आम्स्तर्दामचा खलाशी
आल्कमार हे डच गलबत मसाल्याचे पदार्थ आणि अन्य किंमती सामान घेऊन जावा मधून परतत होते. साउदम्प्टन बंदरात त्या गलबताचा मुक्काम पडला, आणि सर्व खलाशांना बंदरात उतरायची परवानगी मिळाली. त्यांच्यातलाच एक होता हेंड्रिक वेर्श्टेग ! उजव्या खांद्यावर एक माकड, डाव्या खांद्यावर एक पोपट आणि हातात भारतीय कापडाच्या ठाणाचा एक गट्ठा असे सारे घेऊन ते विकण्यासाठी तो निघाला.
ती वसंत ऋतूची सुरुवातच होती पण अजूनही दिवस तसा लवकरच मावळायचा. हेंड्रिक वेर्श्टेग धुक्याने भरलेल्या आणि गॅसच्या बत्त्या पेटत असूनही अंधारलेल्या त्या रस्त्यातून व्यवस्थित चालत होता. त्याच्या डोक्यात विचार सुरू होते – पुढच्या आम्स्तर्दामच्या मुक्कामाचे, तीन वर्षे न भेटलेल्या आईबद्दलचे – आणि मोनिकेंदाम येथे त्याची वाट पाहणार्या त्याच्या वाग्दत्त वधूबद्दलचे. त्याच वेळी बरोबर आणलेले प्राणी आणि अन्य विदेशी मौल्यवान सामान विकून किती पैसे मिळतील याचा हिशोबही चालला होता.
Above Bar रस्त्यावर एक इसम नेमका त्याच्यासमोर उभा ठाकला अन् त्याच्याकडे असलेल्या पोपटाला कोणी गिर्हाईक मिळाले आहे का असे विचारू लागला.
“हा पक्षी आहे ना” , तो सांगू लागला, “तो माझ्या कामाचा आहे. मी जरी काही बोललो नाही तरीही माझ्याशी बोलणारे कोणीतरी मला हवे असते. मी अगदी एकटाच असतो ना !” बहुतेक डच खलाशांप्रमाणे हेंड्रिक वेर्श्टेग इंग्रजी बोलत असे. त्याने त्या पक्षाची किंमत सांगितली आणि गिर्हाईक पटवले.
“या माझ्या मागोमाग”, त्या ग्राहकाने म्हटले. “मी खूप दूरवर राहतो. माझ्या घरच्या पिंजर्यात तुम्ही तुमच्या हाताने हा पोपट ठेवा. तसेच तुमच्या हातातले तागेही मला उघडून दाखवा. कदाचित मला त्यातलेही काही घ्यायला आवडेल!” चांगला सौदा पटल्याने खूश झालेला हेंड्रिक वेर्श्टेग “ह्याला आता हे माकडही कसे विकता येईल” असा विचार करीत आणि त्या माकडाचे गुणगान करीत करीत त्या इसमाबरोबर जाऊ लागला.
“हे माकड आहे ना ते अगदी दुर्मिळ जातीचे आहे बर का! आणि या जातीची माकडे अशी आहेत, की इंग्लंडमधील हवामानामधे चागला टिकाव तर धरतातच पण शिवाय आपल्या मालकाला खूप लळाही लावतात.”
पण तो इसम काही प्रतिसाद देत नव्हता, जणू काही तो हेंड्रिकचे बोलणे ऐकतच नव्हता. परिणामी हेंड्रिकचे बोलणे वायाच जात होते. म्हणून त्याने बोलणेच थांबविले. पुढचा सारा वेळ ते बरोबरीने चालत होते, पण अगदी निमूट. उष्णकटिबंधीय जंगलातून बाहेर येऊन एकाकी पडलेले ते माकड रस्त्यातील धुक्यामुळे घाबरून जाऊन तान्ह्या बाळासारखे किरकिरू लागले, तर तो पोपटही पंख फडफडवू लागला.
तासाभराची चाल झाल्यावर तो इसम एकदम उद्गारला – “आता माझ्या घराच्या जवळ आलो बर का आपण !”
ते दोघे अगदी गावाबाहेर आले होते. गर्द झाडीतून मधेच केव्हातरी एखाद्या झोपडीच्या प्रकाशणार्या खिडक्या दिसत होत्या. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी फाटके आणि कुंपणे असलेली अनेक उद्याने होती, अन अधूनमधून दूरवरून समुद्रातील जलपरीची भयावह किंकाळीही ऐकू येत होती. एका कुंपणासमोर तो इसम थांबला, खिशातून एक किल्ल्यांचा जुडगा काढला, फाटक उघडले आणि हेंड्रिक आत आल्यावर त्याने ते फाटक लावून घेतले.
त्या आवारात आल्यावर हेंड्रिक खूप प्रभावित झाला. एका बागेच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले एक टुमदार छानसे घर मोठ्या कष्टाने त्याला दिसले, पण त्याच्या बंद दारातून प्रकाशाचा एक किरणसुद्धा बाहेर येत नव्हता. एक गप्प राहाणारा अनोळखी इसम, आणि निर्जन – निर्जीव वाटणारे ते घर, सगळेच खिन्न करून टाकणारे होते. पण तेवढ्यात हेंड्रिकला जाणीव झाली की हा इसम एकटाच राहतो आहे. ‘हे काहीतरी अपूर्व आहे!’ तो विचार करू लागला. आणि आपण फार श्रीमंत डच खलाशी नसल्याने ‘या अनोळखी इसमाकडे चोरी करावी का’ असा विचारही त्याच्या मनात डोकावला. पण लगेचच आपल्या मनात असा विचार आल्याबद्दल त्याला स्वतःचीच घृणा वाटू लागली.
“जर तुमच्याकडे आगकाडी असेल तर मला जरा उजेड दाखवता का?” घराच्या दाराच्या कुलुपात एक किल्ली घालत तो इसम म्हणाला. हेंड्रिकने त्याचे म्हणणे ऐकले, आणि दोघेही त्या घरामधे शिरताच त्या इसमाने एक दिवा आणून लावला, आणि काही क्षणात अत्यंत रसिकतेने सजवलेला एक दिवाणखाना प्रकाशमान झाला. हे सारे पाहून हेंड्रिकच्या जिवात जीव आला. हा अनोळखी माणूस आपल्याकडील बरेच कापड विकत घेईल असा अंदाज त्याने बांधलाच होता. दिवाणखान्यातून बाहेर गेलेला तो इसम परत दिवाणखान्यात आला तो हातात एक रिकामा पिंजरा घेऊनच.
“तुमच्याकडचा पोपट तिथे ठेवा. तो चांगला माणसाळेपर्यंत मी त्याला टांगून ठेवणार नाही. आणि तोपर्यंत मला काय पाहिजे आणि ते त्याने कसे बोलायचे हे सुद्धा त्याला समजलेले असेल.”
नंतर तो थरथर कापणारा पोपट ठेवलेला पिंजरा बंद करून त्या इसमाने हेंड्रिक च्या हातात दिवा दिला आणि त्याला सांगितले – “शेजारच्या खोलीत जाऊ या. तिथे एक मोठे टेबल आहे ज्यावर तुमचे कापडाचे तागे पसरून नीट पाहता येतील.” हेंड्रिकला ते पटले आणि तो त्या इसमाने दाखविलेल्या खोलीत गेला. अन लगेच मागचे दार बंद होऊन त्याच्या कुलुपात किल्ली फिरल्याचा आवाज त्याला आला. आता तो अडकला होता. अवाक् झालेल्या हेंड्रिकने दिवा त्या टेबलावर ठेवला आणि बंद झालेले दार ढकलून उघडण्याठी वळावे असा विचार करीत असतानाच एक आवाज ऐकून तो थांबला.
“एक पाऊल जरी उचललेस तरी मरशील रे खलाश्या !”
मान वर करून हेंड्रिकने पाहिले, तर छपराखाली भिंतीतल्या एका अज्ञात झरोक्यातून एक रिव्हॉल्व्हरची नळी त्याच्यावर रोखलेली होती. तो घाबरला आणि थांबला. मारामारीचा प्रसंग अजून आला नव्हता. पण जर तो येता, तर त्या परिस्थितीत त्याच्याकडील सुराच काय पण रिव्हॉल्व्हर सुद्धा त्याच्या काहीही कामाचे नव्हते. हेंड्रिकला आपल्या जरबेत ठेवून तो अनोळखी इसम झरोक्याच्या जवळ भिंतीमागे लपून त्याच्यावर लक्ष ठेवून होता, आणि त्या झरोक्याच्या समोरून रिव्हॉल्व्हर पकडलेला फक्त एक हात हलताना दिसत होता.
“मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक”, तो अनोळखी इसम म्हणाला, “आणि तसेच कर. मी सांगेन तसे जर तू केलेस तर तुला चांगला मोबदला पण मिळेल बरं का ! आणि खरं तर तुला दुसरा पर्याय सुद्धा नाहीये. मी सांगतो ते निमूटपणे ऐक नाहीतर कुत्र्यासारखा मारीन तुला. त्या टेबलाचा खण उघड. तिथे सहा गोळ्यांचे एक रिव्हॉल्व्हर आहे, ते घे.” डच खलाशाने त्या सर्व आदेशाचे अगदी नकळत पालन केले. त्याच्या खांद्यावरचे माकड भीतिने थरथर कापत आणि चीत्कारत होते.
तो अनोळखी इसम पुढे म्हणाला “खोलीच्या टोकाला एक पडदा आहे, तो ओढ.” पडदा ओढल्यावर हेंड्रिकला एका खणात एका खाटेवर हात पाय बांधलेले, तोंडात बोळा कोंबलेला अशा अवस्थेत हताश, निराश नजरेने त्याच्याकडे पहात पहुडलेली एक स्त्री दिसली.
“तिचे हात पाय सोडव, तो अनोळखी इसम उद्गारला, आणि तिच्या तोंडातला बोळापण काढ.”
त्या अनोळखी इसमाचा हुकूम अंमलात आणल्यावर, ती तरूण आणि अप्रतिम सुंदर स्त्री उठली आणि गुडघे टेकवून प्रकाशाच्या दिशेने पहात उभी राहिली आणि ओरडली – “हॅरी, हे तुझे खूपच चुकते आहे. मला भुलवून या हवेलीत तू आणलेस ते माझा खून करण्यासाठीच. पण तू भासवलेस मात्र असे की समेटानंतर नवलाईचा काही काळ आपल्याला इथे सुखाने घालवता येईल. मला असे वाटले की मी तुला माझी बाजू पूर्णपणे समजावून सांगितली आहे. जे झाले त्यात माझा काहीच दोष नव्हता हे तुला अखेरीस पटले आहे असे मला वाटले. हॅरी, हॅरी मी निर्दोष आहे रे!”
“माझा तुझ्यावर विश्वास नाही”, निर्विकारपणे तो अनोळखी इसम म्हणाला.
“हॅरी मी निर्दोष आहे”, घुसमटलेल्या अवाजात ती तरुणी म्हणाली.
“हे तुझे अखेरचे शब्द असणार आहेत. मी ठेवीन ते काळजीपूर्वक लक्षात. आयुष्यभर मला ते आठवत राहतील”.
आणि मग तो अनोळखी आवाज थोडासा कापला पण लगेच तो कठोरही झाला. “मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो”, तो म्हणाला. “जर मी तुझ्यावर कमी प्रेम करीत असतो तर मीच तुला ठार करून टाकले असते. पण मला ते शक्य नव्हते कारण मी तुझ्यावर प्रेम करतो”.
“ए खलाशा, आता मी दहा आकडे मोजेपर्यंत एक गोळी या बाईच्या डोक्यात घातली नाहीस, तर तू तिच्या पायाजवळ मरून पडशील. एक, दोन, तीन ” आणि त्याने चार म्हणण्यापूर्वीच, गोंधळून गेलेल्या हेंड्रिकने, तोपर्यंत गुडघ्यावर बसून त्याच्याकडे टक लावून पाहाणार्या त्या तरुणीला एक गोळी घातली. ती तरुणी तोंडावर पडली. गोळी तिच्या कपाळात लागली होती. आणि लगेचच त्या झरोक्याच्या बाजूने सूं सूं करत आलेल्या एका गोळीने त्या खलाशाच्या उजव्या कानशिलाचा वेध घेतला. तो टेबलाच्या बाजूला कलंडला आणि त्याचे माकड घाबरून किंचाळत त्याच्या अंगरख्यात लपण्याचा प्रयत्न करू लागले.
***
दुस-या दिवशी साउदम्प्टनच्या अगदी टोकाला असलेल्या त्या घरातून येणार्या विचित्र आवाजामुळे तेथून जाणार्या वाटसरूंनी पोलिसाना खबर दिली. आणि पोलिस सुद्धा दरवाजा तोडण्यासाठी ताबडतोब आले. आतमधे त्याना तो खलाशी आणि ती तरुणी यांचे मृतदेह सापडले.
ते माकड सुळ्ळकन् मालकाच्या अंगरख्यातून बाहेर पडले, आणि एका पोलिसाच्या नाकावर आपटले. माकडाने सर्वाना इतके घाबरवले की ते पुन्हा अंगावर येऊ नये म्हणून एक दोन पावले मागे सरत पोलिसाने त्याला एक गोळी घालून शांत केले.
न्यायालयाला कळवले गेले. ‘सदर तरुणीची हत्या करून नंतर खलाशाने आत्महत्त्या केली’ असे ‘स्पष्ट’ झाले. तरीसुद्धा सार्या घटनेबाबतची परिस्थिति काहीशी गूढच वाटत होती. काहीही अडचण न येता दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आणि हा प्रश्न सगळ्यानाच सतावत राहिला की आदल्याच दिवशी साउदम्प्टनच्या बंदरात आलेल्या त्या खलाशासोबत श्रीमति फिंगाल ही इंग्लंडहून आलेल्या एका जोडप्यातील तरुणी इतक्या दूरवरच्या एकाकी घरामधे कशी पोहोचली?
निर्णय घेण्यास उपयोगी अशी कोणतीच माहिती त्या घराचा मालक न्यायालयाला देऊ शकला नाही. सदर घटनेच्या आठच दिवस आधी ती जागा मॅन्चेस्टरच्या कोण्या एका कॉलिन्स नावाच्या इसमाला भाड्याने दिली होती, आणि आता तो इसम परागंदा झाला होता. सदरचा कॉलिन्स नामक इसम, चष्मिस असून त्याची लांब दाढी लाल रंगाची होती, आणि ती दाढी नकली असण्याची शक्यता होती.
लॉर्ड साहेब घाईघाईने लंडनहून आले. त्यांचे त्यांच्या पत्नीवर मनस्वी प्रेम होते आणि तिच्या वियोगाचे अपार दु:ख त्यांच्या वागण्यातून दिसत होते. इतर सगळ्यांप्रमाणेच हे काय आणि कसे झाले हे त्यांनाही समजत नव्हते. या घटनेनंतर केन्सिंग्टन येथील आपल्या व्हिलामधे फक्त एक मुका नोकर आणि एक वटवट्या पोपट यांच्या सोबतीने ते सा-या जगापासून अलिप्त राहू लागले.
त्या पोपटाची वटवट सुरुच आहे, “हॅरी मी निर्दोष आहे”, “हॅरी मी निर्दोष आहे” !
मूळ फ्रेंच लेखक: गियोम अपोलिनेर
गियोम अपोलिनेर (१८८0 -१९१८) हे मूळचे पोलिश. केवळ कथाकारच नव्हे तर कवी व नाटककार म्हणूनही ते फ्रेंच साहित्यात प्रख्यात आहेत.
अनुवादक रवींद्र हरि अभ्यंकर (B.Sc. (1974), M.A. (2005)) हा माझा पाटिविमधला वर्गमित्र. त्याने गेली ५0 वर्षे फ्रेंचचा व्यासंग केला आहे. या क्षेत्रात केवळ भाषाशिक्षक आणि अनुवादक म्हणूनच नव्हे तर फ्रेंच पाठ्यपुस्तकांचा लेखक/ संपादक इथपासून ते अभ्यासक्रमनिर्णेता अशी त्याने मजल मारली असली तरी तो अजूनही स्वतःला फ्रेंचचा विद्यार्थी मानतो. भाषा विसरून जाऊ नये म्हणून त्याने केलेले अनुवाद “केल्याने भाषांतर” या त्रैमासिकात प्रकाशित झाले आहेत.
शीर्षकासोबतचे छायाचित्र: क्युकेनहॉफ गार्डन, आम्स्तर्दाम, नेदरलँड (छायाचित्रकार रवींद्र हरि अभ्यंकर)
Hits: 99
फार छान गोष्ट, कथानक फार वेगळेच आहे, या गोष्टी वरून ओ हेनरी चा आठवण झाली
ही भय कथा दिसते,अनुवाद उत्तम जमला आहे. अभ्यंकरचे अभिनंदन.
आयरे म्हणतात ,तसे कथानक वेगळे आहे ,तरीपण खिळवून ठेवणारे वाटले .
खूप छान आणि वेगळे कथानक!! सुंदर अनुवाद !!
धन्यवाद. आपली प्रतिक्रिया रवींद्र अभ्यंकर यांनाा कळवतो.
Pushkaraj, thanks for the comment. You too can translate something …:-)