मुंबई ग्राहक पंचायत- जगाच्या मंचावर – १

परिचय

भारतीयांनी जगाच्या मंचावर आपला प्रभाव पाडणार्‍या घटना या नेहेमीच आनंददायक असतात. त्यापैकीच ही एक. आनंदवर्धक बाब ही की या घटनेशी संबंधित दोन व्यक्ति (लेखक शिरीष देशपांडे व एक सहकारी वसुंधरा दाते देवधर) या माझ्या पाटिविमधील सहाध्यायी होत्या.

शिरीष देशपांडेचा मूळ लेख वॉट्सपवर फिरत होता, त्याचे हे सचित्र व संपादित रूप तीन भागात.

विश्वास द. मुंडले

स्मरणरंजन – वर्धापन दिनाचे -१

आपल्या आयुष्यातील काही काही पाने इतकी सुंदर लिहीली गेली असतात की ती परत परत वाचण्याचा मोह नाही आवरता येत! आज असंच झालंय!! निमित्त काय? तर आज १६ एप्रिल. संयुक्तराष्ट्र आमसभेने (United Nations General Assembly किंवा UNGA ने) याच दिवशी १९८५ साली संयुक्तराष्ट्रकृत ग्राहक-संरक्षक-तत्वांना (UN Guidelines for Consumer Protection म्हणजेच UNGCP) ला मान्यता दिली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे सुद्धा UNGCP ने प्रभावित झाले होते. १९८६ च्या डिसेंबरमधे भारतात जो ग्राहक संरक्षण कायदा संमत झाला त्यामागे हेही एक कारण होते. गेल्या ३५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध तरतुदींचा अर्थ लावताना याच UNGCP चा आधार घेत ग्राहकाभिमुख असे महत्त्वपूर्ण (landmark) निवाडे दिले आहेत. अशा या ग्राहकांच्या दृष्टीने जागतिक महत्त्वाच्या दस्तावेजात महत्त्वाच्या सुधारणा सुचवण्याची आणि प्रमुख भूमिका बजावण्याची संधी मुबई ग्राहक पंचायत (MGP) या आपल्या संस्थेला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.

पण अनेकदा सत्य हे स्वप्नाहूनही अद्भुत असतं. २०११मधे माझी संस्थेतर्फे कंझ्युमर्स इंटरनॅशनल (CI) च्या संचालक मंडळावर चार वर्षांसाठी निवड झाली आणि एक नवा जागतिक महामार्गच माझ्यासमोर खुला झाला. खरं तर २०१०सालीच UNGCP च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मी CI ला UNGCP मधे महत्त्वाच्या सुधारणांची आवश्यकता आहे हे पटवून त्यानिमित्ताने त्यावर एक परिषद आयोजण्याचा प्रस्ताव दिला होता. पण CI च्या मंडळींनी तो काही फारसा मनावर घेतला नाही.

पण २०१२ मधे संयुक्तराष्ट्रांच्या व्यापार व विकास आयोगाच्या (UNCTAD च्या) एका बैठकीसाठी CI तर्फे जिनीव्हाला जाण्याची संधी आली. आणि मी ती चक्क उचललीच. निमित्त होते UNGCP मधे एक दुरुस्ती सुचवण्याचे. CI ला ग्राहकांच्या ज्ञानाधिकाराचा (म्हणजेच Access to Knowledge – A2K) चा अंतर्भाव UNGCP मधे करुन हवा होता. पण माझा आग्रह होता, की नुसती एक दुरुस्ती कशाला? संपूर्ण UNGCPचाच फेर आढावा घेण्याची आणि समग्र सुधारणा करण्याची वेळ आली आहे. सुरवातीला विरोध करत शेवटी माझ्या आग्रहाखातर CI ने मला UNGCP मधे अशा समग्र सुधारणा करण्याची मागणी करण्यास संमती दिली. ६ मार्च २०१२ रोजी जिनीव्हात UNCTAD च्या बैठकीत ही मागणी मी CI तर्फे मांडली. यथावकाश ऑक्टोबर २०१२ मधे UNCTAD ने UNGCP च्या आढावा-दुरुस्तीसाठी (Review & Revision साठी) हिरवा कंदील दाखवला आणि त्यासाठी CI कडून सूचनाही मागवल्या.

आणि मग सुरू झाला, आणखी मोठा खडतर प्रवास. CI ने या विषयावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत सर्व ग्राहक संघटनांची एक जागतिक परिषद आयोजिली. यात मी आणि शुभदा चौकर सहभागी झालो. तिथे आपण एक नवीन असा विचार मांडला. म्हणजे चर्चेअंती CI काही सूचना UNCTAD ला प्रस्तावित करेल आणि त्यातील अनेक सुचना UNCTAD मान्य सुद्धा करेल. पण अखेरीस या सुधारीत UNGCP ची जगभरात, आणि विशेषतः विकसनशील आणि अविकसित देशांत, अंमलबजावणी होतेय की नाही हे‌ कोण बघणार?  मी आणि शुभदाने यावर बराच सखोल अभ्यास करुन या अंमलबजावणीसाठी संयुक्तराष्ट्रप्रणीत ग्राहकसंरक्षण आयोग (UN Commission on Consumer Protection किंवा UNCCP) स्थापन करण्यात यावा आणि त्यासाठी अस्तित्वात असलेल्या संयुक्त राष्ट्रांतील वेगवेगळ्या आयोगांचे (UN Commissions) चे दाखलेच CI पुढे मांडले. पण CI च्या वरिष्ठ नेत्यांचा आणि सल्लागारांच्या याला सक्त विरोध झाला. हे असं काही मांडलं तर UNCTAD बाकीच्या सूचनाही विचारात घेणार नाही असं दडपण आपल्यावर त्यावेळी आणलं गेलं.

पण मी आणि शुभदा त्यावेळी इतके झपाटलो होतो की कोणतीही तडजोड करण्याच्या मन:स्थितीतच नव्हतो.‌ कारण आम्हा दोघांनाही अशा ग्राहक-संरक्षक-आयोगाचं महत्त्व पूर्णतः पटलं होतं. अखेरीस CI ने आपण आपल्या संस्थेतर्फे (MGP तर्फे) केलेल्या या सूचनेचा UNCTAD ला पाठवायच्या सूचनांमधे शेवटची, म्हणजेच विसावी सूचना म्हणून अंतर्भाव करण्यास काहीशा नाइलाजानेच मान्यता दिली. त्यावेळी शुभदाने सुद्धा CI च्या सल्लागारांना चोख उत्तर देऊन गप्प केलं होतं हे मी कधीच विसरू शकणार नाही.

UNCTAD परिषदेत मध्ये शुभदा चौकर व शिरीष देशपांडे

त्यानंतर २०१३ मधे UNCTAD ची जिनीव्हात UNGCP मधील फेरबदलांवर (revision वर) चर्चा करण्यासाठी दोन दिवसांची परिषद झाली. CI चे दोन/ तीन पदाधिकारी, मी, आणि मला मदतीला शुभदा असे आम्ही जिनीव्हात दाखल झालो. आता UNCTAD ची ही बैठक असते, ती देशोदेशीच्या सरकारी मंत्री/अधिकाऱ्यांची. बैठकीत सर्व निर्णय ही मंत्री/अधिकारी मंडळीच घेतात. CI किंवा मुंबई ग्राहक पंचायत (MGP), म्हणजे आपण, तिथे निरीक्षक पदावरच (Observer status) असतो. आपलं म्हणणं केवळ ऐकून घेतलं जातं. ते सुद्धा सर्व देशांच्या सरकारी प्रतिनिधींच्या सादरीकरणानंतरच. UNCTAD च्या प्रथेनुसार (Protocol नुसार) निरीक्षकांच्या सूचनांची नोंद घेतली जाते, पण त्या सूचनांवर चर्चा देखील होत नाही! त्यानुसार UNGCP मधील बदल हा विषय चर्चेला आला तेव्हा देशोदेशीच्या शासकीय प्रतिनिधींनी आपापले विचार मांडले. मग अखेरीस पाळी आली CI ने मांडलेल्या सूचनांची. पहिल्या १९ मुद्यांवर CI च्या दोन प्रतिनिधींनी सादरीकरण केले. आणि शेवटच्या २०व्या सूचनेवर, जी आपली सूचना होती, त्यावर बोलण्यासाठी मला सांगण्यात आलं.

शिरीष देशपांडे

UNCTAD चा वर उल्लेखिलेल्या प्रथेचा (protocol चा) संदर्भ देत मी सुरवातीलाच सभेच्या माननीय अध्यक्षांना विनंती केली की मी करणार असलेली ही सूचना अनोखी आणि तितकीच महत्त्वाची असल्याने, एक विशेष बाब म्हणून आपण आपला protocol जरासा बाजूला ठेवून माझ्या सादरीकरणानंतर सरकारी प्रतिनिधींना आपापली मते व्यक्त करण्याची संधी द्यावी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अध्यक्षांनी त्याला त्वरित मान्यता दिली. एका वेगळ्याच खुशीत मी आपली सूचना मांडली, आणि अपेक्षेप्रमाणे एका मागून एक देशोदेशीच्या सरकारी प्रतिनिधींचे यावर बोलण्यासाठी फलक (sign boards) उंचावले गेले. काहींनी आपली सूचना उचलून धरली. तर काहींनी अंमलबजावणी करू न शकल्यास कारवाई काय होईल याबाबत भिती/शंका उपस्थित केल्या. त्यामुळे अध्यक्षांनी परत चेंडू माझ्या कोर्टात टाकला. मला आपली सूचना परत सविस्तर समजावून सांगण्याची आयतीच संधी मिळाली.

त्या दोन दिवसांच्या परिषदेत UNGCP च्या अंमलबजावणीसाठी आपल्या सूचनेनुसार UN Commission on Consumer Protection (किंवा UNCCP) स्थापन करावं का, करायचं झालं तर त्याचं स्वरुप कसं असेल, त्याचा आर्थिक भार किती असेल यावर बरीच साधक बाधक चर्चा झाली. अंतिमतः त्यावर अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी UNCTAD ने दहा देशांच्या प्रतिनिधींचा एक कृतिगट (Working Group) नेमला. अशा रितीने एक ऐतिहासिक लढाई अर्धी जिंकून आम्ही भारतात परतलो.

पण जिनिव्हात आपल्याला मिळालेल्या यशाला एक बारीकशी काळी किनारही होती, ती पुढच्या भागात पाहू.

शिरीष देशपांडे (मुंबई ग्राहक पंचायत)

(क्रमशः)

Hits: 146

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *