विज्ञानाचे गतिशास्त्र
विज्ञान कुठे कधी व कसे पुढे जाईल, कुठल्या संशोधनातून काय निष्पन्न होईल, आणि एक समस्या सोडवता सोडवता किती उभ्या रहातील ते सांगता येत नाही हेच खरे! लाइपझिग (जर्मनी) मधल्या मॅक्स प्लांक उत्क्रांतिनिष्ठ मानववंशशास्त्र संस्थेत (Max Planck Institute of Evolutionary Anthropology) काम करणार्या मार्क स्टोनकिंग या संशोधकाने सुरू केलेली ही एक कहाणी.
१९९९ च्या शरद-हेमंत ऋतूचा सुमार. मार्कचा मुलगा घरी आला तो शाळेच्या व्यवस्थापनाचे एक पत्र घेऊन. त्यात पालकांना सूचना होती की त्यांच्या पाल्याच्या एका सहाध्यायाच्या डोक्यात ऊ सापडली आहे. (शाळकरी मुलांच्या आणि विशेषत: मुलींच्या आयांना या प्रकरणाचे गांभीर्य ताबडतोब लक्षात येईल. मुले एकमेकांशी खेळताना या उवा किती सफाईने इकडून तिकडे जातात हे त्यांना चांगलेच ठाऊक असते.) सबब पालकांनी काय काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना त्या पत्रात होत्याच. शिवाय काही माहितीही पुरवलेली होती. उदाहरणार्थ – मानव-मस्तकवासी ऊ हा परजीवी प्राणी मानवापासून अलग केल्यास २४ तासही जगू शकत नाही. मार्कचे डोके लगेच धावू लागले.
अदमासे ६०००० वर्षांपूर्वी अर्वाचीन मानवांचा (होमो सेपिएन्सचा) एक मोठा गट आफ्रिकेतून बाहेर पडून पुढील ५०००० वर्षांत उर्वरित जगभर पसरला हा सिद्धांत आजमितीला बहुमताने जगन्मान्य आहे. मानवी पेशीकेंद्रात व जनुकांत या प्रसाराच्या खुणा दिसत असतात. जर उवा सदैव माणसाबरोबरच रहाणार असतील तर त्यांच्या पूर्वजही आफ्रिकेतूनच आलेल्या असणार. तर मग या मानववंशप्रसाराची एक प्रतिकृती उवांच्या जनुकांत सापडणार! त्या दृष्टीने मार्कने उवांचा अभ्यास सुरू केला. पण लवकरच त्याच्या लक्षात आले की उवांच्या जनुकांत मानवप्रसारापेक्षाही रंजक असा मानवी-वस्त्र-परिधानाचा इतिहास दडलेला आहे.
बायबल सांगते की बाबा आदम व त्याची ईव्ह कपडे घालत नव्हते, लज्जा रक्षणार्थ अंजिराची पाने वापरीत होते, आणि परमेश्वरानेच अंजिराच्या पानांचे कपडे शिवून त्यांना या पृथ्वीवर पाठवले. पण या कथेत अर्वाचीन मानवाच्या सोबत फार पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या बिचार्या ऊची दखलही नाही! अतिप्राचीन मानव प्रजातींच्या अंगावर नखशिखांत केस होते. त्या केसांत परजीवी उवा असणे स्वाभाविकच. होमो वंशाची उत्क्रांती होत असताना साधारण १८ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या अंगावरील केस गेले व उवांचे साम्राज्य मर्यादित झाले. बिचार्या उवा!
पुढे माणसे वस्त्रे पांघरू लागली व डोक्यातल्या उवांना आपले साम्राज्य विस्तारण्याची संधी चालून आली. पण त्यासाठी उत्क्रांती आवश्यक होती. मस्तकवासी उवांकडे केसांना धरून रहाण्यासाठी उपयुक्त असे पाय असतात. त्या आकारानेही लहान असतात. याउलट शरीर किंवा वस्त्रवासी उवांचे शरीर काहीसे मोठे व धागे/ दुमडी/ शिवणी यांत लपून रहाण्यास उपयुक्त असते. माणसे कपडे घालू लागली तशी मस्तकवासी उवांपासून शरीरवासी उवांची उत्क्रांती होण्यास वाव मिळाला, व अर्वाचीन मानव कपडे घालू लागल्यानंतर हे नवे उत्क्रांत रूप उपजले व स्थिरावले, हे आज सर्वमान्य आहे. अर्थातच, मस्तकवासी व वस्त्रवासी उवांचा समान पूर्वज किती वर्षांपूर्वी अस्तित्वात होता हे कळले की माणसे कपडे कधी वापरू लागली हे सांगणे शक्य आहे.
इथिओपिया, न्यूगिनी, इक्वेडोर आणि दरम्यानच्या डझनभर देशांच्या शेकडो माणसांच्या अंगावरील व डोक्यातील उवांचा अभ्यास करून त्याने या दोन प्रकारच्या उवांचे वंशवृक्ष सिद्ध केले. या दोन प्रकारच्या उवांच्या एखाद्या ठराविक जनुकातील फरकावरून तो फरक किती वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असावा हे शोधून काढता येते. मार्कचे संशोधन २००३ साली प्रकाशित झाले. (A11) त्याच्या गणितानुसार जगभरातील विविध ठिकाणीं मस्तकवासी ऊ पासून वस्त्रवासी ऊची उत्क्रांती साधारण ७२००० वर्षांपूर्वी झाली. मोजमापातील चुका लक्षात घेता ही उत्क्रांती ६०००० ते ८०००० वर्षांपूर्वी झाली असे समजायला हरकत नसावी. अदमासे याच काळात माणसे भाषा वापरू लागली, आणि त्याच सुमारास होमो सेपिएन्स जगभर फैलावले, हा केवळ योगायोग की त्यातही काही सूत्र असावे? की सभ्यपणे जगभर वावरायचे म्हणून माणसाने कपडे अंगिकारले असे म्हणायचे? (T12)
पण विज्ञानात इतक्या सहजपणे ‘साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण’ होत नसते. एकाने सांगितले की बाकीचे नुसते मान डोलवीत नसतात. मार्क हा काही मानवी ऊचा एकमेव अभ्यासक नव्हता. २००४ साली फ्लोरिडा नॅशनल म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील अभ्यासक डेव्हिड रीड यांनी मार्कच्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह लावले. (A13)
मस्तकवासी ऊ व वस्त्रवासी ऊ यांच्या जनुकातील फरक किती वर्षांपूर्वी सुरू झाला हे ठरवण्यासाठी या दोन्ही उवांचा पूर्वज असणारा एक संदर्भबिंदू लागतो. मार्कने चिंपांझी-शरीरवासी ऊ हा संदर्भबिंदू निवडला होता. डेव्हिडच्या मते तो संदर्भबिंदूच चुकला होता. तर मार्कच्या मते चूक असलीच तर या संदर्भबिंदूच्या जनुकीय क्रमविश्लेषणात असावी. डेव्हिडच्या फेरविश्लेषणांती मानवाने कपडे वापरण्याचा काळ ५ लाख वर्षे इतका मागे गेला. तत्वत: हेही शक्य आहे, कारण १६ लाख वर्षांपूर्वी सुरू झालेले हिमयुग जवळजवळ २० हजार वर्षांपूर्वीपर्यंत सुरू होते, असे पृथ्वीचा इतिहास सांगतो. या हिमयुगात कपड्यांची मदत होणे स्वाभाविकच नव्हे काय?
यथावकाश वस्त्रस्थित व शिरस्थ उवांच्या अधिक अभ्यासानंतर ‘कपड्यांचा वापर ५ लाख वर्षांपूर्वी सुरू होणे’ ह्या नव्या अंदाजावरही आक्षेप घेतले जाऊ लागले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ रिचर्ड क्लाइन यांचे मते शरीरस्थ उवांना जगण्यासाठी ऊब लागते. त्यासाठी मानवी शरीराच्या अगदी जवळ रहाणे; म्हणजे पर्यायाने मानवाने शरीरालगत बसणारे – अर्थात शिवलेले – कपडे वापरणे आवश्यक आहे. ५ लाख वर्षांपूर्वींचे मानव केवळ ढगळ कातडी पांघरत असल्याने शरीरस्थ ऊच्या उत्क्रांतीचा काळ माणसे कातडी शिवून अंगालगत बसणारे कपडे घालू लागल्यानंतरचा असणे अधिक संभवनीय असे त्यांना वाटते. (A14) थोडक्यात माणसे अंग कधी झाकू लागली? ७२००० वर्षांपूर्वी की ५ लाख वर्षांपूर्वी की मध्येच कधीतरी? या प्रश्नाचे अंतिमोत्तर अजून मिळायचे आहे.
पण डेव्हिड रीड यांनी मार्क स्टोनकिंग यांचे मानवी ऊवरील संशोधन आणखीही पुढे नेले, ज्यामधून स्फोटक सिद्धांत व शक्यता पुढे आल्या आहेत. मार्क स्टोनकिंगप्रमाणे डेव्हिड यांनीही प्रथम जगभरातील शिरस्थ ऊचा जनुकीय अभ्यास केला. पण त्यांना आढळले की अमेरिका खंडातील मूलवासींच्या डोक्यातील ऊ (जिला आपण प्रकार १ म्हणू) व अन्य जगातील शिरस्थ ऊ (जिला आपण प्रकार २ म्हणू) यांच्यात एक सूक्ष्म फरक आहे. (यथावकाश मार्कलाही हा फरक त्याने गोळा केलेल्या जनुकीय माहितीत आढळला.) डेव्हिडने शोधून काढले की हा फरक साधारण ११ लाख ८० हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे याच सुमारास होमो प्रजातीची एक शाखा आफ्रिकेतून स्थलांतर करून आशिया व युरोपात पसरली. त्यांच्या बरोबर प्रकार १ ची ऊही आली. यथावकाश या आदिमानावापासून आशियात होमो इरेक्टस व युरोपात नियॅंडरथाल ही प्रजाति उत्क्रांत झाली. अर्थात त्यांच्या बरोबर राहिलेली ऊ (प्रकार १), हीसुद्धा उत्क्रांत झाली. आफ्रिकेत मागे राहिलेली मानव प्रजाति होमो सेपिएन्स म्हणून उत्क्रांत झाली. अर्थात त्यासोबत प्रकार २ ची ऊ देखील! सुमारे ६०००० वर्षांपूर्वी जेव्हा होमो सेपिएन्सने आफ्रिकेतून स्थलांतर करून जग पादाक्रांत केले तेव्हा त्यांच्या बरोबर प्रकार २ ची ऊ जगभर पसरली. डेव्हिडच्या मते सुमारे १५००० वर्षांपूर्वी बेरिंगच्या सामुद्रधुनीतून अलास्कामार्गे अमेरिका खंडात पोचण्याआधी, सैबेरियामध्ये होमो सेपिएन्सचा तिकडील आदिवासींशी – म्हणजेच ११.८ लाख वर्षे-पूर्वस्थलांतरितांचे वंशज होमो इरेक्टस यांच्याशी – संबंध आला असणार! त्याच वेळेला प्रकार १ च्या ऊला होमो इरेक्टसच्या डोक्यावरून होमो सेपिएन्सच्या डोक्यावर शिरण्याची संधी मिळाली. म्हणूनच अमेरिकन आदिवासींच्या डोक्यातील ऊ व उर्वरित जगातील शिरस्थ ऊ यांच्यात हा जनुकीय फरक दिसतो. डेव्हिडच्या मते तो होमो सेपिएन्स व होमो इरेक्टस यांच्या निकट संबंधांचा पुरावाच होय.
त्यापुढील संशोधनातून याहूनही अधिक स्फोटक प्रश्न उभे राहिले आहेत. पण त्यातली मेख समजून घ्यायची तर मानव-चिंपांझी-गोरिला यांचा सामायिक वंशवृक्ष व मानवाच्या पृथ्वीवरील प्रसाराची रूपरेषा यांचा परिचय असणे आवश्यक आहे. गोरिला, चिंपांझी व मानव यांचा समान पूर्वज साधारण ८० लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर वावरत होता. आपल्यापासून प्रथम गोरिला वेगळे झाले. चिंपांझी व मानव साधारण ६० लाख वर्षांपूर्वी वेगवेगळ्या उत्क्रांतिमार्गावर चालू लागले. या सर्व मुद्द्यांवर मानववंशशास्त्रज्ञांचे एकमत आहे. हे सर्व पूर्वज नखशिखांत केसाळ होते. उवा त्यांच्या अंगावर कुठेही फिरायला मोकळ्या होत्या. चिंपांझी व मानववंश वेगळे झाले तेव्हा त्यांच्यावरील उवांचे वंशही उत्क्रांत होतहोत वेगळे झाले – जसे चिंपांझीवर पेडिक्युलस शेफी व आदिमानवावर पेडिक्युलस ह्युमॅनस. वर उल्लेखिल्याप्रमाणे साधारण १८ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या अंगावरील केस नाहीसे झाले व उवांना फक्त दोन जागा उरल्या. त्या म्हणजे मस्तक व गुप्तांगप्रदेश ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानव-शिरस्थ उवा (पेडिक्युलस ह्युमॅनस) जरी चिंपांझीवरील उवांशी (पेडिक्युलस शेफी) साधर्म्य दाखवीत असल्या तरी मानवी गुप्तांगावरील उवा (थिरस प्यूबिस) या गोरिलांच्या अंगावरील उवांशी (थिरस गोरिले शी) साधर्म्य दाखवतात!
या अंतर्विरोधामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. पण गुप्तांगावरील ऊचे जनुकीय विश्लेषण व वंशवृक्ष अजून अपूर्ण असल्याने हे प्रयत्न सफळ झालेले नाहीत. एक सिद्धांत असा की गोरिला वंशवृक्ष विभक्त होताना इतर ऊ प्रजातींबरोबर थिरस गोरिले ह्या गुह्यरोमप्रदेशीच्या ऊचा वावर आजच्या गोरिला, चिंपांझी व मानव या तिहींच्या पूर्वजांच्यात होता. यथावकाश चिंपांझी व मानवी वंशवृक्षशाखा वेगळ्या झाल्यानंतरच्या काळातही तीच परिस्थिती असावी. पुढे चिंपांझींच्या अंगावरील पेडिक्युलस प्रजातीने गुप्तांगावरील थिरस प्रजातीला हुसकून लावले. अंगभर केस असल्याने ते चिंपांझीला शक्य झाले, पण मानवी शरीर केशरहित झाल्यानंतर मानवातील पेडिक्युलस प्रजातीला हे साधता आले नाही.
सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असते हे सर्वच संशोधकांना, विशेषत: जीवशास्त्रज्ञांना सतत अनुभवाला येत असते. आता हेच स्पष्टीकरण खरे की सत्य त्याहून वेगळेच आहे, हे कळण्यासाठी थांबावे लागणार. पण कळीचा प्रश्न हा की मस्तकवासी ऊमधील सूक्ष्म फरकाच्या बाबतीत डेव्हिडने जे स्पष्टीकरण दिले आहे, तसलेच काही गुप्तांगावरील ऊच्या बाबतीतही लागू पडत असेल काय? सूज्ञांस अधिक सांगणे नलगे!
विज्ञान कुठे कधी व कसे पुढे जाईल, कुठल्या संशोधनातून काय निष्पन्न होईल, आणि एक समस्या सोडवता सोडवता किती उभ्या रहातील ते सांगता येत नाही हेच खरे! (आधारित)
विश्वास मुंडले
Hits: 26
Recent Comments