मुंबईच्या बसमधले मराठी
मुंबईतल्या बसमध्ये प्रवाशांसाठी सूचना म्हणून लिहिलेले बरेच मराठी वाचायला मिळते. पण ते वाचले की मराठी मातृभाषकही मराठीचा वापर करताना चाचपडत आहेत, असे दिसते. मला हे दुश्चिन्ह वाटते.
कुठल्याही समाजात काळाबरोबर, विशेषत: वैज्ञानिक/ तांत्रिक प्रगतीमुळे, अधिकाधिक व्यामिश्र वस्तू, जटिल रचना, संकल्पना, अमूर्ते, निर्माण होत असतात. या सर्वांचा उल्लेखच नव्हे तर त्यांबद्दलचे आपले विचार नेमकेपणे, व थोडक्यात (पक्षी कमीतकमी शब्दात) व्यक्त करता येणे हे कुठल्याही भाषेचे बलस्थान ठरत असते. कुठल्याही नवीन समूर्त वा अमूर्ताचे थोडक्यात वर्णन करण्यासाठी नवनवीन शब्द, वाक्प्रचार, रचना तयार कराव्या लागतात. केवळ पूर्वज्ञात संकल्पनावाचक शब्दांना जोडकाम करण्याचेच धोरण अवलंबले तर नवीन शब्द अधिकाधिक लांबडे व बोजड होत जातील, व या संकल्पनाचे प्रकटन अधिकाधिक कठीण होत जाईल. या समस्येवर विविध मार्ग असतात. जसे की:
- अडगळीत गेलेल्या प्राचीन शब्दांचे पुनरुज्जीवन करणे
- जुन्या अर्थाने वा
- नव्या अर्थासहित.
- अस्तित्वातील शब्दांना नवनवीन अर्थ देणे.
- नवनवीन शब्द घडवणे, ते विविध प्रकारे वापरणे.
- हे नवीन शब्द वा शब्दार्थ जनसामान्यांत रुजवणे; व त्या साठी आवश्यक त्या नवीन वाक्यरचना, व वापराच्या प्रथा रुजवणे.
हे सर्व मार्ग चोखाळणे हे ती भाषा वापरणार्या सर्वांचे व त्यातही त्यांमधील अध्वर्यूंचे कर्तव्य असते. त्याचबरोबर, जनसामान्यांनीही या गरजा समजून घेऊन हे नावीन्य (शब्द, रचना, वाक्प्रचार इ.) आत्मसात् करायचे असते. आपण मराठी भाषक त्यात किती पुरे पडत आहोत? जनसामान्यांचा वावर ज्या बसमध्ये असतो, त्या बसमधील काही सूचना पाहा.
सूचना – चटपटीत नव्हे बटबटीत
- “गर्भवती महिलेस प्राधान्य”
सदर सूचना विनाकारण लांबलेली आहे. गर्भवती म्हटल्यानंतर ती महिलाच असेल हे काय सांगायला हवे काय? तेव्हा “गर्भवतीस प्राधान्य” हेही पुरले असते. - “तान्ह्या मुलासह प्रवास करणार्या स्त्रियांसाठी”
हीही सूचना उगाच लांबलेली आहे. बसमध्ये येणारे सर्वच प्रवासी असतात, तसेच “तान्हे” हे “मूल”ही असते या गोष्टी पुन्हा सांगण्याची गरज नाही. सबब ही सूचना “तान्ह्यासहित स्त्रीसाठी” अशी असेल तर तोच परिणाम साधेल. - “ज्येष्ठ नागरिकास (महिला) प्राधान्य”
- ही सूचना “ज्येष्ठ नागरिक महिलेस प्राधान्य” अशी असती तर सुबक वाटले असते. पण तरीही हे वाक्य कमीत कमी शब्दांच्या निकषात बसत नाही.
- सदर सूचना स्त्रीवर्गासाठी राखीव आसनांपैकी एका आसनाबाबत असल्याने संबंधित आसन पुरुषांसाठी राखीव नाही हे नक्की. तरीही, अगोदर ज्येष्ठ नागरिकांचा (म्हणजेच स्त्री व पुरुष असा दोघांचा) उल्लेख करायचा, व त्यातून (बसण्यासाठी) महिला नागरिकाची निवड सुचवायची हे काहीसे अनावश्यक ठरते.
- ज्येष्ठ नागरिक ही संकल्पना ज्येष्ठ या एकाच शब्दाने व्यक्त करता येते. त्यानुसार “ज्येष्ठ महिलेस प्राधान्य” ही सूचना सुबकही आहे, आणि कमीत कमी शब्दांचीही आहे.
बटबटीत मराठीमागची कारणे
ही बहुविध आहेत. पण प्रस्तुत (ज्येष्ठ नागरिक याच) संदर्भात थोडा विचार करू. ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) ही संकल्पना व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ व नागरिक हे दोन्ही शब्द आवश्यक आहेत, ज्येष्ठ हा एकच शब्द पुरेसा नाही, असे बसमधील सूचना लिहिणारा लेखकच नव्हे, तर बरेचदा आपण सर्वच मानतो. याचे कारण, किंवा कारणे काय असावीत? सहज सुचणारी कारणे अशी:
- वैचारिक परवशता: Senior citizen ही संकल्पना आपण इंग्रजीतून (पक्षी परदेशातून) घेतली. सबब ती तशीच्या तशी व्यक्त केली पाहिजे, अशी एक भूमिका दिसते. हा पूर्वग्रहच म्हटला पाहिजे. कारण
- वयाने ज्येष्ठ असणारांचा मान ठेवला पाहिजे, तरुणांनी उठून त्यांना बसायला दिले पाहिजे, स्त्रियांना, त्यातही गरोदर वा लेकुरवाळ्यांना आवर्जून बसायला दिले पाहिजे, या संपूर्णपणे भारतीय संस्कृतीतील संकल्पना आहेत. मुंबई सारख्या महानगरात या संस्कृतिपालनासाठी लेखी सूचना द्याव्या लागत असल्या, तरी अन्य नगरात, व ग्रामीण भारतात या गोष्टी सर्रास पाळल्या जातात.
- दुसरे असे की “अतिथि देवो भव” मानणार्या आपल्या देशात, कुठल्याही ज्येष्ठाला, स्त्रीला वा लेकुरवाळीला बसायला जागा देणे वर्ज्य असणार नाही, मग तो नागरिक असो की नसो.
- तेव्हा, “ज्येष्ठ नागरिक” ऐवजी “ज्येष्ठ” म्हणणेच श्रेयस्कर, कारण त्यामुळे कमी शब्दात व्यक्त होता येते. तसेच, “ज्येष्ठ” ला समकक्ष किंवा समानार्थी म्हणून “वरिष्ठ”, “वयस्क” यासारखे शब्दप्रयोग करायला हरकत नसावी.
- न्यूनगंड: कुठलीही परकीय संकल्पना आपल्या भाषेत व्यक्त करणे हे अशक्य असल्याने परकीय शब्दच वापरणे गरजेचे असते असे अनेकांचे मत असते. उदाहरणार्थ “casual leave” ही संकल्पना “किरकोळ रजा” या शब्दयोजनेत पुरेशी व्यक्त होत नाही असे कुण्या नामवंत (अर्थात् मराठी) लेखकाचे विधान वाचल्याचे आठवते. याला न्यूनगंडच म्हटले पाहिजे, कारण परकीय शब्दांचे अचूक भाषांतर करता न येणे ही केवळ मराठी भाषेचीच नव्हे तर जगातील प्रत्येक भाषेचीच मर्यादा असते. या मर्यादेवर मात करण्यासाठी वर दिलेले शब्दांचे पुनरुज्जीवन, शब्दांना नवीन अर्थ देणे इत्यादि मार्गच चोखाळावे लागतात, व भाषेच्या कक्षा विस्ताराव्या लागतात. भाषेची श्रीमंती जोपासावी लागते. “पण हे शक्य नाही” हा अवाजवी न्यूनगंडच आपल्याला मराठीत विधायक बदल करू देत नाही. हे विधायक बदल केले नाहीत तर मराठीचे स्वरूप कसे होईल हे पु. ल. देशपांड्यांनी एका वाक्यात भेदकपणे सांगितले आहे. ते वाक्य असे – “कुठलेही थॉट्स् आपल्या मदरटंगमध्ये जितक्या क्लियरली एक्स्प्रेस करता येतात तितके दुसर्या कुठल्याच फॉरिन लॅंग्वेजमध्ये करता येत नाहीत.” सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
- विवादप्रियता व बंडखोरी:
- सर्वसामान्य भारतीय माणूस हा विवादप्रिय असतो, असे नामवंत नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्यांच्या एका ग्रंथात मांडले आहे. (The Argumentative Indian) मराठी माणूस तर ही भारतीय विवादप्रियता अभिमानाने मिरवतो. ही विवादप्रियता शब्दच्छल, हेकेखोरी, यांतून प्रकट होत असते.
- त्याच बरोबरीने आपली सहजी नियम मोडण्याची प्रवृत्ती, सवती सुभेदारी मांडणे, बंधनरहित स्वातंत्र्याची ओढ यातूनही आपली बंडखोरी उघड होत असते.
- समाजात बंडखोर विवादप्रियजनांची बहुसंख्या असेल तर कायदा व सुव्यवस्था राखणे कठीण जाते. आणि सुव्यवस्थेसाठी स्पष्ट लिहिता लिहिता आपले म्हणणे कमीतकमी शब्दात मांडण्याची व्यवस्था लयाला जाते. उदाहरणार्थ,
- ज्येष्ठ म्हणजेच ज्येष्ठ नागरिक असा भाषिक संकेत निर्माण केला तर ज्येष्ठ या शब्दाला दोन अर्थ मिळून बंडखोर विवादप्रिय जनांना वाद घालायला वाव मिळतो. म्हणजे ज्या आसनावर केवळ ज्येष्ठ असा उल्लेख असेल तिथे जर एखादी एखादी ३० वर्षे वयाची व्यक्ती बसली असेल, तर ५० वर्षे वयाची विवादप्रिय व्यक्ती ही बसलेल्या व्यक्तीला “मी तुझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून तू ऊठ” असे म्हणू शकेल. त्यातून एखादा अटीतटीचा प्रसंगही उद्भवू शकेल.
- याच कारणाने, कायदा व सुव्यवस्थेची प्रत्यक्षाप्रत्यक्ष जबाबदारी असणारे लोक हे नेहेमीच संकेतांऐवजी (म्हणजेच “ज्येष्ठ” म्हणून थांबण्याऐवजी) पूर्ण संकल्पना मांडताना (म्हणजे नेहेमीच “ज्येष्ठ नागरिक” म्हणताना) दिसत असावेत. सर्वच कायदे विषयक दस्तऐवज व कलमे लांबलचक असतात ते म्हणूनच बरे!
- शैक्षणिक व साधनविषयक कमतरता: गर्भवती म्हणजेच गर्भ वागवणारी/ वाढवणारी महिला, ज्येष्ठ म्हणजेच वयाने ज्येष्ठ व निवृत्तीच्या वयाचे नागरिक यासारखे संकेत जनसामान्यांमध्ये रुजणे हे आपल्या शिक्षणव्यवस्थेवर अवलंबून असते. इथे शिक्षणव्यवस्था म्हणजे केवळ शालेय, क्रमिक किंवा प्रत्यक्ष शिक्षणव्यवस्था नव्हे तर जीवनानुभवातून शिक्षण पुरवणार्या (शालाबाह्य, सामाजिक, कौटुंबिक) व्यवस्थाही त्यात समाविष्ट असतील. उदाहरणार्थ, परिसर अभ्यासाच्या परिक्षेत कचरा डब्यात टाकण्याबद्दल लिहिणारा मुलगा चॉकलेटची चांदी रस्त्यावर टाकतो, कारण शालाबाह्य शिक्षणव्यवस्था त्याला वेगळेच शिक्षण पुरवत असते. शालाबाह्य व्यवस्था किती महत्वाच्या असतात वगैरे वेगळा चर्चेचा विषय असल्याने त्याचे तपशिलात न शिरता हे एकच उदाहरण देऊन थांबू.
- महत्वाची गोष्ट ही की शब्दांना विविध अर्थ असणे, त्यातील योग्य तो अर्थ संदर्भानुसार घेणे, व तदनुसार कृती करणे या गोष्टी शालेय तसेच शालाबाह्य अशा दोन्ही शिक्षणातून रुजवाव्या लागतात. शालेय पाठ्यपुस्तकातून हे शिक्षण मिळावे यासाठी सुनियोजित पाठ्यपुस्तके बनवावी लागतात. कोणी स्वयंअध्ययन करायचे ठरवले तर त्यासाठी आवश्यक शब्दकोश, अमरकोश (thesaurus) वा शब्दार्थांची चर्चा करणारी पुस्तके उपलब्ध असावी लागतात. विकसणार्या भाषेसोबत सदर पाठ्यपुस्तकांचा व कोशांचाही विकास आवश्यक ठरतो. याप्रकारचे वाङ्मय मराठीत उपलब्ध आहे काय, हा पहिला प्रश्न आहे.
- दुसरा महत्वाचा प्रश्न असा की आपली पाठ्यपुस्तके मुलांना भाषिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यास कितपत उपयोगी आहेत, व आपल्या भाषेत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे कोश किती आहेत? तसेच या सर्व पैलूंकडे लक्ष देणारी शिक्षणव्यवस्थाही आपल्या समाजात जारी दिसत नाही.
- त्याहूनही महत्वाचा, किंबहुना कळीचा प्रश्न हा की आपल्या शिक्षणव्यवस्थेत भाषाशिक्षणाला खरेच महत्व आहे काय? किंबहुना आपल्या शिक्षणतज्ञांनी शिक्षणातले भाषेचे महत्व ओळखले आहे काय?
भाषेवर दुष्परिणाम करणार्या (वैचारिक परवशता, न्यूनगंड, विवादप्रियता, बंडखोरी, शैक्षणिक कमतरता) या दोषांवर काय उपाय करायचा हा एक गहन विषय आहे. त्याची स्वतंत्र चर्चा करावी लागेल.
विसरलेले शब्द
विसरलेले किंवा अडगळीत गेलेले शब्द पुन्हा वापरण्याची शक्यता सुद्धा बसमधील चालकासमोरील सूचनांतून दिसते. हे उदाहरण पाहा.
“दोन थांब्यांमधील प्रवासात प्रतिबंधक दांडा वापरा”
वरकरणी हा संदेश जरी चालकांना दिलेला असला, तरी त्याचा दुसराही हेतू आहे. तो असा की हा संदेश वाचणार्यांनी स्वयंप्रज्ञेने दोन थांब्यांमधील प्रवासात चालकाजवळ जाऊ नये. पण पंचाइत अशी की शिकवल्याशिवाय, किंवा चालकाकडून त्या दांड्याचा अनुभव घेतल्याशिवाय, “प्रतिबंधक दांडा” ह्या संस्कृतोद्भव शब्दाचा अर्थ, गावाकडच्या, केवळ मराठीतूनच शिकलेल्या माणसाला कसा कळणार?
आता, क्रमिक शिक्षण न घेता, शब्दकोश न वाचता, एखादा नवीन शब्द, रचना, वाक्प्रचार इत्यादींचा अर्थ जर ती भाषा वापरणार्या बहुसंख्यांच्या लक्षात आला तर ती भाषा स्वबळावर वाढायला लायक आहे असे समजायला हवे. या नियमानुसार “प्रतिबंधक दांडा” हा शब्द अहितकारकच आहे. कारण प्रतिबंध व त्यापासून बनणारा प्रतिबंधक हे दोन्ही शब्द आपल्या नेहेमीच्या वापरात नसतात. जनसामान्यांना सहजी त्यांचा अर्थ कळणे हे तसे कठीणच आहे.
पण, त्याऐवजी आडकाठी हा शब्द वापरता येईल – जसे की “दोन थांब्यांवरील प्रवासात आडकाठी वापरा” किंवा “आडकाठी करा”. मला खात्री आहे की मराठी मातृभाषा असणार्या प्रत्येकालाच काय म्हटले आहे, ते कळेल. पण नवीन शब्दांबाबत आपले भाषाविषयक धोरण केवळ संस्कृतधार्जिणे व मूलभाषेवर अन्यायकारक आहे. सबब मूळ भाषेतील शब्द वापरणे हा विचारच वगळला जातो.
मूळ भाषेतील शब्द धुंडाळणे असो की, शब्दांना नवीन अर्थ देणे असो, की नवीन शब्द रचणे, त्यांचे कोश बनवणे, ते वारंवार सुधारणे – अशा विविध बाबतीत आपण मराठी भाषक कमी पडतो आहोत असे दिसते. परिणामी मराठीला राजभाषा बनवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहाणार की काय अशी शंका येते.
- विश्वास द. मुंडले
Hits: 29
सूचना फलक हे बर्याच वेळी असे लिहीलेले असतात की वाचणारा पटकन गोंधळूनच गेला पाहिजे.एका क्षणानंतर डोक्यात प्रकाश पडतो.टी व्ही वर सध्या बातम्यांची भाषा अशी आहे ,की काय!.असो.