पाढ्यांची गाणी – १६ ते २०
पाढ्यांच्या गाण्याबाबतचे निवेदन वाचले नसल्यास इथे वाचा.
सोळाचा पाढा – देऊळ आणि घर
सोळा एके सोळा । मातीचा बनवला गोळा ॥
सोळा दुणे बत्तीस । त्याचा केला कळस ॥
सोळा त्रीक अठ्ठेचाळ । कळस हवा जसे कमळ ॥
सोळा चोक चौसष्ट । कमळाच्या पाकळ्या चौसष्ट ॥
सोळा पंचे ऐंशी । कमळाखाली पाने जैशी ॥
सोळा सक शाहाण्णव । कळसाखाली कृष्ण देव ॥
सोळा सत्ते बारोदरसे । देवळाजवळ घर लहानसे ॥
सोळा आठे अठ्ठाविसासे । घरात राहायला हवीत माणसे ॥
सोळा नव्वे चव्वेचाळासे । आई बाबा ताई भाऊसे ॥
सोळा दाही साठासे । देवळात वाजती ढोल ताशे ॥
- मंगला द. मुंडले
सत्राचा पाढा – गणपतीचा प्रसाद
सत्रा एके सत्रा । आमंत्रण करुया मित्रा ॥
सत्रा दुणे चौतीस । त्यांना बोलावू प्रसादास ॥
सत्रा त्रीक एकावन । चतुर्थीला पुजू गजानन ॥
सत्रा चोक अडुसष्ट । प्रसाद देऊ मूठ मूठ ॥
सत्रा पंचे पंचाऐंशी । मित्रांना घेऊ हाताशी ॥
सत्रा सक दुवोदरसे । खोबरे किसूया हातासरसे ॥
सत्रा सत्ते एकोणिसासे । दाणे सोलू वार्यावरसे ॥
सत्रा अठ्ठे छत्तीसासे । खारका कुटूया हळू हळूसे ॥
सत्रा नव्वे त्रेपन्नासे । तीळ धुवूया पाण्यावरसे ॥
सत्रा दाहे सत्तरासे । गुळात मिसळून प्रसाद होतसे ॥
- मंगला द. मुंडले
अठराचा पाढा – पावसाची तयारी
अठरा एके अठरा । विकत आणला पत्रा ॥
अठरा दुणे छत्तीस । आता येईल पाऊस ॥
अठरा त्रीक चोपन्न । कपडे जातील भिजून ॥
अठरा चोक बाहात्तर । कपडे घालू वाळवल्यावर ॥
अठरा पंचे नव्वद । मग होइल आनंद ॥
अठरा सक अष्टोदरसे । पत्र्याचे केले आडोसे ॥
अठरा सत्ते सव्वीसासे । कपडे धुवून होतिल ऐसे ॥
अठरा आठे चव्वेचाळासे । वाळत घालू हातासरसे ॥
अठरा नव्वे बासष्टासे । वाळलेले काढू ऐसे ॥
अठरा दाहे ऐंसासे । मुले पावसा देती पैसे ॥
- मंगला द. मुंडले
एकोणीसचा पाढा – असे खाल्ले कणीस
एकोणीस एके एकोणीस । विकत आणले एक कणीस ॥
एकोणीस दुणे अडतीस । कणसाला पडले पैसे तीस ॥
एकोणीस त्रीक सत्तावन । मग घेतले धुवून ॥
एकोणीस चोक शाहात्तर । भाजून घेतले त्यानंतर ॥
एकोणीस पाचा पंचाण्णव । लिंबू मीठ तिखट लाव ॥
एकोणीस सक चौदोदरसे । दाणे काढले हातासरसे ॥
एकोणीस सत्ते तेहेतीसासे । सार्यांना दिले हातावरसे ॥
एकोणीस अठ्ठे बावन्नासे । सुके मके भाजून कसे ॥
एकोणीस नव्वे एकाहत्तरासे । बटमोगरीचे फूल जसे ॥
एकोणीस दाहे नव्वदासे । मुलामुलींना आवडे खासे ॥
- मंगला द. मुंडले
वीसचा पाढा – परकर-पोलका
वीस एके वीस । मुली येथे येउन बैस ॥
वीस दुणे चाळीस । नेसवीन परकर पोलक्यास ॥
वीस त्रीक साठ । परकर चोळी जरी काठ ॥
वीस चोक ऐंशी । बसंती रंग अंग रेशमी ॥
वीसा पाचा शंभर । परकर शिवला चुणीदार ॥
वीस सक विसासे । पोलक्याचे हात उडती कसे ॥
वीसा साते चाळासे । गळपट्टीला चंद्रहार असे ॥
वीसा आठा साठासे । बटणावर फुलपाखरू वसे ॥
वीस नव्वे ऐंसासे । परकराला गोंडा असे ॥
वीस दाहे दोनशे । परकर नेसुन खेळ ग हर्षे ॥
- मंगला द. मुंडले
Hits: 34
शाळेत पाढे पाठ करायचे म्हणजे एक संकटच असायचे.
हे तर त्यातून काव्य करणे म्हणजे कमालच आहे .
नमस्कार.