मुंबई ग्राहक पंचायत- जगाच्या मंचावर – २

परिचय

भारतीयांनी जगाच्या मंचावर आपला प्रभाव पाडणार्‍या घटना या नेहेमीच आनंददायक असतात. त्यापैकीच ही एक. आनंदवर्धक बाब ही की या घटनेशी संबंधित दोन व्यक्ति (लेखक शिरीष देशपांडे व एक सहकारी वसुंधरा दाते देवधर) या माझ्या पाटिविमधील सहाध्यायी होत्या.

शिरीष देशपांडेचा मूळ लेख वॉट्सपवर फिरत होता, त्याचे हे सचित्र व संपादित रूप – भाग दुसरा.

भाग पहिला, वाचला नसल्यास, इथे वाचा.

स्मरणरंजन – वर्धापन दिनाचे – २

UNCTAD च्या जिनिव्हा बैठकीत मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे मांडलेल्या एका सूचनेवर UNCTAD ची परिषद लागोपाठ दोन दिवस साधक बाधक चर्चा करते, त्यावर समग्र अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी दहा देशांचा एक कृतिगट स्थापन करते, हे आपण पहिल्या भागात वाचले. त्यामुळे मला झालेला आनंद हा टेस्ट क्रिकेटमधे प्रथम पदार्पणातच शतक झळकवणाऱ्या क्रिकेटरच्या आनंदापेक्षा वेगळा नव्हता. या सर्व प्रकरणात कंझ्युमर्स इंटरनॅशनलने आपल्या सूचनेला वेळोवेळी विरोध करुनही आपली सूचना आपण UNCTAD ला गंभीरपणे विचारात घ्यायला लावण्यात अखेर यशस्वी झालो होतो. त्यामुळे या आनंदात आणखीनच भर पडली होती!

शुभदा चौकर व शिरीष देशपांडे UNCTAD परिषदेत

पण मी, शुभदा आणि सगळेच या आनंदात असताना एका गोष्टीचं आम्हा दोघांनाही राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. ते म्हणजे जिनिव्हातील त्या दोन‌ दिवसातील आपल्या सूचनेवरील चर्चेत भारत सरकारतर्फे उपस्थित ग्राहक व्यवहार मंत्रालयातील अतिरिक्त सचिव या चक्क मूग गिळून गप्प होत्या. त्यासाठी त्यांनी दिल्लीहूनच मुगाची पिशवी भरुन‌ आणली होती की काय असा प्रश्न पडावा. वास्तविक पाहता आपल्या सुचनेचं महत्त्व सांगण्यासाठी मी आणि शुभदा जिनिव्हा परिषदेपूर्वी आवर्जून या सचिव बाईंना दिल्लीत भेटून पूर्वसूचन (briefing) केलं होतं. आपल्यातर्फे हा विषय मांडला जाईल त्यावेळी भारत सरकारतर्फे या सूचनेला पाठिंबा द्यावा असे लेखी निवेदनही आपण सरकारला दिलं होतं.

इतकंच नाही तर प्रत्यक्ष परिषदेत माझी बोलण्याची वेळ येताच मी शुभदाला त्या सचिव बाईंजवळ जाऊन परत आठवण करण्यास सांगितले. परंतू बाई गप्प! एका भारतीय ग्राहक संस्थेने केलेली महत्त्वपूर्ण सूचना दोन‌ दिवस UNCTAD च्या परिषदेत अक्षरशः गाजतेय, आणि त्यावर भारत सरकारचा अधिकृत प्रतिनिधी मूग गिळून गप्प कसा, याबाबत आम्हा दोघांनाही अनेक देशांतील शासकीय प्रतिनिधींनी कॉफी ब्रेक, लंच ब्रेकमध्ये छेडले. आम्ही काही तरी सांगून कशीबशी वेळ मारुन नेली खरी. पण आम्ही दोघंही या सर्व प्रकाराने काहीसे अस्वस्थ झालो होतो हे मात्र खरे!

खरं म्हटलं तर आपला एक भारतीय ग्राहक कार्यकर्ता संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यासपीठावर एक अनोखी आणि महत्त्वपूर्ण सूचना करतोय, त्या सूचनेवर भरघोस चर्चा होतेय. पण आमच्या सरकारच्या प्रतिनिधीला त्याचा ना अभिमान, ना त्याला पाठिंबा देण्याची दानत! दोन‌ दिवसांच्या या संपूर्ण परिषदेत या सचिव बाईंनी एक शब्दही उच्चारला नाही. पण त्यासाठी सरकारने मात्र या बाईंचा business classचा विमान खर्च, जिनिव्हासारख्या महागड्या शहरात पंचतारांकित हॉटेलात वास्तव्याचा खर्च हे सर्व आपल्या नागरिकांच्या पैशाच्या जीवावर केले. हे सर्व पाहून मन‌ उद्विग्न झाले. पण अशी कामं करताना अशा अनुभवांनी आपल्याला निराश होऊनही चालत नाही. आपल्या कामावर आपली दृढ श्रद्धा हवी. आपण आलात बरोबर, तर स्वागत आहे. नाही आलात, तर एकटे जायची पण तयारी हवी.

बऱ्याच वेळी आपल्या सूचनांना विरोध होतो. संघटित विरोध होतो. त्यावेळी आपली खरी कसोटी असते. जिनिव्हाला त्या परिषदेत हा विरोधही आपल्याला चाखावा लागला. आपणा सर्वांनाच माहित आहे, की संयुक्त राष्ट्रांच्या बहुतांशी सर्व परिषदांवर अमेरिकेचं प्रचंड वर्चस्व आहे. अमेरिकेच्या साथीला असतात, ते इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया हे प्रगत देश. आपल्या बाबतही नेमकं हेच घडलं. या सर्व प्रगत राष्ट्रांनी आपल्या UN Commission for Consumer Protection या सूचनेला धारदार विरोध केला. परंतू बऱ्याच विकसनशील देशांनी आणि विशेषतः ब्राझिलने आपल्या सूचनेला पाठींबा दिल्याने आपली सूचना संपूर्णपणे फेटाळली जाण्याऐवजी त्यावर दहा देशांचा एक कृतिगट (Working Group) नेमला गेला. ही गोष्टच मुळी फार मोठी होती. त्यामुळे बऱ्याच पांढऱ्या भुवया जिनिव्हात वर उंचावलेल्या दिसल्या. परंतू काय करणार, आपलं नाणंच खणखणीत होतं. एकदम कडssssक.

वसुंधरा देवधर
वर्षा राऊत

तर अशा सर्व नाट्यमय परिस्थितीत आम्ही भारतात परतलो. त्यानंतर‌ आपल्या सूचनेचा समग्र अभ्यास करण्यासाठी नेमलेला दहा देशांचा कृतिगट कार्यरत झाला. कृतिगटाने त्यावर सर्वसमावेशी प्रश्नावली तयार करुन सर्व देशांकडून त्यावर मते मागवली. आपणही त्यात सहभागी झालो. त्या सर्वांचे संकलन, त्या संकलनाचे सर्वांना आदान प्रदान आणि मग वर्षभरात पुन्हा जिनीव्हात दोन दिवसांची परिषद. या परिषदेत आपल्या सूचनेबरोबरच UNGCP मधे अन्य कोणत्या सुधारणा हव्यात यावरही आणखी तीन वेगवेगळे कृतिगट नेमले गेले होते. आपण या चारही गटांत आपल्या संस्थेतर्फे तसेच कंझ्युमर्स इंटरनॅशनल तर्फे बाजू मांडत होतो. या बाबतचा अभ्यासही आपण चार गटांत विभागून घेतला. त्यासाठी शुभदा चौकर, वर्षा राऊत आणि वसुंधरा देवधर यांचं मला खूप मोलाचं अभ्यासपूर्ण सहकार्य मिळालं. ललिताताईंचे परिपक्व मार्गदर्शन/सूचना याशिवाय आमचं पान कधी हललंच नाही.

ललिता कुलकर्णी

या सर्वाचा एक छान परिणाम होत गेला. एकीकडे आपण कंझ्युमर्स इंटरनॅशनल बरोबर आदानप्रदान (interact) करत होतो तर दुसरीकडे UNCTAD च्या माध्यमातून इतर देशोदेशीच्या शासकीय प्रतिनिधींच्या संपर्कात येत होतो. आपला अभ्यास, व्यासंग, मांडणी, सादरीकरणे, तसेच वेळोवेळी येत जाणाऱ्या विविध सूचनांवरील आपल्या फेरदुरुस्त्या, आक्षेप, सुधारित सूचना या सर्व गोष्टींची UNCTAD मधे तसेच देशोदेशीच्या प्रतिनिधींमधे नोंद आणि दखल घेतली जात होती. दोन वर्षांहून अधिक काळ ही प्रक्रिया चालू होती. आणि कळत नकळत MGP-India हे नाव UNCTADच्या परिषदांत आणि परिसरातही सुंदर अक्षरात कोरले जात होतं.

अर्थात यासाठी आपण घेतलेले परिश्रम, केलेली मेहनत, ही प्रचंड होती. दुसऱ्या टप्प्यात वर्षा राऊत हिने दिलेलं योगदान खरोखर वाखाणण्याजोगे होते. UNCTAD परिषदेतील परदेशी प्रतिनिधी आजही वर्षाची आठवण आवर्जून काढतात. याला कारण म्हणजे तिनेसुद्धा माझ्याप्रमाणेच या विषयात एकदा उडी घेतल्यावर झपाटल्यासारखे काम केले. जिनिव्हाच्या दोन परिषदांत प्रत्यक्ष सहभागी होऊन विरोधकांचे मुद्दे खोडून काढणे, आपले मुद्दे कौशल्याने लढवत पुढे नेणे हे सर्व वर्षाने मोठ्या आत्मविश्वासाने केले, हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. विशेष हे की ज्या गोष्टी कंझ्युमर्स इंटरनॅशनलच्या विद्वान सल्लागारांच्याही नजरेतून सुटल्या, त्या नेमक्या वर्षाने टिपल्या आणि आपल्यातर्फे त्या CI आणि UNCTAD च्या नजरेस वेळीच आणून‌ दिल्या. त्यामुळे या सुधारित UNGCPमधे MGPचे योगदान खरोखरच प्रचंड आहे असं म्हटलं पाहिजे. ही अतिशयोक्ती नसून ती सर्वांनी मान्य केलेली वस्तुस्थिती आहे हे लक्षात ठेवणं‌ आवश्यक आहे. सुधारीत UNGCP प्रक्रियेतील या सर्वांना चकीत करणाऱ्या संस्थेच्या भरीव योगदानामुळेच United Nations च्या स्तरावर MGP-India हे गेल्या काही वर्षांत एक Brand name होऊन बसलंय.

रामदास गुजराथी

अर्थात वरवर हे सर्व आम्हा तीन, चार कार्यकर्त्यांचं काम दिसत असलं तरी एक संस्था म्हणून बघताना मला आपल्या वरिष्ठांचा आणि कार्यकारिणीवरील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आणि हा केवळ उपचार म्हणून नाही. या संबंधित काळात प्रा. रामदास गुजराथी हे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि मला या कामात संपूर्ण स्वातंत्र्य दिले. तसेच पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनीसुद्धा माझ्या परदेश वाऱ्यांबद्दल किंवा माझ्या मदतीला अन्य कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याबद्दल कधीच खळखळ केली नाही. संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय भूमिका घ्यायची याचं पूर्ण स्वातंत्र्य माझ्या सहकाऱ्यानी मला दिलं होतं. तसेच यासाठी उठसूठ परदेश प्रवासासाठी लागणारा खर्च ही फक्त आपल्यासारखी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण संस्थाच करू शकते. आणि ही स्वयंपूर्णताही आपल्या वितरण व्यवस्थेतील फार मोठ्या सदस्य संख्येमुळे आहे. म्हणजेच आपल्या या जागतिक कामगिरीत केवळ आम्हा तिघा, चौघा कार्यकर्त्यांचेच योगदान नसून आपल्या प्रत्येक सदस्याचाही या यशात, या कीर्तीत खारीचा वाटा आहे!

UNGCPची लढाई जिनीव्हात उत्तरोत्तर कशी कठीण आणि तितकीच रंगतदार होत गेली आणि “अंती विजयी ठरू” हे आपण कसं काय साध्य केलं ते वाचूया पुढच्या भागात. (क्रमशः)

शिरीष देशपांडे (मुंबई ग्राहक पंचायत)

Hits: 156

You may also like...

2 Responses

  1. Anand Golwalkar says:

    Superb.

  2. Shirish Deshpande says:

    Thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *