शब्द-कोडी-आडनावे
परिचय
अशी कोडी रचायला आईला कसे सुचले याबद्दल तिनेच कवितारूपात लिहून ठेवले होते. .
जेव्हा झोप येत नसते । अनेक शब्द आठवत असते ॥१॥
शब्द डोळ्यासमोर येतात । फेर धरून नाचू लागतात ॥२॥
सुटी होउन त्यांची अक्षरे । बनते छान जोडी ॥३॥
त्यातून मग तयार होतात । मजेदार कोडी ॥४॥
असल्या कोड्यांनीच तिच्या नातवंडांच्या (माझ्या मुलांच्या) भाषिक क्षमतांच्या विकासाला मदत झाली होती. सामान्यतः ही कोडी विविध वयाच्या मुलांसाठी आहेत. काही तर मोठ्या माणसांनाही आव्हान ठरतील. मुलांची शब्दसंपत्ती व पूर्वानुभवानुसार उत्तरे शोधायला कमी जास्त वेळ लागू शकेल. मुलांच्या कल्पनाशक्तीला ताण देण्यासाठी असा वेळ देणे आवश्यक असते असे मला वाटते. त्यामुळे मर्यादित वेळ उपलब्ध असलेल्या शालेय वर्गाऐवजी ही कोडी घरच्या मुक्त वातावरणात जास्त परिणामकारक असतील असे माझे मत आहे. शालेय वातावरणात ह्या कोड्यांचा वापर कसा करावा हे शिक्षकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलेले बरे.
कल्पनाशक्तियुक्त पालक स्वतःही नवनवीन कोड्यांची गाणी रचू शकतील. पण इथे हेही लक्षात असावे की इथे काव्यरचना ही केवळ कोडे श्रवणरम्य आणि आकर्षक करण्यासाठी, तसेच कवितेचा अर्थ लावण्याचे शिकवण्यासाठी उपयुक्त आहे. केवळ शब्दसंपत्तीच्या विकासासाठी गद्यातले कोडे ही तितकेच उपयुक्त असेल. या बाबतीत कोणी तौलनिक प्रयोग केला तर त्याचा अनुभव जाणून घ्यायला मी उत्सुक असेन.
ही कोडी अनेक प्रकारच्या शब्दांवरून रचलेली आहेत. वाचकांच्या सोयीसाठी त्यांचे चार पाच भागात वर्गीकरण करून दिले आहे. ते कोडी वापरू पाहाणार्यांसाठी ते उपयुक्त ठरेल असे वाटते.
बिगर-व्यावसायिक शैक्षणिक वापरासाठी ही कोडी मुक्तपणे उपलब्ध असतील. पण त्याआधी या पानाच्या तळाशी असलेली स्वामित्वहक्क विषयक नोंद वाचावी व नाव नोंदवावे ही विनंती.
आडनावावरील कोडी
चार अक्षरी आडनाव मी । पहिले वगळा होइ नाव मी ॥
पहिले दुसरे अक्षर घ्यावे । अर्थ तयाचा “उणे न व्हावे”॥
तिसरे चवथे अक्षर घ्याल । अर्थ तयाचा भलेच होइल ॥
उत्तर पुरोहित
अक्षरे पाच आडनाव एक । तिसरे पाचवे अर्थ विशेष ॥
तिसरे दुसरे पहिले वाचा । एक खाउ मी होइन साचा ॥
तिसर्या दुसर्यात दिसतो प्राणी । चवथ्या दुसर्याचा अर्थ पाणी ॥
उत्तर कारखानीस
आहे एक आडनाव । त्याची अक्षरे तीन ॥
सर्वांवरती मात्रा असून । गंमत होते मात्रा काढून ॥
अर्थहि त्याचा होइ फुलोरा । शब्द ओळखून मिळवा मानाचा तुरा ॥
उत्तर बेहेरे
रचयित्री – मंगला द. मुंडले
Hits: 65
जात्यावरच्या ओव्या अप्रतिम ! कोडी ( आडनांवाची ) .
बहिणाबाईची प्रकर्षांने आठवण झाली. सोपानदेवांना अाचार्य अत्रे
गाठ पडले तसे भाग्य तुलाही लाभो ही सदिच्छा .
धन्यवाद प्रभाकर.
आत्ता पाहिलेले , वाचलेले आवडले. शब्द कोडी आडनाव वाचले. छानच आहेत. आत्ता नंतर सवडीनुसार एकेक व्वाचीन. कुसुंताईंची आठवण होणे अपरिहार्य आहे.
धन्यवाद.अजून बर्याच कविता द्यायच्या आहेत. नवीन काही रुजू केल्याचा निरोप फेसबुक तर्फे कसा द्यावा हे अजून शोधले नाही. कारण सध्या बाहेरगावी आहे. यथावकाश कळवीत जाईन.
आजी कविता करायच्या एवढच माहित होतं आणि लहानपणी काही एकल्याही होत्या. पण मराठी भाषेवर त्यांच एवढं प्रभुत्व होतं याची कल्पना नव्हती. खूप छान. काका, तुम्हालाही धन्यवाद तुम्ही सर्व छान प्रस्तुत केलय.
धन्यवाद महेश. ही प्रस्तुती इंटरनेटमुळेच शक्य झाली.