दर्पण आणि दिग्दर्शन
सहा जानेवारी! आज पत्रकार दिन. त्या निमित्ताने डॉ. मेधा श्री. लिमये यांनी लिहिलेला लेख वॉट्सॅप वर वाचनात आला आणि आवडला. आपल्याकडे कसे सगळे वाईट आहे आणि युरोपात कसे सगळे आदर्श आहे असा आविर्भाव न बाळगता; किंवा आपले जुने तेच कसे सोने आणि हे नवे आले आहे त्यात फक्त न्यूनच शोधायचे अशीही भूमिका न घेता, केवळ विदेशात होणारी प्रगती प्रांजळपणे जनतेपर्यंत पोहोचवून दिशा दाखवणे हा हेतू धरून तो साधणारे बाळशास्त्री आज हवे आहेत हा त्यांचा निष्कर्षही भावला.
त्यांच्या परवानगीने आजच्या दिवसाचे महत्व ठसवणारा हा लेख इथेही प्रकाशित करीत आहे.
विश्वास द. मुंडले
दर्पण आणि दिग्दर्शन
डॉ. मेधा श्री. लिमये
सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो तो दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ! दर्पण म्हणजे आरसा! जगाच्या पाठीवर घडणाऱ्या घटनांचे यथातथ्य प्रतिबिंब वर्तमानपत्रात पडावे ही अपेक्षा ठेवून सुरू केलेले दर्पण हे पहिले मराठी वर्तमानपत्र १८३२ साली याच दिवशी मुंबईत सुरू झाले. या घटनेला आता एकशे नव्वद वर्षे होऊन गेली आहेत. बाळशास्त्रींच्या काळातील मराठी भाषा आणि तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती हे सर्व खूपच रंजक व उद्बोधक आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या त्या काळात आपल्याकडे ज्ञानाच्या आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी भाषण आणि श्रवण ही माध्यमे जास्त प्रचलित होती. कीर्तन, प्रवचन, कथाकथन ही त्यासाठीची परंपरागत साधने! पण जनप्रबोधनासाठी लेखन आणि वाचन ही माध्यमे पुढील काळात प्रभावी होणार हे बाळशास्त्री जांभेकरांनी जाणले. त्यांच्या मते वर्तमानपत्र म्हणजे विद्याव्यवहारांचे द्वार! म्हणूनच त्यांनी समविचारी अन्य जनांच्या साथीने दर्पण हे पहिले मराठी वर्तमानपत्र मुंबईत सुरू केले.
दर्पणमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये समांतर लेखन असे. त्यामुळे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या सुशिक्षितांसह केवळ मराठीच लिहिता वाचता येणाऱ्यांनाही ते वाचता येत असे. त्यात आपल्या देशातील महत्त्वाच्या घटनांवर भाष्य करण्याबरोबरच युरोपातील सामाजिक, वैज्ञानिक प्रगतीची ओळख करून देण्यावर भर असे. शिक्षणाचा अभाव, बालविवाहाची प्रथा आणि बालविधवांचे खडतर आयुष्य हे सामाजिक प्रश्न तेव्हा स्त्रियांच्या संदर्भात फार महत्त्वाचे होते. या प्रश्नांसाठी जनजागृती करण्याचे आणि सुधारक विचारांचा प्रसार करण्याचे प्रयत्न दर्पणमधून सुरू झाले. प्रारंभी चार महिने दर्पण हे पाक्षिक होते पण नंतर ते साप्ताहिक झाले.
दर्पणच्या पहिल्या अंकात त्याचे उद्दिष्ट सांगताना म्हटले होते – “मनोरंजन करणे, चालते काळाची वर्तमाने कळविणे आणि योग्यतेस नेण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टींची दर्पण छापणारांस मोठी उत्कंठा आहे; म्हणोन या गोष्टी साध्य होण्याविषयी जितका प्रयत्न करवेल तितका ते करतील. कोणा एकाचा पक्षपात किंवा नीचपणा या दोषांचा मळ दर्पणास लागणार नाही; कारण की दर्पण छापणारांचे लक्ष्य निष्कृत्रिम आहे; म्हणोन हे वर्तमानपत्र ज्या रीतीने भले आणि गुणी पुरुषांस मान्य होईल त्या रीतीने करण्यास ते दृढ निश्चयाने उद्योग करतील.”
१८४० मध्ये व्यावहारिक अडचणींमुळे दर्पण बंद पडले पण त्याच सुमारास बाळशास्त्रींनी दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक सुरू करण्यात पुढाकार घेतला. हेही मासिक चारपाच वर्षे चालले. विज्ञानदृष्टी देणारे आद्य मराठी मासिक म्हणून ‘दिग्दर्शन’ महत्त्वाचे वाटते. दिग्दर्शनच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, “परमार्थाविषयी जाणणे हा मनुष्याचा मुख्य धर्म खरा, परंतु आपण सर्व संसारात वागतो तेव्हा इहलोकोपयोगी ज्या गोष्टी त्यांचे त्यांचे ज्ञान ही विद्या होय.” पुढे ह्या सर्व विद्यांचे प्रकार सांगून गणितशास्त्र हे बहुधा सर्व शास्त्रांच्या उपयोगी आहे असे नमूद केले आहे.
दिग्दर्शनमध्ये तंत्रज्ञानासंबंधीची माहिती देताना म्हटले आहे- “शास्त्रांचा उपयोग व्यवहारात कसा करावा याचे जे प्रकार त्यांस कळा अथवा कसबे म्हणावे. उदाहरणार्थ फार भार कोणत्या पदार्थाचा कोणत्या आकृतीवर सहन होतो हे गणितशास्त्रात आहे. त्याच्या आधारावर इमारती, पूल वगैरे बांधण्याचा जो प्रकार ती शिल्पकळा असे जाणावे.”
दिग्दर्शनच्या अंकांमधून मुख्यतः इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित या विषयांवरचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. इतकेच नव्हे तर मानसशास्त्राबद्दलही लेखन थोड्या प्रमाणात प्रसिद्ध झाले. विज्ञानाच्या संदर्भात रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, सामान्यज्ञान अशा विविध विषयांसंबंधी लेखनाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यात सूक्ष्मदर्शक यंत्र, कागदांची उत्पत्ती, सोडा पावडरचे गुणधर्म व उपयोग, काच तयार करण्याची कृती, काचेचे प्रकार इत्यादी विषयांची ओळख करून दिली गेली.
रसायनशास्त्राचा उगम लोहाचे सुवर्ण बनविण्याच्या असफल प्रयत्नांतून झाला हे नमूद करून पुढे अशी टिप्पणी केलेली आढळते की या निरर्थक उद्योगापासून अमोलीक रसायनशास्त्र विद्येचा लाभ झाला आहे. युरोप खंडामध्ये तेव्हा होत असलेल्या रसायनशास्त्राच्या प्रगतीचा उपयोग हिंदुस्थानातील कारागीरांनी केल्यास अल्पश्रमाने बहुत सुख होईल मत मांडले आहे.
वाफेच्या यंत्राचे विविध उपयोग सांगून या यंत्राची कार्यक्षमता मानवी हातांपेक्षा किती जास्त आहे याचे सुरस वर्णन मुळातूनच वाचावे असे आहे.
“वाफयंत्राने रुपये पाडणे, जाहाज चालविणे आणि विहिरीतील पाणी काढणे इतकीच कामे होतात असे समजू नये. युरोप खंडात याचा सर्व प्रकारचे कारखान्यांमध्ये उपयोग करितात. याणे करून खाणीतील पाणी निघून धातू खोदून काढण्यास सुलभ पडते, कापूस पिंजला जातो, कापडे विणून तयार होतात, लोहाराचे काम होते, दाणे दळून पीठ तयार होते अशी सहस्रशः कामे याणे करून होतात. विलायतेत याणेकरून गाड्या चालतात. यामध्ये साहाशे घोड्यांचा जोर जरी असला तथापि हे मुलाच्या हाताचा हुकूम मानिते. याचे भक्षण कोळसे, लाकडे हे पदार्थ. ते ते रिकामे असता खात नाही; ते कधी थकत नाही, याला झोपेची गरज नाही, कोणत्याही देशात नेले असता त्यास हवा बाधत नाही, प्रथम मजबूत केले असता त्यास फारसा रोग होत नाही. इतकेच की म्हातारे झाले म्हणजे याच्याने काम करवत नाही. असे गुण या यंत्रामध्ये आहेत, म्हणून यास यंत्रराज हे नाव दिले असता साजेल.”
विविध ज्ञानशाखांचे थोडक्यात सुबोध ज्ञान करून देणारे असे अन्य माध्यम तेव्हा नव्हतेच. त्यामुळे दिग्दर्शनचा लोकशिक्षणासाठी मोठाच उपयोग झाला असेल. एक विशेष म्हणजे त्यात आपल्याकडे कसे सगळे वाईट आहे आणि युरोपात कसे सगळे आदर्श आहे असा आविर्भाव नव्हता; किंवा आपले जुने तेच कसे सोने आणि हे नवे आले आहे त्यात फक्त न्यूनच शोधायचे अशीही भूमिका नव्हती. केवळ विदेशात होणारी प्रगती प्रांजळपणे जनतेपर्यंत पोहोचवून दिशा दाखवणे हा हेतू होता म्हणूनच मासिकाचे नाव दिग्दर्शन ठेवले असावे.
पत्रकारिता हा बाळशास्त्रींच्या बहुआयामी कार्याचा केवळ एक पैलू. त्यांचा जीवनप्रवास १८१२ ते १८४६ असा केवळ ३४ वर्षांचा! त्यात कर्तृत्वाचा खरा कालावधी तर जेमतेम १६ वर्षांचा! पण तो नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीतला महत्त्वपूर्ण कालखंड होता. ब्रिटिश सत्ता मुंबईत स्थिरावली होती. हळूहळू इंग्रजी शिक्षणाचा प्रसार होऊ लागला होता. गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी मुंबईला The Bombay Native School Book and School Society ची स्थापना केली व तेथे कॅप्टन जॉर्ज जर्विस या इंजिनिअरची चिटणीस म्हणून नियुक्ती केली. या सोसायटीतर्फे १८२४ मध्ये सुरू केलेल्या पहिल्या इंग्रजी शाळेचे बाळशास्त्री विद्यार्थी झाले.
कुशाग्र बुद्धिमत्त्तेच्या बाळशास्त्रींनी अल्पावधीतच इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. संस्कृत, मराठी तर त्यांना उत्तम अवगत होतेच. शाळेच्या चारच वर्षांमध्ये त्यांनी गणित, भूगोल या विषयांचाही उत्तम अभ्यास केला. यामुळे विद्यार्थिदशेतच तिसऱ्या वर्षापासून ते गणिताचे अध्यापन करू लागले.
शिक्षण संपताच त्यांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाली. तेथे पत्रव्यवहारादि प्रशासकीय कामे सांभाळतानाच ते अध्यापन, भाषांतर ही कामेही करीत. त्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात गणिताचे प्रोफेसर, कुलाबा वेधशाळेचे संचालक, बोर्ड ऑफ एज्युकेशनचे शाळातपासनीस अशा विविध जबाबदारीच्या पदांवरही त्यांची नियुक्ती झाली.
रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करणारे जांभेकर हे पहिले भारतीय संशोधक. इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे त्यांना युरोपातील वैज्ञानिक प्रगतीची ओळख झाली आणि त्यांची दृष्टी आधुनिक शास्त्रांकडे वळली.
सर्वसामान्य माणसाचे जीवन विज्ञानामुळे सुखी होऊ शकते हे तेव्हा ज्या भारतीयांना पटू लागले होते अशा मोजक्या व्यक्तींपैकी एक बाळशास्त्री होते. आधुनिक ज्ञानाने स्वदेशीयांची प्रगती व्हावी यासाठी मराठीतून ज्ञानप्रसार झाला पाहिजे याची त्यांना तळमळ होती. सुदैवाने त्यांना एल्फिन्स्टन, जर्विस अशा ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सहवास मिळाला तेही स्वतःच्या साम्राज्यवृद्धीसाठी का असेना पण देशी भाषांमधून भारतीयांना आधुनिक ज्ञान देण्याच्या मताचे होते. त्यांचे प्रयत्न जांभेकरांना अनुकरणीय वाटले. म्हणूनच इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर आणि वृत्तपत्राचे संपादन अशा दुहेरी मार्गांनी त्यांनी काम सुरू केले.
आज जगाची ज्ञानभाषा झालेली इंग्रजी भाषा आणि मानवी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारे विज्ञान-तंत्रज्ञान या दोहोंचे महत्त्व एकशे नव्वद वर्षांपूर्वी जाणणारे बाळशास्त्री यांचे भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणूनच आजही स्मरणीय आहे. आज तर समाजाला प्रगतीची दिशा दाखविण्यासाठी सामर्थ्यशाली माध्यमे आहेत. गरज आहे ती या शक्तीचा सदुपयोग करून समाजाला वर्तमानाचे दर्शन घडविणाऱ्या दर्पणांची आणि भविष्याचे दिग्दर्शन करणाऱ्या द्रष्ट्या पत्रकारांची!
[संदर्भ: आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर शताब्दी स्मारक ग्रंथ, खंड १, २, ३, संपादक श्री. ग. गं. जांभेकर, पुणे, १९५०]
Hits: 1
Hi Good evening Baba M,
After August 22, received intellectual inscribe on Acharya Balshastri Jambhekar…
And you depicted very well..
Thanks a lot
Ramanand
केवळ 34 वर्षांच्या आयुष्यात एवढे मोठे कार्य करणे,आणि तेही चिरंतन राहाणे , केवळ अद्भुत .