आनंद वाचन योजना १९९४
मराठी मुले दृक्श्राव्य करमणुकीकडून इतर वाचनाकडे, विशेषतः मराठी वाचनाकडे वळत नाहीत, ही समस्या जुनी आहे. याबाबत काही करू इच्छिणार्या पालकांची सर्वात मोठी अडचण ही की मुलांसाठी चांगली पुस्तके कशी निवडावी याबाबत त्यांना अपेक्षित मार्गदर्शन सहजी मिळत नाही. जाणकारांनी बनवलेल्या बाल-कुमारांसाठी उपयुक्त पुस्तकांच्या याद्या वेळोवेळी ही गरज भागवत असतात. (उदाहरणार्थ एक यादी इकडे पाहा) पण त्या कालौघात गडप होत असतात. अशा विविध काळी बनलेल्या याद्या जुन्या झाल्या तरीही त्यांची उपयुक्तता कमी होत नसते. आणि एखाद्या समाजातील वाचन संस्कृतीचा दस्तऐवज म्हणून त्यांचे महत्व नेहेमीच अबाधित राहाणार ! अशीच एक १९९४ साली बनलेली जुनी यादी इथे सादर करीत आहे. ह्या बाबतीतली आधारभूत कागदपत्रे माझे पुस्तकप्रेमी मित्र व कुमारसाहित्याचे अभ्यासक-संग्राहक श्री गजानन थत्ते यांनी जपून ठेवली होती. त्यांनी ती मला उपलब्ध करून दिली म्हणूनच ही यादी छापणे शक्य झाले आहे.
मुलांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी १९९४ साली लोकसत्तेचे तत्कालीन संपादक कै. अरुण टिकेकर यांच्या पुढाकाराने दैनिक लोकसत्ता व मराठी ग्रंथप्रकाशक संघटना यांनी लहानमोठ्या मुलांसाठी “आनंद वाचन योजना” आखली. त्यानुसार प्रकाशकांकडे उपलब्ध पुस्तके मागवण्यात आली.
बालमोहनचे मुख्याध्यापक श्री. बापूसाहेब रेगे, श्री. अशोक बेंडखळे, व बाल-कुमार साहित्याचे अभ्यासक/ संग्राहक श्री. गजानन थत्ते यांच्या समितीने या पुस्तकांचे परीक्षण करून मुलांसाठी वाचनास योग्य अशा १७० पुस्तकांची यादी तयार केली. या योजनेची जाहिरातही “उमलणार्या फुलांसाठी – लहान-मोठ्या मुलांसाठी” या शीर्षकाने रविवार ३ एप्रिल १९९४ च्या लोकसत्तेत आली तर योजनेचे तपशील रविवार १० एप्रिल १९९४च्या लोकसत्तेतून जाहीर झाले. त्यातलेच एक चित्र शीर्षकात वापरले आहे. या यादीतील पुस्तके पुढील दोन महिने २०% सवलतीत विविध शहरांत (एक वा अनेक ठिकाणी) उपलब्ध करण्यात आली, जसे की मुंबई (७ ठिकाणी), पुणे (५), नागपूर (५), तर अकोला, अमरावती, औरंगाबाद, कल्याण, कोल्हापूर, जळगाव, ठाणे, डोंबिवली, नांदेड, नाशिक, परभणी, बेळगाव, मिरज, रत्नागिरी, लातूर, वसई, सातारा येथे प्रत्येकी एक ठिकाणी. तसेच ग्रंथप्रकाशक संघटनेतर्फे २९ एप्रिल १९९४ रोजी दादरमधील सावरकर स्मारक सभागृहात भरलेल्या प्रदर्शनातही या १७० पुस्तकांचे एक दालन ठेवण्यात आले होते.
१९९४ च्या आनंदवाचन योजनेअंतर्गत निवडलेल्या १७० पुस्तकांची वर्गीकृत यादी खाली दिली आहे. यादी जुनी असली तरी मुलांसाठी पुस्तके शोधणार्या पालकांना ती आजही उपयुक्त ठरेल असे वाटते. या पुस्तक निवडीत भाग घेणारे एक पुस्तकप्रेमी श्री. गजानन थत्ते यांनी काही पुस्तके विशेषत्वाने पुरस्कारली होती, त्या पुस्तकांची नावे तारांकित (*) केली आहेत.
संक्षेपासाठी मूळ यादीतील क्रमांकाचे आकडे वगळले आहेत, व क्रमवारीही बदलून लेखक/लेखिकेच्या पहिल्या नावानुसार अकारविल्हे देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकांची माहिती शीर्षक, लेखक/ लेखिका, व किंमत (१९९४ सालचे रुपये) या क्रमाने दिली आहे
कथा (५२ पुस्तके)
सोनेरी पेला, अनिल हवालदार, ३० | दुसर्या महायुद्धातील महिला आघाडी (*), ग. म. केळकर, १३ | मधुर गोष्टी संच १ ते ३, गणेश गोविलकर, ६६ |
जंगलातील गोष्टी, गोविंद गोडबोले, ३५ | कथा बोध, जगदीश काबरे, १५ | यक्षांची देणगी (*), जयंत नारळीकर, ६० |
गुलमोहोराची माया, ज्ञानदा नाईक, १० | अर्थशास्त्राच्या कथा, डॉ. भा. ना. काळे, १२ | सचित्र १०१ बालगोष्टी, तारा चौधरी, १२ |
खंड्या (*), दुर्गा भागवत, १५ | उंदीर घर बांधतात, नरेश परळीकर, ११ | गोट्या संच १ ते ५, ना. धो. ताम्हनकर, ७५ |
सुरेख गोष्टी संच १ ते ४, पंढरीनाथ रेगे, ३२ | काबुलीवाला, पद्मिनी बिनीवाले, १० | कावळ्यांची शाळा, प्र. के. अत्रे, १५ |
फुले आणि मुले , प्र. के. अत्रे, ५ | कथा प्रेमचंदांच्या (*), प्र. ग. सहस्रबुद्धे, २४ | प्राण्यांच्या गोष्टी, प्र. ग. सहस्रबुद्धे, ३५ |
विलक्षण कथा, बा. गो. काटकर, २५ | आनंद मेळा, बाबा भांड, १० | धर्मा, बाबा भांड, १० |
युद्धकालीन कथा, भा. द. खेर, १५ | फार फार सुंदर शहर (*), भा. रा. भागवत, १८ | साहस कथा संच १ ते ५ (*), भा. रा. भागवत, ९० |
रक्तरंजित रहस्य (*), भालबा केळकर, १२ | शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा संच १ ते ४ (*) , भालबा केळकर, १२० | रंगीत उंदीर, मधुसूदन घाणेकर, ३० |
आपले वृक्ष, मनेका गांधी, ७० | चौदा चातुर्यकथा, माधव काटदरे, १५ | सवाई थापाड्या, माधुरी भिडे, ३० |
मुलांचे पु.ल., मुकुंद टेकाडे, १५ | कथा नौदल, राजगुरु आगरकर, ५० | आवडत्या गोष्टी, राजा मंगळवेढेकर, ३५ |
बाळांसाठी गोष्टीच गोष्टी, राजा मंगळवेढेकर, १५ | बुद्धीची करामत, राजा मंगळवेढेकर, ४० | सांगी वांगीच्या गोष्टी, राजा मंगळवेढेकर, ३५ |
युद्धकथा (*), राजा लिमये, ३५ | १०१ गोष्टी, रेचल गडकर, २० | एका जवान माणसाची कहाणी, लीलाधर हेगडे , २५ |
अग्निपुत्र , वसंत पोतदार, ५५ | दुर्गभ्रमण विक्रमवीर, वा. शि. आपटे , २२ | असे मित्र अशी मैत्री, वामन चोरघडे, १५ |
अशी माणसे अशी साहसे (*), व्यंकटेश माडगूळकर, ५० | झिपर्या आणि रत्नी, शंकर सारडा , १५ | राजकन्या शालमिरा, शांता शेळके , १० |
टोळंभटाची भरारी, शिरीष निपाणीकर, १६ | चतुराईच्या गोष्टी (*), स. गं. मालशे, ४० | चटक मटक, संपादित, २० |
गोड गोष्टी संच १ ते १०, साने गुरुजी, ८० | १९७१ चे अभिमन्यू, सु. ग. शेवडे , ३० | शूर मुले, सुधा पेठे, २५ |
मोनिकाच्या धमाल कथा, सुभाष भेंडे , ३६ |
कादंबरी (२६ पुस्तके)
आदित्य, अरुण हेबळेकर, ५० | समुद्र सैतान, आत्माराम शेट्ये, १५ | अज्ञात मोती, कमलाकर कदम, ३० |
वाघरू, गो. नी. दांडेकर, १५ | शितू, गो. नी. दांडेकर, २० | अंतराळातील भस्मासुर (*), जयंत नारळीकर, ६० |
अंतराळातील स्फोट (*), जयंत नारळीकर, ३० | प्रेषित (*), जयंत नारळीकर, ५० | बखर बिम्मची, जी. ए. कुलकर्णी, २० |
ठकीमागचे रहस्य , ज्ञानदा नाईक, १५ | दादर पुलाकडील मुले, नारायण सुर्वे, १५ | मायापूरचे रंगेल राक्षस , भा. रा. भागवत, ३५ |
रॉबिनहूड, भा. रा. भागवत, २० | आदिवृक्ष आणि भस्मासुर, महेश चांदोस्कर , ४० | हात ना पसरू कधी, रवींद्र देसाई, ५० |
बारकू, राजा मंगळवेढेकर, १५ | द लिटिल प्रिन्स (*), लतिका मांडे, ३० | भाग्यवती, वसंत वर्हाडपांडे, १५ |
अंकल टॉमची केबिन (*), वा. शि. आपटे, १५ | नवजीवन, वा. शि. आपटे , १५ | टिंकू टिंकल, विजया वाड, ३० |
बनगरवाडी (*), व्यंकटेश माडगूळकर, ३० | औट घडकेचा राजा, शांता शेळके, २५ | गाठ पडली ठकाठका, शांता शेळके, २५ |
हरवलेल्या खेळण्यांचे राज्य , सई परांजपे, १५ | काळदरीतला यात्री, सुभाष भांडारकर, ३० |
कविता (१३ पुस्तके)
अक्षरगाणी, कल्याण इनामदार, १२ | पाडगावकरांच्या बालकविता संच १ ते ५ (*), मंगेश पाडगावकर, ७५ | खुदकन हसू, र. गो. लागू, १० |
धमाल, राजा मंगळवेढेकर, २० | फुलराणीच्या कविता संच १ ते ३ , वसंत बापट, ४० | टॉप आणि इतर पुस्तके संच १ ते ५ (*), विंदा करंदीकर, ७५ |
राणीचा बाग (*), विंदा करंदीकर, २५ | टिवल्या बावल्या (*), वृंदा लिमये, १५ | वृंदा लिमये यांच्या बालकविता संच १ ते ५ (*), वृंदा लिमये, १२५ |
कविता करणारा कावळा, शांता शेळके , १० | झोपेचा गाव (*), शांता शेळके , २५ | कविता मुखी पिलांच्या, संपादित, १० |
गाणारे पत्ते, सुरेश मथुरे , ११ |
विज्ञान (२५ पुस्तके)
माणूस महाबलाढ्य कसा बनतो, अनिल हवालदार , ४० | शेकोटीपासून अणुभट्टीपर्यंत , अनिल हवालदार , २० | अवकाशयात्री, जगदीश काबरे, १८ |
विज्ञान आणि वैज्ञानिक (*), जयंत नारळीकर, ५५ | छंदातून विज्ञान, डी एस्. इटोकर, ४० | वैज्ञानिक खेळणी, डी. एस्. इटोकर, ३५ |
तुम्हाला विज्ञान युगात जगायचय (*) , दत्तप्रसाद दाभोळकर , ३० | विज्ञानेश्वरी (*), दत्तप्रसाद दाभोळकर, ३० | शोधांच्या जन्मकथा संच १ ते ४, नंदिनी थत्ते , ७० |
निसर्गातील नवलाई, पंढरीनाथ रेगे , ६० | अवकाशाची पाउलवाट , प्रभाकर कुंटे , २५ | अंतराळातील झेप, प्रभाकर कुंटे , ४० |
अंतरिक्ष वारकरी, प्रभाकर कुंटे , २५ | हॅलो मी युबीक्विटोसा (*), प्रभाकर गुणे, ३० | आपण असे का वागतो?, बाळ फोंडके, १८ |
विचित्र विज्ञान , बाळ फोंडके , ४० | मला उत्तर हवंय, मोहन आपटे , ४५ | सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार, मोहन आपटे , ४५ |
कुमारांसाठी कॉंम्प्यूटर, राजेंद्र मंत्री, २० | सुलभ विज्ञान माला, शांता पेंडसे, ९० | विज्ञानपोई संच १ ते ३, संपादित, ७५ |
चला प्रयोग करूया, सुधाकर भालेराव, ३५ | दुर्बिणीचे विश्व, सुनील जोगळेकर , ५५ | कृत्रिम उपग्रहांचे जग, सुरेश परांजपे, ६० |
तेलाचे जग (*), सुरेश परांजपे, ६० |
निसर्ग (७ पुस्तके)
सोनाली (*), डॅॉ. पूर्णपात्रे, ३६ | ओळख पर्यावरणाची, निर्मला मोने, २० | निसर्गाची जादू, बालकवि, १२ |
पक्षी निरीक्षण, बी एस् कुळकर्णी, २५ | माळावरचे पक्षी, बी एस् कुळकर्णी, ४० | रानावनातल्या गोष्टी, लालू दुर्वे, २५ |
सिंहांच्या देशात (*), व्यंकटेश माडगूळकर , ३५ |
चरित्र (७ पुस्तके)
हळदी घाट, चंद्रकांत बिवरे, १० | आझाद हिंद सेना, भय्यासाहेब ओंकार, १० | एक होता कार्वर (*), वीणा गवाणकर, ४० |
डॉ. सालिम अली (*), वीणा गवाणकर, ४० | चार्ल्स रुडॉल्फ (*), सुधाकर प्रभू, २५ | आइनस्टाइनची आगळी कहाणी, सुधाकर भालेराव, २० |
खगोलशास्त्राचे महान प्रणेते, सुधाकर भालेराव, ५० |
छंद (१० पुस्तके)
भूगोलातील गमती, कुमुदिनी खांडेकर, २० | स्टॅम्प कलेक्शन, दिवाकर बापट, २५ | किल्ले पाहूया, प्र. के. घाणेकर, ३० |
दुर्गांच्या देशात , प्र. के. घाणेकर, ३५ | सोबत दुर्गांची, प्र. के. घाणेकर, ३० | हे विश्वचि माझ्या घरी, प्रकाश गीध, २८ |
विविध हस्तकला, मनोहर चंपानेरकर , १० | कूटरंजन, रमेश काणकोणकर , २० | हास्यचित्र कसे काढावे, शाम जोशी, २० |
मुलींसाठी योग आणि खेळांचे महत्व , सुलभा मराठे, वसंत भालेकर , २५ |
खेळ (९ पुस्तके)
ऑलिंपिकचे क्रीडाभास्कर, अशोक साठे, ४० | मुलांचे खेळ, आशा परुळेकर, ४० | खेळ, गुप्ता , १५ |
बुद्धिबळे – मंत्र, तंत्र, नीळकंठ देशमुख, ३५ | १०१ श्रेष्ठ क्रिकेटपटू, बाळ पंडित, ३५ | कोडी आणि करामती, मनोहर चंपानेरकर , २५ |
विमाने उडवा , माधव खरे, ६० | क्रिकेट कसे खेळावे, माधव मंत्री, वसंत पोरडी, १५ | वंडर्स ऑफ कपिल देव, वि. स. वाळिंबे , ४० |
विविध (२१ पुस्तके)
चिंटू संच ९ ते १२, चारुहास पंडित/ प्रभाकर वाडेकर, ४० | गणितातील गमती जमती (*), जयंत नारळीकर, २० | मुलखावेगळा इसाप, पु. रा. बेहेरे, २२ |
मोठे लोक छोटे होते तेव्हा, प्रवीण दवणे, ३५ | १११ गणित गमती, मनोहर चंपानेरकर , ३० | संस्कृतीचे मानकरी संच १ व २, मुकुंद पाटणकर, ३० |
संख्यांचे गहिरे रंग, मोहन आपटे, ४० | पुढे व्हा संच १ ते ३, यदुनाथ थत्ते , २४ | यशाची वाटचाल, यदुनाथ थत्ते , २० |
यशाची सप्तपदी, राजेंद्र मंत्री, ५० | बुद्धिमापन कसोट्या, राम गायकवाड, ३० | रेड क्रॉस, ल. म. कडू, १० |
धमाल गमती दामुअण्णाांच्या, वसंत हरदे , १५ | पाठ्यपुस्तकातील साहित्यिक, वामन देशपांडे , २० | मुलांसाठी संध्याकाळ, वामन देशपांडे , २० |
५५१ हास्यविनोद , शांताराम कर्णिक, ४० | ओळखा पाहू, शिरीष निपाणीकर, २१ | आपले काम आपले जीवनसर्वस्व, स. आ. सप्रे, १३/५० |
बॅंकेच्या जगात, संजय गोळे , २५ | उमाळा, साने गुरुजी, २५ | आरोग्य आणि अभ्यास, सुरेशचंद्र वारघडे , २५ |
या यादीचे लेखकवार विश्लेषण करता, १९९४ च्या काळातले आघाडीचे कुमारवाङ्मयकार दिसतात. या यादीत न येऊ शकलेली पुस्तके शोधताना ही लेखकांची नोंद उपयुक्त ठरेल, असे वाटते.
प्रथम विज्ञान व संबंधित विषयांचे लेखक पाहू.
विज्ञान तसेच विज्ञानाच्या अंगाने कथा, कादंबरी, तसेच विविध लिखाण करणार्या जयंत नारळीकर यांची ५ पुस्तके दिसतात. तर विज्ञान व विज्ञानविषयक चरित्रे वा विविध लिखाण करणार्या अन्य बहूल्लेखित लेखकांमध्ये मोहन आपटे (३ पुस्तके), सुधाकर भालेराव (३), राजेंद्र मंत्री (२) हे आहेत. तर कथा व विज्ञान हे दोन्ही विषय चोखाळणारे अनिल हवालदार (३), जगदीश काबरे (३), पंढरीनाथ रेगे (२) हे लेखक दिसतात. निव्वळ विज्ञान-विषयांवर लिहिणारे बहूल्लेखित लेखक आहेत – प्रभाकर कुंटे (३), डी एस्. इटोकर (२), दत्तप्रसाद दाभोळकर (२), बाळ फोंडके (२), सुरेश परांजपे (२). तर निसर्गावर बी. एस्. कुळकर्णी यांचीही २ पुस्तके या यादीत आहेत.
निव्वळ कथा/ कादंबरी/ कविता लेखकांची दखल घेण्याआधी कथा/ कादंबरी बरोबरच निसर्गावर लिहिणार्या व्यंकटेश माडगूळकर यांची तीन पुस्तके आहेत हे नोंदवले पाहिजे.
कथा, कादंबरी, कविता या तीनही गटात राजा मंगळवेढेकर यांची ६, तर शांता शेळके यांची ५ पुस्तके दिसतात. तर कुमारांसाठी कथा कादंबरी लिहिणार्या भा. रा. भागवत यांची ४, वा. शि. आपटे यांची ३, तर ज्ञानदा नाईक यांची २ पुस्तके दिसतात. गो. नी. दांडेकर यांच्या २ कादंबर्या, विंदा करंदीकर आणि वृंदा लिमये यांचे प्रत्येकी २ कवितासंग्रह, तर प्र. के. अत्रे, प्र. ग. सहस्रबुद्धे, बाबा भांड, भालबा केळकर यांचे प्रत्येकी २ कथा संग्रह पुरस्कारलेले दिसतात.
अन्य वाङ्मयप्रकारांबाबत बोलायचे तर मनोहर चंपानेरकर यांची छंद/ खेळ/ विविध अशा तीनही प्रकारातील ३ पुस्तके यादीत आली आहेत. तर साने गुरुजी व शिरीष निपाणीकर या दोघांचीही प्रत्येकी २ पुस्तके कथासंग्रह आणि विविध अशा दोनही प्रकारात आली आहेत. छंद या प्रकारात प्र. के. घाणेकर (३ पुस्तके), चरित्र या प्रकारात वीणा गवाणकर (२ पुस्तके) तर विविध या जातकुळीत यदुनाथ थत्ते व वामन देशपांडे यांची प्रत्येकी २ पुस्तके दिसतात.
मे १९९४ च्या ललित मासिकात अशोक बेंडखळे यांनी “आनंद वाचन योजनाः एक दृष्टिक्षेप” या शीर्षकाच्या लेखात या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. (या लेखाचे शेवटचे पान उपलब्ध झाले नाही.) उपलब्ध लेखातून असे दिसते की सदर यादी ही उपयुक्त असली तरी सर्वंकष म्हणता येणार नाही. याची कारणे अशी.
- एका प्रकाशकाची जास्तीत जास्त बारा प्रकाशने घ्यायची असा निर्बंध समितीने घालून घेतला होता.
- तत्कालीन पुस्तक विक्रेत्यांच्या दृष्टीने या यादीतून अनेक प्रकाशकांची चांगली पुस्तके वगळली गेली आहेत, जसे की – विद्यार्थी गृह (श्याम, श्यामची आई), चौफेर प्रकाशन (व्हिट्या), वसंत बुक स्टॉल (हिंदू सभा, अमोल ठेवा), अनमोल प्रकाशन (सुटीतील करमणूक, विज्ञानातील करमणूक, प्राणिमित्रांच्या नवलकथा, नवगीत), भालबा केळकरांची विज्ञानविषयक पुस्तके, फुलराणी प्रकाशन (गुणसागर टिळक, हे विश्वचि माझे घर), प्रसाद प्रकाशन (ओळखीच्या म्हणी, कथांच्या खाणी), इ.
- तसेच काही विक्रेत्यांच्या मते या यादीत बालवाङ्मयात न बसणारी पुस्तके आली आहेत, जसे की – बनगरवाडी, शितू, अग्निपथ, प्रेषित, आदित्य, हात ना पसरू,
- काही नामवंत प्रकाशकांनी (जसे की कॉण्टिनेण्टल, अनमोल, देशमुख आणि कं. इ.) आपले प्रकाशित बालवाङ्मय विक्रीसाठी उपलब्ध केले नव्हते. त्यामुळे त्यांची पुस्तके या यादीतून आपोआप वगळली गेली आहेत. या योजनेत विक्रेत्यांना ४०% कमिशन मिळावे ही अट या प्रकाशकांना मान्य नसल्याने हे झाले असावे असा एक तर्क आहे.
विक्रेत्यांचा अनुभव असा की नेहेमी खपणारी ठराविक पुस्तकेच या मोहिमेत खपत होती. आणि महिनाभरानंतरही पुस्तकांना म्हणावा तितका उठाव नव्हता. विक्रेत्यांच्या मते त्याचे पहिले कारण हे की पुस्तकांची यादी आगाऊ प्रकाशित झालेली नव्हती. दुसरे असे की पुस्तकांचा परिचय उपलब्ध नव्हता. तो असता तर खरेदीत फरक पडला असता. पण लोकसत्ताने आधीच स्पष्ट केले होते की १७० पुस्तकांची यादी वर्तमानपत्रात छापणे शक्य नाही. त्याच न्यायाने प्रत्येक पुस्तकाचा लघुपरिचयही देणे कठीण होते. असा हा १९९४ साली झालेल्या एका पुस्तकप्रसार मोहिमेचा दस्तावेज. प्रकाशन व विक्रीव्यावसायिक यातून जो घ्यायचा तो धडा घेतीलच. पण पालकांच्या दृष्टीने या उपक्रमाची फलश्रुती हीच की त्यांच्यासाठी अजून एक पुस्तकांची यादी उपलब्ध झाली आहे, जिच्यामधून ते आपल्या मुलांसाठी काही पुस्तके निवडू शकतील.
वाचनानंदासाठी शुभेच्छा !
विश्वास द. मुंडले
श्रेयनिर्देश: श्री. गजानन थत्ते यांच्यामुळे मूळ यादी तसेच लोकसत्ता व ललित मासिकाची कात्रणे उपलब्ध झाली. श्री. अरूण टिकेकर (Hindustantimes.com) व श्री. बापूसाहेब रेगे (prahaar.in) यांची छायाचित्रे google images वरून उपलब्ध झाली.
Hits: 254
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.वाचण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.आपल्याकडे व्यक्तीला ‘बहुश्रुत’म्हटले जाते,श्रवण भक्ती चे प्रमाण जास्त. यू-ट्यूब वर ऐकणे हे जास्त लोकप्रिय आहे.पत्र लिहिण्या पेक्षा बोलणे प्रत्यक्ष हे जास्त होते.आता ‘भ्रमणध्वनी’सगळ्यांच्या हातात आल्यावर लोकं बोलणे जास्त पसंत करतात.सातासमुद्रापार लगेच बोलता येते.
धन्यवाद श्रीकांत, वाचनसंस्कृतीवर मोबाइल, टीव्ही, यूट्यूबचे दुष्परिणाम हे एक वास्तव आहे. त्याची कारणे हा संशोधनाचा विषय आहे.
मुळात पालकांना वाचनाबद्दल किती प्रेम आहे, ह्याबद्दल शंका आहे.मुलांना तुम्ही टीव्ही आणि मोबाईल बघू नका, आतल्या खोलीत वाचन करा, आम्हाला मोबाईल बघू दे किंवा सुमार मालिका बघायच्या आहेत,हाच अनुभव बहुतेक येतो आहे.
धन्यवाद. आपले निरीक्षण बरोबर आहे. पालक हे मुलांचे पहिले गुरु असतात. आणि मुले सूचना पाळून नव्हे तर अनुकरण करून शिकत असतात.
खरंतर ही पुस्तकं मुलांसाठी म्हणण्यापेक्षा मोठ्यांसाठी म्हणजे पालकांसाठी प्रथम आहेत , असे म्हणायला पाहिजे . मुलं वाचत नाहीत अशी ओरड करण्यापेक्षा , मुलांना वाचनप्रवृत्त करण्यात पालक कमी पडतात , असे म्हणणे रास्त ठरेल . पुस्तकांची निवड चांगलीच आहे , तरी वयोगटाचा उल्लेख आवश्यक वाटतो.
धन्यवाद. सामान्यतः कुमार वयापर्यंत आपला पाल्य काय वाचतोय किंवा वाचणार आहे यावर लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी असतेच. त्या न्यायानेही ही पुस्तके प्रथम पालकांसाठीच आहेत. “मुलं वाचत नाहीत अशी ओरड करण्यापेक्षा , मुलांना वाचनप्रवृत्त करण्यात पालक कमी पडतात , असे म्हणणे रास्त ठरेल” हे आपले वाक्य पटले. पुढच्या लेखात दुरुस्ती करू. वयोगटाच्या उल्लेखाची आवश्यकताही मान्य. मात्र मी पाहिलेल्या तीनही याद्यांमध्ये वयोगटाचा उल्लेख नव्हता. प्रकाशित यादी बनवण्यात सिंहाचा वाटा असलेले श्री. गजानन थत्ते यांचे याबाबतीतले मत विचारून कळवतो.