Tit for Tat – आणखी एक अर्थ

नातू पहिलीत गेलाय. त्याने आईला प्रश्न विचारला की “tit for tat” चा अर्थ काय?” आईने सांगितले “जशास तसे”. मग प्रतिप्रश्न आला, “मग tit म्हणजे तसे व tat म्हणजे जसे का?” आता हा मामला आडवाटेला लागला. मुलीने तो माझ्याकडे सोपवला. हे प्रकरण समजावायचे तर ते मला समग्र समजून घेतलेच पाहिजे! मला जरा खोलात शिरायची संवय आहे. ज्यांना खोलात जायचे नसेल पण “tit for tat” चा अर्थ मुलांना समजावण्यासाठी नक्की किती आणि काय सांगायचे एवढ्याच तपशीलात रस असेल, त्यांनी परस्पर इथे क्लिक करून ‘Tit for tat’ ही कोशातील नोंद पाहावी. तपशिलात शिरण्याची इच्छा असेल तर वाचत राहा.

पहिला प्रश्न प्रथम! ‘Tit for tat’ हे काय आहे? वाक्प्रचार/संप्रदाय (idiom), की म्हण (proverb)? मराठीतील म्हणी व वाक्प्रचारांचे संग्रह या दोहोत भेद करीत असले, तरी काही मराठी कोशात वाक्प्रचार, संप्रदाय व म्हण हे तीन्ही शब्द समानार्थी मानलेले दिसतात. (MESSK) मला स्वतःला वाक्प्रचार/संप्रदाय व म्हण यांच्यात भेद करणे महत्वाचे वाटते.

“Tit for tat” या वाक्यांशाचे “जशास तसे”, “ठोशास ठोसा”, “शठं प्रति शाठ्यम्” किंवा “अरेला कारे” हे अर्थ घेतले तर त्यातील कल्पना Tit किंवा tat या शब्दांशी मुळीच जुळत नाहीत. कारण प्रमाण इंग्रजीत tit या शब्दाचा अर्थ छोटा कीटकभक्षी पक्षी असा आहे. तर tat या शब्दाला प्रमाण भाषेत कुठलाच अर्थ नाही. (EEOAL) त्या अर्थाने “Tit for tat” हा संप्रदाय किंवा idiom आहे असेच म्हटले पाहिजे. तर “जशास तसे”, “ठोशास ठोसा”, “शठं प्रति शाठ्यम्” किंवा “अरेला कारे” हे सारे अर्थ जीवनव्यवहारविषयक सत्य वा सल्लाच आहेत. त्या अर्थाने “Tit for tat” ही म्हण ठरते. या संभाव्य दुहेरी वर्गीकरणाचा प्रभाव इंग्रजी कोशांतून दिसतो. “Tit for tat” हा वाक्यांश जसा idiom म्हणून सापडतो (LIDIO) तसाच तो proverb ला वाहिलेल्या कोशातही सापडतो (LPOEP). थोडक्यात काय? तर ज्याला जे आवडेल ते त्याने म्हणावे! मी मात्र “Tit for tat” चा उल्लेख म्हण असा करणार आहे. कारण पुढे कळेलच !

तपशीलवार अर्थाकडे वळण्याआधी प्रथम “Tit for tat” च्या वापराचे उदाहरण पाहू. प्रौढांसाठी लायक सौम्य इंग्रजी उदाहरण असे – “In a tit for tat action, Russia expelled American diplomats.” “In a tit for tat action rival gang assassinated members of the other gang.” हे हिंसक उदाहरण म्हटले पाहिजे. कोशवाङ्मयात नेमस्त आणि हिंस्र अशा दोनही प्रकारची उदाहरणे सापडतात. मुलांसाठी लायक उदाहरण – “When Ajay called him fat, Vijay responded with a tit for tat, and called him rat.” “Tit for tat”चे भाषांतर ठरतील असे वाक्यांश “जशास तसे”, “ठोशास ठोसा”, “शठं प्रति शाठ्यम्” किंवा “अरेला कारे” हे वर दिलेच आहेत. या विविध अर्थछटांतूनही अनेक उदाहरणे तयार करता येतील.

प्रमाण इंग्रजीत tit वा tat यांना काहीच समर्पक अर्थ नाही हे आपण वर पाहिलेच आहे. पण काही इंग्रजी मराठी कोशांत tit या शब्दाचा अशिष्ट इंग्रजीतील स्तन वा स्तनाग्र असा अर्थ दिला आहे. (EMDLE) त्यामुळे Tit किंवा tat या शब्दांचा बोली किंवा गावरान भाषेत (म्हणजेच slang मधे) शोध घेणे गरजेचे आहे. मात्र त्यातूनही या म्हणीच्या पारंपरिक अर्थाचा शोध लागतच नाही. कसे ते पाहा.

प्रथम tit या शब्दाच्या बोली भाषेतील विविध अर्थांचा विचार करू. तसे पाहाता tit हा शब्द स्तन या अर्थी इंग्रजीत बाराव्या शतकाच्या आधीपासून आहे. (EERHU) एखाद्या स्त्रीचा किंवा स्त्रीवर्गाचा अपमानास्पद उल्लेख करण्यासाठीही हा शब्द वापरला जाऊ लागला. (LXOMS) पण सतराव्या शतकात teat हा शब्द स्तनाग्र या अर्थाने प्रमाण इंग्रजीत आला व tit हा शब्द ग्राम्य ठरला. मात्र हा फरक ठळकपणे कोशात उतरला तो विसाव्या शतकातच. (LXDCS) कारण हे असावे की याच विसाव्या शतकात tit ह्या शब्दाला बोलीभाषेत अधिकाधिक अर्थ लाभू लागले, जसे की गबाळग्रंथी किंवा बुळा माणूस (LXODS) बिनकामाचा किंवा मूर्ख माणूस किंवा वेश्या (LXCDS)

ब्रिटीश बोली भाषेत tat म्हणजे कमअस्सल, दुय्यम दर्जाची वस्तू (EEOAL) किंवा टाकाऊ वस्तू वा गबाळी व्यक्ती (LXOMS). tat हे चिंध्या किंवा लक्तरे या अर्थाच्या Tatters या शब्दाचे लघुरूप आहे.

बोली भाषेतील या विविध अर्थातून “जशास तसे” किंवा तत्सम अर्थाची म्हण रचणे हे फारच अकल्पनीय व अतर्क्य आहे. विशेष म्हणजे बोलीभाषेत हे सारे अनर्थकारी अर्थ असूनही tit for tat ही म्हण अतिशय सभ्य अर्थाने किमान चौदाव्या शतकापासून प्रचलित आहे. (LIDIO). याची संगती कशी लावायची?

याबाबत विविध विचारवंतांचे बहुमत असे की, मुळात ही म्हण “tip for tap” अशी असली पाहिजे. ती साधारण चौदाव्या शतकात इंग्रजीत अवतरली असावी, आणि सोळाव्या शतकात तिच्यात बदल होत गेले. (LIDIO) सोळाव्या शतकात या म्हणीची “tip for tap” “tick for tack” आणि “tit for tat” अशी विविध रूपांतरे दिसतात. (LPOEP) फ्रेंच “tant pour tant” वरून इंग्रजीत ““tip for tap” चे “tint for tant” असेही रूपांतर झाले असाही एक प्रवाद आहे. (LODME) अठरावे शतक उजाडताना “Tit for Tat” रूढ झाले आणि एकोणिसाव्या शतकात “tip for tap” हे मूळही विस्मरणात गेले. (LPOEP)

हे उच्चारणातले बदल का घडले असावेत याबाबत काही विवेचन दिसत नाही. पण हे उच्चारसुलभतेसाठी झाले असे माझे मत आहे. उदाहरणार्थ टिप वा टॅप चा उच्चार करताना प्रथम तालव्य व पाठोपाठ ओष्ठ्य वर्ण उच्चारताना तोंडाच्या किती हालचाली करायला लागतात ते पाहा. जीभ टाळ्याला लावायची. मग जिभेमागे हवेचा दाब लावायचा. झटदिशी जीभ सोडवून हवा जाऊ देता देता लगेच ओठांनी तोंड बंद करून सोडलेली हवा अडवायची. याउलट केवळ जीभ टाळ्याला लावणे, हवेचा दाब जिभेमागे धरणे, जीभ सैलावून हवा सोडणे व जीभ परत टाळ्याला लावणे एवढेच करत टिट् म्हणता येते. टॅट् म्हणायला सरतेशेवटी जबडा थोडा वरखाली हलवावा लागतो इतकेच. टिप वा टॅप म्हणताना होणारी ओठांची हालचाल बाद होते व हवा सोडता सोडता ती थांबवणे हा प्रकारही टळतो. थोडक्यात उच्चार सोपे होतात. अर्थात् उच्चार सोपे करता करता शब्द बदलले तरीपण समाजमनातून “tip for tap” हे मूळ काही नष्ट होत नाही. थोडक्यात “Tit for Tat” चा अर्थ लावायचा तर मूळ “tip for tap” चा अर्थ लावला पाहिजे.

तसे पाहाता tap हा शब्द फ्रेंच taper चे लघुरूप म्हणून इंग्रजीत आला असे एक मत आहे. आणि त्याचा अर्थ हळूच मारणे (to strike lightly). (LODME) इंग्रजीत आल्यावर त्याला अजून छटा मिळाल्या जसे की हळूच पण पटकन मारणे (EEOAL) ज्या मारण्याचा आवाज येईल. (EERHU) या सगळ्याचा सोप्या मराठीत सारांश म्हणजे “चापटी देणे”. Tip हा शब्दही tap या शब्दापाठोपाठ इंग्रजीत आला असावा व त्याचा मूळ अर्थही tap सारखाच हळूच मारणे असाच आहे. उदाहरणार्थ क्रिकेटमधे tip and run किंवा tap and run हे दोन्ही वाक्प्रयोग समानार्थी मानतात. (LODME) तेव्हा tip for tap किंवा tit for tat चा सरळ अर्थ असा की एकाच्या tap ला tip ने उत्तर मिळते. एकाने (हळूच) मारले किंवा चापटी दिली तर दुसर्‍यानेही तसेच केले. म्हणजेच, बदला घेतला.

पण इंग्रजीत tip या क्रियापदाला अजून अर्थ आहेत. ते विचारात घेतले तर या म्हणीतला एक सखोल अर्थ दिसतो. Tip या क्रियापदाला कलंडायला कारण होणे असाही एक अर्थ आहे. (EEOAL, EERHU) एखादी वस्तू कलंडायला आली की ती tipping point ला आली असे म्हटले जाते. (वाचकांना “The Tipping Point: How Little Things Can Make a Big Difference” हे माल्कम ग्लॅडवेल यांचे पुस्तक आठवत असेल.) तेव्हा प्रस्तुत संदर्भात tap या क्रियापदाला फक्त चापटी असा अर्थ असला (EEOAL, EERHU) तरी tip या क्रियापदाला केवळ चापटी नव्हे तर कलंडायला लावेल इतका धक्का असा अर्थ आहे. एखाद्याने चापटी मारली (tap) तर उत्तर म्हणून कलंडावे लागेल इतका धक्का मिळणे (tip) त्यातून सूचित होते. थोडक्यात चापटीने सुरू झालेले प्रकरण धक्क्याकडे झुकण्याची किंवा हे प्रकरण जशास तसे एवढ्यापुरते मर्यादित न राहाता कलेकलेने वाढत जाण्याची शक्यता इथे व्यक्त होते. “Push comes to shove” हा इंग्रजी वाक्प्रचार वापरायचा तर एकाच्या “push” ला “shove” ने उत्तर मिळण्याची शक्यता अधिक. बरेचदा तसा अनुभवही येतो.

म्हणूनच मी “tit for tat” ला वाक्प्रचार वा संप्रदाय नव्हे तर म्हण ठरवतो – जीवनव्यवहाराचा एक नवा अर्थ दाखवून देणारी म्हण.

विश्वास द. मुंडले

Hits: 50

You may also like...

1 Response

  1. अर्चना देशपांडे says:

    किती सखोल अभ्यास आहे,या म्हणीबद्द्ल ! कौतुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *