सॅम आणि टफी

साल १९६४. स्थळ – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान दिएगोजवळील किनारा. नौदलाच्या जहाजावर उभे डॉ. सॅम रिजवे विचारात पडले होते. “गेला कुठे हा टफी?” हळूहळू त्यांना काळजीही वाटू लागली. खरे तर अमेरिकी नाविक दलात टफी आणि तत्सम मंडळी अशा जोखमीच्या कारवाया करायला कितपत उपयुक्त ठरतील याबाबत सर्वच सेनाधिकारी साशंक होते. पण डॉ. सॅम निःशंक होते. त्यांनी टफीच्या कार्यक्षमतेची आणि सुखरूप परतण्याची हमी दिली होती. म्हणूनच अमेरिकी सैन्यदलातले शीर्षस्थ अधिकारी टफीच्या कारवाईचे प्रात्यक्षिक पाहायला आले होते. टफीने त्याचे नियोजित काम – समुद्रतळाशी विवक्षित ठिकाणी एक वस्तू ठेवणे – पूर्ण केल्याचा संदेशही आला. मग हा अजून का परतला नाही?

शंका रास्त होती. कारण टफी हा एक डोल्फिन होता. त्याचे आजवरचे प्रशिक्षण बंदिस्त जागेत झाले होते. पण आज तो आपले काम खुल्या महासागरात करणार होता. खोल महासागरात तो हरवला, की पळून गेला, ही शंका. अखेर डॉ. सॅमचा आत्मविश्वास खरा ठरला, आणि थोड्याच वेळात टफी बोटीला बांधलेल्या जाळ्यात विसावला. अमेरिकन नाविकदलात डोल्फिनच्या प्रवेशाची ही सुरुवात होती. डॉ. सॅम हे या मोहिमेचे शिल्पकार होते. आणि टफी हा त्यांचा लाडका डोल्फिन होता.

तसे पाहाता अमेरिकन नाविकदलाला १९५० सालापासूनच डोल्फिन या प्राण्याबद्दल कुतूहल होते, ते त्याच्या वेगाला साहाय्यक ठरणार्‍या बाह्य शरीररचनेमुळे. पाण्याखालून हवेत डागल्या जाणार्‍या क्षेपणास्त्रांची बाह्य रचना डोल्फिनच्या शरीररचनेवरून बेतण्याचा एक प्रकल्प तेव्हापासून सुरू होता. पण हा अभ्यास करता करता डोल्फिनच्या अन्य क्षमताही शास्त्रज्ञांच्या नजरेत भरल्या, जसे की चपळाई, ध्वनिलहरींद्वारा पाण्याखालची लांबवरची वस्तू शोधण्याची शरीरात अंतर्भूत अशी (SONAR) यंत्रणा, आणि सर्वात महत्वाची अशी विविध कौशल्ये शिकण्याची क्षमता.

या सगळ्यांचा अभ्यास करण्यात एक महत्वाची अडचण अशी की अभ्यासासाठी पाळलेले डोल्फिन काही महिनेच जगत. त्याकाळी डॉ. सॅम रिजवे हे पहारेकरी कुत्र्यांचे पशुवैद्य म्हणून काम करीत होते. नौदलाने एका डोल्फिनच्या शवचिकित्सेचे काम त्यांच्यावर सोपवले. पण त्याकाळी डोल्फिन या प्राण्याबद्दलची जीवशास्त्रीय माहिती फारच तुटपुंजी होती. डोल्फिन जगतात कसे हेही ठाऊक नव्हते. तेव्हा ते पटापट मरत यात काय नवल?

पण डॉ. सॅम यांनी या अज्ञानातून वाट काढायला सुरुवात केली. शवचिकित्सेतून त्या डोल्फिनला न्यूमोनिया झाल्याचे निदान त्यांनी केले. संपूर्ण अज्ञानावस्थेतले नौदल या पहिल्या ज्ञानकणाने प्रभावित झाले. त्यांनी डॉ. सॅम यांच्याकडे नौदलाने पाळलेल्या सर्वच डोल्फिनची जबाबदारी सोपवली. डोल्फिनबाबत तत्कालीन जीव-विज्ञानविश्वच अंधारात असताना हे काम फारच कठीण होते. पण डॉ. सॅम यांच्या संशोधनाधिष्ठित अंमलात त्या डोल्फिनदलाचे आरोग्य सुधारत गेले, आणि त्याचबरोबर डॉ. सॅम यांचे डोल्फिनसंबंधीचे ज्ञानही.

हे ज्ञान बहुपेडी होते. उदाहरणार्थ डॉ. सॅम यांनी शोधून काढले की माणसाप्रमाणे प्रत्येक डोल्फिनला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. त्यामुळेच, प्रत्येक डोल्फिनशी त्याच्या व्यक्तिमत्वाबरहुकूम वागावे लागते. सबब, पोलिसी कुत्र्याप्रमाणे प्रत्येक डोल्फिनला एक डोल्फिन-पालक (किंवा मोतद्दार) लागतो. मग त्यासाठी हॉलिवुडपटांत प्राणी हाताळणारे, समुद्री प्राण्यांच्या सर्कशीत काम करणारे यांना या प्रकल्पात डोल्फिन-पालक म्हणून नेमण्यात आले. त्यांच्या मदतीने डोल्फिनना विविध कामे शिकवण्यात आली – प्रथम बंदिस्त तलावात, नंतर बंदिस्त खाडीत, पुढे महासागरी किनार्‍याजवळ, आणि शेवटी खोल महासागरात. खुल्या समुद्रातील प्रशिक्षणाची सुरुवात वर वर्णिलेल्या टफीच्या प्रात्यक्षिकानंतर, म्हणजे १९६४ नंतरच झाली.

या प्रशिक्षणाखेरीज डॉ. सॅम यांनी डोल्फिनविषयक अनेक संशोधन प्रकल्प सुरू केले. त्यांच्या संशोधनाने एक एक करून डोल्फिनबाबतच्या अनेक गैरसमजुतींना फाटा दिला. उदाहरणार्थ, डोल्फिनला हवेतून श्वास घ्यावा लागतो. सबब हा प्राणी सतत पृष्ठभागाजवळच राहात असणार अशी एक समजूत होती. पण डॉ. सॅम यांनी शोध लावला की डोल्फिन समुद्रात ३०० मीटर खोल जाऊ शकतात. त्यासाठी ते आपला श्वास १० मिनिटे रोखू शकतात. या शोधानंतरच डोल्फिनद्वारा खोल समुद्रातील पाणसुरुंग, न फुटलेली क्षेपणास्त्रे व बॉम्ब शोधण्यासाठी एक प्रकल्प सुरू झाला.

विशेष गोष्ट ही की पृष्ठभागापासून ३०० मीटर खोल आणि परत हा प्रवास डोल्फिन फक्त काही मिनिटात पार करतात. मानवाला या प्रवासासाठी काही तास लागतील. कारण वेगाने वर आल्यास रक्तात विरघळलेला नत्रवायू रक्ताबाहेर पडून रक्तप्रवाह कुंठतो व मानवी पाणबुड्याचे मरणच ओढवते. खोल पाण्याच्या दाबाखाली डोल्फिनचे काय होते हे शोधण्यासाठी डॉ. सॅम यांनी प्रथम टफीला कॅमेरा चालवून सेल्फी काढायला शिकवले. त्यावरून कळले की इतक्या खोल पाण्यात डोल्फिनचे शरीर व छातीचा पिंजरा पार आक्रसतात. अशा तर्‍हेने फुप्फुसे बंद पाडून ते नत्रवायू रक्तात मिसळू देत नसावेत, व म्हणूनच झपाट्याने बुडी मारणे डोल्फिनना जमत असावे, असा एक अंदाज होता. पण हे सिद्ध करण्यासाठी डॉ. सॅम यांना श्वास रोधून बुडी मारलेल्या डोल्फिनच्या फुप्फुसातील हवेचे नमुने पाहिजे होते. तेही टफीनेच मिळवून दिले. त्यासाठी टफीने पाण्याखाली असताना आपल्या डोक्यावरील श्वासछिद्रामधून एका नळीच्या टोकात बुडबुडे सोडायला शिकणे आवश्यक होते. मजेची गोष्ट ही की टफीच्या पाठोपाठ त्यांनी जी नळी सोडली तिच्यात टफीने कुणीही न शिकवता चार बुडबुडे सोडले. जणू काही हे यंत्र का सोडले आहे हे माहितच होते.

बुडी मारल्यानंतर विविध वेळचे नमुने अभ्यासल्यावर कळले की केवळ तीन मिनिटानंतर डोल्फिनच्या फुप्फुसातील प्राणवायूचे प्रमाण २% इतके खाली उतरते. त्यापुढील, पाण्याखाली काढलेला सर्वच वेळ डोल्फिन अक्षरशः हवेशिवाय जगत असतात. त्यापोटी शरीरावर येणारा ताण टफीच्या चेहेर्‍यावर सॅमना दिसतही असे. पण तो सोसत टफीने विविध खोलीवर, विविध वेळानंतर डोल्फिनच्या फुप्फुसातील हवेच्या पृथक्करणाचा विदा मिळवून दिला.

अन्य एका अभ्यासप्रकल्पातून डॉ. सॅम यांनी असेही शोधून काढले की सतत पाण्यात राहायचे पण नियमितपणे हवेतून श्वास घ्यायचा, हे साधण्यासाठी डोल्फिनचा मेंदू सतत जागा असावा लागतो. म्हणून डोल्फिन वरकरणी झोपले तरी त्यांचा अर्धा मेंदू जागा असतो. पण शस्त्रक्रियेच्या वेळी पारंपरिक भूल दिली की त्यांचा संपूर्ण मेंदू झोपे, श्वास बंद पडे व डोल्फिन मरत. माणसाप्रमाणे स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारे डोल्फिन एकत्र ठेवले की भांडत, जखमी होत. मग त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागे. मग डॉ. सॅम यांनी डोल्फिनसाठी उपयुक्त असे श्वासोच्छ्वासक यंत्र बनवले आणि डोल्फिनसाठी भूलकारकांची मात्राही निश्चित केली. १९६७ सालातले डॉ. सॅम यांचे हे संशोधन हा डोल्फिनविषयक संशोधनातला मैलाचा दगड मानला जातो.

याच काळात वियतनाम युद्ध ऐन भरात आले होते. तिकडच्या कामरान्ह खाडीत अमेरिकन नौदलाचा दारुगोळा साठवून ठेवलेला होता. त्याच्या रक्षणासाठी युद्धनौका सतत गस्त घालीत असत. पण वियतकॉंगी गनीम पाणबुडे पाण्यात उतरून गस्ती नौका आणि युद्धनौकांवर चुंबकीय स्फोटके लावून स्फोट घडवीत. १९६७ च्या एका वर्षात असे ४२ स्फोट झाले तर १९६८ मध्ये १२७. सर्वाधिक भीषण स्फोटात २५ नाविक दगावले, तर २७ जखमी झाले. ॲडमिरल झुमवाल्ट यांना डॉ. सॅम रिजवे यांचा डोल्फिन प्रकल्प ठाऊक होता. अमेरिकी नौदलाने याच प्रकल्पात शिकवलेले डोल्फिन वियतनामी किनार्‍यावरील गस्तीच्या कामावर नेमले. हे डोल्फिन दोन प्रकारे उपयुक्त ठरले. पहिले म्हणजे त्यांचे प्रशिक्षण. किनार्‍यावरील पाण्यात कोणी माणूस उतरला की लगेच हे डोल्फिन एक बटण दाबून पहारेकर्‍यांना सूचना देत. त्याउपरही जर कोणी पुढे आलेच तर ते पहारेकर्‍याप्रमाणे अडथळाही करीत. हा दुसरा फायदा. ही योजना इतकी परिणामकारक ठरली, की डिसेंबर १९७० मध्ये असे ५ डोल्फिन गस्तीला उतरल्यावर ९ महिन्यात एकही स्फोट झाला नाही. १९८० च्या दशकातील इराण इराक युद्धात, तसेच २००३ मधील अमेरिकेच्या इराकवरील आक्रमणातही डोल्फिननी अशीच कामगिरी बजावलेली आहे. आता तर अणुपाणबुड्यांच्या रक्षणासाठीही डोल्फिन पहारेकरी तैनात असतात. (ले७)

आजही अमेरिकेत प्राणिमित्र व पर्यावरणवादी संघटनांच्या विरोधाला न जुमानता डोल्फिन प्रकल्प चालू आहे. फक्त डोल्फिनकरवी पाणसुरुंग शोधण्याचा प्रकल्प बंद करण्यात आला आहे, कारण ड्रोनद्वारे पाणसुरुंगांचा शोध घेण्याचा सुरक्षित पर्याय मिळाला आहे. पण डॉ. सॅम यांच्या मते डोल्फिन जीजी कामे करतात त्या सगळ्या कामांसाठी यांत्रिक पर्याय आणणे जवळजवळ अशक्य आहे. कारण डोल्फिनचे पाण्यातील वस्तू शोधण्याचे कसब, सफाईदार पोहोणे व चुटकीसरशी दिशा बदलू शकणे, हे तीनही गुण एकाच रोबो किंवा ड्रोन मध्ये मिळणे आजतरी अशक्य दिसते.

बदलत्या परिस्थितीत नवनवीन गोष्टी शिकण्याची डोल्फिनची क्षमता यंत्रात आणणे तर त्याहूनही कठीण. शिक्षणक्षमता हा गुण डॉ. सॅमना सर्वच डोल्फिनमध्ये आणि प्रकर्षाने टफीमध्ये दिसला. त्याच्या असल्या हुषारीची बरीच उदाहरणे आहेत. त्यापैकी, न शिकवता हवेचे नमुने देण्याचे उदाहरण वर दिलेच आहे. टफीच्या लघ्वीचा नमुना मिळवताना, पहिल्या खेपेला चौघांनी टफीला धरून ठेवावे लागले. मग डॉ. सॅमनी झटापट करून कॅथेटर (रबरी नळी) घालून नमुना मिळवला. पण टफी असा हुषार की त्यानंतर कधीही कॅथेटर दाखवली की टफी लघ्वी करून काम सोपे करे. एखादे काम (जसे पाण्यात तरंगणार्‍या रिंगमधून उड्या मारणे) हे किती वेळ करत राहायचे हे सुचवणारा “बीप” आवाज करणारा बीपर पाण्यात सोडलेला असे. टफी शिकवलेल्या कामांची आपण होऊन तालीमही करे. अर्थात तालीम करताना बीपर नसे. त्यावेळी टफी स्वतःच बीप बीप आवाज करत तालीम करे. (च८, ८५) डोल्फिनने पहारेकर्‍याला जागरूक करतानाच पहारेकर्‍याचेही काम करण्याचा उल्लेख वर केलाच आहे. थोडक्यात, डोल्फिनसारखे बुद्धिमान यंत्र बनवणे जवळजवळ अशक्यच.

डॉ. सॅम यांचे दुसरे निरीक्षण असे की माणसांनी शिकवलेली कामे करणे डोल्फिनना आवडत असले पाहिजे. नाहीतर त्याकडे पाठ फिरवून ते खुल्या समुद्रात पळून गेले असते. पण तसे काही घडताना दिसत नाही. याउलट, पाण्याखाली पडलेले क्षेपणास्त्र शोधण्याचे काम शिकवल्यावर टफीने ते खुल्या समुद्रात प्रथम करून दाखवले त्यावेळचा प्रसंग डॉ. सॅमना अजून आठवतो. मानवी पाणबुड्यांना खोल पाण्यातले क्षेपणास्त्र दाखवून दिल्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन टफी जे काही बागडला ते आठवून डॉ. सॅम आजही रोमांचित होतात. (च८)

डोल्फिन हा प्राणी मानवाप्रमाणे शिक्षणक्षम आणि बुद्धिमान ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण त्याची, आणि विशेषतः टफीची, वृत्तीही मानवसदृश असावी हे अनेक प्रसंगांतून दिसते.

टफी हा जितका हुषार तितकाच मनस्वी होता. प्रकल्पात सामील झाल्यावर त्याच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घ्यायला कोणी तयार होईना. कारण, खाऊ घालणार्‍या हाताला चावणे, पाण्यात उभ्या प्रशिक्षकाच्या नडगीवर फटका मारणे, त्याचा पाठलाग करून पळवून लावणे या सारखे प्रकार तो करी. शेवटी, प्रयोगशाळेत काम करणारी डेबी नावाची एक मुलगी आपणहून तयार झाली. आपले प्रयोगशाळेतले काम उरकल्यावर व सुटीच्या दिवशी ती टफीचे पालकत्व करी. टफीला खायला घालणे, खाऊच्या आमिषाने त्याच्या कपाळाला थोपटणे, सोबत पोहोणे, चेंडू आणणे आणि नंतर हे सर्व प्रकार कुठलेही आमिष न देता करणे या पायर्‍या ओलांडायला डेबी-टफी जोडगोळीला कित्येक आठवडे लागले. तरीही टफी डेबीला आपले पर, पोट वा शेपटीला हात लावू देत नसे. एकदा सोबत पोहोताना डेबीच्या रबरी सूटची झिप टफीच्या शेपटाला टोचली. तत्काळ उलटून टफी तिच्या हाताला चावला. हातावर अकरा दात उमटले. त्यातून रक्त गळू लागले, तरीही डेबी शांतपणे त्याला थोपटत राहिली. पण त्या दिवसानंतर टफी व डेबी यांचे इतके सख्य झाले की डेबीला टफीने अंगाला कुठेही हात लावायला परवानगी दिली. (च८, ७१-४) मग टफीला पट्टा बांधणे शक्य झाले. त्याचे प्रशिक्षण झपाट्याने पुढे सरकले.

पण टफीचा खट्याळपणा काही सरला नाही. डोल्फिनवरील डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण करताना टफीने डोळे झाकूनही वस्तू शोधण्याच्या क्षमतेचे शांतपणे पुनःपुनः प्रदर्शन केले. आणि यशस्वी चित्रीकरणानंतर पाण्याशेजारी उभ्या एका नटावर शेपटाने बादलीभर पाणीच उडवले. (च८,१०२)

उच्च शिक्षणासाठी डेबी वर्षाच्या आतच ही नोकरी सोडून गेली. पण सहा महिन्यांनी ती टफीला भेटायला आली, तेव्हा टफीने तिला लांबवरून ओळखले. बागडून आनंद व्यक्त केला. पण बागडणारा डोल्फिन हाच टफी हे तिला कळलेच नाही. कळल्यानंतर ती जवळ आली नि टफीने तिची चक्क गळाभेट घेतली. या हृद्य प्रसंगाचे वर्णन मुळातून वाचण्याजोगे आहे. (च८, १२७-८)

टफीचा खट्याळपणा, आनंद व्यक्त करणे, डेबी आणि टफीची मैत्री जमणे, त्यांची पुनर्भेट या घटनांमध्ये मला डोल्फिनमधील मानवसदृश भावभावनांचे प्रतिबिंब दिसते.

आजमितीला नव्वदीला आलेले डॉ. सॅम हे डोल्फिन व तत्सम प्राणिविषयातले द्रोणाचार्य मानले जातात. याही वयात, “डोल्फिनचे बोलणे आणि परस्पर-संवाद” यावर त्यांचे संशोधन चालू आहे. या बाबतीत अजून बरेच अज्ञान आहे असे त्यांचे मत आहे. (जा९) या विषयातील नव्या पिढीतल्या तज्ञांची अशी भावना आहे की असा डॉ. सॅम रिजवे पुन्हा होणे नाही.

हे द्रोणाचार्य डॉ. सॅम रिजवे मात्र अजूनही आपल्या लाडक्या शिष्याला, म्हणजेच टफीला, विसरलेले नाहीत. कारण, त्यांच्या मते असा टफी पुन्हा होणे नाही. (च८)

विश्वास द. मुंडले

Hits: 28

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *