मंगल-गीत – आईच्या कविता
माझी आई मंगला दत्ताराम मुंडले (१९२४ – १९९५), हिला शिक्षणात रुची होती. तिला भाषा आवडत. व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा आटपल्यावर तिच्या शिक्षकांनी तिला “तू पुढे इंग्रजीही शीक” असे प्रोत्साहनही दिले होते. ते लक्षात ठेवून आईने इंग्रजीचा अभ्यासही सुरू केला. पण घरच्या गरिबीने तिला “व्हफा पास” च्या पुढे जाता आले नाही. आई होतकरू विद्यार्थिनी होती. शेजारी तिच्या शाळेची फी भरायला तयार होते. पण शिक्षण घेताना फी खेरीज अन्य खर्चही असतात आणि फी माफ झाली तरीही आपल्याला शिक्षण परवडणार नाही याची आईला कल्पना आली. तेव्हा शिवणकाम व भरतकाम शिकून ती घराला हातभार लावू लागली.
तिने मुलांच्या शिक्षणात आनंद शोधला. शाळेत परीक्षेचा निकाल लागला की लवकरात लवकर पुढच्या वर्षीची पाठ्यपुस्तके घरी येत. मराठीचे पुस्तक गोष्टीच्या पुस्तकाप्रमाणे आईबरोबर वाचले जाई. आईवडिलांना गाण्याचेही अंग होते. त्यामुळे मे महिन्यातच कवितांना चाली लावून त्या गायल्याही जात. पण आईची भाषेची आवड भागवायला हे पुरेसे नव्हते.
१९६० च्या सुमारास आमच्या शेजारी दांडेकर कुटुंब राहायला आले. पाककृतींची देवाणघेवाण, गप्पाटप्पा करता करता आईला कळले की दांडेकर आजी कवने करतात, ओव्या रचतात. आई “व्हफा पास” होती. दांडेकर आजींना तर लिहिताही येत नव्हते. त्या आपण रचलेली कवने पाठ म्हणत असत. दांडेकर आजींकडून आईला स्फूर्ती मिळाली, आणि तिचा काव्यप्रवास सुरू झाला.
ती ज्या वातावरणात वाढली त्यानुसार आईने असंख्य स्त्रीगीते रचली – जसे की ओव्या, डोहाळे, विहिणी, पाळणे, मंगलाष्टके, उखाणे इ. कुटुंबात वा नातेवाइकांत काही मंगल घडले की ती आशीर्वादही कवितेतून देई. तिच्या नातवंडांसाठीही तिने कविता रचल्या. त्यात बालगीते, बडबडगीते, शाब्दिक कोडी, प्राणिगीते, इतकेच नव्हे तर एक ते वीस पाढ्यांवर रचलेली गीतेही होती. प्रौढ कविता केल्या, विडंबनासारखे प्रकारही तिने हाताळले. मात्र तिच्या स्वभावानुसार सार्याच कविता सुसंस्कार करणार्या वा उजळवणार्याच होत्या.
आपल्या कवितांना कोणीतरी दाद द्यावी असे प्रत्येक कवीला वाटत असते. तिलाही वाटे. मग शेजारपाजारच्या कविताप्रेमी गृहिणींच्या काव्यवाचनाच्या बैठका, परिचित काव्यप्रेमींशी पत्राने कवितांची देवाणघेवाण चाले. वडिलांनी तिच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याचे प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. आई ज्या परंपरेतून आली तीनुसार आईने छंदोबद्ध गेय कविताच रचल्या. आजच्या मुक्तछंदाच्या जमान्यात त्या कवितांना कितपत मागणी आली असती हे ठरवणेही तसे कठीणच.
पण इंटरनेटने जी संधी उपलब्ध झाली आहे, ती साधून तिच्या निवडक कविता प्रकाशित करीत आहे. आईचे नाव मंगला. म्हणून या संग्रहाचे नाव मंगल-गीत.
Hits: 89
प्रिय शाहू दादा,
नमस्कार,
आताच मुंडले काकूंनी केलेल्या काही कविता वाचण्यात आल्या. ये परतुनी ये हे विडंबनात्मक काव्य तर अफलातूनच. आम्ही त्यांना कुसुमताई म्हणत असू. त्यांच्या तोंडून अनेक कविता ऐकण्याचे भाग्य मला लाभले. पण त्या वयात त्या कवितांचे आकलन होणे शक्य नव्हते. आज ह्या संकेतस्थळावर त्यांच्या काही कविता वाचण्याचा योग आला. आणि आज कळले की कवियत्री म्हणून कुसुमताई किती महान होत्या.
मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की कै. कुसुमताई आणि बापू यांचे संस्कार त्या बालवयात माझ्यावर झाले. बापूंनी गायलेली गणपतीची आरती ” जय जय गणपती, गुणपती कुलदेवी ” ही अजूनही कानात रुजते आहे.
जसजसा वेळ मिळेल तेव्हा तुझ्या संकेतस्थळावरील सर्व लिखाण वाचून काढायचा मानस आहे. ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा!!
बाय द वे… संकेतस्थळाचे नाव देखील तुझ्या व्यक्तिमत्त्वाला अगदी चपखल लागू पडते. VISDOM… क्या बात है.
धन्यवाद निखिल,
आई-वडिलांची पुण्याई मलाही अजून लाभते आहे.
अलीकडे लोकांना छंद, वृत्तं वगैरेंची काहीही माहिती नसते. यमक सुध्दा सांभाळत नाहीत. गद्य उताऱ्यातली वाक्यं एकाखाली एक लिहिली की त्यांची कविता तयार होते आणि त्यांची मित्रमंडळी त्यांना ‘शीघ्रकवी’ म्हणून डोक्यावर घेतात.
अशा परिस्थितीत छंद /वृत्तबद्ध मंगल गीतांनी मोठाच आनंद मिळतो.
धन्यवाद. आणखी बर्याच कविता टंकून झाल्या आहेत. येत्या काही आठवड्यात त्या या स्थळी टाकीन म्हणतो.
प्राणि गीते आवडली. ह्यात बाराखडी प्रमाणे खूप अनपेक्षित विषयांवर दोन ते चार ओळींच्या ज्या कविता आहेत त्या खूपच मजेशीर आहेत
धन्यवाद गौरी. आणखी प्राणिगीते ही टाकणार आहे.
मी पारल्यात राहयला आल्यापासून मला भेटलेली पहिली आई, मुंडले काकु , आज त्यांची आठवण प्रकर्षाने झाली । आज मातृदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला हे माझे भाग्य ।
त्यांच्या कित्येक कविता मी ,त्यांनी गायलेल्या ऐकल्या आहेत ।खूप छान उपक्रम केला आहे शाहू तुम्ही । माझी ही इच्छा होती त्या कविता प्रसिद्ध व्हाव्यात । मनाला समाधान वाटले । 1982 चा काळ डोळ्या समोर सरकून गेला ।
अजून बर्याच कविता इथे देणार आहे. पुढील एक दोन महिन्यात सर्व कविता वेबसाइटवर येतील.