भोंडल्याचे गाणे

नवरात्रीनिमित्त आईने रचलेले भोंडल्याचे गाणे सादर करीत आहे.

गोफ आणू एक ग । पीना आणू दोन ग ॥

गजरे आणू तीन ग । आकडे आणू चार ग ॥

एवढे सारे आणीले । आजीच्या समोर ठेवीले ॥

आजी आजी अंबाडा घाल ग । वरती गजरा माळ ग ॥

परकर चोळी घालेन ग । छान छान साडी नेसेन ग ॥

मैत्रिणीच्या घरी जाईन ग । सगळ्या तिकडे येतील ग ॥

भोंडल्याचा खेळ आम्ही खेळू ग । त्याचीच गाणी गाऊ ग ॥

मग कशी मज्जा येईल ग । परतल्यावर सांगेन ग ॥

मैत्रिणिच्या घरी गेल्यावर । सगळ्या मैत्रिणि जमल्यावर ॥

भोंडल्याचा खेळ मांडला ग । त्याचीच गाणी गायलो ग ।

इतक्यात आली तिची ताई । तिलाच होती जाण्याची घाई ॥

आम्ही विचारले घाई कशाला । छोटा बाळ घरीच झोपला ॥

ताई म्हणाली लवकर लवकर । किती गाणी गायली सांगा भरभर ॥

आम्ही म्हणालो खूप खूप । ताई म्हणे दाखवा नव्याचे रूप ॥

अंबाड्याचे गाणे मी गाईले । ताईला फारच आवडले ॥

खिरापती ओळखा आता म्हणाली । एकी एकीवर पाळी आली ॥

चिकी फुटाणे बत्तासे पेढे । बुंदीचे लाडू जिलबीचे कडे ॥

चणे चुरमुरे शेंगदाणे बरं का । जरदाळु अंजीर आणीक खारका ॥

बदाम पिस्ता काजू चारोळी । लिमलेट चॉकलेट लॉलीपॉप गोळी ॥

एवढी नावे फोडल्यावर । ताई म्हणाली बरोबर ॥

हळदी कुंकू लावल्यावर । प्रसाद वाटुन दिल्यावर ॥

गप्पागोष्टी झाल्यावर । मग निघालो घरोघर ॥

  • मंगला द. मुंडले

Hits: 42

You may also like...

1 Response

  1. Ramesh J Modi says:

    छान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *