मंगलाष्टके
लग्न लागताना मंगलाष्टके म्हणणे हा महाराष्ट्रीय लग्नाचा अविभाज्य भाग आहे. ही मंगलाष्टके शार्दूलविक्रीडित अक्षरगणवृत्तात असतात. प्रत्येक चरण १९ अक्षरांचा व त्या १९ अक्षरांची लघु-गुरु क्रमवारीही ठरलेली. पारंपरिक चालीवर म्हणताना बरेचदा अवग्रह घेतल्याने या रचनेचे रूप कसे होते ते खाली दिले आहे.
माना ऽ वा ऽऽ समरा जनांस समरा ऽऽऽ तारा ऽ पता ऽऽ रापग
अशा चार बांधेसूद चरणांचे एक कडवे. मंगलाष्टक याचा अर्थ अशी चार चार चरणांची आठ कडवी म्हणायची. परंपरेनुसार प्रत्येक कडव्यानंतर शुभमंगल सावधान असा गजर करायचा !
गेल्या शतकाच्या प्रथमार्धात लग्नात मंगलाष्टके म्हणणे हा लग्न लावणार्या भटजींचा एकाधिकार असे. अष्टकातली आठही कडवी भटजीच म्हणत. आठही म्हणायची की कमी जास्त हेही भटजीच ठरवत. आजही या बाबतीत भटजींचाच शब्द अखेरचा असतो. ही बाब बरेचदा लग्न उभे राहाणे व मुहूर्तावर लागणे यादरम्यान उपलब्ध वेळ किती यावर अवलंबून असते. पूर्वी मुहूर्तवेळेला फार महत्व असे. लग्न उशीरा उभे राहिल्याने मुहूर्तावर लग्न लावताना मंगलाष्टके वा मंत्र म्हणायला कमी वेळ मिळत असेल तर आठ कडवी कशी म्हणणार? अशा वेळी लग्न लावताना जी घाई उडते तीच तर “तारांबळ”. लग्न लागताना “तदेव लग्नम् सुदिनम् तदेव, ताराबलम् चंद्रबलम् तदेव” असे विष्णूचे स्मरण करणारा श्लोक म्हणतात. तालासुरात पण घाईघाईने “ताराबलम्” म्हणताना त्याचे तारांबलम् होते व मराठीत त्याचे तारांबळ असे रूपांतर होते. असो !
स्वातंत्र्य आले, मराठी समाजाची आर्थिक स्थिती सुधारू लागली आणि हळू हळू विवाहविधीचा विवाह समारंभ होऊ लागला. समारंभात समाविष्ट होणारे नातेवाईक विवाहविधीतही भाग घेऊ लागले. त्यालाच अनुसरून वर किंवा वधू पक्षातील हौशी कवी-मंडळी मंगलाष्टके रचू लागली. हौशी गायक मंडळी ती नवनवी मंगलाष्टके म्हणूही लागली. नातेवाइकांपैकी कोणी प्रथितयश गायक असेल तर ते काम अर्थात त्यांच्याकडेच जाई. माझ्या चुलत भावाच्या लग्नात आर्. एन्. पराडकरांनी मंगलाष्टक म्हटलेले आठवते.
भटजींनी म्हटलेली मंगलाष्टके ठराविक असत – अष्टविनायकांचे किंवा, समुद्रमंथनातील चौदा रत्नांचे वर्णन, रामरक्षेचे भरतवाक्य अशीच काही. अजूनही ती तशीच असतात. त्यांचा वर-वधू किंवा विवाह-प्रपंच यांच्याशी काही संबंध नसतो. पण नवकवींनी रचलेली मंगलाष्टके वर आणि वधू यांचे व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करणारी, त्यांच्या नातेवाईकांचा (जसे की माता-पिता, भाऊ-बहिणी-भावजया यांचा), त्यांच्या प्रभावाचा उल्लेख करणारी, आणि प्रापंचिक जीवनाबाबत देता येईल तो सल्ला देणारी असतात. नातेवाइकांनी रचलेली मंगलाष्टके कौतुकाने छापून वाटलीही जातात. विवाहविधीचा समारंभ (नव्हे इव्हेंट) झाला की हे सर्व आलेच. अर्थात त्यातही एक आपुलकीचा गोडवा असतोच.
पारंपरिक मंगलाष्टक रचताना बर्याच नवकवींची दमछाक होत असते. (मी तर त्या विचारानेही थकून जातो, आणि त्या प्रयत्नातही पडत नाही) एक तर शार्दूलविक्रीडितासारख्या बांधेसूद पण पल्लेदार अक्षरगण-वृत्तात रचना करायची. त्यात बरीच विशेषनामे गोवताना कानामात्रेची ओढाताण होते. यतिभंग होतो. ते सहन केले तरी केवळ काही कडवी जमतात. सल्ला तरी किती आणि काय देणार? मंगलाष्टकाची एक-दोन कडवी रचेपर्यंत सामान्य कवींच्या प्रतिभेचा ओघ आटून जातो.
आजकाल बरेच मंगलाष्टक रचयिते वृत्ताऐवजी तुलनेने सोप्या अशा छंदबद्ध गीतस्वरूप रचना करतात. प्रत्येक चरणानंतर म्हणायचे “शुभमंगल सावधान” हे धृपद धरून रचलेली मंगलाष्टके बरेचदा ऐकायला मिळतात. बरेचदा या रचना काव्य म्हणूनही जास्त सुबक असतात. पण त्याला शार्दूलविक्रीडितात रचलेल्या मंगलाष्टकाचा मझा नाही. आणखी पन्नास वर्षांनी मुक्तछंदातली मंगलाष्टके पाहायला व ऐकायला मिळाली तर नवल वाटू नये. १९६०च्या दशकात विवाहप्रसंगी वर, वधू, त्यांचे नातेवाईक यांची छंदबद्ध वा मुक्तछंदातली मनोगते छापील संग्रहरूपात वाटलेली मी पाहिली आहेत. पण एक भाषिक व सामाजिक परंपरा जपण्यासाठी म्हणून शार्दूलविक्रीडितात रचलेली मंगलाष्टके प्राधान्याने म्हटली जावीत असे माझे व्यक्तिगत मत आहे.
आईला कवितेची आवड असल्याने लग्नात मिळालेली बरीच मंगलाष्टके तिने जपून ठेवलेली होती. त्यातल्या तीनच रचना, ज्यांचे सुबकपण मला भावले, त्या इथे सादर करीत आहे. त्यातली एक पन्नासहून अधिक वर्षे जुनी, तर दोन रचना साठहून अधिक वर्षे इतक्या जुन्या आहेत. साठ वर्षे जुन्या दोन्ही रचना एकाच लग्नातल्या आहेत. या दोहोपैकी आठ कडव्यांची माधव पाडगावकर यांची रचना तर सर्वार्थाने मंगलाष्टक या नावाला शोभणारी, आणि रसग्रहण करण्यालायक आहे. (याच कवीची अजून एक रचना इथे पाहा) एकाच विवाहात दोन ताकदीच्या कवींनी इतकी सुबक मंगलाष्टके रचावी हेही विलक्षणच.
रसभंग न व्हावा म्हणून ही मंगलाष्टके जशी आहेत तशी, विशेषनामे व व्यक्तिनामे न वगळता, दिली आहेत. कवीचे नावा व्यतिरिक्त अन्य कुठलेच तपशील न दिल्याने, केवळ कवी, उल्लेखित व्यक्ती, किंवा त्या विवाहसमारंभात सहभागी व्यक्ती अगर त्यांचे परिचित नातेवाईकच त्या व्यक्ती वा समारंभ ओळखू शकतील. यात त्या व्यक्तींचे खाजगी आयुष्य सार्वजनिक लिखाणात मांडल्याचा आक्षेप कोणी घेईल तर त्याबद्दल आगाऊ क्षमायाचना करतो. आणि या सुबक मंगलाष्टक रचनांचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो.
विश्वास द. मुंडले
आशिर्वाद
संतोषे फुलल्या लता तरु तसे आता वसंतागमी ।
वैशाखी दिन शुक्र हा तिथि असे शुक्लातली पंचमी ॥
नीलाक्षी वधु आज ती वरि उषादेवी रवींद्रावरा ।
विद्वद्रत्न वरा सुविद्य वधु ही रम्या युती सुंदरा ॥१॥
बाला ही रमणीच सूरमणि ही संज्ञाच शोभे तिला ।
सारंगी-स्वरमौक्तिके गुफियली ती रत्नमाला गळा ॥
विद्यारत्न रसज्ञही वर तसा भाग्ये तिला लाभला ।
वाटे धन्य सुयोग हा समसमा आम्रासवे कोकिला ॥२॥
माता ती सुमती सरोज भगिनी ती माधुरी हासरी ।
बंधू प्रेमळ ते प्रकाश रविही संतोषले अंतरी ॥
संतोषे रघुनाथ हा तव पिता तो धन्य झाला असे ।
झाले धन्यच मातृ-पितृ-भगिनी-बंधू गुरूही तसे ॥३॥
कन्या तू नवचंद्रिका जशि नभा शोभाहि जोशी कुळा ।
होवो कीर्तिकला पतिगृही तशी वृद्धिंगता उज्वला ॥
सेवा नम्र घडो करात कर ते विद्या कलारंजन ।
नांदा प्रेमभरे सदैव तुमचे होवो सुखी जीवन ॥४॥
वि. ग. धारप (महाड)
मंगलाष्टक
ज्याची गोड स्मृती करी युवतिसी सानंद अन् लाजरी ।
येता ती घटि गोड मंगल परी होते वधू बावरी ॥
जाया उत्सुक ती अती पतिसवे सोडूनि पितृगृहा ।
माया बंध परी तिला अडवुनी सांगीत थोडी रहा ॥१॥
माता आणि पिता सचिंतचि सदा येता सुता यौवनी ।
होती हर्षभरा मिळे वर बरा पाहूनि त्या लोचनी ॥
येता लग्नघटी सचिंत भरुनी येई गळा सद्गदा ।
नाही अन्य घटी सुतेस पितरां आनंद अन् दुःखदा ॥२॥
आली आज घटी सुमंगल अती नारायणा मालती ।
वरिते अर्पुनि प्रीति-गुच्छ सुमना हृन्मंदिरा त्याप्रती ॥
झाला आज तुम्ही गृहस्थ-गृहिणी प्रणयासनी बैसुनी ।
प्रीतीची फुलबाग गोड उभवा जी देत संजीवनी ॥३॥
भाई
मंगलाष्टक
श्रीशांता नरसिंह सांइ अवघ्या देवादिकांची दया ।
मंगेशात्मज-रामचंद्रतनया जोडी जमे लीलया ॥
धीरोदात्त सुमेरुनंदनि जशी लाभे शिवा पार्वती ।
तैशी रामसुता मिळे गुणवती ‘नारायणां’ ‘मालती’ ॥१॥
वाजंत्री सनई सुरेल झडतो दारावरी चौघडा ।
वार्याने उडती ध्वजा, उभविल्या रंगीबिरंगी गुढ्या ॥
द्वारी शिंपुनि शुद्ध गोमय सडा रंगावली रेखिली ।
पद्मे, स्वस्तिक, शंख, चक्र नि गदा रंगात रेखाटली ॥२॥
अंगाला हळदी सुरेख पिवळी मंडोळि डोईवरी ।
कुंकाच्या भरले तसे मळवटा दैदीप्य भाळावरी ॥
नेत्री उत्कटता प्रतीक्षित घटी ये मीलनाची अता ।
दो जीवांस मिळे सुखान्त मधुरा अद्वैत एकात्मता ॥३॥
काही अद्भुत होउनी गमतसे साकारली स्वप्निमा ।
अंतःकक्ष दुभंगुनी अवतरे दिव्या प्रभा-नीलिमा ॥
स्वान्ती गोड अनोळख्या नवनव्या भावोर्मि फेंसाळती ।
जादूची दुनियाच की प्रकटली भासे मना संप्रती ॥४॥
ज्येष्ठाचा महिना सुमंगल तिथी, षष्ठी मघा तारका ।
शुक्राचा शुभ वार हर्षण तसा हा योगही नेमका ॥
पुण्यापुण्यबळे मुहूर्त घटिका ऐशी अता येतसे ।
माला घेउनि ‘मालती’ निजकरी ‘कांता’स अर्पीतसे ॥५॥
गुंफोनी कर टाकिली उभयतां ती पाउले सातदां ।
साक्षात्कार परस्परां उभयिंच्या हो पावलांचा तदा ॥
जावे संगति पावलावर पुढे पाऊल ठेवोनिया ।
तेणे जीवनिं सौख्य प्रीति विपुला लाभेल यदृच्छया ॥६॥
संसारात पडे सुखैव पहिले पाऊल निर्णायक ।
गम्यागम्य मनांत भाव तरती एकेक उन्मादक ॥
दृष्टीला नवखा दिमाख चढला उन्मेष अंगी भरे ।
निर्मू स्वर्ग दुजा अशी विजिगिषा बाहूंमधे प्रस्फुरे ॥७॥
वैषम्यास वजा करा, मिळवणी ती जाणिवेची हवी ।
दायित्वास समान भागुनि गुणा प्रीतीस आस्था नवी ॥
सामावे गणितात या सफलता संसारिची वास्तव ।
ही ‘नारायण-मालती’ प्रभुवरा जोडी चिरायू भव ॥८॥
माधव पाडगावकर
या पोस्टच्या शीर्षकावरील चित्राचे श्रेय lagnachitayari.in
Hits: 46
खूप माहिती मिळाली. धन्यवाद
विश्वास… लेख आवडला… मस्त.. छंद व वृत्त यांची जाण असली तरच अशा रचना होऊ शकतात.. त्यासाठी वाचन आणि श्रवण अत्यावश्यक