पाढ्यांची गाणी – पावकी ते औटकी
पाढ्यांच्या गाण्याबाबतचे निवेदन वाचले नसल्यास इथे वाचा.
पावकी – बुवाची गोष्ट
एक पाव पाव । एक होती बाव ॥
बे पाव अर्धा । तिथे लागली स्पर्धा ॥
तीन पाव पाऊण । पाणी न्यायचे वाहून ॥
चार पाव एक । स्पर्धक जमले अनेक ॥
पाच पाव सव्वा । तिकडे आला एक बुवा ॥
सहा पाव दीड । तो होता निर्भीड ॥
सात पाव पावणेदोन । त्याने विचारले “तुम्ही कोण” ॥
आठ पाव दोन । “विहीर माझी जा निघून” ॥
नऊ पाव सव्वादोन । स्पर्धक गेले निघून ॥
दहा पाव अडीच झाले । बुवांनी मिशांना पीळ भरले ॥
- मंगला द. मुंडले
निमकी – चिमा आणि बिपिन
एक निम्मे निम्मे । इकडे ये ग चिमे ॥
बे निम्मे एक । नीट सांगते ऐक ॥
तीन निम्मे दीड । करून देते धिरडं ॥
चार निम्मे दोन । तू घेई खाऊन ॥
पाच निम्मे अडीच । खाऊ देइन वडीच ॥
सहा निम्मे तीन । मग येइल बिपीन ॥
सात निम्मे साडेतीन । अभ्यास करा मिळून ॥
आठ निम्मे चार । सुरेख काढा अक्षर ॥
नऊ निम्मे साडेचार । आवरून ठेवा दप्तर ॥
दहा निम्मे पाच । मग खेळायला जाच ॥
- मंगला द. मुंडले
पाउणकी – अरुण आणि मोहन
एक पावणे पाऊण । आठवल्यांचा अरुण ॥
बे पावणे दीड । त्याला खोट्याची चीड ॥
तीन पावणे सव्वादोन । शेजारी होता मोहन ॥
चार पावणे तीन । त्याने चोरली पीन ॥
पाच पावणे पावणेचार । दोघांची जुंपली मारामार ॥
सहा पावणे साडेचार । कोणी घेइना माघार ॥
सात पावणे सव्वापाच । घड्याळात जसे वाजले पाच ॥
आठ पावणे सहा । दोघांच्या मनी विचार हा ॥
नऊ पावणे पावणेसात । घरी येतील आत्ता तात ॥
दहा पावणे साडेसात । पहा झाले दूर हात ॥
- मंगला द. मुंडले
सवायकी – कावळ्याची गोष्ट
एक सव्वा सव्वा । एक होता कौवा ॥
बे सव्वे अडीच । त्याला वेड गोरेपणाचं ॥
तीन सव्वे पावणेचार । त्याने केला मनी विचार ॥
चार सव्वे पाच । खोकं आणलं साबणाचं ॥
पाच सव्वे सव्वासहा । साबू खूप लावला पहा ॥
सहा सव्वे साडेसात । अंग चोळून दमले हात ॥
सात सव्वे पावणेनऊ । आपण कसे गोरे होऊ ॥
आठ सव्वे दहा । सतवी त्याला विचार हा ॥
नऊ सव्वे सव्वा अकरा । अंग घाशिले खराखरा ॥
दहा सव्वे साडेबारा । कौवा गेला मरुन बिचारा ॥
- मंगला द. मुंडले
दिडकी – जोडगोळ्या
दीड एके दीड । जहाजाला शीड ॥
बे दीडे तीन । आगगाडीला इंजीन ॥
तीन दीडे साडेचार । पिंपळाला असे पार ॥
चार दीडे सहा । विमानाला पंखा हा ॥
पाच दीडे साडेसात । समईसाठी लागे वात ॥
सहा दीडे नऊ । आकाशी चंद्रा पाहू ॥
सात दीडे साडेदहा । सागरावरी लाट पहा ॥
आठ दीडे बारा । टेलिफोनला तारा ॥
नऊ दीडे साडेतेरा । टोपली असते केरा ॥
दहा दीडे पंधरा । जोड्या सगळ्या ध्यानी धरा ॥
- मंगला द. मुंडले
अडीचकी – फुलेच फुले
एक अडचे अडीच । लांब फूल गुलछडीचं ॥
बे अडचे पाच । हिरवा हिरवा चाफाच ॥
तीन अडचे साडेसात । नाजुक फूल पारिजात ॥
चार अडचे दहा । फुलांचा राजा गुलाब हा ॥
पाच अडचे साडेबारा । काकडा फूल हवे हारा ॥
सहा अडचे पंधरा । तेरड्याच्या नाना तर्हा ॥
सात अडचे साडेसतरा । मोठे फूल धोतरा ॥
आठ अडचे वीस । लाल फूल जास्वंदीस ॥
नऊ अडचे साडेबावीस । सफेद फूल मोगरीस ॥
दहा अडचे पंचवीस । मंद सुगंध जाईस ॥
- मंगला द. मुंडले
औटकी – प्राणिवर्णन
एक औटे साडेतीन । बारीक पाय हरीण ॥
बे औटे सात । अजगराला नाही दात ॥
तीन औटे साडेदहा । नाकावर शिंग गेंडा हा ॥
चार औटे चौदा । एक डोळा कावळेदादा ॥
पाच औटे साडेसतरा । वाकडे शेपूट हा कुत्रा ॥
सहा औटे एकवीस । साळिंदराला काटेरी पीस ॥
सात औटे साडेचोवीस । अस्वलाला दाट केस ॥
आठ औटे अठ्ठावीस । आखुड दोन पाय कांगारूस ॥
नऊ औटे साडेएकतीस । लांब मान जिराफास ॥
दहा औटे पस्तीस । बारीक डोळे हत्तीस ॥
- मंगला द. मुंडले
Hits: 34
पावकी,निमकी—-औटकी एकदम सही