महिला दिनाच्या निमित्ताने
एखादी व्यक्ती, घटना, वा परिस्थिती यांचे मूल्यमापन करताना होय/ नाही, चांगला/ वाईट असे द्विमिति पर्याय स्वीकारून त्यापैकी एक टोकाची भूमिका घेणे हा मनुष्य-स्वभाव आहे. बरेचदा ही भूमिका अन्य-पर्याय-विलोपी, म्हणजे अन्य पर्याय मुळातूनच नाकारणारी असते. म्हणजे जो चांगला तो (कधीच) वाईट नसतो, तर जो वाईट तो (कधीच) चांगला नसतो, असे हे साधेसोपे गणित. काळा नि पांढरा यांच्यामध्ये राखाडी, करडे, धुरकट अशा अनेक छटा असतात, चांगला की वाईट हे वर्गीकरण प्रसंगोपात्त बदलत असते अशा अनेक जाणिवा अपवादानेच दिसतात. त्यामुळेच बरेचदा एखाद्या एकांगी भूमिकेची प्रतिक्रियाही तितकीच एकांगी असते. याचे सर्वांना ठाऊक असणारे एक उदाहरण, म्हणजे काही अपवाद वगळता जगभर प्रचलित असलेली पुरुषप्रधान संस्कृती, पण बर्याच जणांना ठाऊक नसलेला त्याविरुद्ध उपजणारा पराकोटीचा स्त्रीवादी विचार.
पुरुषप्रधान संस्कृतीवर उतारा म्हणून महिलादिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. अदृष्य मर्यादा (किंवा glass ceiling) या सारखी प्रतीके मांडली गेली. पण मनुष्यस्वभावाला अनुसरून पराकोटीची स्त्रीवादी भूमिकाही उदयाला आलेली आहे, तिची दखल घेतली पाहिजे. Society for Cutting Up Men (SCUM) या नावाची एक संस्था जगातून पुरुषजातीचा उच्छेद करू इच्छिते. आता नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुरुषाविनाही गर्भधारणा शक्य आहे. सबब पुरुषविहीन, केवळ स्त्रीमय जग अस्तित्वात आणण्याचे या संस्थेचे ध्येय साकार होऊ शकते, हे खरे. त्याचे दुष्परिणाम कोणते हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. यदाकदाचित SCUM या संघटनेची प्रगती झाली, व त्यापोटी पुढे कधी आपण पुरुष-दिन साजरा करू लागलोच, तर तेव्हा आपण ही चर्चा नक्कीच करू. आत्ता मात्र परत महिला दिनाकडे वळू.
पराकोटीच्या टोकाच्या भूमिका टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे तथाकथित मध्यममार्ग. पण हा मध्यममार्ग अवलंबतानाही टोकाची भूमिका घ्यायला वाव मिळत जातो. कसे ते पहा.
अलंकारिक भाषेत मध्यममार्गी म्हणतात की, “स्त्री व पुरुष ही मनुष्य-समाज-रथाची दोन चाके आहेत. दोन्ही कार्यरत असतील तरच मानवी जीवन सुरळीत चालेल.” असल्या उपमांचा एक मोठा दोष असा की त्या एकदा पटल्या की उपमेय व उपमान ही सर्वार्थाने एकात्म वाटू लागतात. मग हे रथरूपी जीवन सुरळीत चालायचे तर स्त्री-पुरुष-रूपी दोन्ही चाके सर्वार्थाने सारखी असली पाहिजेत हे ठरते. कारण रथाची दोन चाकेही एकसारखी असतात. असल्या विचारसरणीतूनच स्त्री-पुरुष समानतेची एक संकल्पना जन्माला आलेली आहे. त्यात जी कामे पुरुष करतो, वा करू शकतो, ती सर्व स्त्रियांना करू दिलीच पाहिजेत असा भाव आहे. तसेच त्याउलटही अभिप्रेत आहे. पण ही विचारधाराही वर दिलेल्या दोन विचारांइतकीच एकांगी आहे, कारण ती स्त्री-पुरुषांत असणारे उत्क्रांतिजन्य भेदच नाकारते. असल्या एकांगी समानतेची चर्चा हे महिला दिनाचे उद्दिष्ट नसावे. तर महिलांचे व पुरुषांचे वेगळेपण हे मनुष्य जात टिकवायला कसे पोषक आहे ह्याची दरवर्षी जाणीव करून देणे हे महिला दिनाचे उद्दिष्ट असले पाहिजे.
स्त्री-पुरुषांतील शारीरिक व शरीरव्यवहारविषयक फरक सर्वज्ञात आहेत. तसे का आहे, हेही सर्वांना माहिती आहे. पण स्त्रीपुरुषांच्या मेंदूतील वेगळेपणाची फारशी दखल घेतली जात नाही. या फरकातून उद्भवणार्या स्त्रीच्या, व पर्यायाने पुरुषांच्याही, गुणावगुणांची काही उदाहरणे पाहू. ही उदाहरणे पहाताना एक लक्षात ठेवले पाहिजे की जी कामे पुरुषांचा मेंदू करू शकतो, तीच कामे स्त्रीचा मेंदूही करू शकतो. तसेच उलटही खरे आहे. पण स्त्री-पुरुषांच्या मेंदूंच्या रचनेत व मेंदूच्या वापराच्या प्रक्रियेत काही ठळक भेद आहेत. त्यामुळेच तेच काम करताना स्त्री-पुरुषांच्या क्षमतांमध्ये फरक पडतो, व स्त्री-पुरुषांमधील सापेक्ष गुणावगुण प्रकट होतात. कोट्यवधि वर्षांच्या उत्क्रांतीतून हे फरक उद्भवलेले आहेत. विविध वैज्ञानिक मतांचा गोषवारा असा की – शिकार करणारा आदिमानव-पुरुष, फळे-कंद-मुळे वेचणारी आदिमानव-स्त्री, गर्भावस्था व बाळंतपण यांतून उद्भवणारे परावलंबन, व अवाजवी मोठ्या मेंदूमुळे मानवी मुलांचे लांबलेले बालपण व त्यातून उद्भवणार्या विविध जबाबदार्या ही या फरकांची मुख्य कारणे आहेत. या सर्व घटकांची उत्पत्ती व त्याची निष्पत्ती हा स्वतंत्र चर्चाविषय आहे. याइथे केवळ मेंदूच्या रचनेवरून उद्भवणार्या स्त्री- वा पुरुषविशिष्ट गुणावगुणांची उदाहरणे पाहू.
भावनाविषयक विवेचन तसेच स्मृत्यंकनविषयक कारवाईसाठी मेंदूच्या आतील घोडग्रंथी हा भाग आवश्यक असतो. सरासरीचा विचार करता स्त्रियांच्या मेंदूतील घोडग्रंथी पुरुषांच्या मेंदूतील घोडग्रंथीपेक्षा मोठी असते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे भावनिक तपशील बारकाईने लक्षात घेणे व लक्षात ठेवणे या बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त सक्षम असतात, हेही सर्वज्ञात आहे. मोठी घोडग्रंथी भावनिक सक्षमतेला कशी कारण ठरते याचे तपशील अजून कळलेले नसले, तरी हा फरक लक्षणीय आणि दखलपात्र ठरतो.
भाषाक्षमता व श्रवणक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या मेंदूतील केंद्रांचे बाबतही स्त्रीपुरुषांत तफावत आढळते. स्त्रियांच्या ह्या केंद्रांत पुरुषांपेक्षा ११% जास्त मज्जापेशी असतात. स्वाभाविकपणे ढोबळमानाने स्त्रियांची श्रुतभाषाविषयक क्षमता जास्त प्रगल्भ असू शकते. या बाबतीतले संशोधन मला सापडलेले नाही. पण हा सामान्य अनुभव आहे की भाषाविषयक क्षमतेला भावनाविषयक क्षमतेची जोड देऊन स्त्रियांना बोललेले आणि न बोललेलेही बरेच कळत असते, जे पुरुषांना कळायला थोडा जास्तच वेळ लागतो. भाषेच्या माध्यमातूनच स्त्रियांना ते पुरुषांच्या लक्षात आणून द्यावे लागते. थोडक्यात भावनाविश्वात वावरायला स्त्रिया अधिक सक्षम असतात.
आता मन-बुद्धि-गम्य भावनाविश्वात वावरायचे की इंद्रिय-बुद्धिगम्य वस्तुनिष्ठ विश्वात वावरायचे हे ठरवायचा निसर्गदत्त अधिकार प्रत्येक व्यक्तीला असतोच की! पण काही टक्क्यांचा अपवाद वगळता बहुतेक स्त्रिया स्वयंप्रेरणेने भावनाविश्वात वावरताना दिसतात. काही स्त्री-मेंदू-विषयक तज्ज्ञांच्या मते स्त्रियांच्यात भावनाविश्वाला प्राधान्य देणारा हा बदल वयात येताना होतो. योग्य जोडीदार निवडताना हीच क्षमता अधिक उपयुक्त ठरत असावी. आणि योग्य जोडीदार निवडून वंशसातत्य राखणे ही तर आपल्यापैकी प्रत्येकाची उत्क्रांतिदत्त जबाबदारी आहे. उत्क्रांतिक्रमाचा विचार करता स्वाभाविकपणे वस्तुनिष्ठ विश्वाऐवजी भावनाविश्वात वावरणे पसंत करणार्या आपल्या पूर्वज आज्या-पणज्या-खापरपणज्यांमुळेच आपण या विश्वात अवतरलो असे म्हणायला हवे. विज्ञानविश्वात स्त्रियांचा सहभाग कमी असण्याचे हे महत्वाचे कारण आहे असे हे तज्ज्ञ मानतात.
पुरुषी मेंदूच्या तुलनेत स्त्रियांच्या मेंदूचा हा अवगुण पहा. मानवी मेंदूकडे, एखादी त्रिमिति वस्तू एका बाजूने पाहिली असता दुसर्या कोनातून कशी दिसेल हे ठरवण्याची, किंवा अवकाशातील अंतरांचे अंदाज घेण्याची क्षमता असते. हे काम करणारी मज्जामंडले पुरुष व स्त्रिया या दोहोंच्या मेंदूत असतात. पण असली कोडी सोडवायला पुरुषी मेंदूला सरासरीत कमी वेळ लागतो. वैज्ञानिकांच्या मते पुरुषांच्या मेंदूत हे काम करणारी मज्जामंडले नेटकी असावी, व म्हणूनच हे काम त्यांना तुलनेने लवकर उरकता येते. याउलट स्त्रियांच्या मेंदूत हे काम करणारी मज्जामंडले तुलनेने विस्कळित असावी, कारण स्त्रियांना तुलनेने जास्त वेळ लागतो. वाहन चालवताना हा जास्त लागणारा वेळ हा अवगुण ठरतो. अर्थात प्रशिक्षणाने ही त्रुटी भरून काढता येते. पण काही नवा प्रशिक्षणबाह्य-प्रसंग आला तर हा अवगुण परत उघड होईल. याचा अर्थ सर्वच स्त्रिया याबाबतीत अक्षम असतात असे नाही. उदाहरणार्थ विमाने चालवणार्या, विशेषतः लढाऊ विमाने चालवणार्या स्त्रिया आज आपल्या विमानदलात आहेत. पण ह्या क्षमतेची चाचणी घेणार्या परीक्षेला मुलांइतक्याच प्रमाणात मुली बसल्या तर नापासांच्या प्रमाणाची तुलना पाहाणे हे उद्बोधक असेल.
शरीर व शरीरव्यवहारविषयकच नव्हे तर मेंदूविषयक फरकांची अशी अनेक उदाहरणे असतील. मानवी जीवनाला या फरकांशी जमवून घेणे क्रमप्राप्त आहे. कारण लक्षावधि वर्षांच्या मानवी उत्क्रांतीतून मिळालेल्या आपल्या शरीराशी जमवून घेण्याला पर्यायच नाहीये. ही जुळवणी काहीशी कठीणही आहे. कारण गेल्या १० हजार वर्षांतील सामाजिक बदलांनी गेल्या ७० लाख वर्षांत उत्क्रांत झालेले मानवी शरीर कालबाह्य ठरते आहे की काय असे वाटू लागले आहे. आणि मानवी समाजजीवनात ज्या झपाट्याने बदल होत आहेत तितक्या वेगाने उत्क्रांती शक्य नाही. पण सतत बदलणार्या समाज-जीवनात जवळपास स्थिर अशा मानवी स्त्री-पुरुष-शारीर-क्षमतांनिशी निभावून घेण्याचे साधनही आपल्याला उत्क्रांतीनेच दिलेले आहे. ते म्हणजे आपला मेंदूच.
येथेही आपण टोकाची भूमिका घेत नाही ना याचे भान ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे मेंदूचा वापर करताना आपण अनिर्बंध विचार व तदनुसार आचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार असू; किंवा सार्वजनिक ‘गोड-बोले’ पणाला अवाजवी महत्व देऊन जर आपण स्त्री-पुरुषांतील उत्क्रांतिजन्य जीवशास्त्रीय फरकाचा पाया दुर्लक्षित करणार असू; तर आपण निसर्गाशी लढाई आरंभली असेच म्हणावे लागेल. आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, निसर्गाशी लढाई जिंकण्याचे प्रसंग केवळ अपवादानेच, आणि मर्यादित अशा स्थल-काल-व्यक्ति-समाज-विशिष्ट संदर्भातच घडलेले आहेत. बरेचदा पुरेसा काळ उलटल्यावर निसर्गावर मिळवलेला विजय किती पोकळ होता हेच उघड होत गेलेले आहे. वैश्विक व अनंतकालीन संदर्भात निसर्गावर मात केल्याची उदाहरणे जवळजवळ नाहीतच. थॅलिडोमाइडने केवळ काही वर्षे अनेक स्त्रियांचे गर्भारपण काहीसे सुकर केले. पण एक दशक उलटता उलटता उपजलेल्या संततीच्या हातापायांत दोष दिसू लागले व हा उपाय बंद पडला. ओझोन थराला पडलेले भोक हे दुसरे उदाहरण, जे उलगडायला केवळ ५०-६० वर्षे लागली. मर्त्य मानवांची शेकडो हजारो वर्षे म्हणजे विश्वनिर्मात्या ब्रह्म्याचा एक क्षण अशी समजूत आहे. अंतू बर्वा आठवा ! उत्क्रांतिक्रमातही हाच आणि असाच हिशेब चालतो. या न्यायाने निसर्गावरील मानवी विजय हा “क्षणिक” म्हटला पाहिजे, टिकाऊ तर नव्हेच नव्हे.
मग आपण काय करू शकतो? तर आपल्या मेंदूचा वापर करायचा. कशासाठी?
- स्त्री-पुरुषांची मानवी शरीरे व त्यांचे शरीरव्यवहार कसे चालतात, प्रत्येकाची मर्मस्थाने व बलस्थाने कुठली हे समजून घ्यायचे.
- तुम्ही व तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात त्यांची जोड कशी साधायची हे ठरवायचे. त्यानुसार आप-आपल्या जीवनव्यवहाराची आखणी करायची, व तसे वागायचे.
- स्त्री व पुरुष या दोघांनीही सतत बदलत्या जगाला तोंड देण्यासाठी सतत बदलायला शिकायचे. आणि
- ही सातत्याने बदलण्याची प्रवृत्ती जागी ठेवण्यासाठीच दरवर्षी महिला दिन साजरा करायचा.
विश्वास मुंडले
८ मार्च २०२१
Hits: 12
Recent Comments