बडबडगीते
आईने रचलेली काही बडबडगीते इथे मांडली आहेत. यातील छोटी बडबडगीते लहानग्यांसाठी तर मोठी बडबडगीते थोड्या मोठ्या मुलांना भावतील.
या बडबडगीतांतून काय साध्य होते असा कोणालाही प्रश्न पडेल. ही गाणी ऐकताना बालमंदिरातील मुलांना यमकातील चमत्कृती भावेल. तर प्राथमिक शाळेतील मुलांना यमक जुळवणारे शब्द जोडता जोडता गोष्ट उभी राहाते ते आवडेल. दोन्ही गोष्टी मुलांच्या शब्दसंग्रह विकासाला तसेच भाषिक विकासाला साहाय्यक असतील. माझे मत माझ्या मर्यादित अनुभवावर आधारित आहे. कुणी सांगावे, एखादा कल्पक शिक्षक याहूनही अधिक काही उपयोग शोधू शकेल.
बडबडगीते- छोटी
ऊन पाऊस थंडी
उन्हाळी वारा । घामच्या धारा । पंख्याचा वारा । घेऊया घेऊया ॥१॥
पावसाच्या धारा । पडती गारा । जाउन भरभरा । वेचूया वेचूया ॥२॥
खूप खूप थंडी । अंगात बंडी । आईची मांडी । बैसाया बैसाया ॥३॥
- मंगला द. मुंडले
वेणू आणि रेणू
एक होती वेणू । तिची मैत्रिण रेणू ॥
दोघी मिळून लागल्या । एक स्वेटर विणू ॥
- मंगला द. मुंडले
झोपाळा
शिसवी काळा काळा । बनविला झोपाळा ॥
वर बस गोपाळा । कंठी मोती माळा ॥
पायी घुंगुरवाळा । हाती घेई खुळखुळा ॥
वाजवतो कसा । “खुळखुळ” खुळा ॥
- मंगला द. मुंडले (२७/३/१९८३)
बडबडगीते मोठी
पावसाचे बडबडगाणे
सर सर सर सर
सरसर आली पावसाची सर । मुलांना आली खेळायची लहर ॥१॥
मुले जमली अंगणात । खेळू लागली रिंगणात ॥२॥
खेळता खेळता तोंडाने । पावसाला करती बोलावणे ॥३॥
पावसा पावसा येरे । तुला खाऊ देतो रे ॥४॥
मुलांचे ऐकून बोलावणे । पाउस आला जोराने ॥५॥
पाउस आलेला पाहून । आई आली धावून ॥६॥
आईला पाहून दारात । मुले पळाली घरात ॥७॥
पळता पळता म्हणती पावसा । खाऊ देतो थांब जरासा ॥८॥
खाऊ तुला कसा हवा । लेमन गोळी की मऊ हलवा ॥९॥
खाऊ घेऊन जा घरी । पुन्हा पाठव तुझ्या सरी ॥१०॥
सरी पाठव दुपारी । आई नि बाबा नसतील घरी ॥११॥
खूप मिळेल खेळायला । ओले चिंब व्हायला ॥१२॥
ताई दादा ओरडणार । त्यांचं नाही ऐकणार ॥१३॥
पावसाचं गाणं संपलं । सांगा कुणाला आवडलं ॥१४॥
- मंगला द. मुंडले (२८/९/१९६२)
बक्षिशी
अमी आणि अनु । सई आणि चिमू ॥
यांना बोलावी कमू । म्हणे “आपण श्रमू” ॥
आली ताई नमू । म्हणे “नका रमू ॥
येइल आपला गणू । लागेल बागेत खणू ॥
आपण रोपे मिळवू । सारी ओळीने लावू ॥
रोज राखू निगा । बहरून येतिल बघा ॥
फुलांचा करू गजरा । लावू देवाच्या मखरा ॥
वेधुन घेइल नजरा । मिळेल आनंद खरा ॥
आई बाबांची खुशी । हीच आपली बक्षिशी ॥
- मंगला द. मुंडले (१९९१)
शहाणा ससा
एक होता ससा । तो आईला बोले कसा ॥
“आई आई” । “मी शाळेला जात नाही” ॥
आई म्हणाली “का रे बंडी?” । “कारण आज आहे थंडी” ॥
“अंगात घालिन बंडी” । “शाळेला मारिन दांडी” ॥
पण इतक्यात आली शाळेची गाडी । आईने हातावर दिली वडी ॥
सशाने धरली डब्याची कडी । आणि पकडली गाडी ॥
शाळेजवळ आली गाडी । शिपायाने उघडली कवाडी ॥
सशाने मारली उडी । पळत गाठली दिंडी ॥
शाळेत लावली होती भेंडी । ती खात होती मेंढी ॥
सशाने गाठली माडी । तिकडून आणली छडी ॥
टुणकन् मारली उडी । मेंढीला मारली छडी ॥
मेंढी गेली पळत । ससा बसला बघत ॥
सशाचा पाहुन धीटपणा । बाई म्हणती “ससोबा शहाणा” ॥
मंगला द. मुंडले
तिलूचे गाणे
एक होती तिलू । तिची बहीण शिलू ॥
दोघी गायल्या राग पिलू । तेव्हा नाग लागला डोलू ॥
मग पृथ्वी लागली हालू । आणि जहाज लागलं चालू ॥
त्याचा कप्तान भालू । त्याची बायको मालू ॥
नेसली होती शालू । तिला लागलं कलकलू ॥
त्यांचा नोकर झिलू । लगला वारा घालू ॥
प्रफुल्ल झाली मालू । बोलू लागली गुलुगुलू ॥
जशी रात्र लागली कलू । वारा वाहे झुळझुळू ॥
कमळे लागली खुलू । फुले लागली फुलू ॥
पाखरे लागली किलबिलू । धावले कोंबडीचे पिलू ॥
किनार्यावर होती वाळू । वाळूत भोपळीचा वेलू॥
वेलात अडकले पिलू । ते लागलं कलकलू ॥
पिलाची मालकीण निलू । म्हणे वाल सोलू ॥
तिच्याच होत्या मुली ।तिलू अन् शिलू ॥
तिने हाक मारली । तिलू लगेच धावली ॥
गाणे गायची थांबली । आमची गोष्ट संपली ॥
- मंगला द. मुंडले
“त्रे”ची गाडी
शामराव शिंत्रे । स्वभावाने भित्रे ॥
नेसती धोतरे । बोलती तोतरे ॥
खाती संत्रे । हाताळती यंत्रे ॥
लिहिती पत्रे । म्हणती स्तोत्रे ॥
घरावर पत्रे । दारात कुत्रे ॥
मामा छत्रे । जावई पित्रे ॥
शेजारी अत्रे । मित्र म्हात्रे ॥
असे आमचे । शामराव शिंत्रे ॥
- मंगला द. मुंडले
पप्पूराव
पप्पूराव वडके । फारच रोडके । नाक त्यांचे बसके । उंचीने बुटके ॥
स्वभावाने चिडके । बोलतात लटके । चालतात तिरके । खातात फुलके ॥
वाचतात पुस्तके । राहातात नेटके । पैशाने कडके । उडवतात फटाके ॥
देतात धक्के । मारतात बुक्के । गाव त्यांचे घोडके । घर त्यांचे पडके ॥
घरात होते मडके । ते होते गळके । मडक्यात फडके । फडक्यात वाळके ॥
त्यांचे होते होडके । त्यात ठेवले ढोलके । पप्पूराव बसले हलके । वाजवू लागले ढोलके ॥
ढुम् ढुम् ढुमाक्क । ढुम् ढुम् ढुमाक्क । ढुम् ढुम् ढुमाक्क । ढुम् ढुम् ढुम् ॥
- मंगला द. मुंडले
Hits: 36
सुंदर आहेत