प्राणिगीते २

गंमतशीर प्राणिगीते

प्राणिगीतांची पार्श्वभूमी वाचली नसल्यास इथे वाचा.

यातील बरीच गीते ही लहान मुलांसाठी लायक अशा वात्रटिकेकडे झुकणारी आहेत. म्हणूनच गंमतशीर प्राणिगीते असे शीर्षक दिले आहे. याही यादीतील कित्येक प्राण्यांची नावे पालकांनाही परिचित नसण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती मिळवणे हाही एक प्रकल्प होईल.

अजगर

एक होता अजगर । त्याने खाल्ला काजूगर ॥ त्याची भूक शमली । आठ दिवस झोप काढली ॥

उंट

एक होता उंट । त्याने खाल्ली सुंठ ॥ दुखूं लागलं पोटात । म्हणून गेला वाळवंटात ॥

उंदीर

एक होता उंदीर । त्याने बांधलं मंदीर ॥ त्याला पावाच्या भिंती । आत खव्याच्या मूर्ती ॥

कपोत

एक होता कपोत । त्याने आणलं पोतं ॥ पोतं आणलं साळीचं । कोठार भरलं घळीचं ॥

काजवा

एक होता काजवा । त्याने आणला ताजवा ॥ मोजून घेतला खवा । आणि वाटला सार्‍या गावा ॥

कावळा

फार फार पूर्वी । गोरा होता कावळा ॥ कोळशाचा व्यापार केला । म्हणून काळा झाला ॥

कासव

एक होतं कासव । त्याला घ्यायचं होतं आसव ॥ ते म्हणालं मुंगीला । औषध-दुकान दाखव मला ॥

कुंभारीण

एक होती कुंभारीण । तिने काढलं रिण ॥ रिण फेडायला काय केलं । धनकोच्या घरीच घर बांधलं ॥

कुत्रा

एक होता कुत्रा । तो किती भित्रा ॥ घरात शिरला चोर । तर हा लपला माडीवर ॥

कोंबडा

एक होता कोंबडा । तो झाला बडा ॥ रहायला त्याला वाडा । आणि खायला बटाटावडा ॥

कोकिळा

एक होती कोकिळा । तिला मिळाला खिळा ॥ त्याचा केला विळा । कापला भाजीचा मळा ॥

कोळी

एक होता कोळी । त्याने आणली मोळी ॥ मोळी आणली उसाची । बांधायला दोरी कोळिष्टकाची ॥

खार

एक होती खार । तिने केला हार ॥ हार केला फुलांचा । बघायला थवा मुलांचा ॥

खेकडा

एक होता खेकडा । तो म्हणाला बोकडा ॥ आणून दे कपडा । मग देईन दमडा ॥

गरुड

एक होता गरुड । त्याला भेटला बुरुड ॥ दोघांची जमली गट्टी । चालवली चुन्याची भट्टी ॥

गवा

एक होता गवा । त्याला भेटला रावा ॥ दोघांची झाली दोस्ती । मिळून केली मस्ती ॥

गांडूळ

एक होतं गांडूळ । त्याने आणले तांदूळ ॥ त्याचा केला भात । पण खायला नव्हते दात ॥

गाढव

एक होतं गाढव । त्याने घातला मांडव ॥ मांडव घातला उसाचा । त्यात गालिचा तुसाचा ॥

गेंडा

एक होता गेंडा । त्याने खाल्ला भेंडा ॥ भेंडा खाल्ला तुपाशी । तरी म्हणे मी उपाशी ॥

गोगलगाय

एक होती गोगलगाय । तिने चोरून खाल्ली साय ॥ हे मांजरीनं बघितलं । मालकिणीला सांगितलं ॥

घार

एक होती घार । तिला मिळाली मोटार ॥ म्हणाली त्यात बसेन । आणि जग बघेन ॥

घुबड

एक होतं घुबड । त्याला दिसला वड ॥ वडात दिसली ढोली । म्हणे “काय छान खोली” ॥

घूस

एक होती घूस । तिला फार हौस ॥

म्हणून घर बांधलं । भोवती शिवार सजवलं ।

पण ते फुललं । आणि घुशीनेच पोखरलं ॥

घोडा

एक होता घोडा । त्याने आणला जोडा ॥ जोडा त्याचा लाल । विंचवाने पळवला काल ॥

घोण

एक होती घोण । तिने आणली गोण ॥ गोण होती गुळाची । पंगत जमली मुंग्यांची ॥

घोरपड

एक होती घोरपड । तिने आणलं कापड ॥ कापडाचा केला दोर । आणि चढली किल्ल्यावर ॥

चंडोल

एक होता चंडोल । फिरून आला पृथ्वी गोल ॥

पण पाहिली विहीर खोल । भिती वाटली जाइल तोल ॥

चिचुंद्री

एक होती चिचुंद्री । तिने आणली सुंद्री । वाजवाया लागली शिकू । पण आवाज येई चूं चूं ॥

चिमणी

एक होती चिमणी । तिला मिळाला मणी ॥ देउन म्हणाली सुताराला । घडव तन्मणी याचा मला ॥

जळू

एक होती जळू । तिनं खाल्लं अळू ॥ तहान लागली तिला । मागे रक्त प्यायला ॥

जिराफ

एक होता जिराफ । त्याला भेटला सराफ ॥ दोघांनी मिळून ठरवलं । गाढवाला गाणं शिकवलं ॥

डास

एक होता डास । त्याने घेतला घास ॥ घास होता घाणीचा । वर घोट रक्ताचा ॥

डुक्कर

एक होता डुक्कर । त्याला आली चक्कर ॥ चक्कर आली इतकी । की गर्रकन् घेतली गिरकी ॥

दयाळ

एक होता दयाळ । त्याने पाहिली सिंहाची आयाळ ॥ म्हणे मिळाली जर काढून । तर स्वेटर घेइन विणून ॥

धनेश

एक होता धनेश । त्याने घेतला वीरवेष ॥ पागोटे बांधले डोक्याला । आणि निघाला लढायला ॥

  • मंगला द. मुंडले

Hits: 38

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *