डोहाळे
वास्तवात डोहाळे म्हणजे गरोदर स्त्रीचे मनोरथ, तिच्या (काही व्हावे वा करावे अशा) इच्छा आकांक्षा आणि (काही खावे अशी) लालसा. परंपरेनुसार डोहाळे पुरवणे आवश्यक मानले जाते. गीतरामायणातही “डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे” असे सीता म्हणतेच की !
तर डोहाळेजेवण म्हणजे (पहिलटकरीण) गर्भवतीला सातवा महिना लागला की नातेवाईक व परिचित स्त्रियांना बोलावून तिचे कोडकौतुक करण्याचा समारंभ. कोडकौतुकात तिचे डोहाळे जाणून घेणे, त्यातल्या नावीन्याची चर्चा, वाडी भरून (म्हणजे फुलांचे दागिने घालून) शोभिवंत मंचावर किंवा झोपाळ्यावर, फोटो काढणे हे महत्त्वाचे. शिवाय गर्भवतीची ओटी भरणे यासारखा विधीही असतो. तर मुलगा होणार की मुलगी याबाबतचा अंदाज घेण्याचा “अंगठी की रुपया” असा करमणूकपर प्रकारही असतो.
कवितेच्या संदर्भात डोहाळे म्हणजे डोहाळेजेवणात वडीलधार्या स्त्रीने गर्भवतीला उद्देशून म्हणायचे उपदेशपर तसेच कौतुकपर गाणे. परंपरेनुसार आजच्या काळातही डोहाळेजेवण हा स्त्रीवर्गासाठी मोठा सोहळा राहिला आहे. पण त्यात डोहाळे म्हणण्याचा प्रघात कमी होत होत आज नगण्य उरला आहे.
कविता करू लागल्यावर आई ज्या ज्या डोहाळेजेवण समारंभाला गेली तिथे तिथे तिने आपली काव्यप्रतिभा डोहाळे रचण्यासाठीही वापरली, आणि ते गीत आवर्जून गायले देखील. घरगुती समारंभ असल्याने अशा प्रत्येक काव्यात व्यक्तिगत संदर्भ येणे हे स्वाभाविकच. त्यात अपरिचित वाचकांना रस असणे शक्य नाही. पण खालील दोन रचना मात्र व्यक्तिनाम विरहित असल्याने त्या रसिकांना भावतील.
डोहाळे १
(चाल: शर आला तो )
आईला एक डोहाळे जेवण करता आले नव्हते. तेव्हा आईने आशिर्वादपर डोहाळे लिहून पाठवले होते. ते असे –
स्त्रीजन्माचे सार्थक होण्या बाळे । लागले तुला डोहाळे ॥धृ.॥
तुज नेसवुनी हिरवा हिरवा शालू । वरि साज फुलांचा घालू ॥
तुज बैसवुनी हिरव्या रंगमहाली । घनदाट वृक्ष साऊली ॥
(चाल बदलून) अति सुरम्य वेळ प्रभात । पक्षीगण किलबिलतात । साद ही जना घालीत ॥
उत्साह मनी दाटे यागे वेळे । लागले तुला डोहाळे ॥१॥
अंगावरती शिशिर पाहतो बहरू । त्यावरीच शेला पसरू ॥
तुज बैसाया आणवु काय पलंग । की सिंहपदी चौरंग ॥
(चाल बदलून) तुज नाही का हे गमले । आवडे काय मग बाळे । संकोच मनी ना बोले ॥
मग वृक्षाला बांधवु का हिंदोळे । लागले तुला डोहाळे ॥२॥
बघ झाला की न्यारा भोजन थाट । रेशनला देउन चाट ॥
वरि तांदुळ तो करुनि नारळीभात । साबूदाणा ताकात ॥
(चाल बदलून) वाटाण्याचे पॅटीस । लावून बटाटा त्यास । भजी चटणी भाजी चवीस ॥
मुखशुद्धीला चिकू संत्र अन् केळे । लागले तुला डोहाळे ॥३॥
तुज सांगाती बैसायास तशाच । आणिल्या सख्या ह्या पाच ॥
पुष्पा सरला, ही वीणा गे भगिनी । श्यामा अन् ही रोहीणी ॥
(चाल बदलून) घेऊन उखाणे नाना । कवयित्री घेतिल ताना । भर पडेल थोडी ज्ञाना ॥
कुणी हौशी ग म्हणतिल मग डोहाळे । लागले तुला डोहाळे ॥४॥
भोजन झाले घ्या ग अता विश्रांती । तांबूल मुखा रंगविती ॥
मग बैसवुनी तुम्हा ओळीने पाटी । भरण्याला तुमची ओटी ॥
(चाल बदलून) लावोनी कुंकुम तिलका । हिरवा खण हाती बरं का । हळकुंड सुपारी खारका ॥
श्रीफल आणी बदाम तांदुळ थोडे । लागले तुला डोहाळे ॥५॥
ओटी भरता वंदन करुनी देवा । आशीर्वच त्याचा घ्यावा ॥
आठवा मनी माता महाराष्ट्राची । शिवाई शिवनेरीची ॥
(चाल बदलून) देईल तुम्हा ती पुत्र । जमवुनी आपुले मित्र । राखतील देश स्वतंत्र ॥
जन वदतिल की थोर आमुची बाळे । लागले तुला डोहाळे ॥६॥
हा सोहाळा खरा नाहि ग केला । काव्यात मात्र वर्णियला ॥
माहीत तुम्हा महागाइची महती । ना रुसणे तुम्हि मजवरती ॥
(चाल बदलून) हे काव्य तुम्ही वाचावे । सोहळ्या गोड मानावे । मजवरी क्षेम राखावे ॥
उत्सूक मनी तुमची बघण्या बाळे । लागले तुला डोहाळे ॥७॥
-मंगला द. मुंडले (११/२/१९६६)
डोहाळे – २
वर दिलेली डोहाळ्यांची रचना पारंपरिक असावी. कारण त्याच चालीवर आईने दोनतीन तरी डोहाळे रचले होते. पण खालील रचना वेगळ्याच बाजात आहे.
आईच्या बर्याच रचना मी तिच्या तोंडून गाइलेल्या ऐकल्या होत्या. पण ही रचना मात्र त्याला अपवाद आहे. तेव्हा माझ्या समजुतीनुसार मी त्याची चाल लावून दंडाने यति दाखवल्या आहेत.
आवडे काय तुज बाळे । मज सांगे । झडकरी ॥धृ.॥
(चाल बदलून) आणू का । शालू तुज नवा । रंग पारवा । मोर वरि हवा ॥
नको हा बाई । आणू का । अंजिरी ॥१॥
(चाल बदलून) आवडे । तुला ना जर । सांग मज तर । हवी का बरं ॥
रेशमी साडी । रंगाची । केशरी ॥२॥
(चाल बदलून) मांडिला । पाट चंदनी । ताट ठेवुनी । नक्षी बाजुनी ॥
रेखिली छान । बोटांनी । कंगरी ॥३॥
(चाल बदलून) भोजनी । थाट बघ गडे । जिलबीचे कडे । बटाटे वडे ॥
खिचडी खिरी नाना । भजी फेणी । कुरकुरी ॥४॥
(चाल बदलून) नेउका । फिराया तुला । जाऊ दिल्लीला । देश बांगला ॥
पाहू नेपाळी । दरीखोरी । काश्मिरी ॥५॥
(चाल बदलून) तुज हौस । बांधू मंदीर । वनी मंदार । झुळझुळे नीर ॥
विनायक मूर्ती । त्यामधली । शेंदरी ॥६॥
(चाल बदलून) हे सर्व । बोलाची कढी । धरू नको अढी । कौतुका खडी ॥
देत परी बाई । शब्दांची । भाकरी ॥७॥
(चाल बदलून) आमुचा । देव गणपती । देवो तुजप्रती । पुत्र संतती ॥
म्हणुनी मी वंदी । जोडुनिया । दो करी ॥८॥
-मंगला द. मुंडले
शीर्षकावरील चित्र श्रेय – sukanyaevents.com
Hits: 32
इतके छान डोहाळे ऐकल्यावर पहिलटकरणीला कृतकृत्य झाल्यासारखे नाही वाटले,तरच आश्चर्य !
अप्रतिम कल्पनाशक्तीचा बाज.