दिला. मेडानमधील कॅंपात युद्धबंदी नौसैनिकांना फक्त तुटपुंज्या भातावर भागवावे लागे. मग ज्यूडीला काय खायला घालणार? सुदैव हे की जपान्यांनी कधी तिला गोळी घातली नाही. ज्यूडी आता जपानी सैनिकांच्या लाथा चुकवत कॅंपमध्ये फिरून साप, उंदीर आणि पाली मारून खाऊ लागली. जपानी ऑफिसरांनी टाकलेले खाणे ती चोरी. आठवडे बाजारातही तिच्या चोर्या चालत. या दुर्धर कालखंडातही आपल्या मानवी धन्यांच्या आशा पल्लवित ठेवणार्या ज्यूडीची विनोदबुद्धी, आणि कधी काय करावे व काय साधावे याचे प्रसंगावधान दिसत राही.
चांभारकाम करणारा कझेन्स मऊ चांमड्याचे तुकडे ज्यूडीला गुपचूप खाऊ घाली. त्याला ऑफिसर निवासी विभागात जाण्याची परवानगी होती. एकदा बरेच बूट वाहून नेण्याचा मिशाने तांदूळ चोरण्याची मोहीम कझेन्स व त्याच्या मित्रांनी अंमलात आणली. पण दुसर्याच दिवशी झडती सुरू झाली. बराकीत ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून ठेवलेले तांदूळ सापडते तर तत्क्षणी मृत्यू ठरलेला. जपान्यांची शोधमोहीम अर्धी पार पडता पडता एकाएकी धावत ज्यूडी बराकीत शिरली. तिच्या दात विचकलेल्या जबड्यात जमिनीतून उकरून काढलेली एक कवटी होती. बराकीतील इकडेतिकडे पडलेले सामान व उभी माणसे चुकवत, एक फेरी मारून, जपान्यांनी पिस्तुलाला हात घालण्या अगोदरच ती धावत बाहेर निघूनही गेली. आरडाओरडा करणारे जपानी शोध थांबवून निघून गेले आणि तांदळाची चोरी धकून गेली. कझेन्सची चोरी पकडली जाण्याचा धोका ज्यूडीने ओळखला होता काय? की ती केवळ तिच्या उपकारकर्त्या कझेन्सला वाचवत होती? त्यासाठी काय करावे हे ज्यूडीने कसे ठरवले? हे प्रश्न अनुत्तरितच राहाणार!
दुर्दैवाने पुढे कझेन्स वारला. पण त्यानंतर विमानतंत्री फ्रॅंक विलियम्स याची ज्यूडीशी घट्ट मैत्री झाली. इतकी की विलियम्सने पुटपुटलेले आदेशही ज्यूडी अचूक पाळत असे. यथावकाश खाण्याची अधिकच टंचाई सुरू झाली. कॅंपात भरणारा आठवडेबाजारही बंद झाला. युद्धबंदी जवळचे किडूकमिडूक गावकर्यांना विकून चिकन, अंडी यासारखे पोषक अन्नपदार्थ मिळवीत, ते बंद झाले. आता काय? जपानी सैनिक मृतांच्या थडग्यावर फुलांऐवजी फळ ठेवत. विलियम्सच्या आदेशाने ज्यूडी ते आणून देई. ज्यूडीने मारून आणलेले उंदीर, साप, पक्षी आता विलियम्सच्या हाती सोपवायला सुरुवात केली. त्यासाठी तिच्या कॅंपाबाहेरील फेर्या, वेळी अवेळी, दिवसा आणि रात्रीही, होऊ लागल्या. पण हे सारे धोक्याचे होते. स्थानिक मंडळींना कुत्रा अभक्ष्य नव्हता, आणि आसपासच्या जंगलात वाघांचाही वावर असे.
आश्चर्य हे की त्याही परिस्थितीत ज्यूडी गाभण राहिली. त्या अवस्थेतली वाढती भूक पुरवणे ज्यूडीला व विलियम्सलाही फारच जड गेले. जडावलेली ज्यूडी कोणा स्थानिकाचे वा वाघाचे भक्ष्य ठरण्याची शक्यताही वाढली. पण सारी संकटे टळली व ज्यूडीला नऊ पिल्ले झाली. त्यातली पाच जगली. इंग्लिश बोलणार्या जपानी कॅंपप्रमुख बन्नोला कुत्रा आवडतो व त्याची स्थानिक प्रेयसी ज्यूडीच्या प्रेमात आहे हे विलियम्सला माहित होते. ज्यूडीच्या पिलांपैकी एक किश नावाचे सुरेख पिलू कॅंपप्रमुखाला देऊन वशिला लावण्याचा त्याने घाट घातला. तसे पाहाता कैद्याने प्रमुखाच्या दाराशी जाणे हाही जपान्यांच्या लेखी अपराधच होता. पण बगलेतल्या देखण्या पिलानेच त्याला वाचवले असावे. प्रमुखालाही ते पिलू फारच आवडले. त्याने ते आपल्या प्रेयसीला देण्याचे ठरवूनही टाकले.
एवढा वशिला लावल्यावर विलियम्सने ज्यूडीला स्वतंत्र कैदी क्रमांक मिळावा अशी विनंती केली. पण मधेच हा नवा युद्धकैदी कुठून आला याची चौकशी झाली आणि तो कैदी कुत्रा आहे असे कळले तर आपली पंचाइत होईल म्हणून बन्नोने नकार दिला. विलियम्सने सुचवले की त्याचा क्रमांक 81 असल्याने, प्रमुखांनी आपल्या अधिकारात ज्यूडीला 81A असा क्रमांक द्यावा. मेडान कॅंपापुरती ज्यूडी अधिकृत युद्धबंदी ठरेल पण कैद्यांची संख्याही वाढणार नाही. बन्नोला हे पटले व त्याने तत्काळ तसा अधिकृत निर्णय लिहूनही दिला. किश त्यांना फारच आवडला असावा. कारण लिहिता लिहिता किशने बन्नो यांच्या कोपरापाशी शू करूनही ते रागवले नाहीत. आता ज्यूडी ही जपान्यांची एकमेव अधिकृत युद्धकैदी कुत्री ठरली.
पण बन्नो यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेल्या निस्सीच्या कचाट्यातून ज्यूडीला वाचवताना विलियम्सची कसोटी लागली. विलियम्सने ज्यूडीला विविध संकटातून वाचवून कसे लंडनपर्यंत नेले ती गोष्ट आहे प्राणिमित्र विलियम्सच्या चातुर्याची आणि ज्यूडीच्या समजूतदार आज्ञाधारकतेची. ती पुढच्या श्वानपुराणात.
विश्वास द. मुंडले
संदर्भ: Readers’ Digest
Puppy that became a Prisoner of War
Hits: 1
ज्युडी ची माहिती एखाद्या मनुष्यप्राण्याप्रमाणे रंजक वाटली.