बाळ आणि बाळगुटी
नसलं तरी चालेल
या कवनात स्त्री-मनातील ऐहिक सुखसोयींबाबतची परिवर्तनशील मूल्ये आणि मानवी संस्कृतीचे सातत्य राखणारे कालातीत मूल्य, व या दोहोंत तारतम्य करून निर्णय घेतलेला दिसतो. इथे वर्णिलेल्या ऐहिक सुखसोयी या आजघडीला अगदीच सामान्य वाटतील. पण सदर वर्णन म्हणजे गेल्या शतकाच्या द्वितीयार्धातील चाळकरी निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांचा, आणि त्यांनी स्वीकारलेल्या मूल्याचाही दस्तावेज ठरावा.
ओनरशिपचा ब्लॉक । त्यात इलेक्ट्रिकचे क्लॉक ॥
गॅसची शेगडी । घरकामाला गडी ॥
फ्रीज आल्वीन । कुकर हॉकिन्स ॥
सनमायकाचे टेबल । बॉंबे डाइंगचे टॉवेल ॥
स्टेनलेसची भांडी । प्लॅस्टिकची कुंडी ॥
गॅलरीत तुळस डुलेल । गुलाब मोगरा बहरेल ॥
गोदरेजचे कपाट । आत साड्या साठ ॥
सोफा कम बेड । दिव्याला रंगीत शेड ॥
उषाचा फॅन । शोकेस छान ॥
शोकेसमध्ये क्रोकरी । नाचणारी छोकरी ॥
गालीचा मखमली । सीनवर वृक्षवेली ॥
करमणूक टेलीव्हिजन । हवा निरोप्या टेलिफोन ॥
बेडरूम मध्ये दिवाण जोडी । चादर वर परीटघडी ॥
उशीला कापूस सावरी । पांघरूण शाल काश्मिरी ॥
खिडकीला रोज पडदे नवे । उन्हाळी मात्र वाळ्याचे हवे ॥
एवढं असून येते मनी । सांगते तुम्हा हसू नका कोणी ॥
खेळतं रांगतं मांडीवर बसेल । तर एवढं सारं नसलं तरी चालेल ॥
- मंगला द. मुंडले
बाळकडू
या कवनात सरस्वतीला वंदन करण्याच्या मिषाने पारंपरिक बाळगुटीच्या घटकांचे वर्णन आले आहे. एका अर्थी हा अर्भकांसाठी योजलेल्या पारंपरिक औषधीची नोंद करणारा दस्तऐवजच आहे.
सरस्वती माता । गणराज माझे पिता । नमिते मी उभयता । प्रेमादरे ॥१॥
सात्विक गुणांचे । बाळकडू उगाळीन । बाळाला घालीन । नित्यनेमे ॥२॥
दया जायफळ । क्षमा मायफळ । पिऊनी शीतळ । बाळ होई ॥३॥
हर्तकी हरडा बेहडा । उगाळिता तीन । बाळाला शांती धन । नित्य लाभो ॥४॥
काकडशिंग सुंठ । उगाळिता द्वय । होईल निर्भय । बाळराजा ॥५॥
डाळिंबाची साल । मुरुडशेंग तत्व । उगाळीता सत्व । लाभे बाळा ॥६॥
हळकुंड ज्येष्ठीमध । उगाळा वेखंड । बाळाची अखंड । बुद्धी वाढो ॥७॥
रगतरोढ्याची । साल घाला उगाळून । रोगांचे निर्मूलन । करील ती ॥८॥
माता उगाळूनी । घालीते अतिवीष । पचवील सारे वीष । प्रापंची ग ॥९॥
सर्व औषधांत । गाळा उगाळिती। काळाची नाही भीती । मग बाळा ॥१०॥
पिंपळी पिंपळमूळ । उगाळून घाला । देईल देव त्याला । दीर्घायुष्य ॥११॥
- मंगला द. मुंडले (२२/४/१९६४)
Hits: 0
अप्रतिम