त्रिएस्ते नाट्य – भाग ३ – कळस प्रतिकळस
त्रिएस्ते नाट्यातील या अंकाच्या मुख्य सूत्रधार होत्या – अमेरिकेच्या इटालीतील वकील मिसेस क्लेअर बूथ ल्यूस. अमेरिकन इतिहासात इटालीसारख्या महत्वाच्या देशात, आणि महत्वाच्या काळात, दूत म्हणून नेमलेली पहिली स्त्री. कित्येक वर्षे अमेरिकन कॉंग्रेसची सभासद राहिलेल्या मिसेस ल्यूस या नुसत्याच चतुर आणि प्रभावशाली राजकारणी/ राजदूत नव्हत्या तर एक नाटककार व युद्धपत्रकारही होत्या. त्यांना भारताबद्दल सहानुभूति होती. भारताला स्वातंत्र्य दिलेच पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. इतकेच नव्हे तर १९४६ साली एक कायदा करून भारतीयांना अमेरिकेत स्थलांतर करण्यावर व अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्यावर असलेली बंधने त्यांनी उठवली होती. (जाता जाता मि. ल्यूस हे Time Life Inc. या प्रसिद्ध प्रकाशनाचे संस्थापक होते.) मिसेस ल्यूस यांचे हातून त्रिएस्ते मामल्याची लंडन करार रूपी सांगता कशी झाली तिकडे वळू.
दुसरे महायुद्ध १९४५ मध्ये संपले तरी रशिया युगोस्लाविया वादामुळे त्रिएस्ते मामला कसा भिजत पडला हे आपण पाहिले. १९५३ साली स्टॅलिनचे निधन झाले नि त्रिएस्ते मामल्याबाबतच्या लंडनमधल्या गुप्त वाटाघाटींनी वेग घेतला. वाटाघाटी १९५४ सालच्या मे – जून महिन्या पर्यंत चांगल्या चालल्या होत्या. दोन्ही बाजूंना मान्य असा तोडगा निघणार असे वाटू लागले. पण ऑगस्ट महिन्यात युगोस्लावियाच्या लंडनमधील प्रतिनिधीने आपली भूमिका बदलली. अधिकाधिक प्रदेशाची मागणी करायला सुरुवात केली, व बोलणी फिसकटू लागली. त्रिएस्ते मामल्यामधली गरमागरमी पराकोटीला पोचली.
“वाटाघाटी फिस्कटताहेत” म्हणून इटालीतील अमेरिकन राजदूत मिसेस ल्यूस या अगदी निराश अवस्थेत रोमला परतल्या नि लगेचच त्यांना एका अमेरिकन माणसाचा फोन आला. “जर अमेरिकी राजदूत व्यक्तिश: भेटतील” तर तो त्रिएस्ते मामल्याबाबत काही माहिती देणार होता. त्या युद्धोत्तर काळात अमेरिकन राजदूतांना भेटण्यासाठी लोक नाना शकला लढवीत. त्यातलाच हा एक प्रकार असणे शक्य होते. पण जितक्या झटपट हा फोन आला तो काळ वेळ पाहाता या माणसाला त्रिएस्ते मामला, लंडनमधल्या गुप्त चर्चा, व वाटाघाटींची नाजूक अवस्था, नुकतीच सुरू झालेली गरमागरमी हे सर्वच अगदी जवळून माहिती असल्याचे दिसत होते. तेव्हा हा बिघडणारा मामला सुधरण्यासाठी या माणसाकडे काही उपयुक्त माहिती असेल तर पहावे या हेतूने मिसेस ल्यूस त्याला भेटल्या.
माणूस बरा वाटला, पण त्याने आपले नाव काही सांगितले नाही. इतकेच नव्हे तर त्याला या मामल्यात कुठेही गुंतायचे नाही, हेही त्याने स्पष्ट केले. सांगितले ते इतकेच की “तो CIAसाठी युगोस्लावियात काम करतो. तसेच युगोस्लावियाचा लंडनमधील प्रतिनिधी आमच्या माणसांना सध्या त्रास देत आहे; आणि ते का हेही त्याला माहित आहे.” म्हणजे एकंदरीत हा अज्ञात इसमही चांगलाच जाणकार निघाला.
मिसेस ल्यूसनी विचारले की “मग या बाबतीत मी काय करू शकते?”
“मिसेस ल्यूस, खरी समस्या ही आहे की युगोस्लावियात यंदा गव्हाचे पीक वाया गेले आहे. दुष्काळ पडलाय. युगोस्लावियाचे सर्वेसर्वा टिटो यांना गव्हाची गरज आहे. तो त्यांना मिळाला नाही तर येत्या हिवाळ्यात युगोस्लावियाची अन्नान्नदशा अटळ आहे.”
“पण याचा त्रिएस्ते मामल्याशी संबंध काय?”
“सांगतो. ह्या हुकुमशहांचे डोके कसे चालते तुम्हाला ठाउकच आहे. जनतेचे लक्ष एका संकटावरून वळवण्यासाठी दुसरे संकट उभे करायचे. टिटो हेच करतायत.”
“हिवाळ्याची गरज भागेल एवढा गहू जर अमेरिकेने पुरवला तर, मामला सुधरेल?” ल्यूसमॅडम म्हणाल्या.
गृहस्थ हसला, नि म्हणाला, “मी हेच सुचवणार होतो. पाच लाख टन गहू दिला तर त्यांचा दुष्काळ टळेल, नि लंडनच्या वाटाघाटीही मार्गी लागतील.”
लंडनमध्ये वाटाघाटीत एकाएकी पडलेल्या अनपेक्षित तिढ्याचे कारण आता उमगत होते. मिसेस ल्यूसनी युगोस्लावियातल्या दुष्काळाची खातरजमा केली व चारच दिवसांत त्या सल्लामसलतीसाठी वॉशिंग्टनला परराष्ट्रखात्यात पोचल्या.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री डलेस यांनी एक महत्वाची शंका काढली. “भले तुम्हाला मिळालेली माहिती व सुचलेला मार्ग योग्य असेल. पण लक्षात घ्या की लोकशाहीतल्या राज्यकर्त्यांइतकेच हुकुमशहाही जनमताबाबत जागरूक असतात. टिटोंना युगोस्लावियातच अनेक विरोधक असतील. अमेरिकी गहू पत्करणे हा आपल्या शेतीविषयक धोरणाचा पराभव मानला जाईल हे टिटोंना कळते. आणि गव्हाच्या बदल्यात प्रदेशावरील दावा सोडला ही गोष्ट जगाला कळणे हे तर टिटो यांना मुळीच परवडणार नाही. तेव्हा ही योजना यशस्वी करायची तर टिटोंशी गुप्तपणे व्यवहार करू शकणारा, व जो माणूस या योजनेचे तपशील कधीच आणि कुठेच उघड करणार नाही अशी टिटो यांना खात्री वाटते अशा दूताची गरज आहे.”
असा दूत मिळणे कठीणच होते. पण म्हणून आशा सोडणे मिसेस ल्यूस यांना पटेना. संयोग असा की, दोनच दिवसांनी वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकाराने आयोजलेल्या भोजनसमारंभात मिसेस ल्यूस यांच्या शेजारी बसलेल्या इसमाचे नाव होते बॉब मर्फी. हा माणूस म्हणजे दुसर्या महायुद्ध काळात अमेरिकी सरकारतर्फे युगोस्लाव सेनेला मदत करणारा, व त्यासाठी टिटोंशी व्यक्तिगत वाटाघाटी करणारा परराष्ट्रखात्याचा दूत निघाला. साहाजिकच त्याचे टिटो यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले होते. मिसेस ल्यूसना दूत सापडला.
मिसेस ल्यूस यांनी दुसर्याच दिवशी सकाळी अध्यक्ष आयसेनहॉवर यांची भेट ठरवली. बॉब मर्फीसह त्या अध्यक्षांना भेटल्या. अध्यक्षांनी सांगितलेली कुठलीही कामगिरी करायला बॉब एका पायावर तयार होता. तेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी अध्यक्षांच्या सहीचे टिटोंना लिहिलेले एक व्यक्तिगत पत्र घेऊन बॉब मर्फी निघाला, व लवकरच टिटो यांच्या ब्रियोनी बेटावरील राजेशाही उन्हाळी प्रासादात पोचला.
यथावकाश, लंडनमध्ये ५ ऑक्टोबरला युगोस्लावियाने मूळच्या इटालियन त्रिएस्ते शहरावरील दावा सोडला. हे शहर व आसपासच्या ८५ चौरसमैलांचा प्रदेश इटालीला परत मिळाला. तर २०० चौरसमैलांचा आपला मूळ प्रदेश युगोस्लावियाने स्वीकारला. इटाली व युगोस्लाविया दरम्यानची कायमस्वरूपी सीमारेषा ही मॉर्गन रेषेच्या पश्चिमेला किंवा उत्तरेला पडली. थोडक्यात युगोस्लावियाला थोडा अधिक भूप्रदेश मिळाला, पण त्रिएस्ते शहर राज्य रद्द होऊन त्रिएस्ते शहरासह तो सारा प्रदेश इटालीकडेच आला. या बदल्यात युगोस्लावियाला त्रिएस्ते बंदर वापरण्याचे अधिकारही मिळाले. २५ ऑक्टोबरला ब्रिटिश व अमेरिकन सैन्याची माघार सुरू झाली. त्याच वेळी ४ लाख टन गहूही अमेरिकेतून युगोस्लावियात पोचला.
पुढची कित्येक वर्षे, म्हणजे १९७० सालापर्यंत, असे काही झाले होते हे फक्त सहा व्यक्तींना माहित होते – अध्यक्ष आयसेनहॉवर, परराष्ट्रमंत्री डलेस, मार्शल जोसिप टिटो, बॉब मर्फी, व मिसेस ल्यूस, आणि सीआयए (CIA)साठी काम करणारा तो अज्ञात हेर. दुसरे महायुद्ध लढणारे आयसेनहॉवर व रशियाशी शीतयुद्ध छेडणारे डलेस यांच्या लेखी हे गहू प्रकरण हा तसा चिरकूट मामला म्हटला पाहिजे. CIA चा तो गुप्तहेर कुठेच प्रकाशात आला नव्हता. त्याने आपले नावही प्रकट केलेले नव्हते तिथे त्याने हा मामलाही कुठेच उघड केला नाही यात काय नवल? आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांनी या प्रकारची गुप्तता पाळणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. बॉब मर्फी ने आपल्या निवृत्तीपूर्वीच नव्हे तर निवृत्तीनंतरही इतक्या विविध धाडसी मोहिमा पार पाडल्या होत्या की यथावकाश त्याने जे आत्मचरित्र लिहिले, त्यात या गव्हाच्या व्यवहाराला तितकेसे महत्व दिले नव्हते. थोडक्यात, टिटो यांचा त्याच्यावर जो विश्वास होता त्याला तो जागला, असे म्हणता येईल. पण मिसेस ल्यूस,ज्यांनी हे राजकारण सुरू केले व पुरतवले, यांच्या १९७० साली प्रकाशित झालेल्या चरित्रात मात्र हे छुपे तपशील –“राजकारणातली दृष्टीआडची सृष्टी” -उघड झाली. पुढे जे काही घडले त्याला ल्यूसमॅडमचे चरित्र कारणीभूत ठरले असावे असे मानायला वाव आहे. काय घडले १९७० सालानंतर?
गुप्त लंडन कराराने तांत्रिक दृष्ट्या जरी त्रिएस्ते मामला सुटला असला, व दोस्त सेना जरी इटालीमधून माघारी गेली असली, तरी युगोस्लावियाने अधिकृतपणे हा मामला संपवला नव्हता. पण त्रिएस्ते मामल्याचा अधिकृत शेवट करण्यासाठी इटाली व युगोस्लावियाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दरम्यान १९७५ साली “ओसिमो करार” झाला. गुप्त अशा लंडन करारात ठरल्याप्रमाणेच या दोन देशांतील सीमा ठरल्या, व युगोस्लावियाने अधिकृतपणे त्रिएस्ते शहरावरील दावा सोडला. त्याखेरीज, नवीन सीमांअंतर्गत येणार्या दोन्ही बाजूंच्या अल्पसंख्य गटांची व्यवस्था लावण्याचाही करार झाला. एवढे नावीन्य वगळले तर फरक इतकाच की लंडन करार गुप्त होता तर ओसिमो करार हा सार्वजनिक होता. ओसिम करार मार्शल टिटो यांनी अधिकृतपणे १९७७ साली स्वीकारला आणि त्यानंतरच त्रिएस्ते मामला हा खर्या अर्थाने पण काहीसा सपकपणे संपला. ओसिमो कराराचे शीर्षक होते “१० फेब्रुवारी १९४७ मध्ये सीमानिश्चिती न झालेल्या प्रदेशाच्या सीमांबाबतचा करार.” जणू काही १९५४ सालचे ते नाट्यही घडले नव्हते, नि लंडनचा गुप्त करारही झाला नव्हता ! चित्र असे उभे राहिले की या भिजत घोंगडे ठरलेल्या त्रिएस्ते मामल्याची जी काही सोडवणूक झाली ती इटाली व युगोस्लाविया यांच्यामधल्या १९७५ सालच्या ओसिम करारानेच !! इटालीत लोकशाही असल्याने या करारातील वाटाघाटी गुप्त राखल्याबद्दल आणि इस्त्रिया द्वीपकल्पावर पाणी सोडल्याबद्दल सरकारवर टीका झाली. पण युगोस्लावियात हुकुमशाही असल्याने काही टीकेला वावच नव्हता. १९८० साली टिटो यांचे निधनही झाले. आणि झाले गेले गंगेला मिळाले.
राजकारणातली असली दृष्टीआडची सृष्टी तुम्हाआम्हाला क्वचितच दिसते. कारण त्या सत्तावर्तुळात आपल्याला प्रवेश नसतो. स्वाभाविकचपणे वरकरणी दिसते ते काही वेगळेच असते. इथेही तसेच घडले. पण या सर्व कथेतून असेही जाणवते की तुमच्याआमच्या नजरेआड याहूनही बरेच काही घडले असावे, ज्याचे तपशील आपल्याला अजून कळायचे आहेत. उदाहरणार्थः
कोण होता तो CIA चा गुप्तहेर? लंडनमधल्या गुप्त वाटाघाटींची माहिती इतक्या लगोलग त्याला कशी मिळत असेल? अमेरिकेतून, की युगोस्लावियातून की आणखी कुठून? जनतेचे लक्ष दुष्काळावरून उडवण्यासाठी युगोस्लाविया इटालीशी चाललेल्या वाटाघाटीत खीळ घालत आहे ही युगोस्लावियातल्या अत्युच्चपदस्थ वर्तुळातली अंतस्थ बातमी त्याला कशी कळली असेल? बॉब मर्फी नेमका त्या पत्रकाराने आयोजलेल्या भोजनसमारंभात कसा पोचला? तो नेमका ल्यूसमॅडम शेजारीच कसा बसला? की बॉब मर्फीची व ल्यूसमॅडमची भेटही घडवून आणणारी कोणी अज्ञात व्यक्ती होती? ती व्यक्ती म्हणजे तो CIA चा एजंट तर नव्हे? असे अनेक प्रश्न.
आपल्या राजकारणातही तथाकथित ट्रॅक २ डिप्लोमसी म्हणून बंद दरवाज्या आड बरेच काही चालते – उदाहरणार्थ “अमनकी आशा” सारखे प्रकल्प. किंवा काही गुप्त करार होतात – उदाहरणार्थ २००८ सालचा कॉंग्रेस पक्ष व चिनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यातील अजूनही गुप्त राखलेला सामंजस्य करार. अशा सार्यांचे तपशील कळले तर अशाच कल्पिताहूनही अद्भुत कथा उलगडतील यात संशय नाही.
विश्वास द. मुंडले
संदर्भ १ – https://en.wikipedia.org/wiki/Trieste
संदर्भ २ – https://en.wikipedia.org/wiki/Italy
संदर्भ ३ – https://en.wikipedia.org/wiki/Free_Territory_of_Trieste
संदर्भ ४ – http://www.encyclopedia.com/history/united-states-and-canada/us-history/relations-yugoslavia
संदर्भ ५ – Ure, John (1994), Diplomatic Bag, John Murray, London, pp. 14 – 16
संदर्भ ६ – https://en.wikipedia.org/wiki/Treaty_of_Osimo
Hits: 0
”अमन की आशा” हे तर यशस्वी न होण्यातील होतेच. आपल्याच पुरोगामी माणसांची ”भाबडी आशा”