विडंबन
भुकेची शिदोरी
भुकेची शिदोरी । घेऊ बरोबरी ।
प्रवासास जाता बाबा । प्रवासास बाबा ॥धृ॥
प्रवासही ठरला आहे । किती दूरदूर ॥
महड देहू मग आळंदी । पुणे पंढरपूर ॥
रेनिगुंठा तिरुपति शैल्य । सत्यसाईबाबा ॥१॥
प्रवासही चालू झाला । आडले वहान ॥
पाठी पुढे कितिकिति गाड्या । रांगही महान ॥
मुक्कामास पोचायाला । उशिर होइ आता ॥२॥
आडल्या वहानामाजी । प्रवाशांची दाटी ॥
चुळुबुळु करिती सारे । खाण्यापिण्यासाठी ॥
शिदोरीच असता हाती । सहज येइ खाता ॥३॥
- मंगला द. मुंडले
ये परतुनि ये
स्वातंत्र्यवीरांची क्षमा मागून
ये परतुनि ये । येइ येइ गोपाळा । चाकरा राग डळमळला ॥धृ.॥
करिता स्नान । हात-पाय मी धूता । टॉवेल देशि मज हाता ॥
कधि वदलासी । शिळे नका तुम्हि खाऊ । सोसे न तुम्हाला भाऊ ॥
मम कपड्यांना । धुवुन इस्त्रिही करुन । हातात देशि आणून ॥
(चाल बदलून) इतके तू करिसी सारे । तुजवरी राग धरिला रे । कारण घे समजुनिया रे ॥
विडिकाडीच्या । पाहुनि तव व्यसनाला । रागाचा पारा चढला ॥१॥
तू गेलासी । आणिक मजला कळले । घर सुने सुने मज झाले ॥
हेही नसती । माझ्या मदतीसाठी । ते प्रमोशनाच्या पाठी ॥
तंव मजसाठी । तूच हवा मदतीला । म्हणुनी लिहिते पत्राला ॥
(चाल बदलून) हे तिकिटाचे पैसे घे । भत्त्यात वाढही घे घे । घे वचन तुला हे माझे ॥
पण लवकर ये । पाव मला वक्ताला । विसरले तुझ्या व्यसनाला॥२॥
ये परतुनि ये । येइ येइ गोपाळा । चाकरा राग डळमळला ॥धृ.॥
- मंगला द. मुंडले
माझी एकादशी
करीन म्हटलं एकादशी । पण राहाणार कशी उपाशी ॥
म्हणून म्हटलं थोडं खाईन । आणि मग उपास करीन ॥
सकाळीच घेतला चहा । तर पित्ताचा त्रास पहा ॥
म्हणून लगेच तोंडाला । दुधाचा ग्लास लावला ॥
तासाभराने सुंठ कुटून । खाल्ली तूप साखरेतून ॥
दहा वाजतात तेव्हा । मला खुराक हवा ॥
रात्रीच बदाम भिजवले बरं का । चवीला घातल्या खारका ॥
घेतली थोडी खीर । तेव्हा आला धीर ॥
दुपारी थोडा फराळ हवा । म्हणून पदार्थ केले पहा ॥
साबुदाण्याची खिचडी । भरीत नि खमंग काकडी ॥
बटाट्याची भाजी । वर्याची सोजी ॥
पुर्या खुसखुशीत । खांडवी लुसलुशीत ॥
केळी पुरणाची । भजी सुरणाची ॥
नारळाची चटणी । ताकाचं पाणी ॥
दाण्याची आमटी । श्रीखंडाची वाटी ॥
एवढंच केलं फराळासाठी । तरी पानात झाली दाटी ॥
मुखशुद्धीला काजूगर । मग वामकुक्षी घडीभर ॥
येता जाता खाल्ली केळी । नि उकडलेली रताळी ॥
उठल्यावर घेतला चहा । तेव्हा बरं वाटलं पहा ॥
रात्री घातला साबुदाणा ताकात । त्याने थंड असतं पोटात ॥
अशी माझी एकादशी । पार पडली कशीबशी ॥
- मंगला द. मुंडले (८ नोव्हेंबर १९७१)
Hits: 37
फारच छान !.आईंच्या कल्पनाशक्तीला सलाम ! सर्व गाणीसुरेख आहेत.प्राण्यांवरील गाणी कल्पनातीत अप्रतिम आहेत.जवळ जवळ सर्व विषय कविते मधून त्यांनी हाताळले आहेत.त्यांना सादर प्रणाम.
धन्यवाद. आईच्या कवितांची आणखी काही वह्या सापडल्या आहेत. त्या कॉम्प्यूटरवर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यातील निवडक वर्गीकरण करून क्रमाक्रमाने प्रकाशित करीन.
फारच छान!उपासाची कविता वाचून तोंडाला पाणी सुटलं.