पाढ्यांची गाणी – सहा ते दहा
पाढ्यांच्या गाण्याबाबतचे निवेदन वाचले नसल्यास इथे वाचा.
सहाचा पाढा – भारतातील प्रेक्षणीय स्थळे
सहा एके सहा । कुठे काय पाहा ॥
सहा दुणे बारा । ताजमहाला आग्रा ॥
सहा त्रीक अठरा । औरंगाबादी मकबरा ॥ (बिबीका मकबरा)
सहा चोक चोवीस । कुतुबमिनार दिल्लीस ॥
सहा पंचे तीस । बोलघुमट विजापुरास ॥
सहा सक छत्तीस । प्रतापगड वाईस ॥
सहा सत्ते बेचाळ । लेणी अजिंठा वेरूळ ॥
सहा अठ्ठे अठ्ठेचाळ । अमृतसरी सोन्याचे देऊळ ॥
सहा नव्वे चौपन । काश्मीर हे तर नंदनवन ॥
सहा दाही साठ खरे। एवढे तरी पहा बरे ॥
- मंगला द. मुंडले
सातचा पाढा – गांधीजी
सात एके सात । गांधीजींना दंडवत ॥
सात दुणे चौदा । त्यांचा पोषाख साधा ॥
सात त्रीक एकवीस । नेसती खादीच्या पंचास ॥
सात चोक अठ्ठावीस । दुसरा वरती अंगास ॥
साता पाचा पस्तीस । तिसरा कपडा न अंगास ॥
सात सक बेचाळ । बोलणे त्यांचे ना वायफळ ॥
साती साती एकोणपन्नास । नेमे पाळिति मौनास ॥
साती आठी छप्पन्न । साधे घेती पूर्णान्न ॥
सात नव्वे त्रेसष्ट । स्वभाव त्यांचा स्पष्ट ॥
सात दाहे सत्तर होती । त्यांना राष्ट्रपिता म्हणती ॥
- मंगला द. मुंडले
आठचा पाढा – कसे जेवावे?
आठ एके आठ । बैस घेउन पाट ॥
आठ दुणे सोळा । जेवायला घेई थाळा ॥
आठ त्रीक चोवीस । पाणी पिण्या घेई ग्लास ॥
आठ चोक बत्तीस । मांडी घालून बैस ॥
आठा पंचे चाळीस । तूप साखर पोळीस ॥
आठ सक अठ्ठेचाळ । भात जेवी जिरेसाळ ॥
आठी साती छप्पन । वरती गोडे वरण ॥
आठी आठी चौसष्ट । लोणचे घेई चविष्ट ॥
आठा नव्वे बाहात्तर । साजुक तुपाची धार ॥
आठ दाहे ऐंशी म्हणावे । सारे पान चक्क करावे ॥
- मंगला द. मुंडले
नऊचा पाढा – म्हणींचे गाणे
नऊ एके नऊ । सुसरबाईची पाठ मऊ ॥
नऊ दुणे अठरा । पालथ्या घड्यावर पाण्याच्या धारा ॥
नऊ त्रीक सत्तावीस । मोर होइना लावुन पीस ॥
नऊ चोक छत्तीस । भाई गेला जागा पैस ॥
नवा पाचा पंचेचाळ । कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ॥
नऊ सक चोपन्न । ज्वर येता कडू अन्न ॥
नवा साता त्रेसष्ट । असंगसंगे प्राणाशी गाठ ॥
नवा आठे बाहात्तर । कर नाही तर कशाला डर ॥
नव्वे नव्वे एक्याऐंशी । अग अग म्हशी मला कुठे नेशी ॥
नऊ दाहे नव्वद झाले । म्हणींचे गाणे जुळून आले ॥
- मंगला द. मुंडले
दहाचा पाढा – असे वागावे (२६/८/१९८१)
दहा एके दहा । तुम्ही असे वागून पहा ॥
दहा दुणे वीस । सकाळी लवकर उठावेस ॥
दहा त्रीक तीस । उरकी प्रातर्विधीस ॥
दहा चोक चाळीस । नंतर जाशी स्नानास ॥
दहा पाचे पन्नास । मग बस अभ्यासास ॥
दहा सक साठ । पाढे करी पाठ ॥
दहा साते सत्तर । लिहून काढी प्रश्नोत्तर ॥
दहा आठे ऐंशी । पुस्तक नीट वाचशी ॥
दहा नव्वे नव्वद । कविता करिशी मुखोद्गत ॥
दाही दाही शंभर होती । अशा मुलाला शहाणा म्हणती ॥
- मंगला द. मुंडले
Hits: 57
६ते १०पाढे गीतं जास्त आवडली