पाढ्यांची गाणी – दोन ते पाच

परिचय

पाढ्यांची गाणी करण्याचे आईला कसे सुचले याबद्दल तिने काही लिहून ठेवलेले नाही, किंवा याबाबत कधी बोलणेही झाले नाही. पण शाळकरी असताना संध्याकाळी खेळून घरी आल्यावर आम्हाला परवचा म्हणावी लागे. त्यात शुभंकरोति, स्तोत्रे, रामरक्षा, व सर्व पाढे असत. हे सगळे लयीत व सुरात चाले, आणि तेही पुस्तकात बघून. पाठांतराची सक्ती न करता पुस्तकात बघून म्हणणे हे नावीन्य माझ्या वडिलांनी चालू केलेले. त्याचा फायदा असा की कुठलाही ताण न घेता, आपआपल्या वेगाने कळत नकळत पाठांतर होऊन जाई. यथावकाश पुस्तकाची गरजच संपून जाई.

आई देखील हे सर्व आमच्यासोबत म्हणत असे. तिला सगळे पाठ होते. पाढे म्हणताना मुलांना येणारा कंटाळा तिला दिसत असावा. त्यावर इलाज म्हणून तिने ही गाणी रचली असावीत असे मला वाटते. त्याकाळात पाउणकीचे एक गाणे विनोदाने म्हटले जाई –

एक पावणे पावणे । घोड्यावर बसले रावणे ॥ रावणाने मारला तीर । बे पावणे दीड ॥ पुढचे विसरलो.

याच धर्तीवर तिने दोन ते वीसच्या पाढ्यांची गाणी रचलेली दिसतात. पण ती वर दिलेल्या पाउणकीच्या गाण्याइतकी थिल्लर नाहीत. बोधप्रद वा माहितीपर आहेत. कल्पनाशक्तीला वाव देताना तिने एकाच पाढ्याची अनेक गाणीही रचली आहेत. दहाच्या पुढच्या पाढ्यांत शेवटी शेवटी शंभराचा निदर्शक म्हणून अनेकवेळा शब्दांती ‘से’ येतो. त्याचे यमक जुळवताना काही ठिकाणी पुनरावृत्ती झाली आहे. मात्र त्यामुळे मुलांना पाढ्यांकडे वळवण्याचा हेतू साधण्यात काही अडचण येऊ नये.

मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या गाण्यांचा कसा वापर करता येईल? उदाहरणार्थ, मुलांकडून पाढे म्हणून घेताना मुलांना पहिला चरण (बे एके बे) म्हणू द्यावा व शिक्षकाने दुसरा चरण (भारतीय गणराज्य हे) म्हणावा. जेणेकरून मुलांना पुढचा चरण (बे दुणे चार) आठवायला वेळ मिळेल. तसेच जास्तीची माहिती त्यांच्या कानावरून जाईल. किंवा याउलट शिक्षकाने दुसरा चरण आधी म्हटला (भारतीय गणराज्य हे) तर यमकावरून मुलांना पाढ्याचा चरण (बे एके बे) आठवायला सूचना मिळेल का?

मी या बाबतीत मत देण्याइतका अनुभवी नाही. कल्पक पालक व व्यावसायिक शिक्षकांना कदाचित याहून चांगले मार्ग सुचतील.

-विश्वास द. मुंडले

दोनचा पाढा (१) – भारताचा परिचय

बे एके बे । भारतीय गणराज्य हे ॥

बे दुणे चार । तिथे आपुले सरकार ॥

बे त्रीक सहा । अपुला झेंडा तिरंगी हा ॥

बे चोक आठ । कारभार चाले नीट ॥

बे पंचे दाहा । राज्ये केली पाहा ॥

बे सक बारा । सुलभ झाले कारभारा ॥

बे साती चौदा । भाषा आपल्या चौदा ॥

बे आठे सोळा । सर्व धर्म इथे गोळा ॥

बे नव्वे अठरा । देश असे संपन्न खरा ॥

बे दाहे वीस । राजधानी दिल्लीस ॥

-मंगला द. मुंडले

दोनचा पाढा (२) – दिवाळीचा खाऊ

बे एके बेऽ । आईने खाऊ केला आहे ॥

बे दुणे चार । चकली काटेदार ॥

बे त्रीक सहा । तिखट पाहे चिवडा हा ॥

बे चोक आठ । करंजीची वाकडी पाठ ॥

बे पंचे दाहा । जाळीदार अनारसा हा॥

बे सक बारा । शेवेचा हा धागा दोरा॥

बे साती चौदा । चिरोट्याला असतो पडदा ॥

बे आठे सोळा । लाडू गोल वाटोळा ॥

बे नव्वे अठरा । कडबोळी मारी चकरा॥

बे दाहे वीस । एवढे केले दिवाळीस ॥

-मंगला द. मुंडले

तीनचा पाढा (१) – नितीनची गोष्ट

तीन एके तीन । एक होता नितीन ॥

तीन दुणे सहा । त्याने केला विचार हा ॥

तीन त्रीक नऊ । सगळे मिळून बाहेर जाऊ ॥

तीन चोक बारा । त्याने केला हाकारा ॥

तीन पंचे पंधरा । दोस्त जमले भराभरा ॥

तीन सक अठरा । नितीन होता भित्रा ॥

तीन साते एकवीस । त्यावर पडलं चिमणीचं पीस ॥

तीन आठे चोवीस । तो झाला कासावीस ॥

तीन नव्वे सत्तावीस । लोळू लागला ऐसपैस ॥

तीन दाहे तीस म्हणा । पळून गेला शूरपणा ॥

-मंगला द. मुंडले

तीनचा पाढा (२) – काय काय किती किती?

तीन एके तीन । काळ आहेत तीन ॥

तीन दुणे सहा । ऋतू आहेत सहा ॥

तीन त्रीक नऊ । ग्रह आहेत नऊ ॥

तीन चोक बारा । वर्षाचे महिने बारा ॥

तीन पंचे पंधरा । तिथी आहेत पंधरा ॥

तीन सक अठरा । पुराणे आहेत अठरा ॥

तीन साते एकवीस । गणपतिला दूर्वा एकवीस ॥

तीन आठे चोवीस । दिवसाचे तास चोवीस ॥

तीन नव्वे सत्तावीस । नक्षत्रे आहेत सत्तावीस ॥

तीन दाहे तीस म्हणा । महिन्याचे दिवस तीस ॥

-मंगला द. मुंडले

चारचा पाढा – स्वयंपाकाचे गाणे

चार एके चार । बाजरीची केली भाकर ॥

चार दुणे आठ । भाजीला चिरला माठ ॥

चार त्रीक बारा । टोमॅटो उकडले तेरा ॥

चार चोक सोळा । ताकावर लोण्याचा गोळा ॥

चार पंचे वीस । डाळ शिजवली आमटीस ॥

चार सक चोवीस । कणीक भिजवली पोळीस ॥

चारा सत्ते अठ्ठावीस । गाजर किसले कोशिंबिरीस ॥

चारा आठे बत्तीस । खोबरे खवले चटणीस ॥

चार नव्वे छत्तीस । तांदूळ धुतले भातास ॥

चार दाहे चाळीस । आई म्हणाली शाब्बास ॥

-मंगला द. मुंडले

पाचचा पाढा – अभ्यास व बक्षीस

पाच एके पाच । पुस्तक घेउन वाच ॥

पाच दुणे दहा । नवा धडा उघडू हा ॥

पाच त्रीक पंधरा । वाचू नको भराभरा ॥

पाच चोक वीस । मांडी घालून बैस ॥

पाचा पाचा पंचवीस । धडे नेहेमी वाचावेस ॥

पाच सक तीस । म्हणून लावले बक्षीस ॥

पाचा साते पस्तीस । कसले हवे बक्षीस ॥

पाचा आठे चाळीस । सांगू नको कोणास ॥

पाच नव्वे पंचेचाळ । बक्षीस हवी मोत्याची माळ ॥

पाच दाहे पन्नास । पास झाले की बक्षीस ॥

-मंगला द. मुंडले

Hits: 71

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *