सरकारी दरोडेखोराची गोष्ट
अमेरिकेला जगाच्या राजकारणात लक्ष घालायचे असते. काबू ठेवायचा असतो. स्वाभाविकपणे, त्यांना अनेक राष्ट्रांच्या विविध वकिलातीत येणार्या जाणार्या संदेशांवर लक्ष ठेवून असावे लागते. हे संदेश सांकेतिक असतात. त्यातील संकेतकारक शोधून काढायचा, मग सांकेतिक संदेशातून मूळ संदेश शोधून काढायचा हे शोधकार्य अतिशय खर्चिक असते. केवळ एका देशाचे संदेश वाचताना काय खटाटोप करावा लागतो याची कल्पना येण्यासाठी “Imitation Games” हा चित्रपट पाहावा. मग जगातील अनेक देशांचे हजारो सांकेतिक संदेश हाताळण्याचा व्याप आणि खर्च किती असेल? तेव्हा स्वस्तातला मार्ग म्हणजे चोरी. ज्या देशाचे संदेश वाचायचे, त्या देशाचे सामान्य संदेशाचे सांकेतिक संदेशात रूपांतर करणारे मार्गदर्शक पुस्तक (code book कूटपुस्तक) चोरले की झाले. चोरायचे म्हणजे त्याची चोरून कॉपी मिळवायची. ही कूटपुस्तके त्या देशाच्या इतर देशांतील प्रत्येक वकिलातीत असतातच. कुठूनही चोरावी.
असल्या चोरीचे महत्व अमेरिकेला दुसर्या महायुद्धातच कळलं. त्याकाळात जर्मनांना सामील झालेल्या फ्रेंच व्हिशी सरकारचे कूटपुस्तक त्यांच्या अमेरिकेतील वकिलातीतून चोरायची योजना होती. सुटीच्या दिवशी या वकिलातीतील फितूर सेक्रेटरीने व तिच्या सहकर्मचारी प्रियकराने वकिलातीत प्रवेश घेतला, व तिजोरीफोड्याला चोरवाटेने प्रवेश देऊन काम साधले. गमतीची गोष्ट म्हणजे सर्व कामे उरकताना ही सेक्रेटरी फक्त कानात डूल व पायात बूट घालून वावरत होती. लफड्याचे नाटक वठवायचे होते ना?
१९५५च्या सुमारास CIA ची खात्री पटली की कागदपत्रे चोरून मिळवणे व वाचणे ही आता गरज ठरत आहे. त्याउपर या तिजोरीफोड्यांना बाहेरदेशातही पाठवण्याची गरज १९५६ साली स्पष्ट झाली. त्यावर्षी ख्रुश्चेव यांनी एक धोरणविषयक भाषण कम्युनिस्ट पार्टीच्या एका बंद दरवाज्याआडच्या सभेत केले होते. रशियातून हे भाषण मिळवायला अमेरिकेला इझरायली तिजोरीफोड्याची मदत घ्यावी लागली होती.
पण ही चोरी तितकी सोपी नसते. सर्वस्वी वेगळ्या देशात तिसर्याच देशाच्या वकिलातीत शिरून, काम आटपून तिथून सुरक्षितपणे कसे निसटायचे हे ठरवावे लागते. सर्वच वकिलातीतली महत्वपूर्ण कागदपत्रे नेहेमीच सुरक्षित अशा तिजोरीत ठेवलेली असतात. तेव्हा तिजोरीचा प्रकार, ती कुठे ठेवली आहे, तिथे कसे पोचायचे, कूटपुस्तक कुठे ठेवले आहे याची पक्की माहिती काढावी लागते. या सार्या माहितीसाठी वकिलातीची रेकी करावी लागते. त्यातील व्यक्तींच्या येण्याजाण्याच्या वेळा, त्यांची स्वभाववैचित्र्ये वा वैगुण्ये जाणून घ्यायला हेरगिरी करावी लागते. चोरी करताना बरेचदा वेश व चेहेरा पालटावा लागतो. फितूर मिळाला तर काम सोपे असते. पण अन्यथा तिजोरीपर्यंत पोचताना काही कुलपे बेमालूम उघडावी लागतात. इलेक्ट्रॉनिक निर्बंधांवर मात करावी लागते. कूटपुस्तक ठेवलेली तिजोरी उघडणे हे तिथे कोणाच्याही नकळत पोचल्यानंतरचे काम. तिजोरीच्या प्रकारानुसार मोहिमेची तयारी म्हणून तिजोरी उघडण्याची तालीम करावी लागते. तिजोरीत उपयुक्त असे आणखी काय सापडेल याची कुठलीच निश्चिती नसते. तेव्हा मिळालेल्या कागदाची उपयुक्तता ठरवण्यासाठी गुप्तवार्तांकन, कूटपुस्तक, व त्याचा वापर अवगत असणारी माणसे तिथे तयार असावी लागतात. कूटपुस्तकाची, वा पत्राची चोरी ही त्या वस्तूची चोरी नसून त्यातील मजकुराची असते. सबब कूटपुस्तकाच्या पानांचे तिथेच फोटो काढावे लागतात. शिवाय मिळालेले अन्य सीलबंद लिफाफे उघडणे, मजकुराचे फोटो काढणे, लिफाफे पुन्हा सीलबंद करणे, आणि हे सगळे जसे होते तसे परत ठेवणे, हेही करावे लागते, नाहीतर चोरी पकडली जाईल व तो देश आपले कूटपुस्तकच बदलून टाकेल. सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी टेहेळणी करणारे ठेवावे लागतात, त्यांच्या संपर्कात राहावे लागते. त्यासाठी टेलिकॉमतज्ज्ञही लागतात.
ह्या सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी CIA च्या अंतर्गत एक Special Operations Division या नावाचे खाते उघडण्यात आले. मात्र CIA कर्मचार्यांच्या लेखी या खात्याचे नाव “The Shop” असे होते. या खात्यात फक्त १०-१२ माणसेच होती. अमेरिकी कायद्यानुसार यापैकी बर्याच कारवाया बेकायदेशीर असल्याने “The Shop” या खात्याचे, व त्यातील कर्मचार्यांचे अस्तित्वही नाकारले जाई. त्यालाच अनुसरून हे खातेही CIA च्या मुख्यालयापासून दूरच होते.
चोरी करताना हे कर्मचारी सापडले तर त्यांना अमेरिकन सरकारचे वा वकिलातीचे संरक्षण नसे. मग जी व्हायची ती परवड होवो. उदाहरणार्थ, हे शर्विलक “क्ष” देशाच्या “य” देशातील वकिलातीबाहेर पकडले गेले तर ते “य” देशातील कायद्याच्या हवाली होणार. पण जर ते “क्ष” देशाच्या वकिलातीतच पकडले गेले तर त्यांच्यावर “क्ष” देशाच्या कायद्यानुसार, कदाचित देशद्रोहाचीही कारवाई, अगदी मृत्युदंडही, शक्य असे. कारण आंतरराष्ट्रीय संकेतानुसार “क्ष” देशाची कुठल्याही देशातली वकिलात ही “क्ष” देशाची भूमी मानली जाते.
अमेरिकी CIA च्या वतीने असल्या साठ एक चोर्या करणार्या डग्लस ग्रोट याची, नव्हे त्याच्या परवडीची, ही कथा आहे. विशेष म्हणजे ही परवड परदेशात पकडले गेल्याने नव्हे, तर अमेरिकेतच झाली आणि तीही CIA कडूनच.
ग्रोटच्या परवडीचे कारण जितके रंजक आहे तितकाच रंजक आहे त्याचा या पेशातील प्रवेश ! डग्लस ग्रोट हा हुशार मुलगा वयाच्या विसाव्या वर्षी अमेरिकन सैन्याच्या विशेष दलात (special forces) शिरून कमांडो म्हणून तयार झाला. घरच्या घरी बंदूक, सायलेन्सर, बॉम्ब, सापळे बनवण्यात तो वाकबगार होता. थोडक्यात तो उत्तम हस्तकुशल तंत्रज्ञ होता. त्याला चिनी भाषाही अवगत होती.
विशेष सैन्यदलात चार वर्षे नोकरी करून तो पोलिसदलात दाखल झाला. तिथेही त्याने आपली छाप उमटवली. रहदारीचे नियम मोडणार्या सरकारी कर्मचार्यांना दंड करायलाही तो मागेपुढे पाहात नसे. उदाहरणार्थ एखादा बंब आग विझवण्या व्यतिरिक्त अन्य कामाला जात असेल, तर त्याने डोक्यावर फिरता दिवाही लावायचा नसतो, व सायरनही वाजवायचा नसतो. हा नियम मोडणार्या अग्निशामक कर्मचार्यांना ग्रोट बिनधास्त दंड करीत असे. पण जेव्हा त्याने अग्निशमन-दल-प्रमुखालाच दंड केला तेव्हा त्याला पोलिस खात्यातूनच डच्चू मिळाला. त्याविरुद्ध तो न्यायालयात गेला, आपली नोकरी परत मिळवली, व पाठोपाठ राजीनामाही दिला. थोडक्यात आपल्यावरील अन्यायाविरुद्ध लढायला, व त्यासाठी भल्यभल्यांशी पंगा घ्यायलाही तो कचरत नव्हता.
नंतर तो CIA मध्ये दाखल झाला. त्याचे हस्तकौशल्य पाहून त्याची बदली The Shop मध्ये झाली. सुरुवातीला तो फक्त सीलबंद लिफाफे उघडून, पुन्हा सीलबंद करून होते तिथे ठेवण्यातला (flaps n seals) तज्ज्ञ बनला. पुढे तो रेकी व टेहेळणीतज्ज्ञ बनला, आणि यथावकाश टोळीप्रमुखही झाला. १९८२ ते १९९२ या काळात त्याने ६० वकिलातींवर यशस्वी दरोडे घातले. त्यासाठी त्याला सालिना ४० हजार डॉलर पगाराखेरीज अनेक रोख पुरस्कार व पारितोषिकेही मिळाली.
डग्लसच्या मित्रांना इतकेच माहित होते की तो परराष्ट्र खात्यात नोकरीला आहे व म्हणूनच त्याला एकसारखे परदेशी जावे लागते. बायकोला तो कुठे नोकरी करतो व त्याच्या कामाचे स्वरूप काय हे माहिती होते. पण त्याच्या मुलांना मात्र हे फार उशीरा आणि अपघातानेच कळले. एकदा ग्रोटच्या मुलीने शाळेत वापरण्यासाठी एक कागद वडलांच्या खोलीतून घेतला. पण तो गुप्त संदेश लिहिण्यासाठीचा पाण्यात विरघळणारा कागद होता. ग्रोटने तिला थांबवले व तो कागद चक्क खाऊन टाकला. गोंधळलेल्या मुलांना त्याने त्या कागदाबद्दल व आपल्या CIA मधील नोकरीबद्दलही सांगितले. पण ही झाली त्याच्या कारकीर्दीच्या अखेर-अखेरची गोष्ट.
आद्य प्रश्न असा की ग्रोट सारखी माणसे या पेशात शिरून रमतातच कशी? सरकारी संरक्षण नसतानाही ही माणसे इतका धोका पत्करायला तयार तरी कशी होतात? या प्रश्नांचे सोपे उत्तर म्हणजे देशासाठी आपण काही करतो आहोत या भावनेतून मिळणारे प्रोत्साहन. पण ते काही सर्वस्वी खरे नव्हे. माणसे असल्या पेशात रमण्याचे महत्वाचे कारण म्हणजे धोकेबाज परिस्थितीत वावरताना, व त्यातून निसटताना येणारी झिंग, व तिचे लागणारे व्यसन. कुठल्याही कटोकटीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रक्तात adrenalin या संप्रेरकाचे प्रमाण वाढते. वैद्यकीय भाषेत त्याला adrenalin rush म्हणतात. या अवस्थेत मेंदू सातत्याने तल्लख असतो. अंत:प्रेरणा व विचारप्रेरणा यांच्या सीमारेषेवर काम करीत तांतडीने निर्णय घेत राहातो. त्यानुसार शरीरही तत्काळ कृती करीत राहाते. बहुसंख्यांना रक्तातील adrenalin चे प्रमाण सातत्याने चढे राखत संकटाला तोंड देणे शक्य नसते. त्यांचेकडे पुरेशी ऊर्जा नसते. ते माघार घेतात. पण ग्रोट सारखी माणसे या अवस्थेत सातत्याने राहू शकतात. त्यांना ही अवस्था रुचतही असते. अशा अवस्थेतून पुन:पुन: यशस्वीपणे जाताजाता त्यांना या adrenalin rushचे व्यसनच जडते. जनसामान्यांना रुचणार नाही इतका धोका सातत्याने पत्करणे हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव बनतो. एका मुलाखतीत ग्रोट म्हणतो की कोणालाही थांगपत्ता लागू न देता चोरी करणे, तथाकथित अभेद्य सुरक्षाव्यवस्थेला नमवणे, आणि परदेशातून सराईतपणे निसटणे यातली झिंग काही औरच !
दुसरा प्रश्न असा की या व्यवसायात इतका धोका असूनही ही माणसे वर्षानुवर्षे इतकी यशस्वी होतात तरी कशी? त्यासाठी बदलत्या परिस्थितीत नवनवी उपयुक्त उत्तरे शोधण्याची क्षमता प्रदान करणारे प्रशिक्षण महत्वाचे असते. कुठेही मागमूस न ठेवता, कुठल्याही अनपेक्षिताला वाव न देता, अचूकपणे आपले काम उरकणारी कार्यप्रणाली अंगिकारणे हा या प्रशिक्षणाचा महत्वाचा भाग. त्याच्याच बरोबरीने, भरवशाची पूर्वतयारी (जसे की रेकी, गुप्तवार्ता, फितूर, आणि अभ्यास) करून मगच कामाला हात घालणे हे या कार्यप्रणालीचे महत्वाचे अंग.
या पूर्वतयारीत कुठली माहिती हवी हे ठरवण्यात “The Shop”चाच पुढाकार असे. पण “The Shop” कडील मनुष्यबळा-अभावी रेकी वा हेरगिरीसाठी CIA ची मदत घेणे अनिवार्य होते. महत्वाची बाब ही की CIA च्या पूर्वतयारीत वैगुण्य राहिले तर जीव धोक्यात पडत असे तो ग्रोटसारख्या “The Shop” मधील कर्मचार्यांचाच. याउलट CIA ला मात्र कुठलाच धोका न पत्करता मौलिक माहिती मिळे, कारण “The Shop” मधील कर्मचारी हे CIA चे ताबेदार. आता “ऊस गोड लागला की मुळापासून खाणे” हा तर मनुष्य स्वभावच. प्राथमिक हेरगिरीतील त्रुटीबाबत कुठलीही जबाबदारी न स्वीकारता, अधिकाधिक कामे झटपट उरकता उरकता, CIA च्या पूर्वतयारीत ढिलेपणा शिरला व ग्रोटसारख्या कर्मचार्यांचा धोका वाढत चालला.
दुसरीकडे CIA ची भूकही वाढत होती. नेहेमीप्रमाणे तिजोरीतील कूटपुस्तकाचा मजकूर चोरण्याऐवजी CIA ने १९८९ साली एक तिजोरीच चोरण्याचीच मोहीम आखली. ही तिजोरी होती काठमांडू इथल्या पूर्व जर्मन वकिलातीतली. या तिजोरीत कूटपुस्तकासह कूटटंकयंत्रही ठेवलेले होते अशी खबर होती. ठरल्या दिवशी काठमांडूतील सर्वच वकिलातींसाठी काठमांडूबाहेर एक पार्टी योजलेली होती. अनुभव असा होता की पूर्व जर्मन वकिलातीतील सर्व कर्मचारी असल्या पार्टीला निश्चित हजर राहाणार. पार्टीसाठी निवडलेले ठिकाण वकिलातीपासून पुरेसे दूर होते, जेणेकरून तिजोरी चोरायला कमीतकमी तीन तास मिळाले असते. तसेच झाले.
आता बॉंडपटात शोभेल असा रबरी मुखवटा व टोप घालून ग्रोट आणि मंडळी नेपाळी बनली, आणि वकिलातीत शिरली. उकाडा इतका होता की मुखवटे व टोप उतरवूनच त्यांना तिजोरी चोरावी लागली. अनपेक्षित विशेष म्हणजे चोरून बाहेर काढलेल्या तिजोरीत कूटपुस्तकही नव्हते व कूटटंकयंत्रही नव्हते. तिजोरीसारखी मोठी वस्तू चोरताना चोरट्यांचा माग लागण्याइतके पुरावे राहाण्याची शक्यताही खूपच मोठी होती. पूर्वतयारीत इतके न्यून बाळगणारे CIA आपल्या सुरक्षेबाबत जागरूक नाही असे ग्रोटला वाटू लागले.
१९९० साली, दक्षिण आशियातील एका देशाचे कूटपुस्तक पश्चिम आशियातील देशाच्या राजधानीतून चोरताना तर त्याची खात्रीच पटली. वकिलातीतला एक फितूर, ग्रोट व अन्य ५ जणांना वकिलातीत प्रवेश करवून देणार होता. सर्व टीम वकिलातीत शिरण्याच्या तयारीत एका मोटारीत घामेजून बसली होती. एकतर मोटार छोटी होती; इतकी की माणसे एकमेकांच्या मांडीवर बसली होती. ठरल्या वेळी ही मंडळी वकिलातीत शिरणार, तेवढ्यात एकाएकी CIA ने कारवाई थांबवण्याचा इशारा दिला. वकिलातीत त्या फितुराखेरीज एक सफाई कर्मचारी येऊन दाखल झाल्याने मोहीम तिथेच थांबली. ग्रोटची टीम थोडी लवकर आत शिरती, तर त्यांचे बिंग फुटलेच असते. तासभर मोटारीत घाम गाळत बसून राहिल्यानंतरच कारवाई पुनश्च सुरू करण्याचा आदेश मिळाला. पण इतक्या विचित्रपणे वकिलातीबाहेर गाडीत बसलेल्या सहा गोर्या माणसांबाबत कोणालाही संशय येणे शक्य होते. तसे होते तर त्यांचे बिंगही तिथेच फुटते. तसे घडले नाही हेही ग्रोट आणि मंडळींचे सुदैवच. आत शिरल्यावर ग्रोटने तिजोरी केवळ १५ मिनिटात उघडली. कारण जी तिजोरी उघडायची तिच्यावर त्याने अमेरिकेत तालीम केलेली होती. सर्वच कामगिरी “The Shop”च्या कर्मचार्यांनी सफाईदारपणे दोन तासात पुरी केली. पण CIAच्या पूर्वतयारीतील दोषांपोटी ग्रोट आणि मंडळी पकडली जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
एका वर्षाच्या अवधीत घडलेल्या या दोन प्रकरणांनी ग्रोट बिथरला. आपल्या साहेबाकडे त्याने तपशिलात तक्रार केली. साहेबाने अट घातली की मोठ्या साहेबाकडे या प्रकरणाची वाच्यता करायची नाही. पण ग्रोट कसला ऐकतो ! त्याने काही आठवडे वाट पाहिली व सरळ साहेबाच्या साहेबाकडे तक्रार नोंदवली. मोठ्या साहेबांनी असा निष्कर्ष काढला की सफाई कामगाराचे येणे हा पूर्वतयारीतील दोष नसून केवळ अपघात होता. मोठ्या साहेबांच्या हेही लक्षात आले की आता ग्रोट व त्याचा साहेब यांचे जमणे अशक्य आहे. त्यांनी ग्रोटच्या बदलीचा आदेश दिला.
पण बदली करणार कुठे? एक तर “The Shop” हे CIA मधील एकमेवाद्वितीय खाते. त्यात ग्रोटचे कामही अतिविशेष स्वरूपाचे. शेवटी ऑक्टोबर १९९१ मध्ये त्याला CIAच्या एका कार्यालयात टेबल-खुर्ची देऊन बसवण्यात आले. पण काम? काहीही नाही! ग्रोट रोज सकाळी ९ वाजता हजर होई. जिममध्ये दोन तास व्यायाम करून ११ वाजताच परत जाई. सप्टेंबर १९९२ मध्ये ग्रोटच्या लक्षात आले की आपण राजीनामा द्यावा म्हणून हे सर्व चालले आहे. पण राजीनामा दिल्यावर निवृत्तीपोटी मिळणार्या फायद्यांना तो मुकला असता. ग्रोटने ठरवले की आता CIAलाच हलवायचे. बलाढ्य CIA संस्थेतच राहून तिच्याशी पंगा घेणे हे अकल्पनीयच. यशापेक्षा अपयशाचीच शक्यता अधिक. पण धोका पत्करण्याचे व्यसन लागले की दुसरे काय होणार?
ग्रोटची योजना तुमच्या आमच्या कल्पनेपलिकडली होती. सप्टेंबर १९९२ मध्ये त्याने एका आशियाई देशाच्या अमेरिकेतील वकिलातीला निनावी पत्र पाठवून कळवले की त्यांच्या स्कॅंडिनेव्हियातील एका वकिलातीतील कॉम्प्यूटरमध्ये आजूबाजूचे संभाषण ऐकण्याची व्यवस्था बसवलेली आहे. आपला माग न लागू देता पत्रे कशी पाठवायची याचे प्रशिक्षण तर त्याला CIA नेच दिलेले होते. पुरा बंदोबस्त करून त्याने हेच पत्र एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीन वेळा त्याच दूतावासाला पाठवले. FBI अमेरिकनांचीच संशयास्पद वाटणारी पत्रे अडवते व वाचते हे ग्रोटला ठाऊक होते. कारण अशी पत्रे कशी उघडावी याचे प्रशिक्षण त्यानेच FBI च्या लोकांना दिले होते. त्याची अटकळ अशी की आपली पत्रे नक्की अडवली जाणार आणि ती त्या वकिलातीपर्यंत पोचणारच नाहीत. पुन्हा पुन्हा पाठवलेल्या या पत्रातल्या एकावर तरी कारवाई होणार, व संशयिताला शोधता शोधता CIA आपल्याशी बोलणार. त्यातून आपले निवृत्तीविषयक फायदे मिळवावे असा ग्रोटचा इरादा होता.
प्रत्यक्षात झाले भलतेच. ग्रोटच्या तीन पत्रांपैकी एक त्या वकिलातीत पोचले, दोन अडवली गेली. यथावकाश स्कॅंडिनेव्हियातील कॉम्प्यूटरमधून संभाषण ऐकू यायचे बंद झाले. हे संभाषण CIAच सतत ऐकत होती. तिथे गडबड उडाली. अडवलेल्या दोन पत्रातून अंदेशा आला की फितूर CIA मधलाच आहे. शोध सुरू झाला. पण कोणीच सापडेना. शेवटी CIAने आपल्या संदर्भग्रंथालयातील अमेरिकेतील परदेशी वकिलातींचे पत्ते देणार्या पुस्तकावरील सर्व ठसे धुंडाळले. त्यात ग्रोटचा ठसा सापडला असावा, कारण एक अधिकारी त्याची चौकशी करून गेला. पण ग्रोटच्या योजनेनुसार पुढे काहीच होईना.
ग्रोटचे व्यावसायिक आयुष्य उध्वस्त झाले होतेच. १९९४ साली त्याचे व्यक्तिगत आयुष्यही कोलमडले. बायको-मुले त्याला सोडून गेली. त्या पत्रांसंदर्भात ग्रोटवरील संशयही बळावला असावा. कारण त्याच सुमारास CIAने त्याला Lie Detector Test साठी बोलावले. अर्थात त्याला ग्रोटने परवानगी नाकारली. उलट त्याने वकिलातर्फे CIA ला ५ लाख डॉलर नुकसानभरपाईची नोटिस पाठवली. त्यावर CIAने Lie Detector Test दिल्यावरच नुकसानभरपाई मिळेल अशी अट घातली. तीही ग्रोटने नाकारली. शेवटी १९९६ मध्ये कुठलेही कारण वा नुकसान भरपाई न देता CIAने ग्रोटला कामावरून काढून टाकले.
तेव्हा ग्रोटने पुढचे अधिक धोकेबाज पाऊल उचलले. त्याने आपल्या वकिलाला सांगितले की त्याचा परदेशी वकिलातींचा सुरक्षा सल्लागार बनण्याचा इरादा आहे. बातमी CIA पर्यंत पोचताच खळबळ माजली. त्यांनी त्याला हप्त्याहप्त्याने ३ लाख डॉलर मोबदल्यासहित सहा महिन्यासाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमण्याचा प्रस्ताव दिला. पण Lie Detector Test ची अट कायम ठेवली. वर ती पत्रे कोणी लिहिली होती ते शोधून काढायला मदत करण्याचे, तसेच कुठल्याही परकीय वकिलातीशी संपर्क न साधण्याचे बंधनही घातले. वकिलाने ग्रोटला सल्ला दिला की त्याने मिळेल ते पदरी पाडून घ्यावे व जमल्यास परदेशी पळून जावे. पण ग्रोट ५ लाख डॉलरवर अडून होता. शिवाय, ग्रोटच्या मते CIA चा ३ लाख डॉलरचा प्रस्ताव रद्दबातल करण्याच्या अटी या CIA ला धार्जिण्या होत्या. ग्रोटने CIA चा प्रस्ताव नाकारला व आपल्याला अपेक्षित तडजोड घडवण्यासाठी पुढचा आणखी अकल्पनीय धोका पत्करायचे ठरवले. धोका पत्करण्याचे व्यसन, दुसरे काय?
“आपण कोण?” हे कळणार नाही याची काळजी घेऊन सॅन फ्रान्सिस्को मधील १५ परदेशी वकिलातींना आपला “सुरक्षासल्लागार” असा परिचय करून देणारी पत्रे ग्रोटने लिहिली. कुठल्याही वकिलातीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला नाही. ग्रोटची तशी अपेक्षा पण नव्हती. त्याला इतकेच वाटत होते की ही शक्यता लक्षात घेऊन CIA अधिक पैसा बिनबोभाट सोडेल. म्हणूनच त्याने ही पत्र पाठवण्याची प्रक्रिया CIA पासूनही लपवली नाही. अमेरिकेतील अंतर्गत हेरगिरीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी FBI कडे असते. म्हणून त्याने या पत्राच्या प्रती आपणहोऊन FBI कडेही पोचतील अशी व्यवस्था केली. हेतू हा की FBI काही तडजोड घडवायला मदत करेल. पण झाले उलटेच. FBI ने ग्रोटवर खटलाच भरला. वाटाघाटी करण्याचे निमित्त सांगून बोलवून घेतले व अटक केली.
आता ग्रोटच्या नरकयातना सुरू झाल्या. डोळ्यावर पट्टी बांधून विविध वाहनांतून नेऊन त्याला एका अज्ञात अतिसुरक्षित तुरुंगात एकदम एकांतवासातच ठेवले. त्याच्या कोठडीतील दिवा २४ तास चालू असे, व त्याच्यावर सतत कॅमेर्याची नजर असे. इतकी गुप्तता राखलेली होती की ग्रोटच्या वकिलालाही असेच झापडे बांधून फिरत फिरत ग्रोटपर्यंत पोचावे लागले. सॅन फ्रान्सिस्को मधील वकिलातींना लिहिलेल्या पत्रांमुळे त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप बसला. तर दुसरा सौम्य आरोप होता CIA कडून ५ लाख डॉलरच्या खंडणी-वसुलीचा प्रयत्न करणे.
देशद्रोहाच्या आरोपापोटी त्याला देहदंडही झाला असता. पण अमेरिकी न्यायपद्धतीनुसार सरकारी वकिलांनी पर्याय ठेवला की त्याने गुन्हा मान्य केला तर ते देहदंड देण्याची मागणी करणार नाहीत. पण मग जन्मभरचा तुरुंगवासही टळला नसता. पण ग्रोटने देशद्रोह हा हेतू ठेवला नव्हताच. त्याचा हेतू अधिकाधिक भरपाई मिळवणे इतकाच होता. म्हणून त्याने देशद्रोहाचा आरोप अमान्य केला, पण खंडणीखोरीचा आरोप मात्र मान्य केला. सरकारपक्षानेही तडजोड मान्य केली. त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली.
ग्रोटला सर्वाधिक धोकेबाज कैदी म्हणून अतिबंदिस्त खोलीत ठेवण्यात आले. जणू काही तो मॅकगायव्हर (धाडसी टीव्ही मालिका हीरो), रॅम्बो (चित्रपटांतील धाडसी कमांडो) व हौदिनी (साखळदंडातून सुटणारा जादूगार) या सर्वांचे मिश्रण होता, व कुठल्याही खोलीतून सुटण्याची क्षमता त्याच्याकडे होती. पण ग्रोट म्हणतो, “माझी क्षमता बंद खोली अथवा तिजोरीत शिरण्याची होती, त्यातून बाहेर पडण्याची नव्हे”. हे यथावकाश तुरुंगाधिकार्यांच्याही लक्षात आले असावे. कारण सहा एक महिन्यांनंतर त्याचा एकांतवास संपला.
सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगाधिकार्यांनी त्याच्यासाठी एक समुपदेशिका (counsellor) नेमली. पण ही समुपदेशिकाच त्याच्या प्रेमात पडली. तेव्हा तुरुंगाधिकार्यांनी समुपदेशक बदलला. यथावकाश, ४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर चांगल्या वागणुकीमुळे वर्षभर आधीच ग्रोट सुटला. तुरुंगाबाहेर त्याच्या स्वागताला त्याची प्रेमिका समुपदेशिका हजर होती. लवकरच त्यांनी लग्नही केले. आता त्या दोघांना अमेरिकेत एका अज्ञात ठिकाणी ८० एकरांची शेती देऊन वसवण्यात आले आहे.
त्याच्या CIA मधील कारकीर्दीविषयी ग्रोट म्हणतो, “तिजोर्या फोडताना येणारी मजा काही और होती. पण CIA कडून मला मिळालेली वागणूक काही चांगली नव्हती.” ग्रोटबाबत CIAला विचारले तर त्यांची प्रतिक्रिया इतकीच असते की, “या विषयात CIA टिप्पणी करू इच्छित नाही.”
विश्वास द. मुंडले
संदर्भ:
David Wise, “The Code Thief”, Smithsonian, Oct. 2012, pp.72 – 79 (ऋणनिर्देश: गजानन थत्ते)
Also see at https://www.smithsonianmag.com/history/the-cia-burglar-who-went-rogue-36739394/
https://www.npr.org/2012/10/15/162948740/cias-ex-con-code-thief-reflects-on-his-career
Hits: 75
कल्पने पेक्षा अदभूत. राज्यकर्ते भोंगळपणे वागत नाहीत.
ग्रोट नांवाप्रमाणे ग्रेट वाटतोय्.
एकदम धाडसी.